घरफिचर्सशुजात सरांना आठवताना..!

शुजात सरांना आठवताना..!

Subscribe

आरस्पानी सौंदर्याचे वरदान मिळालेला काश्मीर कित्येक वर्षांपासून सतत जळतो-धुमसतोच आहे. ‘जन्नत’म्हणवणारा हा प्रदेश सामान्य माणसांपासून ते अभिव्यक्तीसाठी लढणाऱ्या पत्रकारांपर्यंत हरेकासाठी ‘जहन्नम’ बनलाय. गेल्या १४ जूनला ‘रायझिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. एक विवेकवादी, संवादी आणि उमदे पत्रकार अशी बुखारी यांची ओळख होती. त्यांची सहकारी राहिलेली तरुण पत्रकार मुनाजाह कंवल हिने जागवलेल्या त्यांच्या आठवणी, थेट काश्मीर खोऱ्यातल्या श्रीनगरहून...

पाश्चिमात्य लोक १३ तारखेला येणारा शुक्रवार अशुभ मानतात. पण मागच्या शुक्रवारी १५ तारीख होती. याच शुक्रवारने माझी ईद, माझा आनंद हिरावून नेला. हा तो दिवस होता ज्या दिवशी शुजात बुखारींच्या मृत्युची बातमी जगभर वाऱ्यासारखी पसरली. १४ जून रोजी दहशतवाद्यांनी त्यांच्या ऑफीसबाहेरच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. रमजान महिन्यातील शेवटच्या दिवशी रोजा सोडण्यासाठी थोडेसे खजूर व एक पेला पाणी घेण्याच्या फक्त वीस मिनिटे आधी!

तो दिवस उदासवाणा होता. माझाही रोजा असल्याने मी आधीच प्रचंड मलूल होते. शरीरात उरल्यासुरल्या शक्तीनिशी दुकानांमधील प्रचंड गर्दीत ईदसाठी मिठाया विकत घेतल्या. ऑफिसनंतर अक्षरशः कशीबशी पाय ओढत घराकडे जात होते अन् शुजात सरांवर हल्ला झाल्याची बातमी मला समजली.

- Advertisement -

मी धास्तावले. काहीशा अविश्वासानेच सत्याची खात्री करायला माझ्या काही सहकाèयांना कॉल्स केले.
हो, कार्यालयातून निघतांना त्यांच्यावर हल्ला केला गेला. थिजलेल्या आवाजात पलीकडून उत्तर आले. सहकारी सांगत होता, ‘आम्ही बंदुकीचा आवाज ऐकला, आधी आम्हाला वाटले तो फटाक्यांचा आवाज असावा. आम्ही विचार केला की लोकांना ईदची चंद्रकोर दिसली असावी आणि त्यामुळे ते आनंद साजरा करीत असतील..! आता सरांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.’

ही अप्रिय बातमी माझ्या मना-मेंदूच्या आत पोहचेपर्यंतच मागरिब(सायंकाळ)च्या नमाजसाठी स्पीकर्सवरून हाकांचा गलबलाट सुरू झाला होता. ही रोजा सोडण्याची वेळ होती. पण माझी सगळी भूकच मरून गेली होती. माझ्या घशात आवंढा दाटून आला.

- Advertisement -

शुजात सर यातून सुखरूप बाहेर पडतील अशी मला आशा वाटत होती. आमच्या वृत्तपत्राच्या फेसबुक पेजवर ही बातमी अपलोड करताना माझ्या डोळ्यांवर पाण्याचा पडदा पसरला होता.

… आणि माझी आशा अखेर हवेत विरली! शुजात सर आता कधीही या जगात असणार नव्हते. रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. उजळणाऱ्या आनंदाची रोशन ईद क्षणार्धात अंधारात बुडून गेली.

सरांसोबत आजवर झालेले उत्साही संवाद मला आठवू लागले. २०११ साल होते ते! मला तो दिवस आजही स्पष्ट आठवतो, मी ‘दै. रायझिंग काश्मीर’च्या कार्यालयात सरांना पहिल्यांदा भेटले होते. उंचेपुरे, छरहरे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व लाभलेले शुजात सर आम्हा नव्या पत्रकारांचे ‘मेंटॉर’ असायचे. त्यांचे मैत्रीपूर्ण वागणे माझ्यासाठी नेहमीच कितीतरी आश्वासक असायचे. मी काम करायचे त्या बिझनेस बीटसाठी मला संपादकांकडून सांगण्यात आले की ते आजारी होते आणि त्यांची प्रकृती आता सुधारत होती.

‘तुम्ही तरुण मुले पुरेसे कष्ट करत नाहीत.’ ‘सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर’मधून कन्व्हर्जंट जर्नालिझममधून मास्टर्स केल्यानंतर वर्षभरानंतर मी ‘रायझिंग काश्मीर’मध्ये रुजू झाले. ते माझी अशी कानउघाडणी नियमित करायचे. ते माझ्या लेखांचे संपादन करत. संपादन सुरू असतानाच काश्मीर खोऱ्यात घडणाऱ्या घटनांवर त्यांच्या तोंडून मार्मिक भाष्य ऐकायला मिळायचे. त्या सगळ्याला मुकण्याचे दु:ख शब्दात कसे सांगता येणार? मी ऑनलाईन विभागासाठीही स्टोरीज करायचे. या स्टोरीज खूप ‘एक्सक्ल्युझिव’ असणे अपेक्षित होते. त्या तशा बनाव्यात म्हणून शुजात सर सतत बळ द्यायचे. सरांनी मला २०१७ ची लोकसभा निवडणूक कव्हर करण्याचीही संधी दिली.

पण थेट ग्राऊंडवरच्या चकमकीची साक्षीदार होत वार्तांकन करणे माझ्यासाठी नवीनच होते. त्यामुळे मी चांगलीच घाबरले होते. ‘रायझिंग काश्मीर’च्या टीमसोबत मी श्रीनगरच्या निर्जन गल्ली-मोहल्ल्यात फिरणार होते. अशा गल्ल्या, ज्या फक्त बंदूकधारी सैनिकांनी भरून गेल्या होत्या!

नव्वदीच्या दशकात जन्मलेली असल्याने त्या शतकातल्या भीतीदायक आठवणी माझ्या मनात होत्या. समोरची दृश्यही जुन्या जखमा जागवणारीच होती. शिवाय निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. मतदान झाले होते केवळ ७.१ टक्के! हा आजवरचा सर्वात नीचांकी आकडा होता. अनेक मतदान केंद्रे चकमकी आणि तरुणांच्या निदर्शनांमुळे बंद करण्यात आली होती. त्या दिवशी आठ लोक मारले गेले, शंभरपेक्षा जास्त लोक छर्रे व बंदुकीच्या गोळ्यांनी घायाळ झाले. इथे शाफक, मन्सूर, मी आणि आमचा चालक असे आम्ही चौघे जुन्या शहराच्या ओसाड गल्ल्यांमध्ये फिरत होतो. एखादा दगड कधीही आम्हाला लागू शकला असता. आम्ही एका रिकाम्या मतदान केंद्राकडून दुसऱ्या केंद्राकडे जात होतो. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. शहरामध्ये नक्की कुठे हे मला निश्चितपणे आठवत नाही; पण एका मतदान केंद्रावर सुरक्षाबलाच्या कर्मचाऱ्याने माझा स्मार्टफोन हिसकावून घेतला. निर्मनुष्य मतदान केंद्र माझ्या कॅमेऱ्यात कैद व्हावे हे त्यांना नको होते. तिकडे काहीतरी भलतेच, माझ्या अंदाजपलीकडचे घडत होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर माझ्या सहकाऱ्यांनी फोन हस्तगत केला. पण त्या प्रक्रियेदरम्यान वातावरण बरेच तापले. एक पत्रकार आणि एक महिला म्हणूनही मी घेतलेला अनुभव थरारून टाकणारा होता.

बातम्या फाईल करायला आम्ही ऑफिसात पोचलो तसा माझ्या जीवात जीव आला. शुजात सरांनी माझे अभिनंदन केले. त्यांनी त्या दिवशी मला धोक्याच्या ठिकाणी पाठवले नसते तर आज मी अशी निर्भय घडलेच नसते. शुजात सरांवर याआधीही दोन जीवघेणे हल्ले झाले होते. आता सगळीकडे दबक्या आवाजात कुजबुज सुरू झालीय, की हयात असताना त्यांनी केलेले, भूमिका घेणारे रिपोर्ताज, त्यांची धडाडीची पत्रकारिताच त्यांच्या हत्येला कारण ठरली. इंटेलिजन्स एजन्सीजनीच त्यांची हत्या घडवून आणली.

आता त्यांचे खुनी सापडतीलही. पण आपण एक असा पत्रकार गमावलाय ज्याने समाजकंटकांशी खुले वैर पत्करले; पण तत्वांशी अजिबात तडजोड केली नाही. ज्याने केवळ सत्य सांगणारी पत्रकारिताच सर्वोच्च मानली.

मी शुजात सरांबरोबर फारच कमी काळ घालवला. पण त्यांनी उमेदीच्या काळात मला जे धडे दिले, ते सतत माझ्या बरोबर असतील.


मुनजाह कंवल

(लेखिका श्रीनगर येथील ‘डेली आफताब’ वृत्तपत्राच्या प्रतिनिधी आहेत)
अनुवाद : मीना शशांक भोसले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -