घरफिचर्सदिव्यता गमावलेले क्रॉफर्ड मार्केट

दिव्यता गमावलेले क्रॉफर्ड मार्केट

Subscribe

मध्य रेल्वेचे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पश्चिम रेल्वेच्या मरिन लाईन्स स्टेशनपासून हे मार्केटजवळ आहे. आज या बाजारात जे मिळते ते मुंबईत सर्वत्र मिळत असले तरी मुंबई बघायला येणारा पर्यटक या मार्केटमध्ये हमखास जातो. तेेथे खरेदी करतो. साधारणत: १४८ वर्षांपूर्वी बांधलेल्या या वास्तूची भव्यता पाहून भारावतो.

साधारणत: १८५० च्या दरम्यान, मुंबईच्या ससून डॉकमध्ये जहाजांची आवक वाढल्यानंतर तेथील बाजाराला मर्यादा आल्या होत्या. तसेच मासळी बाजारही तेथे फोफावत होता. मलबार हिल, आताच्या मरिन ड्राईव्हवर राहणार्‍या इंग्रजांना बाजाराची गरज भासू लागली होती. त्याकाळी मुंबईत प्रमुख असा बाजार नव्हता. भेंडी बाजारात जाणे इंग्रजांसाठी गैरसोयीचे होते. बोहरा बाजार आणि तत्सम छोटे बाजार ही काही मोठी बाजारपेठ नव्हती. त्यामुळे तत्कालिन व्हिक्टोरिया टर्मिनसजवळच मोठी बाजार पेठ बांधण्याचे इंग्रज निश्चित केले. ही बाजारपेठ उभारण्याचे काम कावजी जहांगिर यांना सोपवण्यात आले.
बाजारपेठेचे डिझाईन इंग्रज वास्तुविशारद विल्यम इमरर्सन यांनी केले. १८६८ साली ही बाजारपेठ बांधून पूर्ण झाली. या बाजारपेठेला मुंबईचे पहिले आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांचे नाव देण्यात आले. तेव्हापासून ही बाजारपेठ क्रॉफर्ड मार्केट म्हणून ओळखली जाऊ लागली. १८६९ साली कावजी जहांगिर यांनी ही वास्तू मुंबईच्या जनतेला अर्पण केली. तेव्हापासून येथे खर्‍या अर्थाने बाजार सुरू झाला. सुरुवातीच्या काळात भाज्या, फळे, कपडे, फर्निचर, शोभेच्या वस्तू, मांस, गुरे, किरणा माल अशा गोष्टी येथे विकल्या जात. बाजारपेठेत बहुतांश विक्रेते हे पारशी आणि मराठी होते. दक्षिण मुंबईतील हे मार्केट खर्‍या अर्थाने संपूर्ण मार्केट होते. २.२५ हेक्टर परिसरात पसरलेल्या या मार्केटमध्ये दक्षिण मुंबईतील लोक खास खरेदीसाठी यायचे. त्याकाळी मुंबईत क्रॉफर्ड मार्केटशिवाय कोणतेही मोठे मार्केट नव्हते. त्यामुळे मुंबई बेटावर रहाणारी मंडळी खरेदीसाठी याच मार्केटमध्ये यायची.

येथे घाऊक स्वरुपात माल विकत घेऊन काही फेरीवाले तो मुंबईतील विविध भागात विकायचे. पण निदान आठवड्यातून एकदा तरी क्रॉफर्ड मार्केटमध्ये फिरायला जाण्याची फॅशन त्याकाळी दक्षिण मुंबईतील रहिवाशांमध्ये निर्माण झाली होती. स्वातंत्र्यानंतरही या मार्केटची महत्ता काही कमी झाले नाही. घाऊक स्वरुपात भाज्या, फळे आणि इतर वस्तू खरेदीसाठी या मार्केटमध्ये मुंबईकर येत. अतिशय दणकट बांधकाम असलेल्या या वास्तूत सकाळ, संध्याकाळ गर्दी असे. हळूहळू स्थानिक ठिकाणी बाजारपेठा, मार्केट तयार झाले. त्यामुळे क्रॉफर्ड बाजाराचे स्वरूप घाऊक बाजारापुरतेच मर्यादीत झाले. वाशीचे मार्केट तयार झाल्यावर येथील गर्दी ओसरली. लोक येईनाशी झाली. आता या बाजारात घाऊक तसेच किरकोळ वस्तूही मिळतात. १९८२ साली या बाजाराचे नामकरण महात्मा ज्योतिबा फुले मंडई असे करण्यात आले. या बाजारात भाज्या, फळे, अत्तर, सुकामेवा, खाद्यपदार्थ, मांस, मासे, कपडे, सजावटीच्या वस्तू, किरणा माल, प्रवासी बॅग मिळतात. हा बाजार खरे म्हणजे पशुपक्षींच्या विक्रीसाठी प्रसिद्ध होता. मात्र त्यांच्या विक्रीवर आता बंदी घालण्यात आली आहे. तरीही बंद दरवाजाच्या मागे हे व्यवहार होतात. फिशटँक आणि त्यातील माशांसाठीही हे बाजार अजून प्रसिद्ध आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेचे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पश्चिम रेल्वेच्या मरिन लाईन्स स्टेशनपासून हे मार्केटजवळ आहे.
आज या बाजारात जे मिळते ते मुंबईत सर्वत्र मिळत असले तरी मुंबई बघायला येणारा पर्यटक या मार्केटमध्ये हमखास जातो. तेेथे खरेदी करतो. साधारणत: १४८ वर्षांपूर्वी बांधलेल्या या वास्तूची भव्यता पाहून भारावतो. येथील नक्षीकाम आणि भक्कमता बघून इंग्रजांची प्रशंसाही करतो. आज या बाजारात सुमारे १०८५ दुकाने आहेत. बाजाराच्या पुनर्विकासाबाबत चर्चाही आहे. पण हे मार्केट पुरातन वास्तू म्हणून जाहीर झाले असल्यामुळे त्याचा पुनर्विकास सहज नाही. या बाजारात आगही लागली होती. त्यात ८० दुकाने जळून खाक झाली होती. भाजी आणि फळ बाजार नवी मुंबईला गेल्यामुळे या बाजारात आता मराठी विक्रेता अभावानेच आढळतो. पारशी विक्रेते तर हाताच्या बोटावर मोजण्या इतकेही राहिलेले नाहीत. गुजराती आणि मुस्लिम व्यापारी आता येथे धंदा करतात. खरं सांगायचे तर क्रॉफर्ड मार्केटने आपले जुने वैभव गमावले आहे. भविष्यात ते येईल याबाबत निश्चित काहीच सांगता येत नाही. पण येथील दुकानादारांनी हे मार्केट आतापर्यंत निदान जिवंत तरी ठेवले आहे. त्यांची पुढची पिढी त्यांच्या वारसा कायम ठेवील असे सांगता येत नाही. क्रॉफर्ड मार्केट असो अथवा नसो पण त्याची भव्य दिव्य वास्तू पाडली जाऊ नये, हिच खर्‍या मुंबईकराची अपेक्षा आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -