घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमेडलची जात कोणती?

मेडलची जात कोणती?

Subscribe

जाता जात नाही ती जात...आणि या हिणकस प्रवृत्तीचं दर्शन पुन्हा एकदा घडलं आहे. ऑलिम्पिकमध्ये आपल्या गुणी खेळाडूंनी थोडी का होईना मेडल्स मिळवली, त्यावर इतर देशांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं आणि आपल्या देशातील करंटे खेळाडूंची जात शोधताहेत. दलित खेळाडूंच्या घराबाहेर दंगा करताहेत. प्रसंग कोणताही असो, आमच्या हिणकस प्रवृत्ती सतत डोकं वर काढत राहतात. खेळाडूंची जात शोधणारे लोक त्यांनी मिळवलेल्या मेडल्सचीही जात कोणती हे शोधणार का ?

आपला भारत देश विविध अंगाने, संस्कृतीने नटलेला देश आहे. आपली प्रतिज्ञाच तशी आहे. विविध परंपरांनी नटलेल्या देशाचा मला अभिमान आहे. गेली कित्येक वर्षे ही प्रतिज्ञा बोलतोय. पण आपल्या मनातून आमची जात काही केल्या जात नाही. आपली ही वृत्ती दिसतेच, ती आपण दाखवायचा प्रयत्न करतोच. पण जे काही निवडक क्षण येतात जेव्हा देश एकत्र येतो. एखादी स्पर्धा, आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेलं यश यामुळे देशाची मान उंचावते. एखाद्या अभिनेत्याला, राजकीय नेत्याला, खेळाडूचा जातिक स्तरावर गौरव होतो तेव्हा आम्हाला भारतीय म्हणून अभिमान वाटतो. अशा क्षणांना आपण त्याच हेतूने साजरं करायचं असतं. इतर ठिकाणी जातीवाद दिसतोच.

या भारतात जात हे वास्तव मान्य करुनसुद्धा काही क्षण असे असतात तेव्हा आपल्यातील हिणकस प्रवृत्तीला दाबून, ठेचून त्याच्या छाताडावर पाय ठेवून वरती जायचं असतं. आपल्या देशाचा मान, सन्मान वाढवायचा असतो. त्याक्षणी जातीबद्दलची, धर्माबद्दलची, प्रांताबद्दलची संकुचित विचार वृत्ती प्रवृत्ती बाजूला ठेवायची असते. पण असं होत नाही. लोक शिकले, पण त्यांच्या विचारात अजून सुधारणा झालेली नाही, असेच त्यातून दिसून येते. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या पदकांची संख्या वाढत जाईल, याबद्दल शंकाच नाही, पण त्या पदकांच्या झळाळीमध्ये जात शोधण्याची ही नतद्रष्ट वृत्ती नष्ट व्हायला हवी. कारण सगळे भारतीय म्हणून आपण एक आहोत, हे लक्षात घ्यायला हवे.

- Advertisement -

ऑलिम्पिक सुरू असतानाच महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमधील नेटकर्‍यांनी जात शोधण्याचा ट्रेंड निर्माण केल्याचं वृत्त समोर आलं होतं. या वाक्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र म्हणजे आपल्या राज्याचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्ही घेतो, जिथे जाती निर्मुलनाचे सिद्धांत तयार झाले त्या महाराष्ट्रात खेळाडूंच्या जाती शोधण्यात आल्या. या गोष्टी काही पहिल्यांदा घडल्या नाहीत. दरवर्षी वर्ष संपत आलं की गुगल, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया याद्या जाहीर करतात. यामध्ये ‘मोस्ट सर्च वर्ड ऑफ दी इअर’ वगैरे वगैरे…यात भारतीयांनी अनेकदा जाती कशा शोधल्या याची बातमी हमखास बनते.

पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर देशातील काही लोक तिच्या खेळापेक्षा पीव्ही सिंधूची जात शोधण्यात अधिक गुंतले होते, असं गुगलने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून उघड झालं आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचं तर, या लोकांना तिच्या मेहनतीबद्दल आणि खेळासाठी समर्पणाबद्दल बोलण्यापेक्षा तो कोणत्या जातीचा आहे हे जाणून घेण्यात अधिक रस होता. चिंताजनक म्हणजे, कोणत्याही एका खेळाडूच्या बाबतीत असं काही घडलं नाही. या यादीत अनेक खेळाडू आहेत. सगळ्यांची जात शोधण्यात लोकांना रस होता.

- Advertisement -

पीव्ही सिंधूची जात शोधण्याच्या पलिकडे जाऊन अन्य एका महिला खेळाडूच्या बाबतीत हिणकस प्रकार घडला. उत्तराखंडच्या हरिद्वार जवळील रोषणाबाद गावात राहणारी वंदना कटारिया भारतीय हॉकी संघात खेळाडू आहे. साऊथ आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात वंदनाने हॅटट्रिक केली होती, ती ऑलिम्पिकमध्ये हॅट्ट्रिक करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. वंदनाच्या दमदार खेळाच्या जोरावर भारतीय महिला संघाने ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली. मात्र, ४ ऑगस्टला झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाकडून भारतीय महिला संघाचा पराभव झाला. यानंतर तिच्या गावातील काही लोकांनी वंदनाच्या घरासमोर जाऊन फटाके वाजवत डान्स वगैरे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

दोन व्यक्तींनी वंदनाच्या घरासमोर जाऊन जातीयवादी घोषणा दिल्या आणि त्यासोबत फटाके वाजवून भारतीय संघ हरल्याचा जल्लोषदेखील व्यक्त केला. यानंतर वंदनाचा भाऊ घराबाहेर आला असता हे या दोघांनी भारतीय संघात खूप दलित खेळाडू झाले आहेत, यामुळेच भारताचा संघ हॉकीच्या उपांत्य फेरीमध्ये हरलाय…अशा पद्धतीन हिणवलं. जिंकलेल्याची जात शोधणं हे वाईट आहेच, पण हरलेल्यांची जात शोधून हिणवणं हे त्याहून अत्यंत घाणेरडं आहे.

जेव्हा खेळाडू आर्थिक संकटातून जात असतात, तेव्हा कोणीही त्यांची जात विचारत नाही, त्यांचा धर्म जाणून घेऊ इच्छित नाही आणि त्यांची पर्वा करत नाही, परंतु मेडल्स जिंकताच त्यांना जातीमध्ये विभागण्याची प्रवृत्ती असते. धार्मिक साचा जन्म घेतो. सत्य हे आहे की आपल्या देशात, उच्च आणि नीच, श्रीमंत आणि गरीब, लहान आणि मोठे आणि पुरुष आणि स्त्रिया, उलट, सर्वत्र भेदभावाची कधीही न संपणारी रेषा काढली गेली आहे. सध्याच्या युगात त्याची मुळे अधिक खोल होत आहेत. सर्वच पक्ष आपापल्या राजकीय फायद्यासाठी जातीयवादाचा प्रचार करत आहेत. आपले संविधानाने दिलेले अधिकार आणि कायदेशीर तरतुदीदेखील जातीभेद, दडपशाही आणि अन्याय संपवण्यात फार यशस्वी होताना दिसत नाहीत. कारण देशाच्या राजकारणावर राज्य करणार्‍या काही शक्तींना देशातून जातीवाद संपुष्टात येऊ नये असं वाटतंय. दुर्दैवाने, अलिकडच्या वर्षांत, राजकारणाने खेळांमध्येही जात वास्तव घुसवलं आहे, जे अत्यंत धोकादायक आहे. खेळाडू हा फक्त एक खेळाडू असतो. तो मेहनत, समर्पण, संघर्ष आणि त्याच्या खेळाच्या जोरावर देशाचा सन्मान वाढवतो. आमच्यासाठी, देशाचा अभिमान वाढवणारे प्रत्येक खेळाडू जाती आणि धर्माच्या वर असले पाहिजेत. पण हे असं होताना दिसत नाही.

ऑलिम्पिकमधील खेळाडूंच्या जाती शोधणं स्पर्धा संपेपर्यंत संपलंच नाही. ऑलिम्पिकमध्ये भारताला शंभर वर्षानंतर अ‍ॅथलेटिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकून देणार्‍या नीरज चोप्राची जात शोधण्यात आली. नीरजने भालाफेकमध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलं आहे, ज्याची आपण अपेक्षादेखील केली नव्हती. नीरजचं कौतुक करु तेवढं कमीच आहे. परंतु तो विजयी झाल्यानंतर तो अमुक अमुक जातीचा आहे, असा ट्रेंड सुरू झाला. महाराष्ट्रातदेखील हा ट्रेंड सुरू झाला. आमच्या रक्तातच हे आहे वगैरे वगैरे सुरू झालं. खरं तर त्याच्या विजयाचं, त्याच्या मेहनीतचं कौतुक व्हायला हवं असताना त्याची जात शोधून काढण्यात आम्ही भारतीय मश्गुल होतो. काय भयंकर दिवस आले आहेत. आजची शिक्षित माणसे आता खेळाडूंची जात शोधून त्याचं कौतुक करायचं की नाही हे ठरवू लागलेली आहेत. भारतीय माणसं शेकडो वर्षे जातीयतेच्या कुचकट मानसिकतेत रममाण होतेच; पण आता त्या मानसिकतेला तीव्रतेची धार आलेली आहे. हा जातीयवादच माणूसपणाला पोखरत चालला आहे.

नीरज चोप्राचं कौतुक आहेच. प्रचंड कौतुक आहे. पण कुणाच्या तरी स्टेटसवर वाचलं, नीरजने लाज राखली. कुणाची लाज, कसली लाज? खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला देश म्हणून आपण काहीही करत नसताना, मेडल येईपर्यंत खेळाडूचं नावही माहिती नसताना, त्यामागची तपश्चर्या, मेहनत यातलं ओ-की-ठो कळत नसताना, हरलेल्या खेळाडूंची जात काढताना (आणि जिंकलेल्यांची जात बघून थोडं जास्त कौतुक करताना) तुम्हाला लाज वाटायचं कारणच काय? लाज वाटून घ्यायची असेल तर या सगळ्या गोष्टींची थोडी लाज वाटून घ्या. सिल्व्हर आणि ब्राँझ मिळवणार्‍या आमच्या सगळ्या खेळाडूंचं आम्हाला कौतुकच आहे. कारण जे त्यांना जमलंय त्याच्या पॅाइंट एक टक्केही आम्हाला (आणि तुम्हालाही) जमलेलं नाहीये.

आपण ७४ स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे. पण जो देश जातीच्या साखळदंडात गुलाम आहे, त्याला मुक्त देश म्हणता येईल का? आजही ऑलिम्पिकमध्ये देशाची मान उंचावणार्‍या खेळाडूंची जात शोधण्याचा पराक्रम काही लोकांनी केला. काहींनी तर ती खेळाडू अमुक अमुक जातीची आहे म्हणून हरलो, अशा पद्धतीच्या टिपण्यादेखील केल्या. ऑलिम्पिकमध्ये तब्बल १३ वर्षांनंतर गोल्ड मेडल जिंकणार्‍या नीरज चोप्राचीदेखील आम्ही जात शोधून काढली. त्यामुळे आता या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये मेहनतीने आणि कष्टाने मिळवलेल्या मेडल्सची देखील जात शोधायला हवी.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -