घरफिचर्सघमेंडखोरांची घबाडघाई !

घमेंडखोरांची घबाडघाई !

Subscribe

एकेकाळी नैतिकता, प्रामाणिकपणा आणि वास्तव स्वीकारणारा पक्ष म्हणून भाजपची कीर्ती होती. सारी घाणेरडी व अनीतीमान कृत्ये काँग्रेस पक्ष करायचा. फोडाफोडी, गटबाजीला उत्तेजन, बदनामी व पैसा यांचा आधार घेत हा पक्ष विरोधी पक्षांना नामोहरम करायचा. आता बाजू बदलली असून काँग्रेस भाजपच्या जुन्या नीतीमान अवतारात गेला आणि भाजप काँग्रेसप्रमाणे धूर्त, कुटिल व धोकेबाज राजकारण करत सुटला आहे. दोन्ही पक्षांनी ‘राजकारण व प्रेम यांत सर्व काही माफ असते,’ अशा कुठल्याशा लबाडीच्या व संधीसाधू वाक्प्रचारांचा आधार घेऊन आपण करू ते योग्य असा दाखला सदैव दिला. भाजपची आता ही प्रकृती आणि प्रवृत्ती बनत चालल्याचा अनुभव येतो आहे. दिवसेंदिवस आपल्याच घमेंडीत चालणार्‍या भाजपला देशाचे सगळे घबाड मिळवण्याची घाई झालेली आहे.

एखादा राजकीय पक्ष लागोपाठ दुसर्‍यांदा बहुमतात येऊन सत्ता मिळवतो, तेव्हा तो मतदारांच्या पसंतीस उतरलेला आहे, असे आपण समजतो. ही पसंती नेतृत्वाला असते की पक्षाच्या धोरणांना की विरोधी पक्षाबद्दलची नाराजी म्हणून मिळालेला कौल, याबाबत खात्री देता येत नाही. तरीही आपण गृहीत धरतो की लोकांना भाजप त्याच्या धोरणांसकट, नेत्यांसकट आवडतो. 1996, 98 आणि 99 अशा तीन निवडणुका भाजप जिंकला. परंतु, 2004 ची निवडणूक मात्र हरला, तेव्हा तो लोकांना नापसंत होता म्हणूनच ना?

2004 ते 2014 या काळात काँग्रेस सत्तेत होती. हा काळ भारताच्या प्रगतीत सर्वात उत्कर्षाचा मानला जातो. पण अखेरची दोन वर्षे या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि भाजप त्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक जिंकला. एकूण 31 टक्के मते मिळवलेला भाजप तसा भारताची पसंत नव्हता. 2019 मध्ये तो 39 टक्के मते मिळवून पुन्हा सत्तेत आला. तरीही तो कदाचित भारताचा लाडका पक्ष ठरला असे म्हणता येणार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कोणी अडवू शकत नाही असे वातावरण असताना गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यांत भाजप नापसंती मिळवून बसला. कसाबसा सत्तेपर्यंत पोहोचला. कोणताही राजकीय पक्ष अशा तडाख्यामुळे सावरतो व खोड्या करीत नाही. घमेंडखोरी तर मुळीच करीत नाही. पण भाजप बदलला नाही.

- Advertisement -

105 आमदारांच्या जीवावर भाजपने महाराष्ट्र कमावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना फोडून करू पाहिला. कर्नाटकात येड्डियुरप्पा अवघ्या 13 तासांचे मुख्यमंत्री झाल्यावर नामुष्की सहन करेल तो भाजप कसला? काही दिवसांनी काँग्रेस फोडून तो सत्तासीन झालासुद्धा. गोवा, अरुणाचल प्रदेश, मेघालय येथेही तसेच. बहुमत नसतानाही हा पक्ष अन्य पक्षांचे आमदार विकत घेऊन सत्ता मिळवत चालला आहे. राजस्थानात काँग्रेसमधील सत्तास्पर्धेचा लाभ मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तो त्याने मध्य प्रदेशात मिळवून टाकला.

एकेकाळी नैतिकता, प्रामाणिकपणा आणि वास्तव स्वीकारणारा पक्ष म्हणून भाजपची कीर्ती होती. सारी घाणेरडी व अनीतीमान कृत्ये काँग्रेस पक्ष करायचा. फोडाफोडी, गटबाजीला उत्तेजन, बदनामी व पैसा यांचा आधार घेत हा पक्ष विरोधी पक्षांना नामोहरम करायचा. आता बाजू बदलली असून काँग्रेस भाजपच्या जुन्या नीतीमान अवतारात गेला आणि भाजप काँग्रेसप्रमाणे धूर्त, कुटिल व धोकेबाज राजकारण करत सुटला आहे. दोन्ही पक्षांनी ‘राजकारण व प्रेम यांत सर्व काही माफ असते,’ अशा कुठल्याशा लबाडीच्या व संधीसाधू वाक्प्रचारांचा आधार घेऊन आपण करू ते योग्य असा दाखला सदैव दिला. भाजपची आता ही प्रकृती आणि प्रवृत्ती बनत चालल्याचा अनुभव येतो आहे.

- Advertisement -

नीतीमानतेला काही ऐतिहासिक व सैद्धांतिक आधार होता. काँग्रेस सत्याग्रह आणि सहिष्णुता, स्वातंत्र्य आणि लोकशाही यांसारख्या मूल्यांचे राजकारण करीत देशाला स्वतंत्र्य देणारा ठरला. स्वतंत्र्य चळवळीतील जितेजागते स्वरूप म्हणजे आपली राज्यघटना. परंतु, आपला गौरवशाली इतिहास पाहता लोकांनी सदैव आपल्याला स्वीकारायलाच हवे असा त्याचा हट्ट सुरु झाला. तो विरोधकांचे विजय, सरकारे, कार्य आणि विकास नाकारत सुटला. आपण घडवलेली संविधानात्मक चौकट मोडू लागला. विरोधी पक्षांची रास्त व घटनात्मक जागा तो बळकावू लागला. त्याची शिक्षा त्याला मिळाली, मात्र बराच वर्षांनी.

भाजपची घमेंड आणि आत्मप्रौढी वेगळी आहे. स्वातंत्र्य चळवळीत न उतरणारा हा पक्ष तिची मूल्ये स्वीकारणारा नाही. तो हिंदुराष्ट्र घडवू पाहतो. आपले संविधान तसे कधीही करू देणार नाही. म्हणून भाजपची त्याची आई असलेल्या रा. स्व. संघाची एक नीती आहे. तो कोणती?, तर स्वातंत्र्य चळवळीतून जन्मलेली राजकीय संस्कृती नष्ट करून तिच्या जागी सांस्कृतिक राष्ट्रवादाची चौकट उभी करण्याची. उदारमतवाद, समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आदी मूल्ये संघ मानत नाही. त्यापासून जन्मलेला राजकीय पक्ष अत्यंत नाइलाज म्हणून व डावपेच म्हणून ही मूल्ये मानण्याचा देखावा करतो. पण मनात मात्र एकाधिकारशाही व बहुसंख्याकांची सत्ता चाहतो.

ही वैचारिक लढाई असल्याचे भाजप कधीच प्रकट करीत नाही. आपण संविधानाचे पावित्र्य जपतच सार्‍या कारवाया करीत आहोत असे सांगताना तो खूपदा काँग्रेसचा जुना तसलाच दाखला देतो. पण तो हे दडवतो की काँग्रेसने संविधानात्मक तरतुदी धाब्यावर बसवल्या तरी आख्ख्ये संविधान मोडीत काढण्याची भाषा तो कधी करीत नसे. कारण काँग्रेसला भारताचे धर्मराष्ट्र करायचे नाही. आपणच निर्मिलेले वातावरण मलीन करायचे नाही. आणीबाणीचा 1975-77 चा काळ काँग्रेसने आपल्या कह्यात करू पाहिला होता. भाजपने मग फक्त काँग्रेसलाच नेस्तनाबूत करायचे असे ठरवले नसून काँग्रेसने निर्माण केलेले वातावरण तो नष्ट करू पाहतो. म्हणजे कसे?

आणीबाणी वगळता काँग्रेस कधीही माध्यमांची मुस्कटदाबी करू धजला नाही. तो त्याचा स्वभाव नाही. संघाचा सारा व्यवहार गुप्ततेत चालतो. त्यामुळे भाजपही गुढ व लबाडीचा व्यवहार करतो. माध्यमे आपली कुलंगडी बाहेर काढतील म्हणून तो संपादकांची नेमणूक, पत्रकारांना सोयींची खैरात आणि मालकांवर दबाव अशा अनेक मार्गांचा अवलंब करतो हे अनेक पत्रकार सांगतात. खेरीज भाजपचे जे मध्यमवर्गीय सवर्ण चारित्र्य आहे, ते तो पत्रकारांना आपल्याकडे खेचायला वापरतो. दलितविरोध, मुस्लिमद्वेष, महिलांची दुय्यम जागा, आदिवासींविषयी दुरावा अशा काही भावना भाजप वापरतो व मध्यमवर्गाला सुखावतो.

आरक्षण, राष्ट्रवाद, जशास तसे, उच्चवर्गीयांचे शहाणपण, भारताचा प्राचीन ठेवा, संस्कृत भाषा, धर्मश्रद्धा आदी मुद्यांवर सनातनी मतप्रदर्शन करीत संघ परिवार-भाजप आपला मध्यमवर्गीय जनाधार टिकवून ठेवतो. सुरत शहरात आठ जुलैला आरोग्य राज्यमंत्री कुमार कानानी यांचा मुलगा प्रकाश त्याच्या मित्रांसह लॉकडाऊन तोडून मध्यरात्री मोटारीतून फिरू लागला. त्याला अडवून जाब विचारणारी सुनीता यादव ही पोलीस कर्मचारी खमकी निघाली. तिची बदली करण्यात आली, पण त्याआधी तिने चौघांवर गुन्हा दाखल केला. ही बातमी गुजराती वृत्तपत्रांत आली. मराठीत मात्र नाही आली.

मराठी टीव्हीने बहुधा तसेच केले. गुजरातमध्ये सुरत व अहमदाबाद या शहरांत कोविड-19 चे थैमान सुरु आहे. त्याचीही दखल घेतली जात नाही. त्या राज्यांत गृहमंत्री अमित शहा यांनी जावे अशी सूचना न करता मुंबईकडे त्यांनी लक्ष द्यावे असे मंत्री प्रकाश जावडेकर म्हणतात व त्यांना खूप प्रसिद्धी मिळते, याला काय म्हणावे? नुसता राष्ट्रवाद आणि धर्मप्रेम यांनी बेकारी, दारिद्य्र, मंदी, रोगराई दूर जात नाही हे भाजप सांगतो. पण आपली ती प्रतिमा टिकवण्यासाठी तो सार्‍या खटपटी करून आपली प्रशासकीय गफलत झाकून टाकतो. चीनने भारताची जमीन बालकावलीच नाही असा पंतप्रधानांचा दावा खोटा असूनही राहुल गांधी व काँग्रेस सोडता, मोदी यांना कोणी जाब विचारत नाही याचा अर्थ काय?

अशा कैक गोष्टी घडतात. पण मोदी यांना व त्यांच्या पक्षाला आपण काँग्रेसचा भ्रष्टाचार, गैरकारभार, दिरंगाई व घराणेशाही यापासून लांब आहोत हे सांगण्याची हौस इतकी आहे की, ते बटबटीतपणे पत्रकारांची मुस्कटदाबी व मालकांवर दडपशाही करीत राहतात. ‘अहमदाबाद मिरर’ या दैनिकाने बुधवारी बातमी छापली की, सुरत शहरात कोविड-19 चे बळी वाढत चालल्याने सरकारी यंत्रणा खरा आकडा दडवत आहे. पण हे वृत्त देशभरात जाऊ दिले जाणार नाही. का? मोदी-शहा यांच्याबद्दल शंका उत्पन्न होईल म्हणून.

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा आग्रह मोदींचे शिक्षणमंत्री रमेशचंद्र पोखरियाल का धरीत आहेत? परीक्षा देण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची काळजी कोणाला? परंतु, भाजपची सरकारे हा निर्णय दामटून पुरा करतील आणि विरोधी पक्षांना अडचणीत आणता येतील असा यामागचा हेतू आहे असे भाजपचे राजकारण पाहून म्हटले, तर ते भाजपला आवडेल काय? सूड, खळ, त्रास, फजिती या गोष्टी सत्तेच्या राजकारणात फार काळ चालत नाहीत. कुलगुरुंचे (खोटे?) हवाले देऊन बातम्या प्रसिद्ध केल्या जाणे व पालकांमध्ये मुद्दाम राज्य सरकारविरुद्ध चीड उत्पन्न होईल असे वातावरण तयार करणे ही भाजपच्या धूर्त अन् कुटिल राजकारणाची प्रत!

आता तर गृहमंत्री शहा रविवारी असे बोलले की, भारताने कोविडवर जवळपास मात केलेली आहे. रोजच्या आकाशवाणीच्या प्रचारकी बातम्यांत भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे यावर भर दिला जातो. मग सूरत, अहमदाबाद यांचे काय? पुन्हा अनेक शहरांत लॉकडाऊन केले जात आहे, ते मग कशासाठी? अशा कित्येक चातुर्य कथांनी भाजपचे राजकारण बरबटून गेले आहे. मात्र, लोकांना मोदी आवडतात, भाजपची धोरणे व कारभार त्यांना पसंत आहे म्हटल्यावर काय बोलणार? जो बोलका वर्ग असतो, तो सत्ताधार्‍यांना ताळ्यावर आणत असतो. पण तो आज मोदीमुग्ध आहे आणि भाजपला भुलला आहे. कारण त्याचा पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला असून तो भावनिक प्रश्नांवर आता अधिक भर देऊ लागला आहे.

इंदोरीकर महाराजांवर अंधश्रद्धाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यावर मनसे व भाजप यांचे नेते त्यांना भेटायला गेल्याच्या बातम्या टीव्हीवर बघायला मिळाल्या. कशासाठी? मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. पण त्यावेळी ठाकरे सरकार हे आरक्षण राबवण्याच्या तयारीत नसल्याची आवई उठवण्यात आली. ना मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, ना वकिलांची. कशासाठी? मराठा मतदार आपल्या मागे यावा आणि आलेला राहावा यासाठीच ना! भाजप उजवा पक्ष आहे. म्हणून त्याने मध्ययुगीन प्रथा परंपरा वा विचार मानावेत आणि त्यावर आपला जनाधार उभा करावा याला काय अर्थ! स्वतः कधी सामाजिक वा धार्मिक सुधारणा करायच्या नाहीत अन् पुरोगाम्यांनी करून ठेवलेल्या उधळून लावण्याचे राजकारण करायचे, याला काय म्हणायचे! ही तर ब्राम्हणशाही, पेशवाई यांच्या स्थापनेची तयारी!

कोणताही पक्ष घ्या, तो आर्थिक, सामाजिक हितसंबंधांचा प्रतिनिधी असतो. भाजप हा काही गरिबांचा, दलितांचा, स्त्रियांचा व आदिवासींचा कैवारी नाही. तो पक्का भांडवलशाही व सरंजामशाही तत्वांचा अनुयायी आहे. त्याची धोरणे गरिबांना जाचक आणि वंचितांना त्रासदायक ठरलेली. भारताने स्थलांतरित श्रमिक रस्ते तुडवत जाताना पाहिले आहे. गेल्या चार महिन्यांत दारिद्य्ररेषेखाली गेलेल्या भारतीयांची संख्या 10 कोटी तरी असावी. त्यांना कोणता दिलासा अथवा योजना हे सरकार देईल? उलट नवे संसद संकुले, बुलेट ट्रेन, लढाऊ विमाने, खाणींना परवानगी असे अनेक खर्चिक व प्रदूषणकारी निर्णय मोदी सरकार करीत आहे. ते कशामुळे? भाजपची तशी भूमिका आहे. विकासाचा मार्ग वरून खाली जाण्यावर त्याची भिस्त आहे. खालून वर विकास न्यायचा म्हटला तर तो फार वेळखाऊ असतो. आता तर खासगीकरणाचा धडाका पक्षाने व सरकारने लावला आहे. नफ्याशिवाय खासगीकरणाची काय मजा? त्यात लोकहित दुय्यम स्थानी असणार.

तेव्हा भाजपचे राजकारण केवळ सत्तेसाठी तर असतेच, ते एकाधिकारवादी, भांडवलदारी व प्रतिगामी समाजनिर्मितीसाठीही चालले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारताचे संपूर्ण घबाड त्याला मिळवता येईल काय? आपणच या देशाचे तारणहार आहोत ही घमेंड त्याला ते घबाड प्राप्त करू देईल काय? ते सारे मतदारांच्या हातात आहे…

– जयदेव डोळे

मागील लेख
पुढील लेख

एक प्रतिक्रिया

  1. २००४ ते २०१४ हा भारतासाठी सर्वात वाईट काळ होता. याच काळात आणि चायना भारताला संपवण्यात सुटपा करार झाला.
    हेच कळत नाही आणि आपली प्रचंड मोठा भूभाग काबीज केला
    यात काळात सियाचीन पाकिस्तानला फुकट देण्याबद्दल प्रयत्न झाला
    याच काळात “डरी हुई कोम” ला प्रथम नागरिक/पहिला अधिकार बनवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला.
    आणि बरच काही….

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -