घरफिचर्समूकनायकची शताब्दी आणि समकाल

मूकनायकची शताब्दी आणि समकाल

Subscribe

1920 चे दशक अनेकार्थाने महत्त्वाचे आहे. कारण याच काळात चवदार तळे आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करून डॉ. आंबेडकरांनी एका नव्या परिवर्तनाच्या पर्वाचा प्रारंभ केला होता. विशेष म्हणजे याच दशकात त्यांनी ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ ही दोन वर्तमानपत्रेही सुरु केली होती. ही वृत्तपत्रे त्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी नाही तर समाज बदलासाठी सुरू केली होती. ‘मूकनायक’ची शताब्दी आणि समकालीन पत्रकारिता यांच्यातील तुलनात्मक भेद स्पष्ट करणारा लेख.

भारतीय पत्रकारितेचा खूप मोठा इतिहास आहे. पत्रकारितेच्या या विकासक्रमाचा समकाळाच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर अनेक वळणे येऊन गेल्याची आपल्याला दिसतील. या प्रत्येक वळणाने समाजरचनेची पारंपरिक चौकट बदलण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केला आहे. पण सर्वात महत्त्वाचा आणि क्रांतिकारी प्रयत्न केला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच त्यांनी भारताच्या जातिव्यवस्थेचा आणि माणसांच्या अवहेलनेचा अत्यंत चिकित्सक अभ्यास केला. जात आणि जातिव्यवस्थेचा त्यांच्याइतका क्वचितच इतरांनी सखोल विचार केला असेल.

तत्कालीन समाजव्यवस्थेतल्या या वास्तवाने त्यांना अंतर्मुख केले होते. त्यामुळे जातीसारख्या विघातक शक्तीचे विघटन करण्याचा त्यांनी विचार केला. म्हणजे ब्रिटीश राजवटीमुळे कितीही प्रागतिक विचारांचा प्रचार प्रसार इथे होऊ लागला असला तरी त्यामुळे जातिव्यवस्थेवर विशेष काही परिणाम झाला नव्हता. जातिवर आधारलेली चातुर्वर्ण्याची चौकट याही काळात अधिक घट्ट झालेली होती. उच्चवर्णियांचे हितसंबंध अबाधित राहावेत म्हणून ही चौकट एकोणिसाव्या शतकातल्या खूप मोठ्या प्रबोधनानंतरही अभेद्य होती. त्यामुळे भारतीयांच्या एकूणच सामाजिक जीवनाचा स्तर उंचावायचा असेल तर जातीव्यवस्थेकडे डोळेझाक करून कसे चालेल? याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना झाली.

- Advertisement -

इथल्या धर्मसत्तेने सातत्याने स्त्री-शुद्रातिशूद्रांना कायमच दूर ठेवले. त्यांची माणूस म्हणून प्रतिष्ठा नाकारली. त्यामुळे दलित बहुजनांची गतिहीन अवस्था ही अधिक भीषण असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जे सामाजिक कार्य केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. विशेषत: 1920 चे दशक यादृष्टीने अनेकार्थाने महत्त्वाचे आहे. कारण याच काळात चवदार तळे आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करून डॉ. आंबेडकरांनी एका नव्या परिवर्तनाच्या पर्वाचा प्रारंभ केला होता. विशेष म्हणजे याच दशकात त्यांनी ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ ही दोन वर्तमानपत्रेही सुरु केली होती. ही वृत्तपत्रे त्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी नाही तर समाज बदलासाठी सुरू केली होती. पारंपरिक धारणांमध्ये अडकलेल्या समाजाची मनोभूमिका बदलणे आणि दलितांच्या जगण्याला आत्मबळ देणे हा त्यामागचा थोर विचार होता. या विचारातूनच 31 जानेवारी 1920 रोजी त्यांनी ‘मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात केली. यावेळी बाबासाहेबांचे वय होते केवळ एकोणतीस वर्ष.

कोणत्याच अर्थाने जागृत नसलेला आणि मूक अन्याय सहन करणार्‍या या समाजात चेतना निर्माण करण्याचे कार्य त्याकाळात डॉ. आंबेडकरांनी केले, ही एक अभूतपूर्व घटना आहे. अनिष्ट धार्मिक परंपरा आणि त्यातून निर्माण झालेली विषमता या दोन्ही गोष्टींचा त्यांनी गांभीर्याने विचार केला. मूकनायकचा प्रारंभ हा भारतातल्या सांस्कृतिक इतिहासाचा आणि जातिअंताच्या पर्वाचाही प्रारंभ होता. सुमारे शंभर वर्षापूर्वी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात अत्यंत निर्भयपणे अशा पत्रकारितेची सुरुवात करणे हे सोपे काम नव्हतेच. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांनी संपादकपदाची धुरा पांडुरंग नामदेव भटकर यांच्यावर सोपवली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतले एक निर्भीड आणि थोर संत तुकाराम महाराज यांचा अभंग मूकनायकच्या पहिल्याच अंकात त्यांनी उद्धृत केला आहे.

- Advertisement -

‘काय करू आता धरुनिया भिड / नि:शंक हे तोंड वाजविले//
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण / सार्थक लाजून नव्हे हीत//’

मानवमुक्तीच्या पत्रकारितेचा प्रारंभ करताना हे संतवचन मूकनायकमध्ये छापणे ही घटना अनेकार्थाने महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे डॉ. आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे अत्यंत व्यासंगी विद्वान होते. तरीही त्यांनी मराठीत हे वृत्तपत्र सुरु केले. ज्या काळात दलित समाज कमालीचा निरक्षर होता. अज्ञानी होता. त्या काळात अल्पवाचक संख्येचा व्यावहारिक तोटा माहीत असूनही त्यांनी ‘मूकनायक’ सुरू केले. मोठी आर्थिक झळ सहन करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. कारण आपल्या बांधवांची कैफियत समाजासमोर मांडणे, त्यांना राजकीय हक्क मिळवून देणे आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे हे उच्च ध्येय त्यांच्या मनात होते. राजर्षी शाहू महाराजांची मदत ही सुद्धा डॉ. आंबेडकरांना आपला मनोदय पूर्ण करण्यासाठी पूरक ठरली.

खरे तर त्या काळात इतरही अनेक वर्तमानपत्रे होतीच; पण तरीही ‘मूकनायक’ चे वेगळेपण ठसठशीतपणे समोर येते. डॉ. आंबेडकरांनी या पत्रांच्या माध्यमातून उच्चवर्णीयांना मोठा धक्का दिला. संस्कृतपणे, निर्भयपणे आणि तरीही अत्यंत सभ्यतेने त्यांनी ही पत्रकारिता केली. विशेषत: आजच्या म्हणजे मूकनायकच्या शताब्दी वर्षात समकालीन पत्रकारितेचा विचार करता बाबासाहेबांची ही पत्रकारिता किती मोलाची होती याचा प्रत्यय येतो. पेडन्यूज आणि बाजारू पत्रकारिता सर्वत्र बोकाळली असताना विशिष्ट ध्येयाने लोकहिताची पत्रकारिता करणे ही कृती सोपी नव्हती.

त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखातून त्यांची सामाजिक दृष्टी जाणवते. जन्मजात श्रेष्ठत्वाचा अहंकार मिरवणार्‍यांना त्यांनी नव्याने विचार करायला भाग पाडले आणि मानसिक गुलाम झालेल्या समाजाची अस्मिता जागृत केली. पहिल्या अंकाच्या अग्रलेखात त्यांनी अस्पृश्यांच्या प्रश्नाबद्दल लिहिले आहे. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही हे त्यांनी निक्षून सांगितले. ते लिहितात, आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खर्‍या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी दुसरी भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की, त्यांतील बरीचशी पत्रे विशिष्ट जातींचे हितसंबंध पाहाणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्यांना परवा नसते. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात.

अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इशारा आहे की, कोणतीही एखादी जात अवनत झाली; तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणार्‍या उतारुने जाणून-बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून, किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा, किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा; जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले, तर सर्व बोटीबरोबर त्यालाही, आधी नाही तरी मागाहून का होईना जलसमाधी ही घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, प्रत्यक्ष नव्हे, तरी अप्रत्यक्षपणे, तरी नुकसान करणार्‍या जातीचेही नुकसान होणार आहे; यात बिलकुल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करण्याचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये.

याचा अर्थच असा की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक भूमिका अत्यंत स्पष्ट होती. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी अलक्षित समूहाला चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या आत्मसन्मानासाठी लढा दिला. समतेची नवी भाषा त्यांनी घडवली. मूकनायकमधील त्यांचा प्रत्येक अग्रलेख मूलग्राही आणि स्पष्ट विचार देणारा आहे.

आजच्या काळात पत्रकारितेचे स्वरूप कमालीचे बदलले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियासह ऑनलाईन न्यूजने आपल्या जगण्याचा समग्र अवकाश व्यापून टाकला आहे. असे असले तरी पत्रकारांकडे असणार्‍या शोधक नजरेचा अभाव मात्र जाणवतो. संपूर्ण विश्वासार्हता गमावलेल्या आजच्या पत्रकारितेच्या पार्श्वभूमीवर सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक अशा डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे मोल सहज लक्षात येते. अर्थात डॉ.आंबेडकर हे शिक्षणासाठी लंडनला गेल्यानंतर काही काळ मूकनायक सुरू राहिले खरे; पण ती जबाबदारी इतरांना यशस्वीपणे पेलता आली नाही आणि 8 एप्रिल 1923 रोजी हे पत्र बंद पडले. पण तरीही मूकनायकने भारतीय पत्रकारितेला दिलेले योगदान विसरता येणे शक्य नाही. आजच्या पुष्कळच नकारात्मक होत चाललेल्या पत्रकारितेच्या काळात शताब्दी वर्षाच्या निमित्ताने ‘मूकनायक’ चे स्मरण अपरिहार्य ठरते. कारण मूकनायक केवळ वृत्तपत्र नव्हते तर ते आंबेडकरांच्या तत्त्वचिंतनातून आकाराला आलेले विचारपत्र होते, ज्याने समतेच्या प्रशस्त रस्त्याची पायाभरणी केली.

-डॉ. पी. विठ्ठल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -