घरफिचर्सभावकवी मंगेश पाडगावकर

भावकवी मंगेश पाडगावकर

Subscribe

मंगेश पाडगावकर हे प्रतिभावान मराठी कवी होते. त्यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ले येथे झाला. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन एम.ए झालेल्या पाडगावकर यांनी दोन वर्षे महाविद्यालयात अध्यापक म्हणूनही काम केले. १९५३ ते १९५५ ही दोन वर्षे पाडगावकर यांनी ‘साधना’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम केले. मुंबई आकाशवाणीवर १९६४ ते १९७० या कालावधीत निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले.

६० आणि ७० च्या दशकात पाडगावकर, ‘ज्ञानपीठ’ विजेते कवी विंदा करंदीकर आणि कवी वसंत बापट यांचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम राज्यात अनेक ठिकाणी झाले. पाडगावकर यांनी लिहिलेली ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ ही गाणीही खूप गाजली. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविताही विशेष गाजली होती.

- Advertisement -

‘धारानृत्य’हा पाडगावकर यांचा पहिला काव्यसंग्रह १९५० मध्ये प्रकाशित झाला. सुरुवातीच्या काळात पाडगावकर यांच्या कवितेवर ज्येष्ठ कवीवर्य बा. भ. बोरकर यांचा ठसा होता. नंतर त्यांनी भावकाव्य शैलीत आणि स्वतंत्रपणे काव्यलेखन सुरू केले.‘जिप्सी’ (१९५२), ‘छोरी’ (१९५४), ‘उत्सव’ (१९६२), ‘विदुषक’ (१९६६), ‘सलाम’ (१९७८), ‘गझल’ (१९८३), ‘भटके पक्षी’ (१९८४), ‘बोलगाणी’ (१९९०) हे पाडगावकर यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. पाडगावकर यांनी ‘गझल’, ‘विदुषक’, ‘सलाम’ या काव्यसंग्रहातून राजकीय आशयाची व उपरोधिकपणा असलेली समाजातील विसंगतीवर प्रहार करणारी कविता केली.

सत्तेच्या संपर्कात राहणार्‍या वर्गातील लोकांनी सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील माणसांचा केलेला मानभंग, मध्यमवर्गीयांमध्ये आलेली लाचारी, दांभिकता याबद्दल पाडगावकर यांच्या मनात संताप होता तो या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त झाला. उतारवयातही त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. अशा या थोर कवीचे 30 डिसेंबर 2015 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -