घरफिचर्सराजसत्तेच्या शोषणाचे वर्तमान रूपक !

राजसत्तेच्या शोषणाचे वर्तमान रूपक !

Subscribe

बांदेकरांचा अ‍ॅनिमल फार्म हा पूर्णपणाने भारतीय आहे. भारतीय भूमीच्या अवकाशविश्व चौकटीत ती निर्माण झालेली आहे. त्यामुळेच ती वेगळी आणि स्वतंत्र ठरते. ही प्रयोगशील साहित्यकृती आहे. येथे पात्र प्राणी आहेत, परंतु त्यांच्या फार्ममधे घडणारी राजकारण-धर्मकारणाची गोष्ट ही मानवी जगातली आहे. ती घोडा, बैल, कुत्रा, डुक्कर, मांजर आदी प्राण्यांच्या रूपक व्यवस्थेतून साकारली आहे. ही गोष्ट आणि तीमधील समग्र आशयतत्त्वे वर्तमान भारतीय सत्तासंघर्ष आणि सत्तानितीची वाटचाल अधोरेखित करते. सामाजिक वाढीसाठी ही संबंध वर्तमान व्यवस्थाच कशी कुचकामी ठरते, याचे सूचन ही कादंबरी करते.

गेल्या पावशतकातील भारतीय समाजव्यवस्थेतील शोषणाचे अंत:स्तर स्व-शैलीच्या वेगळेपणासह प्रायोगिक आकृतीबंधातून मांडणारा या शतकातील समाजशास्री कादंबरीकार म्हणून प्रवीण बांदेकर यांचा निर्देश करावा लागेल. त्यांच्या आजपावेतो एकूण तीन कादंबर्‍या प्रसिध्द झालेल्या आहेत. तीमधून लोकशाहीवादी विचारांची बाजू घेत त्यांनी केलेल्या बहुस्तरीय शोषणमीमांसेने भारतीय समाजव्यवस्थेच्या वर्तनाचा आशयच प्रकट झाला आहे. धर्मसत्ता आणि राजसत्तेच्या हितसंबंधी शोषण व्यवस्थेच्या तळकोपर्‍याची पोलखोल करणे आणि सामाजिक मूल्यविवेकाचा जागर घडविणे या वैचारिक भूमिकेने या कादंबर्‍यांचा अवकाश व्यापलेला आहे.

कोकणातील दशावतारामधल्या संकासूरच्या निवेदन पध्दतीतून साकारलेली त्यांची ‘चाळेगत’ ही पहिली कादंबरी कोकणच्या भू-जैविक शोषणाचे सार्वत्रिक असणारे वास्तव प्राधिनिधिक स्वरूपात अधोरेखित करणारी आहे. ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या दुसर्‍या कादंबरीतून सांस्कृतिक शोषणाचा वर्तमान कोकणामधील कथेकरी ठाकर समूहाच्या कळसूत्री बाहुल्यांच्या निवेदन तंत्राधारे रेखाटला आहे. धार्मिक संस्थांच्या कारवाया आणि सामान्य माणसांचे मनोनियंत्रण करून धर्मांध मूलतत्त्ववाद रूजवण्याचा सनातन्यांच्या चाललेल्या प्रयत्नांचे दर्शन ही कादंबरी घडविते.

- Advertisement -

त्यांची नुकतीच प्रसिध्द झालेली आणि त्यांच्याच कादंबर्‍यांच्या श्रेणीत श्रेष्ठ ठरणारी ‘इंडियन अ‍ॅनिमल फार्म’ ही तिसरी कादंबरी समकालीन भारतीय राजसत्तेच्या शोषणाची वस्तुस्थिती रूपकात्मक पध्दतीने मांडताना दिसते. प्राणी विश्वातील सत्ता संघर्ष आणि सत्तापालटाच्या मध्यवर्ती सूत्रासह अनेकविध घटितांच्या माध्यमातून वर्तमान राजकारणाचा चेहरा या रूपकातून समोर येतो. दुसर्‍या महायुध्दानंतर १९४५ साली जॉर्ज ऑर्वेलची ‘अ‍ॅनिमल फार्म’ ही जागतिक पातळीवर चर्चिली गेलेली कादंबरी प्रसिध्द झाली. आकृतीबंधाची प्रयोगशीलता, अ‍ॅलिगरी आशयसूत्राचे उपयोजन आणि मांडणीतील सेंद्रीयत्त्वामुळे ती महत्त्वाची ठरली.

त्यानंतर त्र्याहत्तर वर्षांनंतर प्रवीण बांदेकरांची ‘इंडियन अ‍ॅनिमल फार्म’ ही कादंबरी आली. शीर्षक, आशयसूत्राचे उपयोजन आणि मांडणीची पध्दती हा सारखेपणा या कादंबर्‍यांमधे असला तरी दोन्ही कादंबर्‍यांची आशयद्रव्ये भिन्न आहेत. बांदेकरांचा अ‍ॅनिमल फार्म हा पूर्णपणाने भारतीय आहे. भारतीय भूमीच्या अवकाशविश्व चौकटीत ती निर्माण झालेली आहे. त्यामुळेच ती वेगळी आणि स्वतंत्र ठरते. ही प्रयोगशील साहित्यकृती आहे. येथे पात्र प्राणी आहेत, परंतु त्यांच्या फार्ममधे घडणारी राजकारण-धर्मकारणाची गोष्ट ही मानवी जगातली आहे. ती घोडा, बैल, कुत्रा, डुक्कर, मांजर आदी प्राण्यांच्या रूपक व्यवस्थेतून साकारली आहे. ही गोष्ट आणि तीमधील समग्र आशयतत्त्वे वर्तमान भारतीय सत्तासंघर्ष आणि सत्तानितीची वाटचाल अधोरेखित करते. सामाजिक वाढीसाठी ही संबंध वर्तमान व्यवस्थाच कशी कुचकामी ठरते, याचे सूचन ही कादंबरी करते.

- Advertisement -

राजसत्तेच्या हुकूमशाही-दमनशाही वृत्तीचे सूक्ष्म पदर या कादंबरीच्या अंतरंगातून प्रकटतात. लोकशाही व्यवस्थेत झालेला व्यक्ती संकोच, राजसत्तेच्या इशार्‍यावर चालणारे लोकशाहीचे स्तंभ आणि शोषणासाठी सामाजिक संस्थांचा होत असलेल्या गैरवापराचे दर्शन या कादंबरीतून घडते. समकालात घडणार्‍या अनेकविध घटीतांना सामावून घेत राजकीय वास्तवाचा व्यापक पट या कादंबरीतून उजागर होतो. राजकीय-सामाजिक विचारधारा, त्यातील संघर्ष, शोषण परंपरा, मूल्ये संघर्ष, व्यक्ती आणि विविध समाज गटांमधील स्वार्ताधंता अशा विविध वृत्ती-प्रवृत्तींना रिचवत या कादंबरीचे कथानक आकाराला येते. समाजव्यवस्थेतील सर्वच घटकांमधे झालेला राजकारणाचा शिरकाव आणि लोकांच्या भावनांना हात घालत सत्तापटासाठी जात-धर्माचा होणारा वापर या वास्तवाचे बारकाव्यानिशी संदर्भ या कादंबरीतून चित्रांकीत होतात. राजकीय खेळाच्या सारीपाटात जय-विजयाच्या लढाईत भरडला जाणारा सरळमार्गी सामान्य माणूस आणि मानवीयता-सामाजिकतेचा होणारा र्‍हास या आशयाचे विविध धागे ही कादंबरी आविष्कृत करते.

म्हातारबा कृष्ण घोड्याचे लोकशाहीवादी-पुरोगामी विचाराचे श्रमिक प्राणी मोर्चा संघटन, सनातनी-प्रतिगामी-संस्कृतीरक्षणवादी नानोपंत कुत्र्याची जय समर्थ गँग, सत्तांध झालेल्या साहेबराव डुकराची जी हुजूर पार्टी आणि आपले अस्तित्त्व निर्माण करू पाहणार्‍या बाळक्या बैलाची अखिल गोवंश संघटना यांच्या परस्पर संघर्षातून या कादंबरीचे कथानक उभे राहते. म्हातारबाच्या खूनाने या कादंबरीची गोष्ट सुरू होते आणि शिवारात होणार्‍या शोषणाचा निषेध करणार्‍या तरूण प्राण्यांच्या मोर्चाने शेवट. या दोन बिंदूच्या मधे घडणार्‍या अनेक घडामोडीतून भारतीय राजकारणाने पोखरलेल्या समाजव्यवस्थेचे दर्शन घडते.

विचारवंताचा खून आणि सत्तेविरोधी आवाजांना दाबत त्यांना देशद्रोही ठरवणारी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क नाकारत उजव्या विचारांचे-वर्णव्यवस्थेचे पुरुनरूज्जीवन आणि त्यासाठी समाजात इतिहास विस्मरणाची स्थिती निर्माण करणारी राजसत्ता यातून ध्वनित होते. सत्तेसाठी दुर्बलांवर अन्याय-अत्याचार तसेच बलात्कार आणि विरोधी गटातील व्यक्तींच्या हत्या करून दहशतीचा माहोल पैदा करत सत्तेची जरब समूहांवर ठेवण्याच्या वृत्तीचाही निर्देश ही कादंबरी करते. सत्तेसाठी केली जाणारी लाचारी-लबाडी, अफवा पसरवून इतरांचे केलेले जाणारे चारित्र्यहनन-प्रतिमाभंजन, ज्याची सत्ता त्याचे गोडवे गाणारे लोकवर्तन आणि सर्वसामान्य माणसांच्या स्वप्नांना-इच्छा-आकांक्षांना चिरडणार्‍या अजेंड्याचे अधोरेखन या कादंबरीमधून होते.

सोयीच्या सत्तावापरासाठी समाजात जात, धर्म, लिंग, पंथ-प्रदेश भेद धगधगते ठेवत आपले हितसंबंध शाबूत ठेवण्यात सफल होणारी राजयंत्रणा आणि व्यवहारवादी-भांडवली व्यवस्था पोसण्याचा सत्ताधार्‍यांचा डाव ही कादंबरी उघड करते. राजकारणातील भ्रष्टाचार, समाजात वाढलेली-वाढवलेली असहिष्णुता, लोकशाहीची होणारी गळचेपी आणि समाजव्यवस्थेवर लादलेली अघोषित आणीबाणी अशा समकालातील अनेकविध राजकीय वास्तवाच्या कंगोर्‍यांना उजागर करत ही कादंबरी भारतीय भूमीत्तत्वे पचवत उभी राहते. या कादंबरीतील पात्रे, घटिते, प्रसंग भारतीय भवतालात हुबेहूब दिसतात. या व्यक्तिरेखा तशा उभ्या करण्यात बांदेकर यशस्वी झालेले दिसतात.

आशय आणि अभिव्यक्तीच्या अभिन्नत्त्वातून तसेच, सामाजिक प्रश्न आणि कलात्मक सेंद्रीयत्त्वाच्या समतोलातून या कादंबरीचा आकृतीबंध घडला आहे. सामाजिक प्रश्न आणि वास्तवाला कादंबरी रूप देताना आशयाच्या गरजेतून कादंबरीचा रूपबंध घडायला हवा. तसा घडला तरच ती कलाकृती श्रेष्ठ ठरत आपल्या परंपरेचा विकास-विस्तार करते. नव्या आविष्कार शक्यतांना जन्म देते. या दृष्टीने कादंबरीकार यशस्वी झाल्यानेच मराठी कादंबरी परंपरेत या कादंबरीचे महत्त्व ठळक झाले आहे. कोकणी बोलीचा खास अनवट आविष्कार हा बांदेकरांच्या सर्वच कादंबर्‍यांचा मूलभूत विशेष आहे. याही कादंबरीची भाषा कोकणच्या भू-वैशिष्ठ्यांचे संचित घेऊन अवतरलेली आहे. तृतीय पुरूषी प्रमाण बोलीतील निवेदन आणि संवादासाठी कोकणी बोलीचे उपयोजन बांदेकरांनी केलेले आहे. त्यामुळे बांदेकर जी गोष्ट सांगू पाहताहेत ती प्रवाही झालेली आहे. भाषेच्या गोडव्यामुळेही ही कादंबरी लक्ष वेधून घेते.

राज-धर्मसत्तेचे अंतस्थ हेतू निर्भिडपणे मांडत राजकीय-धार्मिक सत्यशोधनाची जोखीम पत्करत प्रवीण बांदेकर यांनी केलेली राजकीय कृती महत्त्वाची आहे. सत्तेला रूचणारे लेखन करून सत्तेचे लाभार्थी होण्यात धन्यता मानणारे बहुसंख्य लेखक आपल्या अवतीभोवती आहेत. राजसत्तेच्या वळचणीला राहून सुखाचे घास खाणार्‍या कलावंतांचा हा वर्ग जगात आणि भारतात प्राचीन काळापासून आहे. परंतु मानवी दु:खाची बाजू घेणारे, माणसाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे आणि आपल्या काळाला भिडत समकालीन सत्य मांडणारे लेखन कालातीत ठरत असते. म्हणून प्रवीण बांदेकर यांचे कादंबरी लेखन महत्त्वाचे आहे. त्यांच्या कादंबर्‍यांनी मराठी कादंबरी वाङ्मयाच्या आविष्कार शक्यतांचा वैचारिकता, आशय, मांडणी, कथनव्यवस्था आणि भाषिकदृष्ठ्या विस्तार केला आहे. समकाळाच्या सामाजिक चरित्राला उजागर करणारे त्यांचे कादंबरी लेखन हा महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज आहे.

-“केदार काळवणे ” ई-मेल आयडी: [email protected]
-मोबाईल क्र:७०२०६३४५०२
-(सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि.उस्मानाबाद.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -