घरफिचर्समाणूस म्हणून ‘पटेल’असा संमेलनाध्यक्ष

माणूस म्हणून ‘पटेल’असा संमेलनाध्यक्ष

Subscribe

यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे हे १०० वे वर्ष आहे. त्यामुळे या नाट्यमहोत्सवाच्या अध्यक्षपदाचा मान कोणाला मिळतो, याबाबत नाट्य, सांस्कृतिक आणि साहित्य वर्तुळातही उत्सुकता होती. डॉ. जब्बार पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सिने, नाट्य आणि साहित्य क्षेत्रातूनही आनंदाचा सूर निघाला आहे. डॉ. पटेल यांना मिळालेला हा गौरव एक अर्थाने नाट्य आणि चित्रपट कलाक्षेत्राचा गौरव आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रविवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी स्पष्ट केले. नाट्य संमलेनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि जब्बार पटेल यांचे उमेदवारी अर्ज आले होते. परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक ७ नोव्हेंबरला झाल्यानंतर याबाबत विचारविनिमय करण्यात आला. पुढे २० नोव्हेंबर रोजी डॉ. पटेल यांचे नाव जाहीर करण्यात आले. मात्र, नाट्य किंवा साहित्य संमेलन असो, त्याला वादाची किनार असतेच.आजपर्यंतच्या या दोन्ही संमेलनात वादविवाद झालेच नाहीत, असा प्रसंग अपवादात्मक आणि कमालीचा दुर्मीळ आहे. साहित्य, सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील संमेलने राजकीय हेतूने प्रेरित नसावीत असा एक सूर आहे. कलेसाठी मुक्त वातावरण आणि नाट्यकलेच्या सेवेसाठी किंबहुना कलेचा व्यावसायिक दर्जा आणि समाजाभिमुखता वाढवण्याची तसेच समकालीन प्रवाहात नाट्यकला प्रकाराला वैचारिक बळ देण्याची संधी म्हणून नाट्यसंमेलनाकडे पाहिले जाते. सोबतच प्रायोगिक रंगभूमीला ऊर्जा देण्याचे काम नाट्यसंमेलातून व्हावे, रंगभूमी आणि नाट्यचळवळ हे दोन्ही कलाघटक जिवंत राहण्यासाठी संमेलने आवश्यकच असतात. महाराष्ट्राच्या शंभर वर्षांच्या या नाट्यसंमेलन परंपरेसाठी डॉ. जब्बार पटेल हे नाव साजेसेच आहे. मात्र, अध्यक्षांच्या नावाची घोषणा कार्यकारिणीच्या बैठकीनंतर नियामक मंडळाच्या बैठकीपूर्वी जाहीर झाल्याने वादाची ठिणगी पडली होती. ही प्रक्रिया नियमाला धरून नाही, असे सांगून धर्मादाय आयुक्तांपर्यंत हे प्रकरण पोहचले होते. नियामक मंडळाची मान्यता या निवड प्रक्रियेत घेतली गेली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. मात्र, नाट्य परिषदेने स्पष्ट केल्याप्रमाणे परिषदेच्या घटनेतील कलमाप्रमाणेच कार्यकारिणीने डॉ. पटेल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. कार्यकारिणीचे या नावाबाबत एकमत झाल्यानंतर नियामक मंडळाच्या बैठकीत घोषित करण्यात आल्याचे कांबळी यांनी स्पष्ट केले. मात्र, हा विषय इथंच संपायला हवा, नाट्य समूह किंवा नाट्यचळवळीतही लोकशाहीच्या नियमानुसार वाद-विवाद आणि मतभेद होणारच हे गृहीत जरी धरले तरी सांस्कृतिक घटकांतील समूहांनी हे विवाद थेट नाट्यसंमेलनाच्या मंचावर मांडण्यात येणार नाहीत, याची काळजीच घ्यायला हवी. नाट्यसंमेलनाचे शंभरावे वर्ष असताना तरी हा सूज्ञपणा रंगकर्मी आणि नाट्यक्षेत्रातील मंडळींकडून अपेक्षित आहे. जब्बार पटेल यांच्या नावामुळे हा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. नाट्यक्षेत्रातील योगदानाबाबत डॉ. जब्बार पटेल यांच्या नावाविषयी दुमत असण्याचे कारण नाही. प्रायोगिक रंगभूमी, समांतर चित्रपटक्षेत्र, कलात्मक सिनेमा अशा कलेच्या आघाड्यांवर त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. डॉ. पटेल यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासून नाटकातील आपल्या कलाप्रवासाला सुरुवात केली. तत्कालीन ज्येष्ठ, श्रेष्ठ रंगकर्मींकडून नाट्यकला आणि दिग्दर्शनाचे धडे त्यांनी घेतले. शालेय काळात त्यांनी ‘चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू’ हे नाट्य किंवा महाविद्यालयात असताना ‘तुज आहे तुजपाशी’ या नाटकातून त्यांनी आपल्यातील कलेची ओळख जगाला करून दिली. पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत असताना विजय तेंडूलकर यांच्या ते संपर्कात आले. तेंडूलकरांचे ‘बळी’ आणि ‘श्रीमंत’ या नाटकात त्यांनी आगळेवेगळे प्रयोग केले. एकांकिकांवर पटेल यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे डॉ. पटेल यांच्या माध्यमातून एकांकिका आणि तरुणाईच्या नाट्यचळवळीला मोठ्या अपेक्षा आहेत. असे असताना चित्रपटक्षेत्रालाही डॉ. पटेल यांच्याकडून बरेच काही घेता येण्यासारखे आहे. सामना, सिंहासन, जैत रे जैत, उंबरठा, पथिक, मुक्ता, एक होता विदूषक असे दर्जेदार चित्रपट देऊन चित्रभूमीला समृद्ध करणारे डॉक्टरच आहेत. डॉ. श्रीराम लागू आणि निळूभाऊ फुले, मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीला गवसलेल्या दोन हिर्‍यांची चमक खर्‍या अर्थाने ओळखणारे पैलूकार म्हणून डॉ. जब्बार पटेल यांचा उल्लेख करावा लागेल. सरकारी संस्थांची निर्मिती असलेल्या कलाकृतीही डॉ. पटेल यांनी तेवढ्याच ताकदीने आपल्या दिग्दर्शनातून समोर आणल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट त्यापैकीच एक…डॉ. पटेल यांनी रंगभूमी किंवा नाटकातून उभ्या केलेल्या व्यक्तीरेखा या वास्तवाशी फारकत घेणार्‍या कधीच नव्हत्या. ‘जैत रे जैत’ मधला ‘नाग्या’ किंवा ‘उंबरठा’ मधली ‘सुलभा महाजन’ अशा लेखकाने साकारलेल्या व्यक्तीरेखा मंचावर किंवा पडद्यावर कमालीच्या जिवंत करण्यात दिग्दर्शक असलेल्या डॉक्टरांचा वाटा मोलाचा आहे. महनीय व्यक्तिमत्वांचे समाज आणि राजकीय पट पडद्यावर जिवंत करणार्‍या डॉ. पटेलांवर त्या त्या काळात राजकीय हेतूने टीकाही झाल्या. मात्र, त्यांनी अत्यंत संयतपणे या सर्वांचा ‘सामना’ केला. रंगभूमी आणि चित्रपट यातील सेतू म्हणून डॉक्टरांचा उल्लेख करावा लागेल. डॉ. लागू, डॉ. पटेल आणि डॉ. आगाशे ही त्रयी मराठी रंगभूमीचा इतिहास आणि वर्तमान आहे. त्यामुळेच यापैकीच एक असलेल्या डॉ. जब्बार पटेल यांना अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले जाणे आणि ते नाट्यसंमेलनाचे शंभरावे वर्ष असणे या दोन्ही गोष्टी नाट्यक्षेत्रातील एका नव्या शतक पर्वाची सुरुवात मानायला हरकत नाही. या नव्या शतकातील माणसांपुढील आव्हाने वेगळी आहेत. राजकारण, समाज आणि व्यवस्थेपुढे अनेक आव्हाने आहेत. संस्कृती, कला आणि अभिव्यक्तीचे अर्थही बदलत आहेत. सत्तापिपासूंकडून निरंकुश सत्तेच्या माध्यमातून त्यावर नियंत्रणाचे प्रयत्न यशस्वी होऊ लागले आहेत. उन्माद, हिंसा, जमातवादी नवी राजकीय मूल्ये प्रस्थापित होण्याचा धोका आहे. अभिव्यक्ती सादर करणार्‍या रंगभूमीची गळचेपी होत आहे. मानवी मूल्यांपेक्षा जमातवादी मूल्यांची ताकद वाढत आहे. व्यावसायिक रंगभूमीची परिस्थिती यथातथा असतानाच प्रायोगिक रंगभूमीला बळ देण्याचे आव्हान आहे. अभिव्यक्तीच्या संकल्पना दहशतीखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे कलामाध्यमेही अनियंत्रित होत आहेत. यातून लोकशाहीच्या घटनात्मक मूल्यांना धोका निर्माण झालेला असतानाच नाट्य चळवळ आणि नाट्य अभिव्यक्ती ही माध्यमे अधिक सशक्त करण्यासाठी डॉ. जब्बार पटेल हे आश्वासक नाव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -