घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभाजपच्या टार्गेटवर संजय राऊत...!

भाजपच्या टार्गेटवर संजय राऊत…!

Subscribe

‘मी पुन्हा येईन’चा जयघोष करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी तब्बल एकशे सहा भाजपा आमदारांचे तसेच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे भक्कम पाठबळ पाठीशी असतानादेखील त्यांच्याकडील मुख्यमंत्रिपदाची खुर्ची केवळ शिवसेना नेते संजय राऊत यांच्या गनिमी काव्यामुळे म्हणा अथवा चाणक्यनीतीने म्हणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. आणि तेव्हापासून तर राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेत्यांच्या नजरेत शिवसेनेपेक्षाही संजय राऊत हे क्रमांक एकचे शत्रू ठरले आहेत.

येत्या १० जून रोजी होणारी राज्यसभेची निवडणूक ही ज्यांनी सहाव्या जागेचे त्रांगडे निर्माण करून चर्चेत आणली ते शिवसेनेचे नेते व आता राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार संजय राऊत हे भाजपच्या निशाण्यावर आहेत. संभाजीराजेंना अपक्ष रिंगणात उतरवून सर्वपक्षीय उमेदवार बनवण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना संजय राऊत यांनी सर्वप्रथम सुरुंग लावला. त्यामुळे आता राज्यसभेची सहावी जागा ही कोणत्याही परिस्थितीत संजय राऊत यांनी दिलेल्या उमेदवाराला जिंकू द्यायची नाही असा चंगच राज्यातील भाजप नेत्यांनी केला आहे. जर राज्यसभेच्या शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून आल्या तर महाराष्ट्रात संजय राऊत हे बलवान राजकीय नेते आहेत असा संदेश दिल्लीत जाईल आणि त्यामुळेच असा संदेश जाऊ नये याकरता राज्यातील भाजपचे नेते शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

कोणत्याही परिस्थितीत संजय राऊत हे येथील किंग मेकर होऊ नयेत आटोकाट प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. अर्थात केवळ भाजपच्या काही नेत्यांना वाटते म्हणून संजय राऊत हे सहजासहजी हार पत्करणारे देखील नाहीत. शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून एकीकडे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे त्यांचा जाहीर सभेत गौरवपूर्ण उल्लेख करत असतात तर दुसरीकडे त्यांना राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चाणक्य अर्थात् राजनीतिमधील रणनीतीकार म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच संजय राऊत यांना अंडर एस्टीमेट धरण्याची अथवा करण्याची घोडचूक पुन्हा भाजपने करू नये तरच महाराष्ट्रात सर्वाधिक १०६ आमदार निवडून आणलेल्या भाजपला राज्यसभेची सहावी जागा जिंकण्याची आशा करता येईल.

- Advertisement -

शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्यातील आणि दिल्लीतील भाजपा नेतृत्व यांच्यातील संबंध हे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी पासून कधीही फारसे सलोख्याचे नव्हते. उलट १९९५ मध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. त्या काळातही ‘सामना’मधून राज्यातील भाजप नेत्यांवर संजय राऊत हे तोंडसुख घेतच होते. काही वर्षांपूर्वी संजय राऊत यांच्याच एका पुस्तक प्रकाशनाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बोलावण्यात आले होते. त्यावेळी नितीन गडकरी यांनीदेखील संजय राऊत यांच्या सामनातील लेखनाबद्दल त्यांच्या मिश्किल आणि मनमोकळ्या स्वभावाप्रमाणे नाराजी व्यक्त केली होती. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांच्या युतीचे सरकार जरी असले तरी केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र या सूत्रामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच त्याकाळात सर्वत्र बोलबाला होता. शिवसेनेच्या पाठबळावर महाराष्ट्रात भाजपचे सरकार असतानादेखील शिवसेनेच्या मंत्र्यांना शिवसेनेच्या आमदार-खासदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सन्मानजनक वागणूक मिळत नाही.

शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची कामे मुख्यमंत्री तसेच भाजपच्या मंत्र्यांकडून केली जात नाहीत अशा तक्रारी या पाच वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणावर होत्या. त्यामुळे सहाजिकच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत शिवसेनेच्या आक्रमक गटामध्ये तीव्र नापसंती असायची. शिवसेनेतील ही नाराजी संजय राऊत हे मुखपत्राच्या माध्यमातून या काळात सातत्याने व्यक्त करायचे. राज्यातील सत्तेमध्ये शिवसेना सहभागी असताना शिवसेनेच्या मुखपत्रात स्वतःच्याच राज्य सरकारवर तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर संजय राऊत यांच्याकडून केल्या जाणार्‍या हल्ल्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अस्वस्थ असायचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत सामनाच्या अग्रलेखात अन्वर सातत्याने प्रश्न उपस्थित व्हायचे आणि अखेरीस यातून सुटका करून घेण्यासाठी फडणवीस यांनी आपण सामना वाचत नसल्याचे सांगून सामना आणि पर्यायाने संजय राऊत यांच्या टीकेपासून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात फडणवीस यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही, उलट गेले दोन-अडीच वर्ष फडणवीस यांना प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत आहेत. यातून सांगायचा मुद्दा हा की शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून संजय राऊत हे भाजप नेत्यांच्या डोळ्यात सलत होतेच.

- Advertisement -

शिवसेनेचा कारभार उद्धव ठाकरे यांच्या हातात आल्यानंतरदेखील संजय राऊत यांच्या एकूणच लेखनाबाबत आणि त्यांच्या विधानाबाबत भाजप नेत्यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती. २०१९ मध्ये तर संजय राऊत यांच्या मुळेच महाराष्ट्रात शरद पवार यांच्या माध्यमातून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन परस्पर विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांचे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. यामध्येदेखील ‘मी पुन्हा येईन’चा जयघोष करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी तब्बल एकशे सहा भाजपा आमदारांचे तसेच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे भक्कम पाठबळ पाठीशी असतानादेखील त्यांच्याकडील मुख्यमंत्रिपदाची खुर्ची केवळ शिवसेना नेते संजय राऊत यांच्या गनिमी काव्यामुळे म्हणा अथवा चाणक्यनीतीने म्हणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. आणि तेव्हापासून तर राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेत्यांच्या नजरेत शिवसेनेपेक्षाही संजय राऊत हे क्रमांक एकचे शत्रू ठरले आहेत.

यामुळेच संजय राऊत यांच्यावर ईडीची नोटीस बजावून कारवाईदेखील करण्यात आली. भाजपपासून शिवसेनेला दूर केल्यापासून संजय राऊत हे शिवसेनेला कसे संपत आहेत याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात आणि विशेषत: सोशल मीडियावर सुरू राहतील याची दक्षता घेतली जात आहे. थोडक्यात आणि स्पष्ट सांगायचे तर संजय राऊत हे शिवसेनेच्या वर्तुळात किंवा सामान्य शिवसैनिकांमध्ये अधिकाधिक बदनाम कसे होतील आणि त्यांचे शिवसेनेतील वजन कसे कमी होईल असाच प्रयत्न या माध्यमातून सुरू असतो. अर्थात राऊत हे देखील प्रसारमाध्यमांमध्ये मुरलेले असल्यामुळे आणि जन्मजात लढवय्या स्वभावाचे शिवसैनिक असल्यामुळे अद्याप तरी त्यांना राजकीय रणनीतीमध्ये पराभूत होण्याची वेळ आलेली नाही. १० जून रोजी होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये स्वतः संजय राऊत हे तर शिवसेनेचे उमेदवार आहेतच, मात्र त्याच बरोबर शिवसेनेच्या दुसर्‍या जागेसाठी हट्ट धरून आणि त्यासाठी राजकीय,सामाजिक वर्तुळात मोठी नाराजी अंगावर घेऊनही त्यांनी कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सहाव्या जागेसाठी रिंगणात उतरवले आहेच.

भाजप नेत्यांनी छत्रपती संभाजीराजे यांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा पूर्ण प्लॅन आखला होता. छत्रपती संभाजी हे २०१७ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार असताना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर गेले होते. मात्र आताची भाजपची राजकीय ताकद तिसरा उमेदवार स्वबळावर राज्यसभेवर निवडून पाठवणे इतपत सक्षम नाही हे लक्षात घेऊनच संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. तरीदेखील छत्रपती संभाजीराजेंच्या राजकीय पार्श्वभूमीला भाजपचे पाठबळ चिकटलेले होतेच. त्यामुळेच संजय राऊत यांचे राजकीय गुरु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना दुसर्‍या दिवशीच राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केल्यानंतरही संजय राऊत यांनी दुसरी जागा ही शिवसेनेची आहे याची आठवण करून दिली. ही दुसरी जागा शिवसेना लढवेल असं स्पष्ट केलं. त्यानंतरदेखील जर संभाजीराजे हे जर शिवसेनेचे उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल असे देखील स्पष्ट केले होते.

मात्र संभाजीराजे यांच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे संजय राऊत यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. देवेंद्र फडणवीस यांना संभाजीराजे यांच्या उमेदवारीतून जे साध्य करायचे होते ते त्यांनी वेगळ्या प्रकारे साध्य करूनही घेतले. मात्र दुर्दैवाने संभाजी राजेंना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. आणि शिवसेनेच्या दुसर्‍या जागेवरील उमेदवारीची माळ कोल्हापूरच्या संजय पवार या शिवसैनिकाच्या गळ्यात पडली. यावरूनही सारे खापर संजय राऊत आणि शिवसेनेच्या माथ्यावर फोडण्यात आले. मात्र त्यानंतरही संजय राऊत यांनी चाणक्यनीति वापरतात थेट छत्रपती शाहू महाराज यांच्याशीच संधान साधत भाजपचे शिवसेनेला आणि पर्यायाने राऊतना बदनाम करण्याचे डावपेच भाजप वरच उलटवले. मात्र या संपूर्ण भाजप शिवसेना यांच्या राजकारणात आणि त्याहीपेक्षा म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या राजकीय लढाईत मराठा समाजामध्ये सामाजिक कार्य करणार्‍या छत्रपती संभाजी राजेंना राज्यसभे पासून वंचित राहावे लागले.

मात्र त्यानंतरही आता भाजपने संभाजीराजे यांच्या माघारीनंतर कोल्हापूरचेच धनंजय महाडिक यांना सहाव्या जागेसाठी चुरशीचे सक्षम उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे सहाजिकच शिवसेनेला दुसरी जागा जिंकणे हे काहीसे अवघड झाले आहे. मुळात महाविकास आघाडी सरकार म्हणून विचार करायचा झाला तर आघाडीकडे १६८ आमदारांचे संख्याबळ आहे. यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस तसेच काही अपक्षांचे ही समर्थन गृहीत धरण्यात आले आहे. ही जर १६८ मते विचारात घेतली तर शिवसेनेच्या दुसर्‍या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. मात्र धनंजय महाडिक यांचे राजकीय वलय पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीमधील त्यांचे हितसंबंध लक्षात घेता शिवसेनेला दुसरी जागा जिंकणे हे आता वाटते तितके सोपे राहिलेले नाही. त्यामुळेच संजय राऊत यांनी ज्या ईर्षेने शिवसेनेचा दुसरा उमेदवार रिंगणात उभा करून त्याला जिंकून आणण्याचा चंग बांधला आहे त्याच्या दुप्पट ईर्षेने भाजपनेते शिवसेनेचा दुसरा उमेदवार कसा पडेल यासाठी प्रयत्नशील आहेत. संजय राऊत यांची राजकीय घोडदौड लगाम घालून मर्यादित करण्याचा राज्यातील भाजप नेत्यांचा हा प्रयत्न आहे त्याला यश मिळते की नाही हे राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतरच कळू शकेल.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -