IND vs ENG : राहुलला यापेक्षा चांगल्याप्रकारे फलंदाजी करताना पाहिले नाही; रोहितकडून कौतुक

लोकेश राहुलने इंग्लंडविरुद्ध कसोटीत दमदार पुनरागमन केले आहे.

kl rahul and rohit sharma
लोकेश राहुल आणि रोहित शर्मा

भारताचा सलामीवीर लोकेश राहुलला जवळपास दोन वर्षे कसोटी संघाबाहेर बसावे लागले होते. तसेच एकदिवसीय क्रिकेट पाठोपाठ कसोटीतही राहुलला मधल्या फळीत खेळवण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा विचार होता. परंतु, शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांना दुखापती झाल्याने इंग्लंडविरुद्ध राहुलला पुन्हा सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना राहुलने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ८४ धावांची खेळी केली. तर लॉर्ड्सवर होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत त्याने कामगिरीत अधिकच सुधारणा करताना पहिल्या डावात १२९ धावांची खेळी केली. त्यामुळे राहुलचा सलामीचा साथीदार रोहित शर्माने त्याची स्तुती केली.

पहिल्या चेंडूपासून उत्कृष्ट फलंदाजी

मी राहुलला यापेक्षा चांगल्याप्रकारे फलंदाजी करताना पाहिलेले नाही. त्याने अगदी पहिल्या चेंडूपासून उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याचे त्याच्या खेळावर पूर्ण नियंत्रण होते. कोणत्याही क्षणी तो चेंडू मारण्यापूर्वी खूप विचार करत आहे किंवा कोणत्याही गोलंदाजांविरुद्ध खेळताना अडचणीत सापडतो आहे असे वाटले नाही. त्याने योजनेनुसार फलंदाजी करत संधीचा पुरेपूर वापर केला, असे रोहितने सांगितले.

कसोटीत संयम राखावा लागतो

रोहितला यंदा पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटीत सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या कसोटीत चांगल्या सुरुवातीनंतर तो बाद झाला. परंतु, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ८३ धावांची अप्रतिम खेळी केली. रोहित आणि राहुल यांनी सुरुवातीला सावध फलंदाजी केली. परंतु, खेळपट्टीवर वेळ घालवल्यावर दोघांनीही धावांची गती वाढवली. याबाबत रोहित म्हणाला, फलंदाज म्हणून तुमच्यात फटकेबाजी करण्याची क्षमता असली तरी आव्हानात्मक परिस्थितीत तुम्हाला संयम राखावा लागतो. विशेषतः कसोटीत नव्या चेंडूविरुद्ध सावध पद्धतीने फलंदाजी करावी लागते. परंतु, खेळपट्टीवर वेळ घालवल्यावर तुम्ही आक्रमक शैलीत खेळ करू शकता.