घरफिचर्सशेखचिल्लीपणाचे अवसानघातकी डोहाळे

शेखचिल्लीपणाचे अवसानघातकी डोहाळे

Subscribe

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते, प्रवक्ते संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा आहे. या दोघांनी मनाचा हिय्या केल्यामुळेच महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकला, अन्यथा भाजपाच्या पाठीशी पंतप्रधान मोदींसारख्या लोकप्रिय नेत्याचे बळ असल्यामुळे ते सहज साध्य नव्हते. काहीही झाले तरी आपलीच सत्ता येणार आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार, अशा भ्रमात राज्यातील देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजप नेते राहिले होते. पण झाले वेगळेच. मागील पाच वर्षे भाजपच्या मागे फरपटत राहिलेली शिवसेना आता काहीही गमवायला तयार होती. त्यामुळे त्यांनी दुसर्‍या कार्यकालात भाजपने आम्हाला मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होते, ते पूर्ण करावे ही भूमिका लावून धरली. शिवसेना आपल्या भूमिकेपासून हटेना आणि भाजपलाही काही शिवसेनेची अट मान्य होईना, यामुळे गाडी अडून बसली हे पाहिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे मान्य करून राज्यात सत्तेचा नवा फॉर्म्युला तयार केला.

ठाकरे आणि पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख घराणी आहेत. त्यांच्या राजकीय पातळीवर वेगळ्या भूमिका असल्या तरी त्यांचे वैयक्तिक पातळीवर घरोब्याचे संबंध आहेत. शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार दिला नाही. शरद पवार यांच्यावर केंद्रीय कृषीमंत्री असताना दिल्लीत एका व्यक्तीने हल्ला केला, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी त्या हल्ल्याचा निषेध केला. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जीवनावर पुस्तक प्रकाशित केले होते, तेव्हा गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दिलदार विरोधक आहेत, असा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला होता. त्यामुळे घरगुती संबंध आणि दोन्ही पक्ष प्रादेशिक असल्यामुळे दोघांचीही सारखीच गरज होती. हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, हे मान्य करण्यासारखे असले तरी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेणे आवश्यक होते, नाही तर सरकार स्थापन होऊ शकत नव्हते. शिवसेनेला जातीयवादी आणि प्रांतवादी पक्ष समजला जात असल्यामुळे अशा सरकारला पाठिंबा देणे किंवा त्यात सहभागी होणे हे सुरुवातीला काँग्रेसच्या पचनी पडत नव्हते. कारण त्यामुळे त्याचा फटका काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष म्हणून अन्य राज्यांमध्ये बसण्याची शक्यता होती, पण सध्याची काँग्रेसची अन्य राज्यांमधील स्थिती पाहता आणि नेते-कार्यकर्ते पक्षासोबत राहण्यासाठी सत्तेची गरज होती. सत्ता नसेल तर नेते आणि कार्यकर्ते सोबत राहत नाहीत, जिकडे सत्ता तिकडे जातात, हा राजकीय पक्षांचा जुना अनुभव आहे. तो महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेला होता. त्यांनाही सत्ता हवीच होती. तसेच शिवसेना-राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा देऊन काहीच फायदा नव्हता. कारण महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना त्याचा काहीच लाभ मिळणार नव्हता. त्यामुळे सरळ सत्तेत सहभागी होणे फायद्याचे आहे, हे त्यांनी लक्षात घेऊन तसा निर्णय घेतला. त्यामुळेच राज्यात अकल्पित असा फॉर्म्युला तयार झाला. सुरुवातीला या फॉर्म्युल्यामध्ये सहभागी होण्यास तयार नसलेल्या काँग्रेसला नरेंद्र मोदींना आव्हान देण्याची ही चांगली संधी आहे, हे पटवून देऊन पवारांनी आघाडीत सामील करून घेतले.
प्रत्यक्ष राजकारणाची सवय नसलेले आणि प्रकृतीच्या तक्रारी असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रासारख्या देशातील सर्वच दृष्टीने वजनदार असलेल्या राज्याचे शिवधनुष्य पेलायला झेपेल का, अशीच शंका अनेकांना वाटत होती. कारण मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीचा दिनक्रम हा अतिशय धकाधकीचा असतो, त्याचा ताण त्याच्या प्रकृतीवर पडत असतो, त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून फार काळ राहणार नाहीत, ते ती जबाबदारी आपल्या पत्नीकडे देतील किंवा अन्य कुठल्यातरी शिवसेनेच्या नेत्याकडे देतील, असे काहींना वाटत होते. इतकचे काय तर उद्धव ठाकरे यांनी प्रकृतीच्या कारणावरून असमर्थता दर्शवली तर हे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे येईल, अशीही आशा त्या पक्षाच्या नेत्यांना वाटत होती, पण तसे काहीच झाले नाही. उलट अनेकांचे जीव घेणार्‍या कोरोना महामारीचे अनपेक्षित आव्हान आल्यानंतरही डगमगून न जाता उद्धव ठाकरे यांनी अगदी कुुटूंबप्रमुखाप्रमाणे राज्याची जबाबदारी सांभाळली. फेसबुक लाईव्हवरून लोकांना ते करीत असलेले मार्गदर्शन आणि सूचना या एखाद्या कुटुंबप्रमुखाने जिव्हाळ्याने सांगाव्यात असे ते बोलत असत. विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या होतातोंडाशी आलेली सत्ता गेल्यामुळे जखमी वाघासारखी अवस्था झालेली होती. त्यामुळे ते सरकारला कोरोनाच्या महामारीतही हरतर्‍हेने कोंडीत पकडण्यासाठी आकाशपातळ एक करत होते. पण अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनी मनाचा संयम ढळू न देता, शांतपणे आपले काम चालू ठेवले. भाजपने ठाकरे सरकारची राज्यपालांच्या माध्यमातून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या नेत्यांंनी आपली कोरोना संकटातील मदत मुख्यमंत्री निधीला न देता पंतप्रधान निधीला दिली.

- Advertisement -

उद्धव ठाकरे कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलेल्या गोष्टी एक एक करून आता सुरू करत आहेत. त्यासाठी आवश्यक काळजी घेत आहेत. खरे तर कोरोनाने उद्धव ठाकरे यांची सर्वच बाबतीत कसोटी पाहिली आणि ते त्या कसोटीवर खरे उतरले. त्यांचा संयमित स्वभाव लोकांना आवडू लागला आहे. उद्धव यांची मुख्यमंत्रीपदावरील मांड पक्की होऊ लागली आहे. पण त्याचवेळी त्यांना या पदावर आणण्यासाठी मौलिक भूमिका पार पाडणारे शरद पवार आणि संजय राऊत यांना मात्र शेखचिल्लीच्या वृत्तीची लागण झालेली आहे, असे दिसते. कारण काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेसचे मुख्य नेते राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले होते. आमच्या नेत्यांवर टीका करताना विचार करा, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार हे राहुल गांधी यांना समजून घेताना कमी पडत आहेत, असे सुनावले. त्याचसोबत शनिवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत, शरद पवारांना पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू न देण्यात काँग्रेसचा मोठा हातभार आहे, असे मी पूर्वीपासून सांगत आलो आहे, असे काँग्रेसला झोंबणारे विधान केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. शरद पवार आणि संजय राऊत यांना अशी विधाने करताना आपली महाराष्ट्रातील सत्ता ही काँग्रेसच्या सहभागामुळे अस्तित्वात आहे, याचा विसर पडतो हे खरोखरच आश्चर्यकारक मानावे लागते. कारण काँग्रेस अशा टीकेला त्रासून जर सत्तेतून बाहेर पडली तर महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल. त्यामुळे सरकार टिकवायचे असेल आणि उद्धव ठाकरे यांना पाच वर्षे मुख्यमंत्री ठेवायचे असेल, तर शरद पवार आणि राऊत यांनी हा शेखचिल्लीपणाचा मोह आवरता घ्यायला हवा. संजय राऊत यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन प्रादेशिक पक्षांना एकत्र करून राष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करावी, असे आवाहन केले होते. त्यासाठी युपीएच्या प्रमुखपदी शरद पवार असावेत, अशा बातम्याही पसरल्या होत्या, पण राज्यात काय किंवा केंद्रात काय, काँग्रेसला बाजूला ठेवणे हे अवसानघातकी ठरू शकेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -