घरफिचर्सयाकूबच्या फाशीला विरोध करणारे नसिरुद्दीन स्लिपर सेल?

याकूबच्या फाशीला विरोध करणारे नसिरुद्दीन स्लिपर सेल?

Subscribe

१९९३ च्या मुंबईच्या साखळी स्फोटातील आरोपी याकूब मेनन याची फाशी रद्द करावी यासाठी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे अर्ज करणार्‍या महाभागांच्या यादीत नसिरुद्दीन शहा यांचे नाव होते. जिहादी हल्ल्यात देशाची आर्थिक राजधानी बेचिराख करून अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण घेणार्‍या स्फोटातील आरोपी वाचावा यासाठी नसिरुद्दीन उतावीळ होता. त्यावेळी त्याला मुलांची चिंता, भविष्याची काळजी नव्हती. याकूबचे भविष्य त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. देशाचे वर्तमान जिहादी पंज्यात पकडणार्‍या आणि पुढील पिढ्यांचे भविष्य गहाण टाकणार्‍या देशविरोधकांसाठी अश्रू ढाळणार्‍या नसिरुद्दीन शहा यांना स्लिपर सेल म्हणणे गैर काय?

एकोणीसाव्या शतकातील सय्यद मुहम्मद शाह ज्यांनी १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांच्या बाजूने लढून भारतीय सैनिकांना विरोध केला होता त्यांचे नसिरुद्दीन शहा हे वंशज असल्याची माहिती विकिपीडियावर उपलब्ध आहे. पद्मश्री, पद्मविभूषण यासह तीन राष्ट्रीय, १० फिल्मफेअर पुरस्कार मिळविणार्‍या नसिरुद्दीन यांना त्यांच्या अभिनयामुळे ओळखले जाते. त्यांना मिळालेले पुरस्कार ही त्यांना कलाकार म्हणून मिळालेली पावती आहे. समांतर चित्रपट ते व्यावसायिक चित्रपट असा नसिरुद्दीन यांचा प्रवास आहे. आता समांतर चित्रपट अस्तित्वात नाही. आत्ताचे व्यावसायिक चित्रपट अधिक वास्तववादी आणि त्यावेळच्या समांतर चित्रपटाच्या काहीसे पुढे जाणारे आहेत. आम्ही समांतरवाले असा त्यावेळी चित्रपटसृष्टीत एक वर्ग निर्माण केला होता. जाणीवपूर्वक आम्ही वेगळे आहोत असे सांगण्याचा प्रयत्न होत होता.

आम्ही मुळांशी आणि कलेच्या मूल्यांशी घट्ट नाते सांगणारे असा प्रचार त्याचवेळी पीआर कंपन्यांचा सुळसुळाट नसताना ‘योजनापूर्वक’ केला होता. प्रेक्षकांची समज, त्यांची मानसिकता याची चर्चा झाली होती. आमचे चित्रपट क्लासेससाठी आहेत, मासेससाठी नाहीत असेही सांगितले गेले होते. प्रेमकथा, हाणामारी, गाणी आणि सुखांत शेवट यात अडकलेला भारतीय चित्रपट विशेषतः हिंदी चित्रपट आम्ही बाहेर काढला असे सांगण्याची फॅशन रूढ होत होती. जागतिक चित्रपटांच्या तोडीचे चित्रपट आपण निर्माण करत आहोत असे मिरवले जात होते. हे सगळं एक प्रकारच्या तुच्छतेतून व्यक्त केले जात होते.अपवाद वगळता बहुतांश समांतरवाले सगळेच डावे म्हणजे आजचे न्यू-लेफ्ट आणि लिबरल आहेत. जन्माने भारतीय असलेल्या या सगळ्यांना केवळ रूढी-चालीरीती नव्हेतर, समृद्ध भारतीय परंपरा, संस्कृती नाकारणे हा पुरुषार्थ वाटतो. युरोपीय शिक्षण-संकल्पना-मांडणी त्यांच्यासाठी जिव्हाळ्याची आहे. धर्म अफूची गोळी हा मार्क्सचा सिद्धांत आणि अवघ युरोप धर्मनिरपेक्ष हे चित्र त्यांच्यासाठी आकर्षणाचे आहे. यातून धर्म नाकारला पाहिजे, धर्माचे शिक्षण नको, परंपरा-संस्कृती झिडकारणे हे क्रांतीकारक वाटत होते. नव्हेतर वेळप्रसंगी असलेली व्यवस्था बेचिराख करण्यासाठी एल्गार करण्याची भाषा वापरून आपण विचारवंत-बुद्धिजीवी असल्याचा संकेत देण्याला ते प्राधान्य देतात.

- Advertisement -

नेहरू डॉक्ट्रीनने तयार केलेली इकोसिस्टिम आणि इंदिरा गांधी यांनी त्याच इकोसिस्टिमचे केलेले बळकटीकरण यातून नसिरुद्दीन यांच्यासारखे बाबा तयार होत गेले आहेत. अशाच बाबांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारवर भगवेकरणाचा आरोप करून सरस्वती पूजनाविषयी चिंता व्यक्त केली होती. संविधान बदल, मनुवाद, पुरुषसत्ताक, स्त्री-विरोध अशा काळजी आणि चिंता त्यावेळी अचानक उगवल्या होत्या. २००४ साली सत्ताबदल झाल्यावर त्या सगळ्या चिंता-काळजी गायब झाल्या होत्या. राज्यात १९९५ ते २००४ दरम्यान भाजप-सेना युतीची सत्ता असताना भविष्याविषयी असंच काहीसं बोललं गेलं होतं.

२०१४ साली सत्तांतर झाले. केवळ मोदी पंतप्रधान झाले इतकाच मर्यादित बदल नव्हता. तो तितकाच असतातर ‘बाबा’ नसिरुद्दीन सारख्यांनी मोदी चांगले; पण ते ज्या विचारधारेतून आले आहेत ती अडचणीची आहे, असे म्हटले असते. पण तसे न होता अंधानुकरण, ढोंगी प्रतिष्ठा, प्रतिष्ठेचे फसवे मापदंड म्हणून कुरवाळलेला विदेशी विचार भारतीय विचाराने बदलेल असे आश्वासक वातावरण निर्माण होत होते. सत्ता ‘काँग्रेसची’ आणि मस्ती ‘आमची’ याला पायबंद बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. दृष्टिकोनात मूलभूत बदल होत होता. हे सगळं एका मजबूत व्यवस्थेसाठी आव्हान होते. नियंत्रण सुटू द्यायचे नव्हते. याविरोधात नॅरेटिव्हच्या मालिकांची निर्मिती वेगाने सुरु करण्यात आली. अमुक एक संघटनेला चिरडून टाकण्याची भाषा करणार्‍या, विशिष्ट संघटनेवर एकदा नव्हे तीन वेळा बंदी घालणार्‍या, सरदार पटेल यांना डावलणार्‍या, पुरुषोत्तम दास टंडन यांचे खच्चीकरण करणार्‍या, गवताचे पाते उगवत नाही म्हणून देशाचा भूभाग चीनला देणार्‍या, चीनच्या आक्रमणाचे स्वागत करणार्‍या, जम्मू-काश्मीरचा प्रश्न युनोत नेणार्‍या, फुटीरतावाद्यांना पोसणार्‍या, शहाबानोला न्याय नाकारणार्‍या, काश्मिरी पंडितांचा वंश संहार मूकपणे पाहणार्‍या, शिखांची सामूहिक कत्तल होत असताना डोळ्यावर कातडं ओढणार्‍या, निःशस्त्र कारसेवकांवर गोळीबार करणार्‍या, गोध्रा जळीतकांडाविषयी मूग गिळणार्‍या, १९९३ पासून मुंबईत सुरू झालेल्या स्फोटाच्या जिहादी दहशतवादाकडे पाठ फिरवणार्‍या आणि रझा अकादमीने सीएसटी परिसरात केलेली स्मारकाची तोडफोड-महिला पोलिसांचा विनयभंग याविषयी ‘ब्र’ न काढणारे २०१४च्या भाजप विजयाने पुरस्कार वापसी, असहिष्णुतेची बांग आदी माध्यमातून कार्यरत आहेत.

- Advertisement -

नसिरुद्दीन यांचे बोल हा त्याचाच एक भाग आहे. विविध टप्प्यावर कोणी उभे रहायचे हे ठरलेले असते. विजय तेंडुलकर, प्रकाशराज, अनंतमूर्ती, नयना सहगल, अरुण शौरी, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा असे देशाच्या विविध भागांतून एकेका टप्प्यावर उभे राहणारे नसिर आहेत. नसिरुद्दीन आता त्याच नाट्यातील एक पात्र म्हणून उभे राहिले आहेत. त्यांचा डायलॉग फारसा नवा नाही. सूत्र एकच आहे. फक्त शब्द पुढेमागे केले आहेत. नसिरुद्दीन यांच्या बोलण्याचे तात्काळ होणारे स्वागत आणि त्यातून व्यक्त होणारी घाऊक काळजी हा सगळा त्या नाट्याचा पुढचा प्रयोग आहे. तसेच, नासिर बोलवर टीका होणार हे गृहीतच धरलेले होते. त्या टीकेचे स्वरूप, त्यातील त्वेष, विरोधाचे मुद्दे अजमावले जात आहेत. आता अडुसष्ट वर्षांचे असेलतरी सेलिब्रेटी असणारे नसिरुद्दीन यांच्या वक्तव्याचा परिणाम काय होईल? त्याचा प्रभाव किती पडेल? यावरून पुढचा ‘नसिर’ उभा राहील.

साधारण निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांना वर्षभर आधी लागतात. प्रचार साधारण सहा महिने आधी सुरु होतो आणि शेवटच्या टप्प्यात तो तीव्र होतो. २०१९ च्या निवडणुकीचा प्रचार २०१४ च्या मोदी विजयापासूनच सुरु झाला होता. भाजपचे राजकीय विरोधक म्हणून असे अनेक नसिर त्यावेळी पासून विविध मुखवटे धारण करून प्रचार करत आहेत. आपले तनखे, पुख्खे बंद पडण्याची भीती आणि आपला खरा चेहरा उघड होण्याची भीती यातून नसिर मानसिकतेचा कंपूने भविष्याची चिंता, मुलांची काळजी व्यक्त करण्याचे एक नाट्य रंगवले गेले आहे.

पुनर्निर्माणासाठी काम करणारे, एकात्मिक विचारातून सर्वांगीण विकासाची कास धरणारे, समरसतेसाठी कार्यरत असणारे, विधायकतेतून सहअस्तित्व जोपासणारे भविष्याविषयी साशंक नसतात. खोट्या चिंता व्यक्त करत नसतात. नव्या पिढीला अधिक चांगले जीवन जगता यावे यासाठी आपला अहंकार, घरदार याचा त्याग करून जगण्याचा वस्तुपाठ निर्माण करतात. ते अनाम राहतात. त्याउलट ट्विट करणारे, बाईट देणारे प्रसिद्धीचा झोत अंगावर ओढून घेण्यात धन्यता मानतात. नागरिकांनी ठरवायचे ‘वरलीया रंगा भुलायचे की…’?

-मकरंद मुळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -