घरफिचर्सदिल्ली ते गल्ली!

दिल्ली ते गल्ली!

Subscribe

देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीची सार्वत्रिक निवडणूक आज होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या महिनाभर या राज्यात सुरू असलेल्या प्रचाराचा उडालेला धुरळा काल सायंकाळी बसला. राजधानीत निवडणूक असूनही इथल्या प्रचाराने गल्लीचं रूप धारण केलं होतं. या निमित्ताने राजकीय पक्षांच्या विशेषत: भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली बाहेरील शेकडो नेत्यांनी या शहराची पिकनिक करून घेतली. भाजपचे देशभरातले एकूण एक नेते या निवडणुकीच्या प्रचारात उतरलेले देशाने पाहिले. इतक्या मोठ्या संख्येने नेते आपल्याकडे मतांची याचना करण्यासाठी आलेले दिल्लीतल्या मतदारांनी आजमावले. हा अनोखा संगम होता. अमित शाह यांच्यासारख्या स्वत:ला बलाढ्य आणि धनाढ्य समजणार्‍या नेत्याला दारोदारी मतस्लीप वाटताना पाहून नेते मतांसाठी किती लाचार होतात ते दिल्लीसह देशाने पाहिलं. हे म्हणजे सगळं अप्रूप होतं. इतरवेळा 100 कमांडोंच्या गराड्यात वावरणार्‍या नेत्यांना दिल्लीतल्या मतदारांनी रस्त्यावर आणलं होतं. त्याला कारण ठरले होते अर्थातच अरविंद केजरीवाल. केजरीवालांनी सगळ्यांच्याच नाकात दम आणल्याचं हे द्योतक. गंमत पहा एकेकाळी कोण हे केजरीवाल म्हणून हिणवणार्‍या या नेत्यापुढे सगळ्यांचीच गाळण उडालेली पाहून दिल्लीतले मतदार प्रचंड खूश दिसत होते. कधीकाळी मफलरवाले बाबा म्हणून ज्यांची खिल्ली उडवली त्या केजरीवालांनी सगळ्यांची खिल्ली उडवलेली पाहून दिल्लीत असा काही खुशीचा माहोल होता की विचारून सोय नाही.

देशातल्या एकाही राज्यात आजवर नव्हती इतकी रंजक दिल्लीतल्या निवडणुकीने आणली. देशाची सत्ता एकहाती हातात असताना ज्या राज्यातून ती हाकली जाते ते राज्यच आपल्याकडे नाही, याची सल भाजपला गेल्या सहा वर्षांपासून बोचते आहे. २०१४ च्या निवडणुकीतही एकाकी सत्ता असताना दिल्लीत मात्र दोन आमदार निवडून आणता आले, याचं वैषम्य भाजपला होतं. त्या निवडणुकीत भाजपची जशी बोलती बंद झाली तशी ती काँग्रेसचीही बंद झाली होती. सुमारे २५ वर्षे एकहाती सत्ता राबवणार्‍या काँग्रेस पक्षाला एकही आमदार निवडून आणता आला नाही. तसं देशात प्रचंड सत्ता असूनही दिल्लीत केवळ दोन आमदारांवर समाधान मानण्याची वेळ भाजपवर ओढावली.

या दु:खाची फेड करण्यासाठी हे सगळे एकाच व्यक्तीच्या विरोधात ठाकले होते. कोणतीही किंमत मोजून दिल्लीत सत्ता मिळवायचीच, असा पण भाजपने केला आहे. आम्ही ४५ जागा जिंकू असा विश्वास अमित शहा व्यक्त करताना सगळ्या शक्तींचा वापर त्या पक्षाने निवडणुकीत केला आहे. शहा म्हणतात त्याप्रमाणे भाजपला ४५ जागा मिळून सत्ता प्राप्त झाली तर अठरावं आश्चर्य देशात घडेल, हे स्पष्टच आहे. ज्या ज्या राज्यात सत्ता आहे त्या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष बोलके मंत्री आणि नेते यांची मांदियाळी दिल्लीत होतीच, पण पराभूत झालेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्येही दिल्लीचे वारे भाजपने वाहवले आणि देवेंद्र फडणवीसांसह ३० जणांची फौज दिल्लीत धाडली. ज्यांनी शाळा बंद पाडल्या त्यांनीही दिल्लीत जाऊन तिथल्या सरकारला उपदेशाचे डोस पाजले आणि राज्यावर पाच लाख कोटींचं कर्ज करणार्‍यांनीही दिल्लीला ३७ हजार कोटींच्या फायद्यात आणणार्‍या सरकारला राज्य विकायचं कसं याचे सल्ले दिले.

- Advertisement -

म्हणजे बघा जे आपल्या राज्याची वाताहत करतात त्यांनी सुफलाम असलेल्यांना सल्ले द्यावे, इतकी वाईट परिस्थिती जणू केजरीवाल यांनी दिल्लीची करून ठेवलीय. आपल्या नेत्यांनी खरं तर दिल्लीत जाऊन धडे घ्यावेत ते केजरीवाल यांनी दिल्लीत केलेल्या कामांचे. त्यांच्या स्वभावाचे. सरकार कसं चालवावं याचे, भ्रष्टाचार कसा निपटून काढावं याचे, शाळा, हॉस्पिटलं कशी चालवावीत याचे. सर्वसामान्यांना सरकार आपलं आहे, हे वाटू लागणं याचे. आपल्याकडे कुठलासा निर्णय घेतला की आशिष शेलारांसारखे नेते मुख्यमंत्र्यांचा बाप काढतात. तो ही निवडणुका नसतात. दिल्लीत निवडणुका असूनही केजरीवालांना कोणाचा बाप काढावासा वाटला नाही. इतकंच काय ‘फडणवीस और तावडे अपने मेहमान है, उनका स्वागत करो और अपनी पाठशाला, हॉस्पिटल उन्हे दिखाव’, असा प्रेमाचा सल्ला केजरीवाल देतात तेव्हा आपल्या नेत्यांमध्ये आणि केजरीवाल यांच्यातील तफावत स्पष्ट दिसते.

दिल्लीची सत्ता आजवर राखणार्‍या एकाही पक्षाला (यात काँग्रेसची जबाबदारी सर्वाधिक आहे). आपलं राज्य एकदाही फायद्यात आणता आलं नाही. जितकी म्हणून वाईट करता येईल तितकी गलिच्छ अवस्था या पक्षांनी दिल्लीची केली. दिल्लीची महानगरपालिका आज भाजपच्या ताब्यात आहे, पण तिथेही लोकांच्या वाट्याला दुर्विलासच आलाय. प्रदूषणात देशातील पहिल्या क्रमांकावरील या राज्यात जगणं हैराण झालं होतं. आज हा सारा बदल पाहून लोकं विश्वासाने केजरीवालांना धन्यवाद देतात. केजरीवालांच्या विरोधकांनी त्यांचं कौतुक करावं, असं कोणीही म्हणणार नाही, पण तोंडपट्टा चालवावा इतकंही खाली नको यायला हवं होतं. केंद्रीय मंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे महान नेते प्रकाश जावडेकर यांनी केजरीवाल यांना चक्क अतिरेकी म्हणून घोषित करून टाकलं. इतका अतिरेकीपणा केजरीवाल करत असतील तर त्यांना दिल्ली पोलिसांनी केव्हाच ताब्यात घ्यायला हवं होतं. दिल्लीची सारी पोलीस यंत्रणा अमित शहा यांच्या ताब्यात असताना जावडेकर आणि त्याचे नेते कोणाची वाट पाहत होते? जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा या नेत्याला त्रास देणार्‍या अमित शहा आणि त्यांच्या पोलिसांनी दिल्लीत घातलेला उच्छाद कोणीही विसरू शकत नाही. जामीयामध्ये केलेला अमानवी लाठीचार्ज असेल वा जेएनयूमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करणार्‍या गुंडांची पाठराखण असेल, पोलीस किती नीच पद्धतीने केजरीवाल यांच्या सरकारबरोबर वागले हे सार्‍या देशाने पाहिलं.

- Advertisement -

अशा परिस्थितीत अतिरेकीपणा केला म्हणून केजरीवालांची तुरुंगात रवनागी का केली नाही? जावडेकर यांच्या या अतिरेकी वक्तव्याने खरं तर महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सीबीआयच्या अधिकार्‍यांना सोडलं जातं, त्याच्या घराची झडती घेतली जाते. सत्ताधारी आपच्या 68 आमदारांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या जातात. या सगळ्या धाडीसत्रातून केजरीवाल आणि त्यांचे आमदार निर्दोष सुटतात. याचा अर्थ भाजपने आपल्याकडील केंद्रातल्या सत्तेचा किती बेमालूम वापर केला हे स्पष्ट दिसतं. कोणाविषयी कुठे काय बोलावं, याला काही मर्यादा असाव्यात. या सार्‍या मर्यादा जावडेकरांपासून भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी कमरेला गुंडाळल्यागत दिल्लीत प्रचार केला. तो दिल्लीतल्या व्यवस्थेबाबत आणि सुधारणांबाबत केला असता तर कोणी कौतुक केलं असतं, पण उठसूठ पाकिस्तान, ३७०, नागरिकत्वाच्या नावाने लोकांना जखडून एकमेकांविरोधात लढण्याची प्रेरणा देण्याशिवाय एकही विषय भाजपच्या नेत्यांना पुढे आणता आला नाही. देशातील सातत्याने वाढणारी महागाई, दिवसागणिक फुगणारी बेकारी, बंद होणारे उद्योग याविषयी ब्र न काढणार्‍या भाजपचा चेहरा या प्रचारात पुरता काळवंडला होता.

आपल्या महाराष्ट्रातील दिल्लीत गेलेल्या नेत्यांना खरं तर दिल्लीच्या निवडणुकीने चांगली संधी आणून दिली होती. या निमित्ताने आपले प्रदेशाध्यक्ष तर दारोदारी जाऊन चिठ्ठ्या वितरणाचं काम करताना लोकांनी पाहिले. दिल्लीतील गल्ल्या कशा आहेत, हे प्रदेशाध्यक्षांनी पाहिलं असेलच. शरद पवारांचा दिल्लीतील बंगला हिरावून घेणार्‍या या नेत्याला पवारांचं दिल्लीत घर शाबुत आहे की नाही, हे ही पाहता आलं असतं. विनोद तावडेंना दिल्लीतल्या चकाचक बनलेल्या शाळा धुंडाळता आल्या असत्या. या शाळांमध्ये दिल्या जाणार्‍या शिक्षणाची पातळीही मोजता आली असती. फडणवीसांना केजरीवाल किती सौम्य पद्धतीने भाषणं देतात, भाषण देताना आकांडतांडव करत नाहीत, भाषणात खोटी माहिती देत नाहीत, इतरांवर अश्लाघ्य आरोप करत नाहीत, याचीही माहिती घेता आली असती. विशेष म्हणजे पाच वर्षात अनेक योजना राबवून राज्याला फायद्यात कसं आणायचं याचे धडे फडणवीसांना केजरीवालांकडून घेता आले असते. दिल्लीचं बजेट ३७ हजार कोटींच्या शिल्लकीत आणण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती घेता आली असती.

आपल्या राज्यात काहीही न करता दिल्लीच्या लोकांना निवडणुकीची शिकवणूक देणार्‍यांनी इतकं जरी केलं असतं तरी या नेत्यांचा स्वत:चा फायदा झाला असताच, शिवाय पुन्हा येणार म्हणून सत्तेचं गाजर धरून बसलेल्यांना ही सत्ता कशी राबवावी याचंही कौशल्य घेता आलं असतं. आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांचं इतकंच नशीब की दिल्लीत गेलेल्या या नेत्यांना तुम्ही राज्यात काय केलंत, असा प्रश्न कोणी दिल्लीकराने विचारला नाही. मोफत पाणी आणि मोफत वीज घेणार्‍या दिल्लीतल्या मतदारांनी या पुरवठ्यावर प्रश्न करणार्‍या गुजरात आणि हरयाणा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातल्या परिस्थितीवर जाब विचारला तेव्हा या मुख्यमंत्र्यांना भाषणं आवरती घ्यावी लागली. इतका अवमान करून घेण्यापर्यंत खोटेपणा करण्याची फळंही भाजपच्या नेत्यांना चाखावी लागली. केजरीवाल यांनी दिल्लीत कामं केली की नाही, हे तिथले मतदारच जाणतात. या कामांच्या जोरावर ते मतं मागत असताना त्यांच्यापुढे जामीयाचं आणि नागरिकत्वाचं भूत निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न विकाऊ मीडियान े केला, पण त्यालाही पुरून उरत केजरीवाल यांनी सगळ्यांनाच जमिनीवर आणलं. विकाऊ मीडियाचं कधी नव्हे इतकं हसं झालं. नको नको ते प्रश्न विचारणार्‍या माध्यमांमधल्या भक्तांचा त्यांनी पोल खोलला. एकार्थी दिल्लीतील ही निवडणूक म्हणजे ‘तू लढ’ म्हणणार्‍यांसाठीही एक धडाच होता.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -