घरफिचर्ससंघर्ष की समन्वय?

संघर्ष की समन्वय?

Subscribe

विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जेव्हा दलितांची समस्या उग्र होऊ लागली, तेव्हा यावर भूमिका घेणे भाग पडले. उत्तर भारतातील दलितांचे नेते म्हणजे बाबू जगजीवनराम ज्यांनी सर्व हयात काँग्रेस पक्षात काढली व सतत समन्वयाची भूमिका घेतली. याच्या उलट बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी कधीही काँग्रेसबरोबर सहकार्य केले नाही व उलटपक्षी जीवनभर काँग्रेसच्या विरोधात राजकारण केले. थोडक्यात जो वाद अ‍ॅश व अली यांच्यात होता (संघर्ष की समन्वय), हाच वाद भारतातही झाला.

माणसाच्या ज्ञात इतिहासात एका मानवी समुहाने दुसर्‍या मानवी समुहाला गुलाम केल्याची असंख्य उदाहरणे आढळतात. रोमन साम्राज्याच्या आधी असलेल्या नगर राज्यांत गुलाम होतेच. त्यांच्या श्रमांवरच ग्रीकोरोमन संस्कृती उत्कर्षाला पोहोचली होती. मध्ययुगीन व आधुनिक काळात आपला देश अनुक्रमे मुस्लिमांचा व नंतर ब्रिटीशांचा गुलाम होता. आज मुद्दा आहे तो असा की गुलाम असलेला मानवी समूह कशा प्रकारे स्वतःची दास्यातून सुटका करून घेतो. भारतीय समाजाने सुरूवातीला हिंसक मार्गाने व नंतर अहिंसक मार्गाने ब्रिटीश साम्राज्यावरच्या विरोधात लढे दिले. भारताला 1947 साली मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे आशिया व आफ्रिका खंडात निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली.

- Advertisement -

भारतासारखे आधी गुलाम असलेले देश स्वतंत्र जरी झाले तरी त्या देशांतील प्रत्येक सामाजिक घटकाला स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळाली का? असा प्रश्न उपस्थित केला तर नकारात्मक उत्तर द्यावे लागते. उलटपक्षी काही अभ्यासक तर असेही दाखवून देतात की स्वातंत्र्य मिळाल्यावर सुरूवातीची वर्षे जेवढे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना होते त्यापेक्षा आज किती तरी कमी स्वातंत्र्य आज आहे. आजही भारतातील दलित व अल्पसंख्याकांना स्वातंत्र्याचे फायदे मिळतातच असे नाही.

असाच काहीसा प्रकार अमेरिकेतही आहे. जेथेसुद्धा गोेरे व निग्रो यांच्यात सतत वादावादी सुरू असते. तसे पाहिले तर युरोप आणि अमेरिकेत ‘गोरे विरूद्ध निग्रो’ हा संघर्ष गेली अनेक शतके सुरू आहे. तेथील गोर्‍या समाजातील अनेक विचारवंतांचे आजही मत आहे की निग्रो हा दुय्यम दर्जाचा वंश आहे व हा वंश गुलामगिरीत ठेवण्याच्याच लायकीचा आहेे. हा वाद आजही म्हणजे 2018 सालीसुद्धा तेवढ्याच त्वेषाने लढला जातो. म्हणूनच तेथील ‘गोरे विरूद्ध निग्रो’ हा वाद समजू घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

युरोपातील अनेक देशांत तसेच अमेरिकेत आणले गेलेले निग्रो हे गुलाम म्हणून आणले होते. 14 व 15 शतकांत आफ्रिकेतून रायफलच्या धाकाने तरूण धट्टे कट्टे निग्रो पकडून आणायचे व त्यांना भरदिवसा बाजारात गुलाम म्हणून विकायचे, हा अतिशय किफायतशीर व्यवसाय होता. अमेरिकेत अब्राहम लिंकन या महामानवाच्या प्रयत्नांनी व त्याने स्वकीयांशी दिलेल्या लढ्याच्या जोरावर इ.स. 1864 मध्ये अमेरिकेतील निग्रोंची गुलामगिरी संपुुष्टात आली. त्यानंतर हळूहळू निग्रो समाज प्रगतीच्या पथावर प्रवास करू लागला.

मानवी प्रगतीच्या क्षेत्रांचा विचार केला तर ज्ञानविज्ञान, संगीत, नृत्य, कला, क्रिडा वगैरे क्षेेत्रांची नावे समोर येतात. विसावे शतक उजाडले तेव्हा अमेरिकेत निग्रोंना विकासाच्या संधी उपलब्ध व्हायला लागल्या. यातील महत्वाचा टप्पा म्हणजे इ.स. 1936 साली हिटलरच्या जर्मनीत भरलेली ऑलिम्पिक स्पर्धा व त्यात जेसी ओवन्स (19131980) या अमेरिकेच्या निग्रो धावपटूने जिंकलेली चार सुवर्णपदकं! ऑलिम्पिक खेळांत एक सुवर्णपदक मिळवताना जीव मेटाकुटीला येतो तेथे जेसीने तब्बल चार सुवर्णपदकं पटकावली होती.

विसाव्या शतकापर्यंत निग्रो समाजाला दुय्यम दर्जाचा वंश समजणार्‍या मानसिकतेला अनेक बाजुंनी आव्हानं मिळत होती. याच काळात अमेरिकेत नागरी हक्कांची लढाई पेटली व बघताबघता तिने अक्राळविक्राळ रूप धारण केले. यातून समोर आलेले एक नाव म्हणजे डॉ. मार्टीन ल्युथर किंग (ज्युनियर) (19291968). अशा महानुभवांचे जे होते तेच मार्टीन ल्युथर किंग यांचे झाले व तो म्हणजे खुन. त्यांना 4 एप्रिल 1968 रोजी एका मारेकर्‍याने गोळया घातल्या. त्याच्या तीन वर्षे अगोदर 1965 साली ‘माल्कम एक्स’ चा खून झाला होता. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1966 साली ‘ब्लॅक पँथर’ पार्टी स्थापन झाली. (यातूनच आपल्याकडे दलित पँथर सुरू झाली होती.)

जेव्हा अमेरिकेत नागरी हक्कांचा लढा जोरात होता तेव्हा या लढयाच्या नेत्यांत व कार्यकर्त्यांत लढयाच्या स्वरूपाबद्दल सतत चर्चा होत असत. एका बाजुने सतत समन्वयाची बाजू मांडली जायची तर दुसरीकडून सतत संघर्षाची मागणी केली जायची. डॉ.मार्टीन लुथर किंग काय किंवा माल्कम एक्स काय ही मंडळी उघडपणे राजकारणी होती. पण गोरे विरूद्ध काळे हा लढा फक्त राजकीय क्षेत्रापुरता सीमित नव्हता. हा लढा जीवनाच्या इतर क्षेत्रातही सरकला. यातील प्रमुख क्षेत्र म्हणजे क्रीडा.

1960 च्या दशकात अमेरिकेतील बॉक्सिंगच्या क्षेत्रात गाजतगर्जत असलेले नाव म्हणजे सुप्रसिद्ध मुुष्टीयोध्दा मोहम्मद अली ऊर्फ कॅशीयस क्ले (19422016). याने अमेरिकेतील गोर्‍या समाजाच्या वंशवादी धोरणाचा निषेध म्हणून 1961 साली धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला. यामुळे आधीचा ख्रिश्चन कॅशियस क्ले नंतर मोहम्मद अली म्हणून प्रसिद्ध झाला. अलीने अमेरिकेच्या बाजुने व्हिएतनाम युद्धात लढण्याचे नाकारून तुरूंगात जाणे पत्करले पण लढार्इला गेला नाही.

मोहम्मद अलीला समकालीन असलेला आणखी एक क्रीडापटू होता ज्याने अलीच्या पूर्ण विरूद्ध भूमिका घेतली होती. त्याचे नाव आहे टेनिसपटू आर्थर अ‍ॅशे (19431993). अ‍ॅशेने 1975 साली टेनिसमधली अतिशय मानाची विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. आजपर्यंत विम्बल्डनमध्येे पुरूषांनी एकेरी स्पर्धा जिंकणारा आर्थर अ‍ॅशे हा एकमेव निग्रो टेनीसपटू आहे. 1960 व 1970 च्या दशकात अ‍ॅशे व अली अमेरिकेत लोकप्रियतेच्या शिखरावर होते. दोघेही अमेरिकेतील निग्रो समाजाच्या गळयातील तार्इत होते.

जेव्हा एका बाजुने अली गोर्‍यांच्या अमेरिकेवर कडक शब्दांत टीका करत होता तेव्हा अ‍ॅशे मात्र समन्वयाची बाजू घेत होता. एकीकडे अली व्हिएतनाम युद्धावर जाण्यास नकार देत होता व त्यापायी तुरूंगवास भोगत होता तर दुसरीकडे अ‍ॅशे युद्धावर जाण्यास तयार असल्याचे जाहिर करत होता.

असाच वाद आपल्या देशांतही झाल्याचे व होत असल्याचे दिसून येते. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जेव्हा दलितांची समस्या उग्र होऊ लागली, तेव्हा यावर भूमिका घेणे भाग पडले. उत्तर भारतातील दलितांचे नेते म्हणजे बाबू जगजीवनराम ज्यांनी सर्व हयात काँग्रेस पक्षात काढली व सतत समन्वयाची भूमिका घेतली. याच्या उलट बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी कधीही काँग्रेसबरोबर सहकार्य केले नाही व उलटपक्षी जीवनभर काँग्रेसच्या विरोधात राजकारण केले. थोडक्यात जो वाद अ‍ॅश व अली यांच्यात होता (संघर्ष की समन्वय), हाच वाद भारतातही झाला. जसा सिनेमा / नाटकांचा शेवट पक्का असतो तसा अशा वादांचा शेवट असा नसतो. मुख्य म्हणजे येथे हा बरोबर तर तो चूक असेही म्हणता येता नाही. हा ज्याच्या त्याच्या परिस्थितीच्या आकलनाचा प्रश्न असतो.

प्रा. अविनाश कोल्हे (0989 210 3880)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -