घरफिचर्सकॅन्सरग्रस्त रुग्णांचे समुपदेशन आवश्यक

कॅन्सरग्रस्त रुग्णांचे समुपदेशन आवश्यक

Subscribe

विशेषत: तरुणवयीन कॅन्सर रुग्णांमध्ये ऐन उमेदीच्या काळात रोगाचे निदान झाल्याने मनोबल खचते. भविष्यातील अनिश्चिततेमुळे त्यांना नैराश्य येते. आई-वडील व इतर कुटुंबीय यांना बसलेल्या धक्क्याने अस्वस्थता येते. अशा वेळी केवळ कॅन्सरग्रस्त रुग्णांचेच नव्हे तर कुटुंबियांचे समुपदेशनही महत्त्वाचे ठरते.

मागील लेखात आपण कॅन्सर व आयुर्वेदीय शमन चिकित्सा, अनुषंगिक उपक्रम, रसायन चिकित्सा व पथ्यकर आहार याबद्दल माहिती जाणून घेतली. आजच्या लेखात आपण कॅन्सरग्रस्त रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य व समुपदेशन चिकित्सेचे महत्त्व जाणून घेणार आहोत.कॅन्सर हा तनामनाचा थरकाप उडवणारा शब्द. कॅन्सरचे नाव ऐकल्यावरच रुग्ण व त्यांचे नातेवाईक खचून जातात. सर्व वयोगटातील कॅन्सर रुग्णांमध्ये अशावेळी गरज असते ती समुपदेशनाने त्यांच्या मनातील कॅन्सरची भीती दूर करण्याची, त्यांचा आत्मविश्वास उंचावण्याची.

बालवयीन कॅन्सर रुग्ण आजारामुळे किंवा चिकित्सा चालू असताना निर्माण होणार्‍या लक्षणांमुळे शारीरिक व मानसिकदृष्ट्या हळवे झालेले असतात. अशावेळी बालकांपेक्षा पालकांचे समुपदेशन करणे महत्त्वाचे ठरते. समुपदेशनाने पालकांना दिवसाचा अधिकाधिक वेळ बालकांसाठी देण्यास उद्युक्त करावे. मात्र असे करताना बालकांना शारीरिक दुर्बलतेची तीव्रतेने जाणीव होऊ देऊ नये. म्हणूनच त्यांच्या शारीरिक जपणुकीबरोबरच वाचन-अभ्यास-बैठे खेळ यात बालकांचे मन गुंतवावे. या आजारामुळे आपली भावंडे, समवयस्क मित्र मंडळ यांच्यापासून आपण विभक्त होत आहोत अशा जाणीवेने कॅन्सरग्रस्त बालकात चिडचिडेपणा निर्माण होतो. यासाठी त्याचे शरीर साथ देत असेल, तेव्हा पालकांनी त्याला मैदानावर खेळ पहाण्यास नेणे, मित्र-मैत्रिणींना घरी बोलावून गप्पा मारण्यास उद्युक्त करावे व शक्य असेल तेव्हा शाळेत पाठवावे. आपल्या मुलाच्या आजाराने आईवडिलांना तसेच इतर नातेवाईकांना तीव्र मानसिक धक्का बसला असला तरी तसे दु:खाचे भाव त्यांनी बालकासमोर प्रदर्शित करणे टाळावे.

- Advertisement -

विशेषत: तरुणवयीन कॅन्सर रुग्णांमध्ये ऐन उमेदीच्या काळात रोगाचे निदान झाल्याने मनोबल खचते. भविष्यातील अनिश्चिततेमुळे त्यांना नैराश्य येते. आईवडील व इतर कुटुंबीय यांना बसलेल्या धक्क्याने अस्वस्थता येते. अशा वेळी केवळ कॅन्सरग्रस्त रुग्णांचेच नव्हे तर कुटुंबियांचे समुपदेशनही महत्त्वाचे ठरते. समुपदेशकाने कॅन्सरग्रस्त रुग्णांचे कुटुंबीय व मित्र-परिवार यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल उंचवावे.

समुपदेशन चिकित्सेने कॅन्सरग्रस्त रुग्णास जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी शारीरिक स्थिती सुधारत असलेल्या समवयस्क कॅन्सरग्रस्त रुग्णांशी त्यांची भेट घडवून आणावी व त्यांच्यासह या विषयावर चर्चा करण्यास सांगावे. आजाराची, त्याच्या चिकित्सेची, पथ्यपालनाची रुग्णाला परिपूर्ण कल्पना द्यावी. यांच्या पालनाने कॅन्सर नियंत्रणात ठेवता येतो हे पटवून देऊन भावी जीवनातील अनिश्चिततेमुळे निर्माण झालेले नैराश्य दूर करावे. या वयात मुले आई-वडिलांपेक्षा समवयस्क-मध्यमवयीन स्नेहींसह अधिक मनमोकळेपणाने बोलत असल्याने रुग्णास त्यांच्याशी संवाद साधण्यास व मानसिक ताण कमी करण्यास उद्युक्त करावे.

- Advertisement -

मध्यमवयीन कॅन्सर रुग्णांमध्ये आयुष्यमर्यादा अनिश्चिततेमुळे कुटुंबियांची चिंता वाटते. इप्सित स्वप्ने साध्य होणार नाहीत या भावनेने चिडचिडेपणा वाढतो. अशावेळी नातेवाईकांनी, विशेषत: सहचराने रुग्णास कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलण्याचे आश्वासन देऊन चिंता दूर करण्याचा प्रयत्न करावा. समुपदेशकाने कॅन्सर नियंत्रणात असलेल्या इतर रुग्णांशी त्या रुग्णाच्या वारंवार भेटीगाठी घडवाव्या, जेणेकरून रुग्णाच्या मनात आजाराबाबत व आयुष्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होईल.

वृद्ध कॅन्सर रुग्ण पराधीनत्वाच्या भावनेने निराश होतात. संंभाव्य वेेदना सहन करता येतील किंवा नाही याची त्यांना चिंता वाटते. कुटुंबियांना करावी लागणारी सेवा या विचाराने त्यांना अस्वस्थता येते. औषधोपचाराच्या खर्चाच्या आर्थिक तरतुदीने ते चिंतातूर होतात. अशावेळी समुपदेशन चिकित्सेने पुढच्या पिढीतील नातेवाईकांशी संवाद साधून वृद्ध कॅन्सर रुग्णांतील पराधिनत्वाची भावना दूर करण्याचा प्रयत्न करावा. रुग्णाला झालेल्या कॅन्सरच्या प्रकाराची माहिती देऊन त्यामुळे निर्माण होऊ शकणार्‍या संभाव्य परिणामांंविषयी व उपायांबाबत आधीच सकारात्मक चर्चा करावी. वृद्ध कॅन्सर रुग्णांच्या मनात कुटुंबियांना कराव्या लागणार्‍या सेवेबद्दल जी दिलगिरीची भावना असते, ती योग्य नाही हे त्यांना समुपदेशकाने पटवून द्यावेे. उलट अशा वेळी वृद्ध रुग्णास शारीरिक व मानसिक आधार देणे हे कुटुंबियांंचे कर्तव्यच आहे हे त्यांना पटवून द्यावे.अशारीतीने समुपदेशनाने कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मनातील कॅन्सरची भीती दूर होऊन सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागण्यास व मनोबल उंचावण्यास मदत होते.

वैद्य स. प्र. सरदेशमुख
ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)
संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -