घरक्रीडाआम्ही एक-दोन खेळाडूंवर अवलंबून नाही!

आम्ही एक-दोन खेळाडूंवर अवलंबून नाही!

Subscribe

मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैद्राबादचा पराभव करत आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या सामन्यांत वेगवेगळ्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावत मुंबईला विजय मिळवून दिला आहे. आम्ही एक-दोन खेळाडूंवर अवलंबून नाही, हीच आमच्या संघाची खास गोष्ट आहे, असे हैद्राबादविरुद्धच्या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.

आम्ही एक साखळी सामना शिल्लक असतानाच प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. २०१७ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. तेव्हा आम्ही २ सामने शिल्लक असतानाच प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. यंदा आम्ही संघ म्हणून दबाव असताना खूप चांगल्या प्रकारे खेळ केला आहे. वेगवेगळ्या सामन्यांत विविध खेळाडूंनी जबाबदारीने खेळत आम्हाला सामना जिंकवला आहे. त्यामुळेच क्विंटन डी कॉक वगळता आमचा एकही फलंदाज सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या अव्वल पाचमध्ये नाही. आमचा संघ एक-दोन खेळाडूंवर अवलंबून नाही, हीच आमची खास गोष्ट आहे. तुम्हाला जर अशी मोठी स्पर्धा जिंकायची असेल, तर प्रत्येक खेळाडूने योगदान देणे महत्त्वाचे असते. एखादा खेळाडू तुम्हाला सतत सामने जिंकवून देऊ शकतो यावर संघ म्हणून आमचा विश्वास नाही. सर्वच खेळाडूंनी संघाला सामना जिंकवून देण्याची जबाबदारी घेणे आवश्यक असते आणि आमच्या संघातील खेळाडू तेच करत आहेत, असे रोहितने सांगितले.

- Advertisement -

हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याविषयी रोहित म्हणाला, यावर्षी आम्ही पाहिले आहे की वानखेडेवर दुसर्‍या डावात फिरकीपटूंना मदत मिळते. या स्टेडियममधील खेळपट्टी कधी चांगली असते तर कधी नसते. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या सामन्यात आम्ही प्रथम फलंदाजी करून धावा फलकावर लावण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -