घरफिचर्स‘निर्भय’ साहित्यिक कार्यकर्ता!

‘निर्भय’ साहित्यिक कार्यकर्ता!

Subscribe

१९९३-९४ च्या सुमारास मुंबईत उभ्या राहिलेल्या ‘निर्भय बनो’ आंदोलनाच्या दरम्यान जे काही निर्भय चेहरे समोर आले, त्यात जेष्ठ साहित्यक रत्नाकर मतकरी यांचं नाव नक्कीच अग्रभागी राहील. साहित्यिकांनी प्रत्यक्ष आंदोलनात उतरावं की नाही असा वाद सर्वत्र सुरू असताना मतकरींनी मात्र प्रत्यक्ष कृती करून आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘निर्भय बनो’च्या अनेक कार्यक्रमात ते कार्यकर्त्याच्या हिरीरीने वावरले.

अ‍ॅड. निशा शिवूरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि संजय मंगला गोपाळ, प्रकाश डाकवे, रवि कदम, सुनीती सु.र.आदी समाजवादी साथींच्या पुढाकाराने १९९१ साली महाराष्ट्रात निघालेल्या परित्यक्ता मुक्ती यात्रेच्या स्वागतासाठी मुंबईत विक्रोळी पार्क साईट येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी कार्यकर्त्याच्या उत्साहाने सहकुटुंब भाग घेतला आणि काही काळानंतर इथेच युवा समितीच्या (आताचे लोकांचे दोस्त ) कार्यकर्त्यांना घेऊन, ‘परित्यक्ता, एक टाकलेली बाई’ या टेलिफिल्मचं शूटिंगही केलं. नवर्‍याने टाकलेल्या स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून टेलिफिल्मची निर्मिती करून त्यांनी कार्यकर्ता कलावंत म्हणून आपलं योगदान दिलं. अर्थात यामागे त्यांच्या कलावंत पत्नी प्रतिभाताई मतकरी यांचे खूप परिश्रम होते.

- Advertisement -

मतकरी यांच्या ‘लोककथा ७८’ या नाटकाने उपेक्षित समूहाची वेदना ठसठशीतपणे रंगमंचावर मांडली. विक्रोळी पार्क साईटच्या युवा समितीनेही या नाटकाचे दोन प्रयोग केले. कास्प प्लॅन या एनजीओच्या सहकार्याने आणि प्रतिभाताईंच्या पुढाकाराने पार्क साईटसारख्या झोपडपट्ट्यांमधील मुलांनी रत्नाकर मतकरींच्या ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नाटकाचे पन्नासहून अधिक प्रयोग केले. साधारण तीन दशकांपूर्वीची ही गोष्ट, पण विशेष म्हणजे ठाण्यातील समता विचार प्रसारक संस्थेच्या माध्यमातून झोपडपट्टीत नाट्यकला रुजवण्याचा तो प्रयोग आजही सुरू आहे.या ‘वंचितांच्या रंगमंच’ किंवा ‘स्लम थिएटर’ मधून झोपडपट्टीमधील कलावंतांनी व्यक्त व्हावे. अशी मतकरी यांची कल्पना होती आणि आहे. रत्नाकर मतकरींचं कार्यकर्तेपण कायम टिकून होतं हेच यातून दिसत नाही काय ? मध्येच कधीतरी त्यांच्या घरी गेल्यावर, आज समाजात काय चाललंय यावर थोडीफार चर्चा व्हायची. कार्यकर्त्यांकडून वास्तव समजून घेण्याचा त्यांचा तो प्रयत्न असायचा.

आजच्या घडीला जेव्हा अशा वास्तववादी साहित्यिक कार्यकर्त्यांची देशाला खूप गरज आहे, त्याचवेळी मतकरी यांचं जाणं मनात एक गूढ वेदना कायम ठेऊन गेली. मतकरी दोस्तांच्या स्मरणात कायम राहतील !

- Advertisement -

-रवि भिलाणे/रवि पेडणेकर (लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -