Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Related Story

- Advertisement -

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडाजवळ असलेले आंबडवे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते महू येथे असताना १४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. रामजी हे लष्करातून निवृत्त झाल्यावर कुटुंबासह नोकरीसाठी सातार्‍यास आले. त्यामुळे आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यास झाले.

आंबेडकरांचे माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. या काळात दोन महत्त्वपूर्ण घटना त्यांच्या जीवनात घडल्या. एक म्हणजे त्यांचे रमाबाई ह्या स्वजातीय मुलीशी लग्न झाले व दुसरी त्यांचे जीवन प्रभावी होण्यास साह्यभूत झालेल्या केळुसकर गुरूजींशी त्यांचा निकटचा संबंध आला. पदवी घेतल्यानंतर त्यांना बडोदे संस्थानची शिष्यवृत्ती मिळाली व १९१३ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम.ए. व पीएच. डी. ह्या पदव्या मिळविल्या.

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने त्यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून डॉ. बाबासाहेबांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड ते मानत असत. ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंध होणार नाही असे ते मानत.

डॉ. बाबासाहेब म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्कही आपल्याला कळत नाहीत, अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. बाबासाहेबांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केले. १९४२ पासून १९४६ पर्यंत ते व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते. भारत स्वतंत्र झाल्यावर ते केंद्रीय मंत्रिमंडळात विधिमंत्री झाले.

- Advertisement -

पुढे ते संविधान-लेखन-समितीचे अध्यक्षही झाले. अस्पृश्यता नामशेष करणारा संविधानातील ११ वा अनुच्छेद हा आंबेडकरांचा विजयच आहे. सतत परिश्रम घेऊन, चर्चा करून त्यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने तीन वर्षांत संविधानाचा मसुदा तयार केला. ह्या महत्त्वाच्या कामगिरीबरोबरच त्यांनी ‘हिंदु कोड बिल’ लोकसभेला सादर करण्याचा बहुमान मिळविला. अशा या महान कायदेतज्ज्ञाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.

- Advertisement -