घरफिचर्ससंपादकीय : सावध ऐका पुढल्या हाका!

संपादकीय : सावध ऐका पुढल्या हाका!

Subscribe

महाराष्ट्रात दुष्काळाने तीव्र स्वरूप धारण करायला सुरुवात केली आहे. त्याच्या बातम्या, छायाचित्रे येत आहेत. गंभीर परिस्थिती आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने हे संकट येणार, हे अपेक्षित होते. निवडणुकीच्या रणधुमाळीत हे वास्तव आ वासून समोर येत नव्हते इतकेच. माध्यमांनाही मनात असूनही निवडणुकांच्या जबाबदारीमुळे दुष्काळाच्या तीव्रतेवर लक्ष केंद्रित करता येत नव्हते. तीच बाब राज्यकर्त्यांची आणि विरोधकांची होती. पायाला भिंगार्‍या लावल्यासारख्या गेले महिना दोन महिने सतत राजकीय पक्षांचे नेते गरगर फिरत असताना प्रशासन मात्र ढिम्म बसले होते. तुरळक अपवाद वगळता आचारसंहितेचा बाऊ करून कागदपत्रे आणि माणसेही जागेवरून हलत नव्हती.

हे चित्र भयानक आहे. दुष्काळ निवारणावर आधीच निर्णय झाले असल्याने त्याची अंमलबजावणी करायला प्रशासनाचे हात कोणी धरले नव्हते. पण, साचेबद्ध आणि भावनाविरहित काम करण्याची सवय असलेल्या सरकारी अधिकार्‍यांना गारेगार एसीमधून बाहेर पडून लोकांचे अश्रू तर दिसले पाहिजे ना… या अधिकार्‍यांना वठणीवर आणायला सत्ताधारीही तितकेच खमके हवेत. अजित पवार आणि नारायण राणे, छगन भुजबळ यांच्या खमकेपणाबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. यांच्यात ती धमक आहे. काम कसे होत नाही ते सांगा, फालतूची बडबड ऐकायला आम्ही खुर्चीवर बसलेलो नाही. नियमात बसत नाही म्हणजे काय? बसवा ते आणि मला बघतो, सांगतो, ही कारणे चालणार नाहीत. सगळी यंत्रणा कामाला लावा आणि संध्याकाळपर्यंत मला रिपोर्ट द्या. समोरच्या अधिकार्‍यांना कंप भरलाच पाहिजे. नाही म्हणायची हिंमतच झाली नाही पाहिजे, असा दरारा या नेत्यांचा होता.

- Advertisement -

राज्यकर्ते बरेचदा जनतेच्या भल्याचे निर्णय घेत असतात. मात्र हे निर्णय राबवणारी प्रशासकीय यंत्रणा झारीतील शुक्राचार्य बनते आणि समाज रचनेतील शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहचत नाही. हेच चित्र आपण वर्षोनुवर्षे पाहत आलेलो आहे. परिणामी जनता राज्यकर्त्यांच्या नावाने शिमगा करते आणि या सर्व धबाडग्यात सरकारी अधिकारी नावाची जमात सहीसलामत सुटते. गलेलठ्ठ पगार, सर्व सुविधा असूनही त्यांच्या कामाचे टोकदार मूल्यमापन होताना दिसत नाही. घोडेस्वाराची मांड घट्ट असली की घोडा वेगाने पळतो, तसेच राज्य कारभाराचे असले पाहिजे. राज्यकर्त्यांची प्रशासनावरील पकड ढिली झाली की राज्य मागे पडते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आणि मेहनती आहेत, पण त्यांच्या मंत्रिमंडळातील किती जणांना सत्तेत पाच वर्षे घालवूनही प्रशासन कसे वेगवान करायचे, हे कळले का हा प्रश्नच आहे. अधिकारी त्यांना जुमानत नाहीत आणि कारभार लालफितीत अडकून पडलेला दिसत आहे. शेवटी एक फडणवीस हे राज्य चालवू शकत नाहीत, हे स्वत: फडणवीसांनीही लक्षात घ्यायला हवे. असो…

राज्यातील निवडणुकीचे चार टप्पे पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेत पाणी, चारा, टँकर, मनरेगा, रोहयो, तातडीची मदत अशा बाजूंचा आढावा घेत निपचित पडलेल्या प्रशासनाला हलवून जागे केले. मुख्य म्हणजे मंत्री, पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाऊन दुष्काळावर जागल्याची जबाबदारी दिली. पिचलेल्या माणसांना ते कसे आधार देतात, यावर आता त्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत यशापयशाचा मार्ग ठरणार आहे. गेल्या दशकभरात आपल्या राज्यात दुष्काळ पाचवीला पूजल्यासारखा येत आहे. चार महिने पाऊस, चार महिने थंडी आणि चार महिने उन्हाळा हे आपल्याला माहीत असलेले निसर्ग चित्र आता उलटेपालटे झाले आहे. पाऊस वेळेवर आणि वेळेइतका पडेल याची खात्री नाही. येथे माणसांचीच नियत बदलली तेथे फक्त एकट्या निसर्गाला दोष देऊन काय उपयोग? आपण, निसर्ग वाचवण्यासाठी काय करतो, याचा मग्न तळ्याकाठी बसून युगांत उलटून गेल्यासारखा थोडा विचार करा, मग बघा आपली उद्ध्वस्त धर्मशाळा झालेली आपल्याला दोन डोळ्यांनी पाहायला मिळेल… आणि मग दोन डोळे, दोन काचा आणि दोन खाचा असे होऊन येथे प्रश्न कुठे येतो आसवांचा.. असे म्हणण्याची वेळ येणार नाही. घरटी वर्षाला चार झाडे लावावी आणि ती जगवावी, पावसाचे पाणी छोटे छोटे बंधारे घालून अडवावे, डोंगरदर्‍यांना चर खोदून ते झिरपेल असे पाहावे अशी छोटी छोटी माणसांच्या इच्छाशक्तीची सहज सोपी कामे आहेत. पण तीसुद्धा आपण करणार नाही आणि सरकारच्या नावाने बोंब ठोकणार हे आता चालणार नाही. पाण्याविना आपणच आपले मरण ओढवून घेत आहोत.

- Advertisement -

एक साधे उदाहरण द्यायचे तर कोकणात धो धो पाऊस पडतो आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागते. असाच प्रकार सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले तालुक्याला खेटून असलेल्या परबवाडा ग्रामपंचायत परिसरात व्हायचा. गावातली सर्व माणसे एक झाली आणि पाऊस संपल्यानंतर गावच्या चारी बाजूंनी छोट्या ओढ्यांना बंधारे घातले. गावच्या डोंगरावर असलेला शेकडो वर्षांपूर्वीचा तलाव खोल करून बंदिस्त केला. दुसर्‍या बाजूला एक मोठी विहीर बांधली. याचा परिणाम म्हणजे आज या वाड्यात मुबलक पाणी आहे. पाण्याअभावी मे महिन्यात गावाला न जाणारे चाकरमानी आपल्या घरी जात आहेत. हे अगदी वानगीदाखल साधे उदाहरण. इस्रायल पाण्याचा एकेक थेंब वाचवत आहे, कारण त्यांना त्या थेंबाचे महत्व ठाऊक आहे. म्हणूनच निसर्ग वाचवा, तो तुम्हाला वाचवेल. अभिनेते आमिर खान, सयाजी शिंदे, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आज स्वतः शिवारात उतरून पाणी, झाडे यावर काम करत आहेत. महाराष्ट्र वाचवण्याची धडपड करत आहेत. यात तुमचाही सहभाग असला पाहिजे. बदलत्या ऋतूचक्राच्या पुढल्या हाका ऐकून सावध व्हा. अन्यथा आपले मरण आपणच पहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -