घरफिचर्सकुरघोडीचे पाढे पंचावन्न!

कुरघोडीचे पाढे पंचावन्न!

Subscribe

शिवसेनेच्या निर्मितीचा दिवस नुकताच मुंबईत साजरा झाला. एका सत्ताधारी पक्षाचा वर्धापनदिन म्हणजे सरकारी उत्सव. पण सेनेच्या या वाढदिवशी सरकार पुरतं ढिम्म होतं. सेनेच्या वाढदिवसाचे सत्तेतल्या प्रमुख भाजपला काहीही देणेघेणे नव्हते. पूर्वी असा दिवस साधून नेत्यांना शुभेच्छा दिल्या जायच्या. आज त्याची गरज या दोन्ही पक्षांना एकमेकांविषयी राहिलेली नाही.

आजवर भाजपला सेनेविषयी प्रेम असण्याचं कारण नाही. सत्ता चालवताना सगळे फायदे आपण घ्यायचे आणि जाब विचारला की सहकाऱ्यांची पिसं उपटायची अशी पध्दत भाजपने अंगिकारली. यामुळे भाजपवर कोणाचाच भरवसा राहिला नाही. फायदा आपल्या पदरात टाकणाऱ्या भाजपने सेनेला कस्पटासमान वागणूक दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या ‘मंत्रा’चा आधार घेत भाजपने सेनेला दूर ठेवण्याचा आत्मघाती खेळ खेळला. पुढे विरोधी पक्षाची भूमिका सेनेने घेतली. एकनाथ शिंदे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद देऊन सेनेने ‘हम भी कुछ कम नही,’ हे दाखवून दिलं. यामुळे भाजपची पुरती बेईज्जती झाली. सेनेला धक्क्याला लावण्याच्या इराद्याने स्वत:साठी खड्डा खणण्याची ही तयारी असल्याची टीका भाजपचेच कार्यकर्ते करू लागले. अति झाल्यावर दोन पक्षांमध्ये समेट झाला आणि सत्तेत त्या पक्षाला वाटेकरी करून घेण्याचा निर्णय भाजपने घेतला.

हे होताना सरकारमध्ये महत्त्वाची पदे भाजपने आपल्याकडे घेत शिवसेनेला दुय्यम मंत्रिपदे दिली. तेव्हाच खरे तर सेनेने आपला हिसका दाखवायला हवा होता. पण तेव्हा भाजपला पवारांची स्वप्ने पडत होती. सेनेनेही सत्तेच्या गाजरासाठी तडजोडीचा मार्ग स्वीकारला आणि वाट्याला आली ती मंत्रिपदं स्वीकारण्याचा निर्णय सेनेने घेतला. ही मंत्रिपदं सेनेसाठी असून नसल्यागत होती. कारण सरकारचा कंट्रोल हा मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने धोरणात्मक निर्णयासाठी सगळ्याच मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांवरच विसंबून राहावे लागत आहे. इतर खात्यांमध्ये सेनेच्या कार्यकर्त्यांची कामे होण्याचा मार्ग तर कमालीचा आखडला होता. आपल्या कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत म्हणून सेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी भाजप मंत्र्यांवर केलेल्या शब्दप्रयोगाला अनेकजण साक्षीदार आहेत. इतके होऊनही सेना सत्तेत आहे, याचेच अनेकांना आश्चर्य वाटले. या दोन पक्षांमधील ही स्थिती पुढे अधिकच बिघडली.

- Advertisement -

राज्यात पार पडणाऱ्या निवडणुका हा तर सत्तेतल्या या दोन्ही पक्षांसाठी ताणाताणीचा विषय बनला. भाजपला एकाकी विजय मिळू द्यायचा नाही, असा पण सेनेने केला. यासाठी असलेली ताकद वापरून सेनेने अनेक ठिकाणी भाजपला धक्का दिला. या निवडणुकांच्या प्रचारात एकमेकांची उतरवण्याचा एकही प्रसंग शिल्लक राहिला नाही. यामुळे सेना-भाजपतील दरी अधिकच वाढली. पालघरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी त्यात पराभवाची झालर होती. भंडाèयाच्या निवडणुकीत तर भाजपची बोलती बंद झाली. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याचा माज तिथे पुरता मोडीत निघाला. पालघरच्या निवडणुकीसाठी आणलेले ढोलताशे काँग्रेसच्या तन्ना हाऊस इथल्या नव्या मुख्यालयाकडे गेले. आणलेल्या पेढ्यांचेही पैसे देण्यात आले नाही, इतकं नैराश्य कार्यकर्त्यांमध्ये पसरलं. सेनेचा पाठिंबा असता तर महाराष्ट्रातलं चित्र वेगळं असतं हे भाजपच्या नेत्यांना एव्हाना कळून चुकले.

एकीकडे दोन पक्षांमध्ये असं वितुष्ट असताना दुसरीकडे भाजपच्या राजवटीवर जनताही नाराज असल्याचं लपून राहिलं नाही. दिलेल्या आश्वासनांचा भाजपला पुरता विसर पडला आहे. इंधनावरील अनुदान काढून घेतल्याचं कारण सांगत पूर्वीच्या सरकारला दोष देण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारने हाती घेतला. अनुदान बंद करण्याची आघाडी सरकारसारखी चूक आपण करणार नाही, असं सांगत सरकारने सामान्य माणसाला कोणी वाली नाही, हेच दाखवून दिलं. अनुदान देण्याचा आघाडी सरकारचा निर्णय योग्यच होता, असे आता सगळ्यांनाच पटलंय. कुठल्याही एका ठोस निर्णयावर भाजपचे हे सरकार कायम राहिले नाही. हाती घेतलेल्या निर्णयांची अवस्था बिकट होऊ लागलीय. नितीन गडकरी वगळता एकाही खात्याला गेल्या चार वर्षांत मोठे काम करता आले नाही. एकीकडे हे असताना दुसरीकडे सहकारी पक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन भाजपने कधीच बदलला नाही. पूर्वी सत्तेसाठी मदत घेतलेल्या पक्षाचाच गळा घोटण्याचं काम काँग्रेसने केलं. त्याच वाटेवर भाजप गेलाय. सेनेसह इतर पक्ष भाजपपासून चार हात दूर राहण्याला हेच कारण ठरले.

- Advertisement -

अशा कठीण परिस्थितीत आपली भूमिका काय असावी, याबाबत सेनेचे नेतेच निश्चित नाहीत, हे स्पष्ट झाले. अवमानाची लक्षणं पाहून सेनेकडून काही निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने याबाबत सेनेच्या वर्धापनदिनी काहीही स्पष्ट झालं नाही. मुख्यमंत्री आपलाच असणार इतकीच घोषणा करून सेनेने आपल्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधला. इतका मोठा इव्हेंट असा पोकळ निघेल, असे वाटत नव्हते. आपल्या पक्षाला ज्या भाजपने संपवण्याचा प्रयत्न केला त्या पक्षाबाबत केवळ खडे बोल सुनावण्याचे काम उरकण्यात आले. मुख्यमंत्री आपलाच येणार या घोषणेपुढे पक्षनेते गेले नाहीत. पण याला आधार काय, हे ही कोणी सांगितलं नाही. भाजपच्या मदतीशिवाय सत्ता येणार नाही, याची खात्री सेनेच्या सगळ्याच नेत्यांना आहे. तरी मुख्यमंत्री आपलाच, हे सूत्र कुठून आले ते कोणीही सांगू शकत नाही. सत्तेत असताना इतका अवमान पचवणे कोणाही पक्षाला शक्य नव्हते. तरीही सेनेने कमीपणा घेतला. याचा फायदा भाजपने वेळोवेळी घेतला. आगामी निवडणुकीत १५१ जागा मिळण्याबरोबरच ताकदीची मंत्रिपदं मिळण्यासाठी सेना पत्ते टाकेल, असं सांगितलं जातं. हे आता सेनेसाठी अवघड नाही. पण असा आडून फायदा करून घेण्यापेक्षा थेट जागा जाहीर करण्याची हिंमत दाखवली असती तर सेनेच्या अस्तित्वाची जाणीव झाली असती. सेनेच्या ताकदीचा अंदाज भाजपलाही आहे. सेनेच्या मदतीशिवाय आपल्याला सत्ता घेता येणार नाही, याची जाणीव त्या पक्षाच्या नेत्यांना आहे. यामुळेच ‘दुखवू नका,’ असा मंत्र पक्षाध्यक्षांना द्यावा लागला. सेनेला डिवचण्यात पुढे असलेल्या किरीट सोमय्या, आशिष शेलार यांची चलती यामुळे कमी झाली. एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न केव्हाच विस्कटल्याची खात्रीच जणू भाजप नेत्यांना झाली असल्याने दूर गेलेल्यांना जवळ करण्याचा प्रयत्न त्यांनी संपर्क अभियानातून सुरू केला. हे अभियान मुंबईत मातोश्रीवर पोहोचलं तेव्हा भाजपच्या एकूणच अडचणीची जाणीव सर्वांना झाली.


– प्रवीण पुरो
(लेखक ‘आपलं महानगर’चे विशेष प्रतिनिधी आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -