घरफिचर्सभारतीय डॉक्टरांवर दाखवलेला विश्वास अभिमानास्पद

भारतीय डॉक्टरांवर दाखवलेला विश्वास अभिमानास्पद

Subscribe

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याच्या निमित्ताने मी त्यांच्या संपर्कात आलो. त्यामुळेच मला वाजपेयी यांच्या स्वभावाचे विविध पैलू समजले. देशाचा पंतप्रधान म्हणजे एक दरारा, जरब असतो. परंतु वाजपेयी हे त्याच्या पूर्णत: विरुद्ध होते. ते सुसंस्कृत, मृदू स्वभावाचे, कमी बोलणारे शिस्तबद्ध व प्रत्येक व्यक्तीला अगदी हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यालाही सन्मानाने वागवत असे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्यावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. पहिली शस्त्रक्रिया ही 1998 तर दुसरी 2000 मध्ये करण्यात आली. त्यावेळी भारतात सांधारोपण शस्त्रक्रिया करणे ही सोपी बाब नव्हती. परंतु ही शस्त्रक्रिया भारतातच करण्याचा वाजपेयी यांचा अट्टाहास होता. आज अनेक महत्त्वाच्या व्यक्ती कोणताही आजार झाला की उपचारासाठी परदेशात जातात. पण वाजपेयी यांनी भारतातील डॉक्टरांकडूनच उपचार करून घेण्याचा अट्टाहास धरत भारतीय डॉक्टरांवर मोठा विश्वास दाखवला.

वाजपेयी यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर राणावत यांना अमेरिकेतून बोलवण्यात आले असले तरी ते भारतीयच होते. मी व डॉक्टर राणावत आम्ही दोघांनी इंदौरला एकत्र काम केले होते. ते माझे वरिष्ठ होते. त्यामुळे भारतीय डॉक्टरांवर वाजपेयी यांनी दाखवलेला विश्वास ही भारतीय वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी अभिमानाची गोष्ट होती. वाजपेयीच्या गुडघ्यांवरील शस्त्रक्रियेसाठी जेव्हा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आले. तेव्हा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे आम्हाला फार त्रास होत असे. परंतु त्यांच्या स्वभावामुळे हा त्रास काहीच वाटत नसे.

- Advertisement -

एखादी प्रतिष्ठित व्यक्ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येते तेव्हा तिच्या अनेक मागण्या असतात. परंतु वाजपेयी मात्र या सर्वाला अपवाद होते. त्यांनी एक रुग्ण म्हणून आम्हाला कोणताही त्रास दिला नाही. हॉस्पिटलमध्ये उपचार होत असताना त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. डॉक्टर म्हणून ते माझ्याशी सन्मानाने वागायचेच पण हॉस्पिटलमधील परिचारिका व कर्मचारी यांच्याशी तितकेच सन्मानाने वागायचे. साहेब आम्हाला कोणताच त्रास देत नाहीत, उगाचच काहीही मागत नाहीत असे त्यांच्या सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये असलेले डॉक्टर व कर्मचारी आम्हाला वारंवार सांगयचे. यातूनच त्यांच्यातील सभ्यपणा, सुसंस्कृतपणा माझ्यासह हॉस्पिटलमधील सर्व कर्मचार्‍यांना अनुभवता आला. अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर शस्त्रक्रिया करताना माझ्यासह आमची सर्व टीम दबावाखाली होती. शस्त्रक्रियेदरम्यान कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली होती. पण शस्त्रक्रियेमध्ये वाजपेयींनी दाखवलेला सहभाग हा वाखाणण्याजोगा होता. त्यांनी आमच्यावर कोणतेही दडपण येऊ दिले नाही. त्यांच्यामध्ये कधीच अहमपणा दिसला नाही. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करताना मनावर फारसे दडपण जाणवले नाही. घरातील एखाद्या वडीलधार्‍या व्यक्तीप्रमाणे ते हॉस्पिटलमध्ये आमच्याशी वागत असे.

वाजपेयी यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर अनेकदा मला त्यांच्या उपचारासाठी दिल्लीला जावे लागत असे. त्यावेळी त्यांच्या निवासस्थानी गेल्यावर ते माझी आस्थेने विचारपूस करत असे. इतकेच नव्हे तर मला आदराने चहा, नास्तासाठी आग्रह धरत असे. देशाच्या पंतप्रधानाने मला अशी विचारपूस करणे हे मला अपेक्षित नसे. पण प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागवणे या त्यांच्या स्वभावामुळे मला मिळत असलेल्या पाहुणचारामुळे मी भारावून जात असे.
वाजपेयी यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यामुळे मी कधी नव्हे इतका संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालो. समाजामध्ये पंतप्रधानांच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणून माझ्याकडे पाहिले जाऊ लागले. वाजपेयी यांच्यावर केलेल्या शस्त्रक्रियेमुळे समाजामध्ये माझ्याबद्दल लोकांमधील आदर अधिकच वाढला. वाजपेयी यांच्याबद्दल लोकांच्या मनात आस्था व अभिमान होता. ते पंतप्रधान झाल्यानंतर तो अधिकच द्विगुणित झाला होता. अशा व्यक्तीच्या सहवासात राहणे, त्यांना जवळून पाहणे हे माझ्यासाठी भाग्याचेच होते.


– डॉ. नंदू लाड, अस्थिव्यंगतज्ज्ञ, ब्रीच कँडी हॉस्पिटल

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -