घरफिचर्सलहरी मान्सूनवर शेतकर्‍यांचा जुगार !

लहरी मान्सूनवर शेतकर्‍यांचा जुगार !

Subscribe

मोसमी पावसाची अनिश्चितता भारताच्या अर्थकारणाचा कणा मोडून टाकते. देशातील सुमारे 60 टक्के लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत आणि सुमारे 75 टक्के शेती ही आजही मोसमी पावसावरच अवलंबून आहे. मोसमी पावसावर विश्वास नसल्यामुळे जगातील 50 टक्के धरणं ही भारतात बांधली गेली. भारतातील एकूण धरणांपैकी 50 टक्के धरणं ही आमच्या महाराष्ट्रात आहेत. परंतु याच धरणांच्या महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. वेळेवर न आलेला पाऊस हा अनेक आत्महत्यांसाठी कारणीभूत झालेला आहे.

भारतीय शेतीबद्दल बोलताना असे म्हटले जाते की, ‘इंडियन अ‍ॅग्रिकल्चर इज अ गॅम्बल ऑन मान्सून’ म्हणजे, भारतीय शेती हा मोसमी पावसावरचा जुगार आहे, ही गोष्ट गृहीत धरली तर यावर्षी हा जुगार आम्ही हरत आहोत, असे स्पष्टपणे दिसायला लागले आहे. देशात 36 हवामान विभाग आहेत, या 36 पैकी 30 हवामान विभागांत मोसमी पाऊस 24 जूनपर्यंतच्या पावसाचा विचार केल्यास, 20 ते 60 टक्क्यांनी कमी आहे. आजपर्यंत जितका पाऊस पडायला हवा होता त्यापैकी सरासरी 47 टक्के पाऊस संपूर्ण देशात कमी पडलेला आहे. भारताच्या मध्यवर्ती भागात तो 54 टक्क्यांनी, दक्षिणेकडील राज्य मुख्यतः केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या भागात 38 टक्के इतका कमी आहे तर कर्नाटकच्या विभागाकडे तो तब्बल 44 टक्क्यांनी कमी आहे. भारतीय मौसम विभागानेच देशातील मान्सून 47 टक्क्यांनी कमी आहे असे स्पष्ट केले आहे.

मान्सूनच्या सरी नावापुरत्याच महाराष्ट्राला ओलांडून पुढे गेले असल्या तरी मान्सूनचे ढग मात्र खर्‍या अर्थाने अजूनही केरळ आणि तमिळनाडू याच भागाकडे अडकलेले आहेत. 1901 पासून आजपर्यंतच्या पावसाचा विचार केला तर 2019 हे वर्ष नवीन दुष्काळाचा विक्रम तयार करतो की काय असे दिसायला लागले आहे. जून महिन्यात आजपर्यंत 1905 साली 88.7 मिमी, 1926 साली 97.6 मिमी, 2009 साली 85.7 मिमी इतका कमी पाऊस पडलेला होता. जून महिन्यातील पावसाचा विचार केला तर 1954 नंतर सर्वात कमी पाऊस यावर्षी नोंदवला जाईल असे दिसते. 1871 सालापासून आम्ही पावसाची आकडेवारी नोंदवतो, या आकडेवारीच्या आधारावर असे म्हणता येते की, जून महिन्यात पाऊस उशिरा येत असेल तर एकूणच मान्सून कमी येण्याची शक्यता 77 टक्के इतकी मोठी आहे. शेतीच्याही दृष्टीकोनातून जून महिन्यातील पाऊस म्हणजे जुगाराची पैज आहे, या महिन्यात एकूण पावसापैकी साधारणत: 23 ते 24 टक्के पाऊस पडतो. मान्सूनपूर्व सरी याच महिन्यात येतात, पिकांची पेरणी करण्यासाठी याच महिन्यातील पाऊस सर्वात महत्त्वाचा असतो. या सर्व गोष्टींचा विचार केला तर हा जुगार आम्ही हरत आहोत हेच स्पष्ट दिसते.

- Advertisement -

यावर्षी मे महिन्यात ऑस्ट्रेलियापासून सुरू झालेला मान्सूनचा प्रवास हा वाटेत कसा आहे हे आम्ही दररोज बघत होतो, हिंदी महासागर ते अरबी समुद्र हा त्यांचा प्रवाससुद्धा तंत्रज्ञानाच्या मदतीने दररोज आम्ही पाहिला. एक जूनला केरळच्या आणि तामीळनाडूच्या तटावर धडकणारा मान्सून 1 जून रोजी न येता तो 9 जूनला आला तरीही आम्ही शांत होतो. दोन दिवस उशीर झाला तर काय होईल? तो येईलच अशी आमची शाश्वती होती. परंतु यावर्षी पॅसिफिक महासागरात पेरू आणि चिली या देशांच्या किनार्‍याजवळ ‘अल निनो’ जागृत झालेला आहे, ‘अल निनो’मुळे पॅसिफिक महासागरातील समुद्राचे पाणी सामान्य तापमानापेक्षा आपोआपच जास्त तापमानाचे होते आणि त्यामुळे ज्या प्रतिव्यापारी वार्‍यांच्या रथावर स्वार होऊन मान्सून प्रवास करतो तो रथच ‘अल निनो’मुळे थांबवला जातो, यावर्षी तसेच झाले आहे. ज्या ज्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होतो, त्या वर्षी मान्सूनवर आणि जगभरातील हवामानावर काही ना काही परिणाम पडतो.

परंतु यावर्षी अल निनो हा इतकासा मजबूत नाही तो कमकुवत आहे, त्यामुळे हवामान शास्त्रज्ञांना खूप मोठी चिंता नव्हती. परंतु ज्या दिवशी मान्सून भारताच्या किनार्‍यावर केरळमध्ये दाखल झाला त्याच दिवशी म्हणजे 9 जून रोजी अरबी समुद्रात मालदीवच्या बेटाजवळ ‘वायू’ नावाचे एक तुफान जन्माला आले. ते हळूहळू अतिशय तीव्र झाले. 150 किलोमीटर प्रतितास इतका वार्‍यांचा वेग झाला. हे तुफान सुरुवातीला मुंबईकडे वळले, मुंबईला पावसाची आणि जोरदार वार्‍यांची चेतावणीसुद्धा दिली गेली; पण ‘वायू’नंतर गुजरातमध्ये काठियावाडच्या किनार्‍याकडे गेला. वायूने मात्र महाराष्ट्राच्या किनार्‍याकडे चालत येणार्‍या मोसमी वार्‍यांची शक्तीच हिसकून टाकली. 13 जूनला ‘वायू’ गुजरातच्या किनार्‍यावर धडकले, त्यानंतर असे वाटले की आता तरी मोसमी वारे पुढेपुढे चालत जाऊन भारताच्या मुख्य भूमीकडे जातील, परंतु असे झाले नाही ‘अल निनो’ आणि ‘वायू’ या दोन राक्षसांनी 2019 चा पाऊस गिळंकृत केला, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.

- Advertisement -

परंतु एक गोष्ट आणखी आपणा सर्वांना लक्षात घ्यावी लागेल ती अशी की, प्रत्येक वेळी आपणास अल निनो किंवा एखाद्या वादळास दोष देता येणार नाही. या दोघांपेक्षा तिसरा राक्षस सर्वात मोठा म्हणून समोर येतो आहे आणि तो ‘ग्लोबल वार्मिंग’ हा होय. ‘ग्लोबल वार्मिंग’मुळे जगभरातील पर्जन्याचे प्रतिरूप बदलून गेले आहे. मान्सून सामान्यतः राजस्थानच्या परिसरातील तयार झालेल्या अत्यंत कमी दाबाच्या क्षेत्रामुळे भारतात शिरतो. यावर्षी संपूर्ण भारतच अत्यंत तापलेला होता, संपूर्ण भारतीय उपखंडावर अत्यंत कमी दाबाचे क्षेत्रही विकसित झाले होते, त्यामुळे जास्त दाबाकडून तर कमी दाबाकडे जाण्याची हवेची प्रवृत्ती असल्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून आलेली थंड हवा ही भारतात मान्सूनच्या प्रवाहासोबत येणे अगत्याचे होते. परंतु अलिकडे अगदी लहान लहान गोष्टीमुळे मान्सूनची भविष्यवाणी करणे जवळपास अशक्य होते आहे. या सर्व लहान लहान गोष्टी आज मोठे रूप धारण करत आहेत याचे कारणसुद्धा जागतिक तापमानवाढ हेच आहे. मोसमी वार्‍यांच्या काळात बंगालच्या उपसागरात एखादा तुफान येत असेल तर चालेल, परंतु तो अरबी समुद्रात येऊ नये असे साधारणत: म्हटले जाते. ही गोष्ट या वर्षी तंतोतंत खरी ठरली आहे.

भारतातील शेतीची मोसमी पावसावरील अवलंबिता लक्षात घेऊन, मागच्या शेकडो वर्षांपासून भारतात मोसमी पावसाचा अभ्यास सुरू झाला. काहींनी वरून देवाची पूजा केली, आमच्या पूर्वजांनी इंद्र देवाला खूश करण्यासाठी यज्ञ केले, नक्षत्र आणि राशींचा अभ्यास केला गेला, काहींनी बेडकांचे लग्न लावले, काहींनी निसर्गातील पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा अभ्यास केला, तर काहींनी मात्र वैज्ञानिक पद्धती अवलंबण्याचा प्रयत्न केला. वैज्ञानिक पद्धतींची ही सुरुवात 1882 पासून ब्रिटिश भारतात आल्यानंतर झाली. 1877 आणि 1878 ही दोन वर्षे भारतातील दुष्काळाची वर्षे होती. यापूर्वीच 1875 साली भारतीय मौसम विभागाची स्थापना करण्यात आली होती. भारतीय मौसम विभागाचे संचालक म्हणून एच. एफ. ब्लॅन्फोर्ड यांची नियुक्ती झाली आणि 1882-1885 या काळात ब्लॅन्फोर्ड यांनी भारतीय मान्सूनची पहिली भविष्यवाणी केली. ब्लॅन्फोर्ड नंतर 1895 ला जॉन इलिएट हे संचालक बनले आणि त्यांनी मान्सूनची भविष्यवाणी करण्याच्या पद्धतीत सुधारणा घडवून आणल्या.

हिमालयातील बर्फवृष्टी, ऑक्टोबर महिन्यातील हिमालयातील थंडी, ऑस्ट्रेलिया परिसरातील उन्हाळ्यातील वातावरणीय स्थिती इत्यादी गोष्टींच्या आधारावर भारतीय मोसमी पावसाची भविष्यवाणी केली जाऊ लागली. मागील शंभर वर्षात ‘भारतीय मौसम विभागाने’ अनेक आधार बदलले आहेत. डॉ. वसंत गोवारीकर यांनी अलीकडेच भारतीय हवामानाची भविष्यवाणी करताना सोळा आधार सांगितले होते, त्यांचा ‘सिक्सटीन टेस्ट’ मॉडेल हवामान शास्त्रात महत्त्वाचा मॉडेल होता. संगणकीय काळात आणि उपग्रहांच्या आजच्या जमान्यात हे मॉडेलसुद्धा मागे पडले आणि आज अनेक वेगळे सांख्यिकीय मॉडेल समोर आले आहेत. हवामान शास्त्रज्ञ राजीवन यांनी 2007 साली मांडलेला सांख्यिकी मॉडेल आज बरीचशी शुद्ध भविष्यवाणी करतो. आज तर बंगलोर येथील सेंटर फॉर मॅथेमॅटिकल मॉडेलिंग, पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर अहमदाबाद, भारतीय मौसम विभाग, या सर्व महत्त्वाच्या संस्थांनी मिळून एक SPIM मॉडेल तयार केला आहे, SPIM चा शब्द विस्तार ‘सीजनल प्रेडिक्शन ऑफ इंडियन समर मान्सून’ असा होतो.

यांनी आणखी एक मॉडेल मान्सून मिशन मॉडेल अलीकडेच 2014 साली विकसित केले आहे. देशातील या सर्वच संस्था एकत्र येऊनसुद्धा मान्सूनची 100 टक्के भविष्यवाणी करू शकत नाही, हे 2019 मधील वेगवेगळ्या संघटनांच्या चुकलेल्या भविष्यवाणीने दाखवून दिले आहे. स्वातंत्र्यानंतर मागील सत्तर वर्षांत भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड मोठी झेप घेतली. आमची अवकाश याने मंगळापर्यंत गेलेली आहेत, इन्सॅट ही उपग्रहांची संपूर्ण शृंखला आम्ही हवामानाचा अभ्यास करण्यासाठी वाहून घेतली होती. दोन ते अडीच मीटर रिझोल्यूशन असलेले कॅमेरे आम्ही उपग्रहांवर लावलेले आहेत. परंतु अजूनही आम्ही भारतीय मोसमाचा लहरीपणा अभ्यासू शकलो नाहीत हे मान्यच करावे लागेल.

भारतीय हवामानातील लहरीपणा मागच्या पन्नास वर्षांत वाढतच चाललेला आहे. मागील दहा वर्षांत तर तो पराकोटीला गेलेला दिसून येतो. वाळवंट असलेल्या राजस्थान आणि लडाखमध्ये भरपूर पाऊस पडत आहे. 6 ऑगस्ट 2010 रोजी लेह येथे 150 मिलिमीटर प्रतितास या वेगाने पाऊस पडला, इथे एकाच दिवशी 250 मिली मीटर इतका पाऊस पडला. येथील वार्षिक पर्जन्यमान फक्त 60 मिलिमीटर इतके असताना एकाच दिवशी 250 मिलिमीटर पाऊस पडल्याने, लडाख संकटात सापडला होता. मागील शेकडो वर्षांपासून या भागात पाऊस येत नाही, हा भाग वाळवंट आहे. पाऊस कमी असल्याने या ठिकाणचे बुध्दीष्ठ गोम्फा किंवा मॉनेस्ट्री या मातीच्या स्लॅबच्या बनलेल्या असतात, त्यांना पावसामुळे काहीच झाले नव्हते; पण आज जास्त पावसामुळे आता या सर्व मातीच्या मॉनेस्ट्री पडत चाललेल्या आहेत.

नवीन गोम्फा तीव्र उताराचे बांधले जात आहेत. भारतातील थरच्या वाळवंटात असाच किस्सा आहे, या वाळवंटात वार्षिक पर्जन्य 25 ते 30 सेंटीमीटर असताना बारमेरसारख्या वाळवंटी शहरात तब्बल 723 मिलिमीटर पाऊस 2015 च्या एका आठवड्यात पडलेला आहे. पर्वतीय भागांनी पर्जन्याची स्पर्धा करावी, चेरापुंचीचा पावसाचा विक्रम मौसिमरामने तोडावा हे कोणत्याही भूगोल शास्त्रज्ञाला मान्यच आहे. परंतु पावसाचे नवीन विक्रम पर्वतात नसून आजकाल समुद्री आणि पठारी भागात होताना पाहावयास मिळतात. मुंबई येथे 27 जुलै 2005 ला एकाच दिवशी 940 मिमी इतका विक्रमी पाऊस पडला होता. 24 जुलै 1989 ला महाराष्ट्रातील बीड येथे 320 मिमी पाऊस पडला तर रत्नागिरीला 31 मे 2006 ला 640 मिलिमीटर इतका पाऊस नोंदवला गेला. गेल्याच वर्षी नागपुरात 5 जून 2018 ला 280 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. 16 जून 1995 ला चेरापुंजी येथे एकाच दिवशी 1560 मिलिमीटर इतका पाऊस नोंदला गेला. या सर्व अतिवृष्टीने आणि वादळी पावसाने हजारो लोकांना मारले आहे, मागील वर्षी केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीत तब्बल पाचशे लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

लेहमधील 2010 च्या पुरानंतर लगेच 2014 ला श्रीनगर पाण्याखाली बुडाला, भारतीय लष्कर धावले नसते तर श्रीनगरमधील मृतांचा आकडासुद्धा प्रचंड वाढला असता. 2013 ला प्रभू शंकराच्या दर्शनाला गेलेले 30000च्या वर तीर्थयात्री केदारनाथ येथे मारले गेले. आणि केदारनाथची आठवण जायच्या अगोदरच श्रीनगरला शेकडो लोक पुरात मृत पावले. दरवर्षी येणार्‍या पुराची ही कथा आता न संपणारी होत चालली आहे. एखाद्या ठिकाणी असणारे वार्षिक पर्जन्य कमी झालेले नाही, ते आहे तेवढेच आहे, परंतु ते आजकाल कमीत कमी दिवसात कधीतरी तर चोवीस तासात पडते, प्रश्न हाच आहे.

भारतीय मौसम विभागाच्या मते 1950 च्या आसपास अतिवृष्टी ही दरवर्षी दोनदा यायची, आजकाल अशा घटना दरवर्षी किमान 6 वेळा होत आहेत. जास्त पावसामुळे 1950 पासून आजपर्यंत तब्बल 70 हजार लोक भारतात मृत्युमुखी पडले आहेत, तर दोन कोटी लोक बेघर झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या आणि बेघर झालेल्या लोकांत सर्वात जास्त गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतील लोक आहेत. मागील वर्षी जागतिक बँकेने एक इशारा भारताला दिला होता, जागतिक हवामान बदलामुळे भारतात आणि विशेषतः मध्य भारतात मराठवाडा, छत्तीसगड, विदर्भ, मध्य प्रदेश या भागात शेती आणि मानवी जीवन यावर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. हवामान बदलाचा परिणाम ज्या स्थानावर सर्वात जास्त होईल त्या स्थानांना ‘हॉटस्पॉट’ हे नाव जागतिक बँकेने दिले होते. जागतिक बँकेच्या मते भारतातील दहा हॉटस्पॉट चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, राजनांदगाव, दुर्ग, आणि होशंगाबाद हे आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भविष्यात भारताचा मध्य भाग हा हवामान बदलाचा सर्वात मोठा बळी ठरणार आहे.

मोसमी पावसाची अनिश्चितता भारताच्या अर्थकारणाचा कणा मोडून टाकते. देशातील सुमारे 60 टक्के लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत आणि सुमारे 75 टक्के शेती ही आजही मोसमी पावसावरच अवलंबून आहे. मोसमी पावसावर विश्वास नसल्यामुळे जगातील 50 टक्के धरणं ही भारतात बांधली गेली. भारतातील एकूण धरणांपैकी 50 टक्के धरणं ही आमच्या महाराष्ट्रात आहेत. परंतु याच धरणांच्या महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. वेळेवर न आलेला पाऊस हा अनेक आत्महत्यांसाठी कारणीभूत झालेला आहे.

आत्महत्या झाल्यानंतर शेतकर्‍यांना सानुग्रह म्हणून पैसा दिला जातो, परंतु ज्या गोष्टींमुळे आत्महत्या घडून येतात त्या हवामान बदलाचा विचार कोणताच राजकारणी करताना दिसून येत नाही. देशाचे, राज्यांचे आणि प्रत्येक जिल्ह्याचीसुद्धा ‘क्लायमेट चेंज प्लान्स’ हे त्या-त्या अ‍ॅथॉरिटीच्या कॉम्प्युटरमध्ये बंद आहेत, एखादी घटना घडल्यानंतर त्यांच्यावर काही दिवस पर्यंत चर्चा होते, पुढे तो प्लान कचर्‍याच्या डब्यात टाकला जातो. युद्धात किंवा आतंकवादातसुद्धा जेवढे नागरिक मृत झाले नसतील तेवढे दरवर्षी अशा प्रकारच्या हवामान विषयक घटनांत मृत्युमुखी पडतात, परंतु नैसर्गिक आपत्ती म्हणून आपण या गोष्टीकडे डोळेझाक करतो. खरे तर नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ या गोष्टीत युद्धापेक्षा जास्त हानी होत आहे.

-डॉ. योगेश दुधपचारे,भूगोल विभाग प्रमुख,जनता महाविद्यालय,चंद्रपूूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -