प्रेक्षकांविना क्रिकेट म्हणजे जणू वधूविना विवाह – अख्तर

shoaib akhtar

करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिने जगातील जवळपास सर्वच खेळ बंद होते. मात्र, आता हळूहळू पुन्हा काही खेळांच्या स्पर्धांना सुरुवात झाली आहे. हे सामने रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना होत आहेत. येत्या काही काळात क्रिकेटलाही प्रेक्षकांविना पुन्हा सुरुवात होण्याबाबत चर्चा होत आहे. परंतु, प्रेक्षकांविना क्रिकेट झाले, तर सामन्यांतील मजा कमी होईल आणि या सामन्यांचे मार्केटिंग करणेही अवघड जाईल, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला वाटते.

रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे हा कदाचित क्रिकेट संघटनांसाठी योग्य निर्णय आहे. मात्र, तुम्ही याचे मार्केटिंग करु शकणार नाही. प्रेक्षकांविना क्रिकेट हे जणू वधूविना विवाहासारखे आहे. सामने खेळताना तुम्हाला प्रेक्षक स्टेडियममध्ये हवे असतात. त्यांच्याविना सामन्यांतील मजा कमी होईल. त्यामुळे पुढील एका वर्षात आपण करोनावर नियंत्रण मिळवू आणि परिस्थिती पूर्ववत होईल अशी मला आशा आहे, असे अख्तरने नमूद केले.

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीनेही असेच काहीसे मत व्यक्त केले होते. चाहत्यांच्या उत्साहामुळेच मैदानावरचे बरेच क्षण खास बनतात. सामने सुरू राहतील. खेळ जसा आणि ज्या भावनेने खेळला पाहिजे, तसाच आम्ही खेळू. मात्र, प्रेक्षकांविना त्यातील जादू थोडी कमी होईल, असे कोहली म्हणाला होता.