घरगणपती उत्सव बातम्याकोकणातील गणपती; सांस्कृतिक जतन आणि सामाजिक बांधिलकी

कोकणातील गणपती; सांस्कृतिक जतन आणि सामाजिक बांधिलकी

Subscribe

घरातल्या, दारातल्या माणसांशी संवाद साधण्याचा गणपती हा मला एक शाश्वत मार्ग दिसतो. एरवी कोकणी माणूस कशाला घाबरत नाही, परिस्थितीने असा काही अंगभूत चिवटपणा आलेला असतो की अतिशय टोकाच्या प्रसंगातही ती जीवन संपवण्याचे नाव घेणार नाही. पेज खाऊन दिवस काढेल, पण कोणाच्या दारावर जाऊन हात पसरणार नाही. नेत्यांची चमचेगिरी करत फिरणार नाही... गेल्या काही वर्षांमध्ये याला काही अपवाद झाले असतील, पण ती संख्या अजूनही खूप कमी आहे.

कोकणातील गणपती हा मला कधीच फक्त वर्षाचा उत्सव वाटत नाही… तो लाल मातीच्या संस्कृतीचे जतन आहे. निसर्गाचा आविष्कार आहे आणि सामाजिक बांधिलकीचा भवताल आहे. जो घरादारात, परिसरात रात्रीच्या ़फुललेल्या प्राजक्तासारखा दिसतो. पहाटे आसमंत दरवळून टाकणार्‍या आणि दवबिंदूत न्हाऊन गेलेल्या जुईच्या मंडपासारखा भासतो… श्रावण सरी बरसू लागल्या की अधीर मन कोकणाकडे ओढ घेऊ लागते आणि भाद्रपदातील गणेश चतुर्थी दररोज तनामनात गुंजन करू लागते…आणि चतुर्थीचे ते दिवस वर्षभराचे आनंदविश्व मनी घट्ट करून जातात. घरातल्या, दारातल्या माणसांशी संवाद साधण्याचा गणपती हा मला एक शाश्वत मार्ग दिसतो. एरवी कोकणी माणूस कशाला घाबरत नाही, परिस्थितीने असा काही अंगभूत चिवटपणा आलेला असतो की अतिशय टोकाच्या प्रसंगातही ती जीवन संपवण्याचे नाव घेणार नाही. पेज खाऊन दिवस काढेल, पण कोणाच्या दारावर जाऊन हात पसरणार नाही. नेत्यांची चमचेगिरी करत फिरणार नाही… गेल्या काही वर्षांमध्ये याला काही अपवाद झाले असतील, पण ती संख्या अजूनही खूप कमी आहे. शहरे सोडली तर अजूनही खेडोपाड्यातील आणि गावकुसातील कोकणी माणूस आपल्या मतांवर ठाम आहे. या ठामपणात, मनाच्या खंबीरतेत कोकणातील महिला पुढे आहेत. केरळ आणि गोव्याची मातृसत्ताक पद्धत येथील वातावरणात नि:शब्द पसरून राहिलीय…

माझेच घर नव्हे तर हजारो कोकणी माणसांची घरे सांभाळून ठेवलीत ती एका आईने, चुलतीने, मोठ्या बहिणीने, आत्याने आणि मावशीने. ही गे, आये… वडिलोपार्जित घर वाडी तर सांभाळतेच, पण संस्कृतीचे संस्कार तिने आमच्या मनांवर केलेत… त्याचा कधी बाजार करू नकोस, हे तिने आपल्या कृतीमधून न बोलता सांगितलंय. ती शिकलेली नाही, पण नवस सायासापलीकडे तिने आम्हाला घडवले आहे. आपल्या घरी दीड, पाच, सात दिवसांच्या मुक्कामाला आलेला तो विघ्नहर्ता सर्व सुखदुःख विसरायला लावणारा आहे. त्याला मनोभावे हात जोड… कुठे आणखी नवस बोलायला आणि फेडायला लाखोंच्या गर्दीत जाऊ नकोस, असे ती माऊली सांगते तेव्हा… एक प्रकारे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची सीमारेषा तिने आखून दिलेली असते… साने गुरुजी, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, नाथ पै, मधू दंडवते आणि एस.एम.जोशी यांचा माणूस केंद्रस्थानी सांगणारा समाजवादी विचार तिने कुठलेही पुस्तक न वाचता रुजवलेला असतो… एके काळी राजापूर मतदारसंघ हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता आणि वेंगुर्ले ही या बालेकिल्ल्याची पंढरी होती आणि या पंढरीचा देव होता, नाथ पै! गरीबांचा नाथ. गणपती हा सण नाथ पै यांच्यासाठी लोकसंपर्काचे मोठे साधन होते. ते गणपतीच्या 11 दिवसांत कोकण पिंजून काढायचे. त्याचा प्रभाव अजूनही जाणवतो. तो वेंगुर्ल्यात अनेकांच्या घरात देवांच्या बाजूला असलेल्या नाथ पै यांच्या तसबिरीतून दिसतो… कसालला आमच्या आत्याच्या घरातील मोठ्या तुळईवर नाथ पै यांच्या चित्रासह थांब लक्ष्मी कुंकू लावते, जनता दलाला मत देते! यातूनही तो ठळकपणे समोर येतो. हे सारे अजूनही सामाजिक बांधिलकीच्या खुणा सांगणारे आहे. टोकाचा नास्तिकपणा म्हणजेच समाजवाद हा अपप्रचार कोकणाने खोदून काढला आहे. माझे घर, माझा देव आणि माझी संस्कृती मी जपणार.. त्याचा कधी बाजार करणार नाही, कधी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही! संस्कृतीची मुळे अशी कोकणात खोल रुजलीत…

- Advertisement -

निसर्ग हा आजही या भागात केंद्रस्थानी आहे. तोच जनमानसात दिसतो, गणपतीत बहरून येतो. गणपतीतील पारंपरिक सजावटीच्या रूपाने हा निसर्ग दारातून घरात येतो. गणपतीच्या डोक्यावरील आरास म्हणजे मालवणी भाषेत माटी ही आंब्याची पाने, नारळ, सुपारी, रानफुले आणि रानातील रंगीबेरंगी फळे यांनी सजवलेली असते. जागतिक पर्यावरण शास्त्रज्ञ माधवराव गाडगीळ कोकणाचा मोठा भाग असलेली पश्चिम घाट जैवविविधता जपली पाहिजे, ती जगातील हेरिटेज अशी नैसर्गिक संपत्ती आहे, हे सातत्याने सांगत आहेत, ते याच कोकणातील गणपतीच्या निमित्ताने होणार्‍या पर्यावरण संस्कृतीशी जोडले गेले आहे. कोकणी जनता ते गेली कित्येक वर्षे करतेय… कोकणातील देवराई हा प्रकारही त्यातच येतो. ग्रामदेवतेच्या देवळाभोवती काही एकर पसरलेले वटवृक्ष त्याची साक्ष आहेत. दोनेकशे वर्षांपूर्वीच्या वड आणि पिंपळाच्या एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या आणि त्याची जमिनीत गेलेली मुळे जगात कुठेही विकत न मिळू शकणार्‍या ऑक्सिजनची कोठारे आहेत.

निसर्ग गणपती कसा असतो तो भारतातील नामवंत वास्तू रचनाकार अजित परबच्या घरी मला दिसतो. वेंगुर्ल्यात राऊळवाड्याकडून बाजाराकडे जाताना साकवाच्या अलीकडे अजितचे टिपिकल कोकणी घर आहे. चिरे, माती आणि दगड यांचे अप्रतिम मिश्रण असलेले. या घरातील त्याचा गणपती तुम्हाला किमान अर्धा तास तरी घरातून पाय काढू देणार नाही. मूर्ती शाडूच्या मातीची आणि छोटी. निवांत वडाच्या झाडाखाली पहुडलेली. मूर्तीला कोणताही रंग नाही. डोळे मात्र तुमच्या मनाचा ठाव घेणारे, हत्तीसारखे! शाडूच्या राखाडी मुळ रंगावर कुंकू आणि हळद चार बोटात पकडून नाजूकतेने हलकेच उधळण केलेली. चारी बाजूला छोटी छोटी झाडे, वेली, फुले, हिरवा निसर्ग गालिचा. समोर भोपळ्याची मोठी घंटा आणि गर्द अंधारात निसर्ग उजळवून टाकणारी समईची फक्त एक ज्योत!

- Advertisement -

अजित श्रीमंत घरातला. बघितले तर झगमगी वातावरणाचा दिखावा तो करू शकतो, पण त्याला तसे वाटत नाही आणि तो आपल्या कृतीमधून निसर्गगान सांगत इतरांना निसर्ग जपण्याचा संदेश देतो. अजितच्या घरी माधवराव गाडगीळ आणि देशातील अनेक नामवंत पर्यावरण मंडळी, बरेच वास्तू रचनाकार येतात, काही दिवस थांबतात. निसर्ग वाचवण्याचा लढाईत सामील होतात… केरळात पुराने शेकडो माणसे दगावली, हजारो कोटींचे नुकसान झाले त्याला नैसर्गिक आपत्ती कारणीभूत नाही तर विकासाच्या नावाखाली केलेला विनाश आहे. बॅक वॉटरची बुजवलेली आणि वळवलेली पात्रे, बेसुमार वृक्षतोड, कापून काढलेले डोंगर आणि खनिजे मिळवण्यासाठी निर्माण केलेल्या असंख्य खाणी… हे गाडगीळ पुराव्यांनिशी सांगतात तेव्हा ते कोकण आणि गोव्याच्याही निसर्गाचा केरळप्रमाणे र्‍हास होत चालला आहे आणि एके दिवशी या संपन्न भागाचाही विनाश व्हायला वेळ लागणार नाही, याचा इशाराही देतात… जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि नाणार रिफायनरी हे तर कोकणावर पडणारे अणुबॉम्ब आहेत. या विनाशकारी प्रकल्पांमुळे भविष्यात माणूसच वाचला नाही तर कोणासाठी भकास विकास हवा आहे? हा गाडगीळ यांचा लाखमोलाचा सवाल आहे. गणपतीच्या उत्सवात पर्यावरण वाचवा, असा संदेश घेऊन गावोगावी फिरणारे सत्यजीत चव्हाण, राजेंद्र फातर्फेकर, सचिन चव्हाण, मंगेश चव्हाण, मंगेश सावंत ही व्यवसायाने अभियंते, सीए, अधिकारी असलेली मंडळी आज सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन निसर्गदूत बनलीत. तुमच्या आमच्यासारखा या सर्व निसर्गदुतांच्या घरीही गणपती आहे, पण हे सारेजण निसर्ग वाचवण्याचा लढा घेऊन कोकणात उतरलेत आणि तो निसर्गकार गणपती त्यांना आपल्या या उत्सवात निसर्ग वाचवण्यासाठी आणि वर्षभर जैतापूर आणि नाणार रिफायनरीसारख्या विनाशकारी प्रकल्पाविरोधात लढण्याची ताकद देतो…

या सार्‍या निसर्गदुतांनी वेंगुर्ल्यात परबवाडा ग्रामपंचायतीत गणपतीच्या दिवसांत अणुऊर्जा प्रकल्प आणि पालघरच्या तारापूरसह जगभरात त्याचे झालेले मानवी अस्तित्व नष्ट करू पाहणारे भयानक परिणाम चित्रफितीच्या माध्यमातून आणि शास्त्रीय चौकटीत राहून समजावून सांगितले आहेत. हे भयानक वास्तव समोर येते तेव्हा जैतापूर अणुऊर्जा आणि नाणार रिफायनरी हे प्रकल्प हे फक्त राजापूर जाळणारे नाहीत, तर अख्खा कोकण, घाटमाथा साफ पुसून टाकणारा तो विनाश आहे, हे ते उदाहरणांसकट सांगतात. परिणामी आपल्याला काही होणार नाही, हे सिंधुदुर्गच्या टोकावर असलेल्या वेंगुर्लेवासियांचा गैरसमजही ही उदाहरणे दूर करतात.

मुंबईत मोठ्या संख्येने असलेले चाकरमानी या मायनगरीत कसेही दिवस काढत असले तरी मनाने ते आपल्या गावात असतात… पोटाची खळगी भरताना आपला गाव, घर टिकले पाहिजे ही त्यांची ओढ दादरच्या कोतवाल गार्डन, परळच्या शिरोडकर शाळेतील मासिक बैठकांमधून दिसून येते. दर महिन्याला पन्नास, शंभर रुपये वर्गणी भरून तो कोकणातील आपली घर संस्कृती वाचली पाहिजे, यासाठी धडपडतो… गाव बांधून ठेवण्याच्या मार्गाचा देवदूत होतो. या छोट्याशा निधीमधून कोकणातील वाडी आणि गाव मंडळे गणपतीत वार्षिक कार्यक्रम घेतात. यावेळी शाळेतील, कॉलेजमधील गुणवान मुलांचा रोख रकमेची बक्षिसे देऊन सत्कार केला जातो, गरीब मुलांना दत्तक घेतले जाते. गणेश मूर्ती तसेच सजावट स्पर्धा घेऊन गावच्या कलाकारांचे कौतुक केले जाते आणि याचवेळी गरजू मुलांना नोकरीसाठी मुंबईला घेऊन जाण्याची प्रक्रिया येथेच सुरू होते… यावेळी आलेला गणपत धुरी. रे, झिला माझ्या बाळग्याक मुंबयत खुय तरी चिकटव मरे, असे सहज सांगून जातो. याचवेळी गावचे रस्ते, दिवे, पाणी, बचत गट यासाठी मार्ग काढले जातात. दहा एक वर्षांपूर्वी गणपतीतील अशाच कार्यक्रमातून आमच्या वेंगुर्ल्यातील परबवाडा गावातील पाणी प्रश्न कायस्वरूपी सुटला. सरकारच्या जलस्वराज्य योजनेमधून तो यशस्वीपणे राबवण्यात आला…

साथी मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या चिवट आणि अथक प्रयत्नांमुळे कोकणात रेल्वे आली.. आज महिन्याला कोकणी माणूस या सेवेचा फायदा घेऊन आपल्या गावी जातो, घरवाडी सांभाळतो… रेल्वेच्या आरामदायी प्रवासामुळे
आता गणपतीत कोकणात गावी जाणार्‍यांची संख्या खूप मोठ्याने वाढली आहे… मात्र ही गावी जाण्याची ओढ फक्त उत्सवी रूप घेता काम नये! गणपती हा विद्येचा, शक्तीचा आणि निसर्गाचा देव आहे. त्याची पूजा करताना निसर्ग सांभाळला गेला तर पाहिजेच, पण भोवतालची माणसेही जपली पाहिजेत. ‘नाही रे’ वर्गातील माणसांना हात दिला पाहिजे. प्रत्येकाने किमान एक माणूस सक्षम केला पाहिजे… गाव उभारला पाहिजे. खेड्यातील माणूस उभा झाला तर तालुका, जिल्हा, राज्य आणि देश उभा राहील आणि खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, हे महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार होईल!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -