घरक्रीडान्यू परशुराम,अमर क्रीडा मंडळ उपांत्यपूर्व फेरीत

न्यू परशुराम,अमर क्रीडा मंडळ उपांत्यपूर्व फेरीत

Subscribe

श्री सिद्धेश्वर मंडळ कबड्डी स्पर्धा

न्यू परशुराम मंडळ, अमर क्रीडा मंडळ, अमरहिंद मंडळ या संघांनी श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ आयोजित मनसे चषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. प्रभादेवीच्या राजाराम साळवी क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या चुरशीच्या सामन्यात न्यू परशुराम मंडळाने एसजीएसचे आव्हान ३२-२९ असे परतवून लावत उपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्याच्या मध्यंतराला ११-१२ अशा एका गुणाने पिछाडीवर पडलेल्या न्यू परशुरामने उत्तरार्धात आक्रमक खेळ करत हा सामना तीन गुणांच्या फरकाने जिंकला. त्यांच्या भावेश लोदीने आपल्या एका चढाईत ४, नंतर ३ आणि नंतर २-२ गडी टिपण्याची किमया साधली. त्याला ओमकार परब आणि गौरव मैने यांची उत्तम साथ लाभली.

उप-उपांत्यपूर्व फेरीच्याच सामन्यात अमर मंडळाने एसएसजी फाऊंडेशनचा ४६-२० असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. अमरने या सामन्याच्या सुरुवातच अप्रतिम खेळ करत मध्यंतराला २८-८ अशी भक्कम आघाडी मिळवली. उत्तरार्धात त्यांनी आणखी एक लोण देत विजयावर शिक्कामोर्तब केले. अमर मंडळाच्या विजयात अमन साळवी, संकेत चव्हाण, राज सकपाळ हे खेळाडू चमकले. अमरहिंदने विजय नवनाथवर ४४-३१ अशी मात केली. या सामन्याच्या मध्यंतराला १८-१५ अशी आघाडी घेणार्‍या अमरहिंदकडून सिद्धेश सावर्डेकर, दीप थरवल, हरीश गुप्ता यांनी चांगला खेळ केला. विजय नवनाथच्या दीप बोरडवेकर, प्रथमेश दहीबावकर यांनी झुंजार खेळ केला, पण त्यांना इतरांची फारशी साथ लाभली नाही.

- Advertisement -

सिद्धीप्रभाची आगेकूच!
सिद्धीप्रभाने जागृती मंडळाचा ३३-९ असा धुव्वा उडवत श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्याच्या पूर्वार्धात सिद्धीप्रभाने तीन लोण देत मध्यंतराला भक्कम आघाडी घेतली. त्यांनी पुढेही दमदार खेळ सुरु ठेवत हा सामना २४ गुणांच्या फरकाने जिंकला. सिद्धीप्रभाच्या विजयात ओमकार ढवळे, आकाश मोरे यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -