घरफिचर्समेरा सुंदर सपना बीत गया...

मेरा सुंदर सपना बीत गया…

Subscribe

संगीतकार हनुमान प्रसादजींना गीता रॉयच्या त्या बंधमुक्त सुरांनी जागच्या जागी खिळवून ठेवलं. इतकं सुंदर, खणखणीत गाणं कोण गातं आहे हे क्षणभर त्यांना तिथे कळलंच नाही. एका क्षणी ते स्वत:भोवतीच गोल फिरले; पण तरीही ते सूर नेमके कुठून येत आहेत हे त्यांना कळेना. सूर कुठून येत आहेत याचा नेमका मागोवा घेतला आणि त्या सुरांचं बोट पकडत ते त्या सुरांच्या उगमबिंदूकडे निघाले.

गीता दत्त ही गीता रॉय होती तेव्हाची गोष्ट. गाणं गाण्याची तिला बेहद्द आवड होती. त्यासाठी ती गाणं थोडंफार शिकलीही होती. गाणं यायला आणि कळायला लागल्यापासून ती गाण्याच्या प्रेमात पडली. गाणं हेच सर्वस्व समजू लागली. सात सुरांमध्ये जीवनाची नौका सहजपणे पार करण्याची शक्ती असते असं तिच्या मनाने घेतलं. दिवसारात्री तिला गाण्याचीच स्वप्नं पडू लागली. गाण्यात ती इतकी रमून गेली की गाणं हेच तिचं जग बनलं. गाणं हाच तिचा श्वास बनला. गाण्याचाच सहवास तिला आवडू लागला.

…तर अशी ही गीता रॉय सकाळ-दुपार-संध्याकाळ गाण्याचा रियाझ करायची. दिवस उजाडला की गाण्याच्या रियाझाची वाट पहायची. गाण्याच्या रियाझाला उत्सुकतेने बसायची. खुल्या दिलाने गायची. जीव तोडून गायची. आपलं गाणं पुढे जगासमोर येईल, लोक आपल्या गाण्यासाठी जीव टाकतील, आपल्या गाण्याला आणि आपल्या गाण्यासोबत आपल्या स्वत:ला लोकप्रियतेचं, प्रसिध्दीचं कोंदण मिळेल हे तिच्या गावीही नव्हतं आणि त्याची तिला फिकिरही नव्हती. ती आपल्या स्वत:च्याच गाण्याच्या नादात होती. आपल्याला येणारं गाणं आपण गावं आणि आपला आनंद आपण मिळवावा असंच जणू तिचं तिच्या गाण्याबद्दलचं तत्वज्ञान होतं.

- Advertisement -

ती अशा ठिकाणी राहत होती की खाली एक शाळा होती आणि त्या शाळेच्या नेमकं वर तिचं घर होतं. ती शाळा भरताना आणि सुटताना शाळेतल्या विद्यार्थ्यांचा हा गलका व्हायचा; पण गीता रॉयच्या गाण्यावर त्याचा कोणत्याही प्रकारचा ओरखडा उठायचा नाही. ती गाणं गाताना हा विद्यार्थ्यांचा गलका मुळी तिच्या कानाला स्पर्श करायचाच नाही. तिला तो गलका ऐकू यायचाच नाही इतकी ती तिच्या गाण्यात रंगून आणि रमून गेलेली असायची.

कधी कधी ती गाणं गाताना तिच्या गाण्याचे स्वच्छ आणि स्पष्ट सूर शाळेतल्या शिक्षकांना ऐकू जायचे आणि काही क्षण त्यापैकी एखाद्या शिक्षकाच्या अध्यापनाची समाधी भंग व्हायची. कधी कधी शाळेतल्या काही विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासावरून उडून त्या सुरांवर एकाग्र व्हायचं; पण त्या गोड सुरांबद्दल शाळेतल्या कुणाचीच काही तक्रार नसायची. उलट तिचं गाणं अविरत सुरू असायचं. उलट तिच्या गाण्याबद्दल त्या शाळेतल्या शिक्षकांमध्ये असलीच तर आपुलकी असायची. आपल्या शाळेच्या वर असलेल्या ज्या घरामधून हा सुरांचा झरा वाहतो त्याबद्दल त्या शिक्षकांना आदर होता. एक ना एक दिवस हे सूर जगासमोर येतील आणि जगाला ते सूर डोक्यावर घेतील, असं भाकित त्यांनी वर्तवून ठेवलं होतं.

- Advertisement -

गीता रॉय जेव्हा तिचं गाणं गायची तेव्हा तिच्या घराशेजारच्या रस्त्यावरून जाणार्‍या वाटसरूंनाही तिचं गाणं स्पष्ट ऐकू यायचं आणि त्यांचंही तिच्या त्या गाण्याकडे हमखास लक्ष वेधलं जायचं. अशाच एके दिवशी या वाटसरूंमधून वाट काढत काढत त्या काळातले प्रसिध्द संगीतकार हनुमान प्रसाद चालले होते. चालता चालता ते गीता रॉयच्या घराकडे अचानक थबकले. कारण अर्थातच गीता रॉयचं गाणं…ती मनमोकळेपणाने गात होती. ती तिच्या घरात गात असली तरी तिचं गाणं घरात कोंडून राहिलं नव्हतं. तिच्या गाण्याचे सूर तिच्या घराचा उंबरठा ओलांडून मुक्तपणे बाहेर पडत होते.

जणू तिच्या घराच्या चार भिंतींचं बंधन त्यांना मंजूर नव्हतं. संगीतकार हनुमान प्रसादजींना गीता रॉयच्या त्या बंधमुक्त सुरांनी जागच्या जागी खिळवून ठेवलं. इतकं सुंदर, खणखणीत गाणं कोण गातं आहे हे क्षणभर त्यांना तिथे कळलंच नाही. एका क्षणी ते स्वत:भोवतीच गोल फिरले; पण तरीही ते सूर नेमके कुठून येत आहेत हे त्यांना कळेना. त्यांनी एक चौफेर नजर टाकली. सूर कुठून येत आहेत याचा नेमका मागोवा घेतला आणि त्या सुरांचं बोट पकडत ते त्या सुरांच्या उगमबिंदूकडे निघाले. त्यांच्या लक्षात आलं की आपण चालत आहोत त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या शाळेच्या वरच्या माळ्यावर असलेल्या घरातून हे सूर दरवळत आहेत.

हनुमान प्रसाद गीता रॉयच्या घराच्या अगदी जवळ पोहोचले. गीता रॉयच्या घराच्या खुल्या खिडकीबाहेर दबक्या पावलांनी उभे राहिले. एकीकडे गीता रॉयचं गाणं सुरूच होतं. ती तिच्याच गाण्यात मग्न होती. देहभान हरपून गात होती. हनुमान प्रसादजींनी तिला तिचं गाणं मनमुक्तपणे मनसोक्त गाऊ दिलं. तिचं गाणं जेव्हा पूर्णपणे थांबलं तेव्हाच ते तिच्या दारात येऊन उभे राहिले. त्यांना पाहताच गीता रॉय काहीशी गोंधळली. ते तिच्यासाठी अनोळखी असल्याने तिचा तसा गोंधळ होणं साहजिक होतं; पण तिचा आणखी गोंधळ होण्याच्या आधीच हनुमान प्रसादजींनी तिला आपली ओळख सांगितली.

‘मी हनुमान प्रसाद, संगीतकार आहे, सिनेमांसाठी संगीत करतो,’ ते म्हणाले.
‘नमस्कार,’ ती म्हणाली, पण तरीही ती गोंधळली. त्यांचं आपल्याकडे येण्याचं नेमकं कारण काय हे तिला अजूनही कळत नव्हतं. तिच्या चेहर्‍यावर त्यांना बघून अजूनही भलंमोठं प्रश्नचिन्हं होतं.
‘मी रस्त्याने चाललो होतो. चालता चालता तुमचं गाणं ऐकलं. तुमच्या गाण्याने, तुमच्या आवाजाने खरंच मी मंत्रमुग्ध झालो…आणि त्या आवाजाचा शोध घेत घेत निघालो…आणि तुमच्या दारात येऊन पोहोचलो…काय बेहतरीन आहे तुमचा आवाज!’ ते म्हणाले.
ती लाजली. हनुमान प्रसादजींनी केलेल्या कौतुकाने भारावून गेली.

‘मी एका सिनेमाचं संगीत करतो आहे…त्या सिनेमासाठी तुम्हाला जर एखादं गाणं दिलं तर तुम्ही गाल?’ त्यांनी तिला थेट प्रश्न केला.

इतकी मोठी संधी स्वत:च्या पायापंखांनी आपल्याकडे अशी अकस्मात चालून आली आहे हे पाहून ती आधी बावरलीच; पण नंतर स्वत:ला सावरत तिने हनुमान प्रसादजींना हो म्हणून टाकलं…आणि पुढल्या काही दिवसांतच ‘भक्त प्रल्हाद’ नावाच्या सिनेमासाठी तिने आपल्या आयुष्यातलं पहिलंवहिलं गाणं गायलं.

गीता रॉयच्या आयुष्यातली भाग्याची रेषा तिथेच थांबली नाही. पुढे आणखी वेगळी गंमत घडली ती अशी की नेमक्या त्याच काळात एस.डी.बर्मन हे नाव पुढे येण्यासाठी धडपडत होतं. त्यांनी नेमकं ते गाणं ऐकलं आणि ते संगीत करत असलेल्या ‘दो भाई’ या सिनेमासाठी याच आवाजात गाणं गाऊन घेण्याचा निर्माता-दिग्दर्शकांसमोर जवळ जवळ हट्टच धरला. खरंतर शमशाद बेगम, जोहराबाई, राजकुमारी, अमीरबाई यांच्यासारख्या त्या काळातल्या प्रस्थापित गायिकांना डावलण्याचं दु:साहस एस.डी.बर्मन तेव्हा करत होते. पण एस.डी.बर्मनच्या त्या म्हणण्याला निर्माता-दिग्दर्शकांनी मान दिला आणि यथावकाश गीता रॉयच्या आवाजात जे गाणं रेकॉर्ड झालं त्या गाण्याचे शब्द होते – मेरा सुंदर सपना बीत गया!…ते गाणं त्या काळात लोकांना आवडलं आणि गीता रॉयसाठी सिनेमाचं दालन खुलं झालं!…

रस्त्यावरून जाणार्‍या कुणा संगीतकाराने तिचा आवाज ऐकला…आणि तो ऐकून त्याने तिला कुठून कुठे नेऊन ठेवलं!…नशीब नशीब म्हणतात ते असं असतं…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -