घरफिचर्सचित्रमहर्षी भालजी पेंढारकर

चित्रमहर्षी भालजी पेंढारकर

Subscribe

भालजी पेंढारकर हे भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणार्‍या चित्रकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक आणि गीतकार होते. त्यांचा जन्म 2 मे 1898 रोजी कोल्हापुरात झाला. चाकोरीबद्ध शालेय शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुणवयातच कोल्हापूर सोडले. सुरुवातीच्या काळात पुण्यात केसरी या वृत्तपत्रात नोकरी, छत्रपती शाहूमहाराजांच्या रायबाग कॅम्पमध्ये वास्तव्य आणि सैन्यात भरती काहीशी अशी भटकंती करत ते कोल्हापूरला परतले. भालजी पुण्यात असताना त्यांनी केसरीचे अंक घरोघरी पोहोचवणे, विकणे अशी कामे केली; पण त्यातून उरलेल्या वेळात त्यांनी केसरीचे जुने अंक-विशेषतः लोकमान्य टिळकांचे जहाल अग्रलेख, चिपळूणकर, मोडक, विजापूरकरांच्या ग्रंथमाला, पुस्तके, चरित्रे असे साहित्य वाचले. त्यांच्यातल्या लेखकावर या सगळ्यांचे संस्कार झाले.

पुण्यातल्या ‘लक्ष्मी’ थिएटरचे व्यवस्थापक रुस्तमजी मोदी (सोहराब मोदींचे बंधू) यांनी त्या काळी मूकपटांच्या वरच्या भागात इंग्रजी उपशीर्षकांची मराठी भाषांतरे देण्याची पद्धत सुरू केली होती. भालजींना वर्तमानपत्रात स्फुटे लिहिण्याबरोबरच हे मराठी भाषांतराचे कामही मिळाले. पुढे त्यांनी सिनेमा समाचारमधून चित्रपटांची परीक्षणेही लिहिली. १९२१ मध्ये भालजींनी संगीत कायदेभंग, भवितव्यता, क्रांतिकारक, राष्ट्रसंसार, आसुरी लालसा आणि अजिंक्यतारा ही सहा नाटके लिहिली, त्यांत अभिनयही केला.

- Advertisement -

भालजी पेंढारकरांच्या बोलपटांच्या सुरुवातीलाच ‘बहु असोत सुंदर’, ‘आकाशवाणी’ (१९३४), ‘पार्थकुमार’ (१९३४), ‘कालियामर्दन’ (१९३५), ‘सावित्री’ (१९३६) अशी सुरू झालेली त्यांची कारकीर्द ‘नेताजी पालकर’ (१९३९), ‘थोरातांची कमळा’ (१९४१), ‘वाल्मिकी’ (१९४६), ‘मीठभाकर’ (१९४९), ‘छत्रपती शिवाजी’ (१९५२), ‘गाठ पडली ठका ठका’ (१९५६), ‘मोहित्यांची मंजुळा’ (१९६३) अशी वळणे घेत गेली. ‘साधी माणसं’ (१९६५), ‘गनिमी कावा’ (१९८१) आणि शेवटचा शाब्बास सूनबाई (१९८६) असे तब्बल पंचेचाळीस चित्रपट त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले. या चित्रपटांत ते दिग्दर्शन-कथा-पटकथा-संवाद किंवा निर्मिती या नात्याने कार्यरत होते. अशा या श्रेष्ठ चित्रमहर्षीचे २६ नोव्हेंबर १९९४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -