घरफिचर्सघुसमटीचा आत्मविस्फोट !

घुसमटीचा आत्मविस्फोट !

Subscribe

कौटुंबिक पातळीवर घरातील सदस्यांचा आपसातील संवाद कमी झाला आहे. मोबाईलसारख्या गॅझेट्समुळे माणसे आत्मकेंद्री झाली आहेत. ती स्वत:मध्येच गुंतून पडली आहेत. त्यामुळेच मनातले दबाव, तणावाची चर्चा खुलेपणाने केली जात नाही. समाजमाध्यमे ही संवादापेक्षा मते मांडण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे या ठिकाणी व्यक्तीची घुसमट कमी होण्यापेक्षा वाढते. जगाप्रती असलेला राग, अपयश आणि पराभवाची भावना, आपल्या अवतीभवतीच्या लोकांनी आपले मानसिक खच्चीकरण करण्यासाठी उपसलेले जातीयतेचे हत्यार, यामुळे भवतालाविषयी रोषाची भावना वाढीस लागते. गॅजेट्समुळे आलेले एकाकीपण ही भावना वाढवण्यास पोषक ठरते. त्यातून भावनांचा निचरा होत नसल्यामुळे ही घुसमट असह्य झाल्यावर आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. डॉ. पायल तडवीसारख्या उच्चशिक्षित महिलेने आत्महत्येचे पाऊल उचलल्यामुळे व्यक्तीची पावले आत्मविस्फोट करून घेण्याकडे का वळतात, याचा सखोल विचार होण्याची गरज आहे.

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्नांनी पुन्हा डोकी वर काढली आहेत. मानवी आत्महत्येची कारणे अनेकदा कौटुंबिक असतात. मात्र ज्यावेळी ही कारणे सामाजिक होतात, त्यावेळी स्थिती आणखी धोकादायक होते. कौटुंबिक कारणे अनेकदा तात्कालिक असतात. पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्ये आत्महत्येची कारणे आणि त्याहून मोठ्या वयाच्या साधारण ३० वर्षे वयानंतरच्या व्यक्तीच्या आत्महत्येची कारणे यात फरक असतो. तसाच फरक महिला किंवा पुरुषांच्या आत्महत्येच्या कारणांत असतो. पौगंडावस्थेत मानसिक आणि शारिरीक बदलांना सामोरे जाताना त्याचा मनावर परिणाम होत असतो. स्वत्वाची जाणीव याच वयात विकसित होत जाते. त्यामुळेच प्रेमात अपयश, विरह, परीक्षेत नापास झाल्याची भीती, कौटुंबिक दबाव आदी कारणे अशा आत्महत्येमागे असतात.

कुटुंब स्तरावर योग्य संवाद नसल्यामुळेही आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असते. भारतासारख्या विकसनशील देशांत मानवी आनंदाच्या व्याख्या झपाट्याने बदलत आहेत. जागतिकीकरणानंतर ही स्थिती आणखी भयावह झाली आहे. प्रोफेशनलिझम, करिअर, पैसा, यशाची गणिते, स्पर्धा यामुळे त्यात भर पडत आहे. त्यामुळे भवतालच्या जगासोबत जुळवून घेणे आणि या स्पर्धेत मागे पडण्याची भीती हेसुद्धा आत्महत्येचे कारण आहे.

- Advertisement -

कौटुंबिक पातळीवर घरातील सदस्यांचा आपसातील संवाद कमी झाला आहे. मोबाईलसारख्या गॅझेट्समुळे माणसे आत्मकेंद्री झाली आहेत. ती आपल्यात गुंतून पडली आहेत. त्यामुळेच मनातले दबाव, तणावाची चर्चा खुलेपणाने केली जात नाही. समाजमाध्यमे ही संवादापेक्षा मते मांडण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे या ठिकाणी व्यक्तीची घुसमट कमी होण्यापेक्षा वाढते. जगाप्रती असलेला राग, अपयश आणि पराभवाची भावना यामुळे आत्महत्येचा विचार येणा-या व्यक्तींमध्ये भवतालाप्रती एक प्रकारच्या रागाची भावना वाढीस लागते. गॅजेट्समुळे आलेले एकाकीपण ही भावना वाढवण्यास पोषक ठरते. त्यातून भावनांचा निचरा होत नसल्यामुळे ही घुसमट असह्य झाल्यावर आत्महत्येचे पाऊल उचलले जाते.

घुसमट किंवा तणाव असह्य होण्याला निश्चित अशी कालमर्यादा नाही. बरेचदा तणाव मनात कायम ठेवल्याने तो वाढत जातो. संवाद होत नसल्यामुळे वाईट अनुभवांची मालिका मनात तयार होत जाते. त्यातून ताण वाढल्याने याची परिणती आत्महत्येच्या घटनेत होते. असा ढोबळ गैरसमज आहे की, आत्महत्या करणा-या व्यक्तीचे जीवनावर प्रेम नसते, जगण्याची ओढ नसते, मात्र हे खरे नाही. अशा व्यक्तीचेही जगण्यावर पुरेसे प्रेम असते, परंतु सहजसाध्य आणि मनासारखे जगण्याच्या वाटा बंद झाल्याच्या भ्रमातून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले जाते. जगण्याची सकारात्मक तीव्र इच्छा असल्याने ज्यावेळी त्यातून निराशा निर्माण होते. ती निराशाही त्याच प्रमाणात तीव्र स्वरुपाचीच नकारात्मक अशीच असते. मग असे जगणे टाळण्यासाठी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला जातो.

- Advertisement -

जाळून घेणे, उंचावरून उडी घेणे किंवा रेल्वेखाली स्वतःला झोकून देणे अशा घटना आपल्या आजूबाजूला घडल्याचे आपण ऐकतो. अनेकदा याची कारणे कौटुंबिक असतात. आपल्याला कुणीच समजून घेत नाही, अशी मानसिकता यामागे अनेकदा असते. कौटुंबिक स्तरावरील जिव्हाळा, प्रेम, आत्मियता नाहीशी होणे. त्यातून व्यक्तीच्या अपेक्षांची हेळसांड झाल्याने जगण्याविषयी नकारात्मकता वाढीस लागते. अन्न, घर, कपड्यांच्या पलिकडे शारीरिक गरजांचे सातत्याने होणारे दमनही आत्महत्येचे एक समोर न आलेले कारण असू शकते. कौटुंबिक भांडणात टोकाच्या तणावामध्ये मानवी संवेदना रागाच्या नियंत्रणात जातात. असा बधिर अवस्थेत विवेक काम करत नाही, ही स्थिती धोकादायक असते. त्यातूनच स्वतःला पेटवून घेण्याचे प्रकार घडतात. इतर वेळेच छोट्याशा चटक्यालाही घाबरणारी व्यक्ती संवेदना बधिर झाल्यामुळे रागाच्या भरात आत्महत्या करतात. ज्यावेळी ही केलेली चूक ध्यानात येते. त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. भयावह तणावाचा हा क्षण टाळण्याची गरज असते. मात्र विभक्त कुटुंबपद्धतीत आणि अलिकडच्या बदलत्या सामाजिक गरजांच्या परिस्थितीत ही बाब कठिण होत आहे.

माणसाचे स्वतःवर, कुटुंबावर, समाजावर, मित्र आणि नातेवाईकांवर प्रेम असते. या नातेसंबंधातून व्यक्तीच्या जगण्याच्या कारणांचा आनंद सामावलेला असतो. मात्र, या घटकांच्या प्रती असलेल्या जबाबदारीच्या बदल्यात त्याच्याही या घटकांकडून अपेक्षा असतात. या अपेक्षा ज्यावेळी आत्मियता किवा जबाबदारीच्या तुलनेत मोठ्या होतात त्यावेळी तिथे तणाव निर्माण होतो. नातेसंबंधातील अविश्वास, संशय, चारित्र्यहनन, विसंवाद, आत्मियतेपेक्षा अधिकाराची भावना वाढल्यानंतर कुटुंब पातळीवर आत्महत्येच्या घटना समोर येतात. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त असते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना त्यांच्या भावनांचा निचरा करण्याची सुविधा समाजव्यवस्थेत जास्त असते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना दुय्यम मानले जाते. ही दुय्यमता निराशाजनक असते. शिक्षणाचा अभाव, तणावाचं योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे कौटुंबिक कारणावरून होणा-या आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मानसिक घुसमटीतूनच महिलांच्या आत्महत्या वाढण्याचे हे महत्वाचे कारण आहे.

आत्महत्यांची सामाजिक कारणे थोडी वेगळी असतात. समाजनिंदा, भीती, चारित्र्यहनन, लोकलज्जा, मानहानी अशी कारणे या ठिकाणी असतात. शेतक-यांच्या आत्महत्येमागे घेतलेले कर्ज न फेडणे हे प्राथमिक स्वरुपाचे कारण असते, मात्र त्यातून होणारी सामाजिक अवहेलना, कुटुंबाची चिंता, घरातील लग्नकार्य, आर्थिक जबाबदारीच्या कारणांची अपूर्तता त्यातून होणारी सामाजिक थट्टा आदी कारणे असू शकतात. कुटुंबाची जबाबदारी म्हणजेच सदस्यांच्या गरजा पूर्ण न करण्याची असमर्थता यामागे असते. यातील महत्वाचा भाग आर्थिक असतो. वित्तीय व्यवहारात व्यक्तीच्या गरजांचे मूल्य सारखेच ठरवले जाते. त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी असलेल्या क्षमतांचा विचार दुय्यम असतो. आधुनिक समाजव्यवस्थेचाही हाच पाया असतो. त्यातून होणारी घुसमट संपवण्यासाठी आत्महत्येचा पर्याय निवडला जातो.

पौगंडावस्थेत भावना इच्छा टोकाच्या असतात. अपयश पचवण्याची प्रगल्भता पुरेशी नसते, संवेदना टोकदार असतात. गरजा, भावना आणि अनुभव कमी असल्याने आलेले संकट जीवनाच्या तुलनेत खूपच जड वाटते. यावेळी कौटुंबिक आधार महत्वाचा असतो. विद्यार्थी-विद्यार्थींनीमध्ये परीक्षेत नापास होण्याच्या भीतीमागे अनेकदा इतर कारणे असतात. समाजनिंदा आणि कुटुंबातील यशाच्या धारणेचे ओझे झाल्याने या आत्महत्या घडतात.

व्यसन हे आत्महत्येचे एक सामाजिक कारण असते. मानवी जगण्याला मर्यादा असतात. प्रत्येकाच्या जगण्याच्या आपापल्या सुप्त इच्छा असतात. मात्र, समाज अशा बेफिकीर जगण्याला परवानगी देत नसतो. भवतालचा एक दबाव मानवी मनावर कायम असतो. या दबावातून येणारे सोसलेपण, व्यसनाच्या अंमलाखाली झुगारले जाते. त्यामुळेच मद्यपान केलेली व्यक्ती बेफिकीरीने वागत असते. असे वागणे हे त्या व्यक्तीत दबलेल्या इच्छांची पूर्तता असते. राग, प्रेम, भावनिकता, अगतिकता, बेफिकीरी, टोकाच्या संवेदना, जिव्हाळा किंवा आत्मियता निर्माण होणे ही लक्षणे अमली पदार्थाचे सेवन केलेल्यांमध्ये दिसतात. मद्यासारखा अमली पदार्थाचे परिणाम व्यक्तीला कौटुंबिक, सामाजिक अधःपतनाकडे नेणारे असतात, तर तंबाखूजन्य पदार्थांचे व्यक्तीगत, परंतु तीव्र स्वरुपचे असतात. बधिर, चेतनाहीन असण्याची इच्छाही आत्महत्येकडे नेणारी असते.

सामाजिक स्वरुपातील आत्महत्येचे कारण ठरणारे घटक भारतीय समुदायात अनेक आहेत. जातवास्तव, रुढी, परंपरा, धार्मिक नियम, असे सामाजिक दबावाचे घटक समाजात विद्यमान असतात. जातवास्तवामुळे माणसाच्या मानवी संवेदनेची गळचेपी होते. व्यक्ती चांगली किंवा वाईट हे ठरण्यात जातवास्तवाचे निकष वापरले जातात. ही एक गटवादी चौकटीची भयानक स्थिती असते. जातव्यवस्था मानवी विश्वासाला तडा देते, त्यामुळेच जातींच्या गटांचे समुदाय बनतात. हे समुदाय इतर जात सदस्याला आपल्यात सामावून घ्यायला तयार होत नाहीत. यातून व्यक्तीला वाळीत टाकणे, दुर्लक्ष करणे, नकारात्मक वागणूक देणे आदी प्रकार होतात.

आत्महत्येसाठी सामाजिक निराशेचे हे मोठे कारण असते. नुकत्याच झालेल्या डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येची कारणे शोधण्यासाठी एका सत्यशोधन समितीची स्थापना करण्याचे वैद्यकीय क्षेत्राने ठरवलेले आहे. आत्महत्येच्या सामाजिक कारणांच्या दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांच्या संघटनात्मक पातळीवर हा विचार करण्यात आला आहे. वैद्यकीय व्यवसायात ताणतणाव असतातच. ते नाकारता येत नाहीत. देशाच्या आणि खासकरून मुंबईच्या लोकसंख्येचा विचार केल्यास ही बाब ध्यानात येते. मुंबईतील जेजे. केईएम यासारख्या मोठ्या रुग्णालयांत रोज दाखल होणा-या रुग्णांची संख्या मोठी आहे. वैद्यकीय व्यवसायातील कामातील चुकांचा संंबंध थेट मानवी जीविताशी जोडला जातो. त्यामुळे हा तणाव इतर क्षेत्रातील तणावापेक्षा जास्त असतोच. त्यातही जर जातवास्तवाची त्यात भर पडल्यास या उपेक्षेतून आत्महत्येच्या घटनेला पोषक वातावरण निर्माण होते. डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येमागे कनिष्ठ जात वास्तवाचे कारण असल्याचा आरोप होत आहे.

हे कारण मानसिक तणावाच्या कारणापेक्षा जास्त धोकादायक आहे. नोबेल प्रोफेशन मानल्या जाणा-या वैद्यकीय व्यवसायात अशा प्रवृत्तींना जागा नको, असा गंभीर विचार करून या घटनेच्या चौकशीसाठी डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. हा खटला स्थानिक तपास यंत्रणांकडून काढून गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामागेही हेच कारण आहे. डॉ. पायल या मागासवर्गीय गटातून असल्याने त्यांना सहका-यांकडून हिणवले जात असल्याचा आरोप आहे. या निराशेतूनच ही आत्महत्या झाल्याचा आरोप केला गेला आहे. डॉ. पायलच्या जवळच्या सहका-यांचा जबाब पोलिसांकडून नोंदवला जात आहे. या मागे जातवास्तवाचे कारण असेल तर ती चिंतेची बाब आहे.

जातीय भावना या कमालीचा निराशावाद पेरतात. मैत्री, आत्मियता, जिव्हाळा, प्रेम या मानवी भावनांना अनेकदा जातव्यवस्थेत बळी जावे लागते. सामाजिक आत्महत्येचे हे एक मोठे कारण आहे.

तणावाचे नियोजन कसे करावे

आग तोपर्यंतच पेटती राहते जोपर्यंत जळून जाण्यासाठी त्यात कुठल्यातरी इंधनाची आहुती पडत राहते. एक वेळ अशी येते की इंधन संपून जाते आणि उरते ती फक्त राख. Burnout ही संज्ञा शब्दशः नसली तरी मानसिक आणि शारीरिक पातळीवर अगदी अशाच पद्धतीने अनुभवाला येते.

शिक्षण पूर्ण झालं की स्वतः निर्णय घेऊन किंवा नाइलाज म्हणून, आर्थिक, सामाजिक, मानसिक गरजा पूर्ण होण्यासाठी आपण नोकरी-उद्योग-प्रवास इत्यादी सुरू करतो. आपण करत असलेले काम हे आपल्या ‘स्व’च्या कल्पनेशी इतकं जोडलेलं असतं की आयुष्याचा कायापालट दोन्ही चांगल्या आणि वाईट अर्थाने करायची क्षमता आपल्या कामाच्या स्वरूपात असत. हळूहळू यात आपली ध्येय, स्वप्न, ईर्षा, स्पर्धा, वाढत्या गरजा या गोष्टी कधी शिरकाव करतात ते आपल्याला कळत नाही आणि आपण फसतो एका भीषण अतिव्यस्ततेच्या चक्रव्यूहात!

या burnout चा एक महत्वाचा भाग म्हणजे कामातून मिळत असणारं समाधान, मी काहीतरी महत्वाचं योगदान देत आहे ही भावना, आणि आपली उत्पादनक्षमता (कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त केलेलं उत्तम दर्जाचं काम) या सर्वांवर होणारा दृश्य वाईट परिणाम!

दिवसेंदिवस येत असणारी अस्वस्थता, कामाचा वाढता आवाका, न संपणार्‍या deadlines, मानसिक, शारीरिक आणि भावनिक थकवा, काम, संस्था आणि boss बद्दल वाटणारा राग, आपण अडकून पडलो आहोत असं वाटणं, अकार्यक्षमतेमुळे येणारी अपराधी भावना या सगळ्या हळूहळू पण सतत येणार्‍या अनुभवांना म्हटलं जातं burnout! अगदी टोकाच्या अवस्थेत हा burnout चा भस्मासूर नैराश्य, आत्महत्या, कौटुंबिक तणाव, आरोग्यावर बेसुमार दुष्परिणाम असं पण रूप घेऊ शकतो. हळूहळू आपण आपला उत्साह, हुरुप आणि आत्माच हरवून बसतो. अति शेवटी माती करतो.

Burnout का होतो?

-कर्मचार्‍यांकडून ठेवलेल्या अवास्तव अपेक्षा आणि मागण्या. वाढतं काम, अपुरी साधनं, प्रवासाच्या आणि कामाच्या गैरसोयीच्या वेळा
-या अपेक्षा पूर्ण करताना कर्मचार्‍यांकडे असणारे अपुरे कौशल्य, ऊर्जा आणि इच्छाशक्ती
– कुटुंब, संस्था आणि मित्र-नातेवाईकांकडून मिळणारा तोकडा सपोर्ट
-कौतुकाचा अभाव आणि योग्य त्या वेळी न मिळालेलं पण due असणार promotion, पगारवाढ इत्यादी
– व्यक्तीमध्ये बदलाला सामोरं जाण्याची तयारी नसणे, आपल्या मागण्या आणि आपली असमर्थता ठामपणे व्यक्त न करता येणं, तणाव आणि भावनांचं व्यवस्थापन करता न येणे
– अनेक आर्थिक आणि सामाजिक समस्या जसं की बेरोजगारी, गरीबी, वाढती लोकसंख्या, महागाई, कायमस्वरूपी काम मिळवण्यामधली असुरक्षितता, नवीन तंत्रज्ञानाचं आव्हान, उदासीन आणि अर्धवट पुस्तकी ज्ञान देणारी शिक्षणव्यवस्था इत्यादी

या burnout राक्षसापासून स्वतःला कसं वाचवायचं?

– स्वतःसाठी शांतता शोधा. जेव्हा आता बस असं वाटेल तेव्हा स्वतःला space द्या. मध्ये मध्ये कामातून ब्रेक घेत चला. विश्रांती घ्या, वेळेवर आणि छान जेवण करा, भरपूर पाणी प्या, व्यायामाला आयुष्याचा भाग बनवा. सहलीला जा. फोन आणि इतर स्क्रीन दूर ठेवा. कधीतरी स्वतःला priority द्या.

– कधी कधी अगदी काहीच करू नका. मेंदूला सतत काहीतरी कामात गुंतवायलाच हवं असं अजिबात नाहीये.

– तुमचे अनुभव लिहीत राहा. व्यक्त होण्याचा एक सुंदर पर्याय.

– मित्र मैत्रिणींना भेटत राहा किंवा एकटे राहायला आवडत असेल तर तो वेळ स्वतःला नक्की द्या.

– तुम्हाला आवडणार्‍या आणि आयुष्य अर्थपूर्ण बनवणार्‍या गोष्टींमध्ये सहभागी व्हा. कामाच्या पलीकडे स्वतःचे छंद आणि स्वतःची ओळख बनवा.

– नाही म्हणायला शिका. काम आणि घर यात एक स्पष्ट रेषा आखून ठेवा. स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि अतिताण येईपर्यंत त्या ओलांडून स्पर्धेतील अजून एक अनोळखी चेहरा बनू नका. कुठे थांबलं पाहिजे हे कळलं की सहज होतं बरंच काही.

– योग्य वेळी घरच्यांचा आणि वेळ आली तर मानसशास्त्रज्ञांचा, डॉक्टरांचा आधार घ्या. तुमच्या मानसिक आरोग्यापेक्षा काहीच मोलाचं नाही.

– गरजा आणि कामना यात खूप फरक असतो. योग्य वेळी योग्य त्याची निवड करा. नवीन कौशल्य आत्मसात करा, जी कामाच्या ठिकाणी उपयोगी येतील. सुदैवाने इंटरनेट अगदी फुकटात काही उत्तम कोर्सेस कमी वेळात शिकवू शकतो. आपले प्लस आणि मायनस नेहमी जोखून ठेवा आणि त्यात सतत update करत राहा. तणावाचे नियोजन आणि भावनांचे व्यवस्थापन काळाची गरज आहे. त्याला पर्याय नाही.

– सतत व्यस्त असणं म्हणजे काहीतर खूप भारी या गैरसमजातून बाहेर या. तुमच्या व्यस्त असण्या किंवा नसण्याने जग थांबत नाही.

– अगदी असह्य झालं तर कामाला स्वल्पविराम द्या, quitting is not always loosing, sometimes it is a beautiful medium for new and better beginnings.

Burnout अगदी सुरवातीच्या अवस्थेतच ओळखणं ही त्याला थांबवण्याची पहिली पायरी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -