घरफिचर्सजमाना खराब नही....

जमाना खराब नही….

Subscribe

नकाब किंवा पदर घेण्याला उदात्त संस्कृतीमूल्याची ओळख लाभली आहे. थोरामोठ्यांसमोर घरातल्या महिलेने कायम पदरातच वावरायला हवे, कुटुंबातील इतर पुरुषांना महिलेचा चेहरा दिसता कामा नये, अशी धारणा भारतातील काही भागात आजही आहे. आपल्याच कुटुंबव्यवस्थेच्या पातळीवर इतका अविश्वास जपला जातो तर या समस्येची कारणे ही अशा पेहरावाच्या गरजेत नाही तर कुटुंबात दडलेल्या सामाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेत शोधावी लागतील.

एक प्रसिद्ध झेन कथा आहे. एका बौद्ध मठात वंदना आणि धम्म प्रवचनाच्या वेळेत एक मांजर प्रवचनगृहात शांततेचा भंग करत असे. उपस्थित भिख्खू संघ आणि प्रवचन ऐकण्यासाठी थांबणार्‍यांचा त्यामुळे रसभंग होत असे. कालांतराने एका भिख्खूने यावर उपाय केला. प्रवचनादरम्यानच्या काळात या मांजरीला प्रवचनगृहापासून दूर नेले जाऊ लागले. मात्र मांजर ऐकेना, ती पुन्हा संथागारात दाखल होऊन म्याव म्याव करून प्रवचनात अडथळा निर्माण करत असे. पुढे मठातील काही जणांनी ज्या ठिकाणाहून तिचा आवाज येणार नाही अशा दूरच्या ठिकाणी एका झाडाखाली मांजरीला बांधण्याचा उपाय केला. एका दोरीने मांजराला बांधण्यात येत असे, त्यामुळे प्रवचनात सातत्य निर्माण झाले. अडथळे बंद झाले, मात्र सोबतच मांजरही त्या दरम्यान बांधले जाऊ लागले. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू होता. कालांतराने या मांजरीचा मृत्यू झाला. मात्र प्रवचनादरम्यान मांजर बांधण्याचा प्रकार सर्वदूर दरम्यानच्या काळात पसरला. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम होई, त्या ठिकाणी एखादे मांजर बांधण्याची पद्धत रुढ झाली. आता त्याला काही अंशी दैवी महत्व येऊ लागले, आणि मांजराला बांधणे किती महत्वाचे आहे यावरही काही जण प्रवचन देऊ लागले. त्याला तात्विक किंवा गूढवादी संदर्भ मिळू लागले. वस्तुतः मांजर बांधण्याचा आणि प्रवचनातील तथागतांच्या धम्म वचनांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता.

- Advertisement -

सद्य:स्थितीत बुरखा परिधान करण्यावरून जो वादंग निर्माण झाला आहे तोही अशाच पद्धतीचा असावा. प्रचलित समुदायात मानल्या जाणार्‍या धर्मार्थाचे अर्थ बदलणे शक्य आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ आणि विवेकाचा आधार घेणे आवश्यक आहे. बुरखा परिधान करावा किंवा नाही? हा प्रश्न नंतरचा आहे. बुरख्यामागील बुरसटलेली मानसिकता जास्त परिणाम करणारी आहे. आपला चेहरा इतरांना दिसूच नये, असे महिलेला का वाटावे? यामागील कारणांचा शोध घ्यायला हवा, कुठल्याही मूलतत्ववादाची तपासणी आधुनिकतेचा स्वीकार करणार्‍या बदलत्या समाजाचा आधार असते. ज्या देशात आपण राहतो, वावरतो, नागरिकत्वाचे अधिकार उपयोगात आणतो, त्या देशाच्या कायद्यानुसार होणार्‍या बदलांचे पालन करणे कर्तव्याच्या कक्षेत येते. मग नागरिक म्हणून त्याच्याशी सहमत असावे किंवा नसावे, हा प्रश्न गौण आहे. त्यामुळे कायदे बदलण्याचे अधिकारही कायद्याच्याच कक्षेत येतात, त्यामुळे हा मार्ग लोकशाहीत महत्वाचा आणि सनदशीर असतो.

चेहरा ही माणसाची ओळख मानली जाते. भारतात आधारकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्रांसाठी चेहर्‍याचे छायाचित्र महत्वाचे असते. निवडणूक ओळखपत्रावर चेहर्‍याचे छायाचित्र देण्यासाठी निवडणूक कार्यालयाला नकार देण्याचे प्रकार मधल्या काळात घडले होते. त्यातून विशिष्ट अशा मूलतत्ववादाचा पुरस्कार करण्याचा हा प्रकार होता. मूलतत्ववाद धोक्याचा नाही, मात्र त्यातून कट्टरवादाचा मार्ग प्रशस्त होत असेल तर त्याला विरोध व्हायलाच हवा. चेहरा ही नागरिकत्वाची ओळख असते, माणूस म्हणूनही व्यक्तीचा चेहरा महत्वाचा असतो, अशा चेहर्‍याला पडद्याआड दडवण्याचे प्रकार मानवतेचे अवमूल्यन आहे.

- Advertisement -

बुरखा, नकाबसारख्या चेहराबंदी करणार्‍या पेहरावावर बंदी घालणारा डेन्मार्क काही पहिला देश नाही. एप्रिल 2011 मध्ये पहिल्यांदा फ्रान्सने युरोपात सर्वप्रथम अशी बंदी घातली होती. त्यानंतर बेल्जियममध्येही सार्वजनिक ठिकाणी ओळख लपवणार्‍या पेहरावावर बंदी आली. या व्यतिरिक्त ऑस्ट्रिया, बल्गेरिया तसेच दक्षिण जर्मनीतल्या बव्हेरिया राज्यात चेहरा लपवण्यावर बंदी आहे. अगदी अलिकडेच नेदरलँड्सच्या संसदेनेही 2016 साली या विषयातील एक प्रस्ताव मंजूर केला होता, मात्र त्याला अद्याप प्रतिनिधींची मंजुरी मिळालेली नाही.

श्रीलंकेत चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या देशात बुरखाबंदी करण्यात आली. त्यानंतर हा विषय मूलतत्ववादावरून कायमच परस्परविरोधी पवित्र्यात असलेल्या समुदायांच्या आपल्या देशात चर्चिला जाणार होताच. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीने त्यासाठी योग्य जमीन तयार करून दिली होती. त्यामुळे गटवादी समुहांना हा विषय राजकीय करण्याचा मोह आवणार नव्हताच. दुर्दैव हे आहे की या विषयाचे आजपर्यंत राजकारणच झाले आहे. मात्र हा प्रश्न सामाजिक परिप्रेक्ष्यातून खूपच कमी वेळेत चर्चिला गेला आहे. धर्म आणि धर्मधारणांचा प्रचलित अडसर इथेही कायम आहेच. महिलांच्या सुरक्षेसाठी नकाब महत्वाचा आहे. त्यासाठी धर्माचा दाखला देणार्‍यांकडून महिलांच्या नैसर्गिक अधिकाराचे दमन केले जाते, सोबतच प्रचलित कायद्यावरील अविश्वासही जपला जातो. समाजाने आपल्यातील त्रुटी संपवाव्यात यासाठी इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच करणे म्हणजे, चोरट्यांच्या भीतीने नागरिकांनी स्वतःला कोंडून घेण्यासारखे आहे. बरं, हा विषय याच हेतूसाठी असता तरी त्यात बदल शक्य आहे. मात्र त्याला पुरुषप्रधान मानसिकतेची जोड आहे. महिलांना शोषणाचे साधन समजणार्‍या वर्चस्ववादी कट्टरवादी समुदायाचा हा बनाव आहे. पत्नी, आई, बहीण, आजी ही नातेसंबंधातील पुरुष मानल्या जाणार्‍या घटकाची खासगी मालमत्ता नसते. त्यामुळे एखाद्या कापडात गुंडाळून बंदिस्त करण्यात येणारी बाहुली आणि जिवंत महिला यात फरक असतो.

लोकशाहीत नागरिक म्हणून माणूस केंद्रस्थानी असल्याने लिंग फरकाला इथे स्थान नाही. वारा, धूळ आणि उन्हापासून बचाव म्हणून नकाब, हिजाब किंवा परिधान करण्याची गरज परिस्थितीसाक्षेप असते. चेहर्‍याचे संरक्षण एवढाच त्याचा उद्देश असतो. वाळवंटी प्रदेशात येणारी वादळे, वाढलेले तापमान यामुळे ही बाब गरजेची असू शकते, मात्र त्याआडून आपल्या वर्चस्वाची इच्छा साध्य करणे चुकीचेच आहे. नकाब किंवा पदर घेण्याला उदात्त संस्कृतीमूल्याची ओळख लाभली आहे. थोरामोठ्यांसमोर घरातल्या महिलेने कायम पदरातच वावरायला हवे, कुटुंबातील इतर पुरुषांना महिलेचा चेहरा दिसता कामा नये, अशी धारणा भारतातील काही भागात आजही आहे. आपल्याच कुटुंबव्यवस्थेच्या पातळीवर इतका अविश्वास जपला जातो तर या समस्येची कारणे ही अशा पेहरावाच्या गरजेत नाही तर कुटुंबात दडलेल्या सामाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेत शोधावी लागतील. हिजाब किंवा नकाब हा त्यावरील उपाय नाही. नकाब किंवा हिजाब वापरल्याने खरेच महिलांवरील अत्याचारात घट झालेली आहे काय? नकाबचा वापर करून खरेच सामाजिक सुरक्षा धोक्यात येते का ? दहशतवादी किंवा गुन्हेगारी कारवायांसाठी नकाबचा वापर केल्याची किती उदाहरणे जगात आहेत. तिच्या ‘नकाब किंवा पर्दानशी’ असण्यावर पंकज उधासची एक प्रसिद्ध गझल आहे.

बेपर्दा नज़र आयी कल जो चन्द बीबियां
अकबर ज़मीं में गैरत-ए-क़ौमी से गड़ गया
पूछा जो मैने आप का पर्दा वो क्या हुआ
कहने लगीं के अक़्ल पे मर्दों की पड़ गया
निकलो न बेनक़ाब ज़माना खराब है….

पुरुषप्रधान समुदायांनी त्यांची राजकीय उद्दीष्ट बाजूला ठेवून त्यांच्या अकलेवर पडलेला पर्दा आधी बाजूला करावा, म्हणजे झालं, जमाना इतना भी खराब नही भाई…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -