घरफिचर्ससारांशचलो इश्क करें...

चलो इश्क करें…

Subscribe

असे बरेच तरुण-तरुणी आहेत जे आंतरजातीय विवाहचा मार्ग स्वीकारत आहेत. जात, धर्म पंथ बाजूला ठेवून वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु हे करत असताना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. समाज व्यवस्थेने घालून दिलेले नियम किंवा सरळ सरळ सांगायची झाले तर जाती व्यवस्थेचे नियम हे कठोरपणे राबवणारी एक यंत्रणादेखील आपल्यामध्ये आहे. ज्यांची मानसिकता आजही बाहेरच्या जातीमध्ये आपला मुलगा किंवा मुलीने लग्न करू नये हीच आहे. एवढेच नव्हे तर पोटजात देखील पाहिली जाते.

रूढी, प्रथा, परंपरा, संकेत आणि इथली जातव्यवस्था या सामाजिक बंधनाच्या चौकटीत आपण आहोत. भारतीय समाज व्यवस्थेत जात हे इथले वास्तव आहे. जवळपास सर्वच महापुरुषांनी जातीच्या पलीकडे जाऊन विचार केला आणि इथल्या अविवेकी जाती व्यवस्थेला विरोध केला. जात बंदिस्त प्रवर्ग आहे. आपण जातीची बंधनं झुगारण्यासाठी प्रयत्नशील होण्याची गरज आहे. तेव्हाच आपला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकास होऊ शकतो. आजच्या काळात आपण विचारांची बांधणी करत असताना एका विशिष्ट समाजाची रचना करत आहोत. किंबहुना, भेदभावाच्या भिंती पाडून एक नवा विचार छत्रपती शिवराय, फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांचा आणि परिवर्तनवादी संतांचा पुरोगामीत्वाचा विचार स्वीकारावा लागणार आहे. जे कुणी यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहून सकारात्मक विचारांची देवाणघेवाणदेखील तितकीच गरजेची आहे. प्रगतीशील समाजात ही बंधनाची चौकट तोडू पाहणारे काही युवक समोर येत आहेत. स्व विकासाची एक वाट निर्माण करत आहेत. जेणेकरून येणार्‍या पिढीला सोपे जाईल.

आजघडीला जात मोडीत काढायची असेल तर लोकांसमोर त्यांचा धर्म आडवा येतो. प्रचलित समाज रचना बदलल्याशिवाय प्रगती होत नाही. जातीच्या पायावर तुम्ही काहीही उभारु शकत नाही. तुम्ही राष्ट्र उभारु शकत नाही, तुम्ही नैतिकता उभारु शकत नाही, जातीच्या पायावर तुम्ही कितीही मजले भक्कम इमारती उभारल्या तरी त्याला तडेच जातील आणि ते एकजीव असणार नाही. समाज व्यवस्थेतील सुधारणा कशा घडवून आणायच्या. जात कशी नष्ट करायची यावरचा उपाय आंतरजातीय विवाह तसेच आंतर स्नेहभोजन हे अल्पशा स्वरुपात असणारे उपाय आहेत. जातीमुळे श्रमविभाजन किंवा आर्थिक आणि राजकीय विकाससुद्धा होऊ शकत नाही, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्पष्ट मत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन काही युवक हे आजच्या लोकांसमोर आंतरजातीय विवाह करून आदर्श निर्माण करत आहेत.

- Advertisement -

मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो. तो म्हणजे राजेश मुळे आणि सायली राणे या दांपत्याचा.. राजेश मुळे हा मूळ हिंगोली जिल्ह्यातील भिरडा या माझ्या गावचा तरुण आहे. ज्याने स्वतःच्या बळावर शिक्षणाने आपल्या विचारांना प्रगल्भ केले. समाजकार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर. महाराष्ट्रातील आदिवासी भागात मुलांचा शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी काम केले. पाड्यावर देखील मुलांना शिक्षणाचा हक्क आहे, हे तो आपल्या कामातून सांगतो. सोबतच सायली यांची ओळख झाली. मागच्या महिन्यात राजेश आणि सायलीने आंतरजातीय विवाह केला. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे. बरेच लोक असे करत आहेत… हो अगदी बरोबर आहे. पण या दोघांचेही अभिनंदन महाराष्ट्रभरातून यासाठी होत आहे की, यांनी स्वतःचा विवाह हा कोणताही जास्त खर्च न करता पुणे या ठिकाणी सत्यशोधक पद्धतीने केला. महात्मा फुलेंचा वारसा लाभलेल्या पुण्यामध्ये हा विवाह होणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे.

हे दोघे इथेच थांबले नाही तर त्यांनी पत्रिकेमध्ये असे नमूद केले होते की, लग्नाला येत असताना कोणत्याही प्रकारची इतर भेटवस्तू स्वीकारली जाणार नाही. तर छत्रपती शिवराय, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पुस्तक भेट म्हणून स्वीकारण्यात येईल. लग्न झाल्यानंतर जेवढी पुस्तके भेट म्हणून आली ती सर्व पुस्तके त्यांनी भिरडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत तेथील जिल्हा परिषद शाळेतील ग्रंथालयाला सुपूर्द केली. एखादा संकल्प केल्यानंतर तो पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आपली असते असे राजेश आणि सायली ज्यावेळी बोलतात, त्यावेळी खरंच आजचा युवक बदलत आहे. आणि सकारात्मक विचार करत आहे असे दिसते. या दोघांचेही महाराष्ट्रभरातून अभिनंदन होत आहे. चर्चा होत आहे. अशीच गरज आहे आजच्या युवकांना आदर्श घेण्याची. आपला जन्म जरी विशिष्ट जातीत झाला असला तरी माणूस हीच आपली खरी ओळख आहे. पी. के. चित्रपटातल्या डायलॉग प्रमाणे सांगायचे झाले तर आपल्या शरीरावर कोणताही ठप्पा नाही की आपण या जातीचे किंवा धर्माचे आहोत.

- Advertisement -

असे बरेच तरुण-तरुणी आहेत जे आंतरजातीय विवाहचा मार्ग स्वीकारत आहेत. जात, धर्म पंथ बाजूला ठेवून वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु हे करत असताना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. समाज व्यवस्थेने घालून दिलेले नियम किंवा सरळ सरळ सांगायची झाले तर जाती व्यवस्थेचे नियम हे कठोरपणे राबवणारी एक यंत्रणादेखील आपल्यामध्ये आहे. ज्यांची मानसिकता आजही बाहेरच्या जातीमध्ये आपला मुलगा किंवा मुलीने लग्न करू नये हीच आहे. एवढेच नव्हे तर पोटजात देखील पाहिली जाते. ग्रामीण भागात आपण समजू शकतो. पण शहरी भागात देखील ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते.

काळासोबत आपण बदलत गेलो तर त्यातून चांगल्याची अनुभूती येते. पण काळासोबत न बदलणारी माणसं स्वतःला आणि आपल्या समाजव्यवस्थेला अधोगतीकडे घेऊन जात असतात. एकीकडे आंतरजातीय विवाहाच्या गप्पा मारणारे स्वतःच्या घरात हा विषय निघाला की, मूग गिळून गप्प असतात हीदेखील वस्तुस्थिती आहे. म्हणूनच आपल्याकडे ‘सैराट’सारखा चित्रपट निर्माण होतो. यापूर्वी ग्रामीण भागात अशा अनेक घटना घडलेल्या पाहायला मिळतील ज्याची कुठेच नोंद नाही. सैराट चित्रपटातील शेवट गावागावात आजही घडतो, परंतु त्याची वाच्यता केली जात नाही. त्याचे कारण आपली इज्जत प्यारी…. या वस्तूस्थितीला नाकारून चालणार नाही. पण हे बदलण्यासाठी जे जे प्रयत्न करत आहेत त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहावे लागणार आहे.

मुळात आपल्याकडे जातीचे आणि धर्माचे राजकारण होत आहे. इथे सुद्धा जातीवर आणि धर्मावर आधारित तिकीट मिळते. अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांकाचा वादही नेहमीच पाहायला मिळतो. एखादा मुलाने मुलीने जर आंतरजातीय विवाह केला तर त्याला देखील राजकीय रंग प्राप्त करून देणारे महाभाग कमी नाहीत. मुळात बुद्ध सांगतात त्याप्रमाणे आपण शांतीच्या आणि प्रेमाच्या मार्गाने गेलो तर जग जिंकू शकतो. प्रेम करणं ही नैसर्गिक भावना आहे. एकमेकांसोबत राहणं आणि विवाह करणे ही देखील प्रेमाच्या नंतरची एक आयुष्याची पायरी आहे. समजून घेत जर राजेश आणि सायली सारखा मार्ग निवडला तर नक्कीच आंतरजातीय विवाहाचा एक ट्रेंड युवकांमध्ये रुजेल आणि समाजाचा विकास होईल.

पाश्चिमात्य देशामध्ये कसा विकास होतो आहे. याच्या गप्पा मारणारे आपण त्यांच्याकडील काही गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्याकडे सहजच दुर्लक्ष करतो. त्याचा मुद्दाम स्वीकारत करत नाही त्याचे अतिशय देखणे आणि खोटे कारण आपण देतो ते म्हणजे आपली संस्कृती तशी नाही. पण मुळात चांगल्या गोष्टी स्वीकारणे हीच आपली खरी संस्कृती आहे असे मला वाटते. येणार्‍या काळात युवकांनी सकारात्मक विचार केला तर जातीचे साखरदंड तोडायला वेळ लागणार नाही. बाकी या सगळ्या गोष्टींचे राजकारण करू पाहणार्‍यांना राहात इंदौरी यांचा एक शेर मुद्दामून इथे नमूद करावा वाटतो.

आज हम दोंनों को फुर्सत है चलो इश्क करें
इश्क दोंनों की जरूरत है चलो इश्क करें

आप हिन्दु मैं मुसलमान ये ईसाई वो सिख
यार छोड़ो ये सियासत है चलो इश्क करें……

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -