Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग ‘मी परत येण्याची’ किती ही घाई...

‘मी परत येण्याची’ किती ही घाई…

Related Story

- Advertisement -

पंढरपूरला 25 नोव्हेंबर 2020 रोजी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना असे सरकार चालत नसते. आम्हाला हे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही. तुम्ही फक्त वाट बघा, अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर महाविकास आघाडी सरकार काही कोसळले नाही, पण पदवीधर निवडणुकीत भाजपचा उमेदवार मात्र पडला. आतासुद्धा 12 एप्रिल 2021 ला पंढरपूरला पोटनिवडणुकीचा प्रचार करताना फडणवीस यांनी ‘‘हे सरकार कधी पडणार हे मी ठरवणार आहे, अशी गर्जना केली. फडणवीस यांना महाविकास आघाडी सरकार पाडण्याची किती घाई झाली आहे, हेच यातून दिसून येते. 2019 च्या निवडणुकीत ‘‘मीच परत येणार असे सतत वरच्या सुरात सांगणार्‍या फडणवीसांचे सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार न झाल्यामुळे आता ते दर महिन्याला किमान दोनदा ते सरकार आज ना उद्या पडणार, असे सांगत स्वतःचे आणि सोबत्यांचे समाधान करून घेत असतात.

कुडमुड्या ज्योतिषाच्या पिंजर्‍यातील पोपटसुद्धा इतक्या वेगाने भविष्य सांगणार नाही, एवढ्या जलदगतीने फडणवीस यांना कधी कोण पडणार हे सांगता येते, म्हणजे आश्चर्य म्हणायला हवे. आधी यासाठी ते आणि भाजपचे खासदार नारायण राणे मिळून हे सरकार कधी पडणार हे सांगायचे. नंतर राणे हे सरकार पडण्याच्या आठवडी तारखा देऊ लागले आणि त्या खोट्या पडू लागल्या, तसे लोकांनी राणे यांना फार गंभीरपणे घेणे बंद केल्याने आता फडणवीस एकटेच भविष्य सांगत आहेत. मात्र एका अभ्यासू नेत्याचा झालेला हा ज्योतिषी आता गंमतीचा विषय होऊ लागला आहे. दैव देते आणि कर्म नेते यानुसार महाविकास आघाडी सरकार त्यांच्या दुर्दैवाने कोसळेल, पण या कोसळण्याचा एक भाग आपण असावे असे जे काही फडणवीस यांना वाटत आहे, तो प्रकार 2014 च्या आधी या युवा नेत्याकडे बघताना कधी दिसला नव्हता, उलट महाराष्ट्राला मोठ्या विचारांच्या नेत्यांचा जो काही वारसा लाभला आहे तो पुढे चालवणारा हा माणूस आहे, असा आशावाद वाटत होता. पण, केवळ सत्ता गेल्यामुळे माणूस एवढा बेभान होऊ शकतो का? फडणवीसांचा कौटुंबिक वारसा, त्यांचे महापौर ते विरोधी पक्षनेता इथपर्यंतच एकूण राजकारण, सामाजिक जीवनातला त्यांचा याआधीचा वावर हा निश्चितच इतका उद्वेग आणणारा कधीच नव्हता.

- Advertisement -

एका राजकीय खेळीचा भाग म्हणून आणि लॉटरी लागावी तसे मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर मात्र त्यांच्यातील जमिनीवरून चालणारा नेता हरवून गेला. ही सारी वस्तुस्थिती लक्षात घेतली तरीही अलीकडे त्यांची जी काय सर्कस सुरू असते ती बघता, फडणवीसांना हल्ली नेमके काय झाले आहे, असा प्रश्न कुणालाही पडेल! गेल्या सात-आठ वर्षांच्या काळात भाजपाच्या राजकारणात ज्या उथळ संस्कृतीला उत आलाय, त्या पातळीचे नेते फडणवीस कधीच नव्हते. फार काय संपूर्ण विदर्भातील भाजपाच्या आजवरच्या इतिहासात इतक्या उथळ राजकारणाचे दुसरे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. फडणवीसांच्या तुलनेत योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज, हे देखील आता बर्‍यापैकी सभ्य वाटायला लागलेत. या पार्श्वभूमीवर विचार केल्यास फडणवीसांचा थयथयाट अनाकलनीय आहे. त्यांच्या कुटुंबातून ज्या प्रकारची प्रतिक्रिया सत्ता गेल्यानंतर आली, तशा प्रकारचा जळाल्याचा धूर आजवरच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या किचनमधून आला नसेल. त्या प्रतिक्रिया बघून अवघा महाराष्ट्र थक्क झाला ! आपण बोलतो काय.. कुणालाच भान उरले नाही.

या सार्‍याचा मागोवा घ्यायला हवा. यासाठी आपल्याला 2019 ची लोकसभा आणि तिचा निकाल लक्षात घ्यावा लागेल. आधीच्या एखाद वर्षांपासून देशात मोदीविरोधी वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली होती. सरकार बहुधा सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत होते. मेक इन इंडियाचा फुगा फुटला होता. त्यामुळे भाजपाच्या जागा नक्कीच कमी होतील, अशी हवा राजकीय वर्तुळात पसरायला लागली होती. अशा पार्श्वभूमीवर भाजपाच्या किमान 40/50 जागा नक्कीच कमी होणार, असा अंदाज होता. मित्र पक्षांची मदत घेतल्याशिवाय सरकार बनूच शकत नाही, अशी अवस्था होती. खुद्द भाजपावालेसुद्धा 230 च्या आसपास आकडा जाईल, अशी गणिते मांडत होते. म्हणजेच तो आणखी कमी असण्याची शक्यता होती. आणि इथेच खरी मेख आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नसले, तरी विपक्ष कुठेही एकजूट दिसत नव्हता. मात्र लोकसभेच्या धक्कादायक निकालाने सारेच चित्र बदलले. भाजपच्या स्वतःच्या अंदाजापेक्षा त्यांना सुमारे 100 जागा जास्त मिळाल्या. सारेच सुसाट झाले.

- Advertisement -

देशात असा राजकीय प्रलय आला असतानाच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यावर होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादीमधील भले भले नेते भाजपचे कमळ हाती घ्यायला रांगेत उभे राहिले. विरोधी नेत्यांची ही लाचारी बघून मोदी-शहा यांच्यानंतरच आपणच, असा समज फडणवीस यांना झाला. तसेही एखाद्या महापंडिताच्या तोर्‍यात त्यांनी जाहीर करून टाकलेच होते, की लिहून ठेवा…महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार हे प्रकरण बाद झालेले आहे. त्यावेळचा त्यांचा आवेश आणि चेहरा कमालीचा आक्रमक दिसत होता. पण, केंद्राच्या तुलनेत भाजपला यश मिळाले नाही. सत्ता एकट्याच्या ताकदीने येत नाही हे दिसताच फडणवीस यांनी ‘रात्रीस खेळ’ करून अजित पवार यांच्यासोबत सत्तेची शपथ घेऊन पाहिली. पण ही पहाट मैफल शरद पवार यांनी उधळून लावली. आणि मग फडणवीस यांच्यासह भाजपचे सारेच नेते भान हरवून गेल्यासारखे राजकारण करत आहेत. हे कमी म्हणून की, काय महाराष्ट्राच्या इतिहासात राजभवन आणि राज्यपाल कुठल्या राजकीय पक्षाच्या इतके आहारी गेले नव्हते.

अलीकडे सैद्धांतिक आणि समाजहितासाठी सकारात्मक विरोध हा प्रकार तसा राजकारणातून नाहीसाच झाल्यासारखा आहे. तरीही काँगेस किंवा इतर पक्ष विरोधी बाकावर असताना एवढे खालच्या पातळीवर कधीही गेले नाहीत. कोरोना वाढत असताना, संपूर्ण महाराष्ट्र संकटात असताना विरोधी पक्षाच्या लोकांनी जनतेच्या आरोग्यासाठी एक होण्याची गरज असताना जे काही राजकारण करत आहेत ते पाहता आता या राज्यातील सामान्य माणूस सत्ताधार्‍यांपेक्षा फडणवीस आणि त्यांच्या सहकारी नेत्यांना वैतागला आहे. सकाळी चंद्रकांत पाटील, दुपारी प्रवीण दरेकर, संध्याकाळी नारायण राणे आणि रात्री देवेंद्र फडणवीस हे रोज सरकारच्या नावाने जो काही शिमगा घालत आहे तो पाहून आता लोकांना यांची किव येऊन सरकारबद्दल सहानभूती वाटू लागली आहे.

राजकारण करायला पुढे वर्षे पडली आहेत, पण आता माणसांचा जीव वाचवणे गरजेचे असताना केंद्र आणि हे विरोधक मिळून जे काही राजकारण करत आहेत ते पाहता हा सरळ उद्धव ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे, हे उघड दिसत आहे. उठता बसता गुजरातच्या विकासाची पिपाणी वाजवणार्‍या भाजपच्या गुजरात सरकारला कोरोनाच्या हलगर्जीवरून हायकोर्टाने जे काही फटकारले आहे ते पाहता ‘हमाम में सब नंगे’ हे उघड झाले आहे. मात्र सध्याची काय परिस्थिती आहे, आपण काय बोलत आहोत… असे काहीच भान फडणवीस यांना उरलेले दिसत नाही. उद्धव ठाकरे सरकार येऊन दीड वर्षे झालीत, हे अजूनही त्यांच्या पचनी पडत नाही, हेच यातून दिसून येते.

- Advertisement -