घरताज्या घडामोडीअर्ध्यावरती डाव मोडणार..?

अर्ध्यावरती डाव मोडणार..?

Subscribe

कोरोना किंवा कोरोनाचा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचा विचार केला, तर तो स्थानिक पातळीवर अधिक वेगाने पसरू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय. परिणामी, कुठल्याही देशात स्थानिक पातळीवर तरी क्रीडा स्पर्धांना परवानगी मिळणे अद्याप अवघड होऊन बसले आहे. राज्य, राष्ट्रीय पातळीवर विचार केला, तर अनेक स्पर्धांचे आता वेळापत्रक तयार झाले असून, त्यादृष्टीने आयोजकांसह खेळाडूंचेही नियोजन झाले आहे. त्यानुसार भारतासह जगभरात विविध क्रीडाक्षेत्रातील खेळाडूंचे सराव सत्रही सुरू झालेले दिसून येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरही सर्वच खेळांतील स्पर्धांना सुरुवात झाली आहे. तर दुसर्‍या बाजूला जगभर कोरोनाचा प्रभावही वाढता आहे, त्यामुळे अर्ध्यावरती डाव मोडण्याची धागधुग स्पर्धा आयोजक आणि क्रीडाप्रेमींच्या मनात आहे.

कोरोनाच्या सावटाखाली जगभरात ‘लॉक-अनलॉक’चा खेळ सुरू असताना आता कुठे तरी परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली होती. मात्र, ‘अर्ध्यावरती डाव मोडावा’ अशीच काहीशी स्थिती पुन्हा एकदा उभी ठाकली आहे. यातून क्रीडा क्षेत्रही वाचू शकलेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून जगभरातील क्रीडाक्षेत्र ठप्प झाले होते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर खेळाडूंचे आणि खेळाचीही हानी झाली. मात्र, कोरोनाचा प्रादूर्भाव कुठे तरी कमी होऊ लागला आणि लसीकरणाचा टक्काही वाढला, ज्यामुळे पुन्हा एकदा ‘नवी इनिंग’ सुरू होऊन क्रीडा क्षेत्रात उत्साह संचारलेला बघायला मिळाला. याचाच फायदा उचलत अत्यंत सावधतेने, सुरक्षितपणे ‘क्रिकेट का त्योहार’ समजली जाणारी आयपीएल स्पर्धा, तसेच ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक, क्रिकेट वर्ल्ड कप यांसह विविध क्रीडाप्रकारांतील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र, एखाद्या विकेट मिळणार्‍या चेंडूला पंचांनी ‘नो बॉल’ द्यावा, असंच काहीसं घडतंय. क्रीडाक्षेत्रात वेगवेगळे खेळ रंगू लागताच आता कोरोना आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने डोके वर काढल्याने क्रीडाप्रेमींना चिंता सतावू लागली आहे. आता पुन्हा ‘अर्ध्यावरती डाव मोडणार’ अशी भीती सर्वांना खात आहे. मुळात, आता मैदाने आणि खेळ कुठल्याही परिस्थितीत थांबू नयेत, अशी प्रत्येकाची मागणी आहे. मात्र, ‘थर्ड अंपायर’चा निर्णय येईपर्यंत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ करावे, तसेच सद्य:स्थितीत प्रत्येक क्रीडाप्रेमींना करण्यापलिकडे पर्याय दिसत नाही.

कोरोना किंवा कोरोनाचा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचा विचार केला, तर तो स्थानिक पातळीवर अधिक वेगाने पसरू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय. परिणामी, कुठल्याही देशात स्थानिक पातळीवर तरी क्रीडा स्पर्धांना परवानगी मिळणे अद्याप अवघड होऊन बसले आहे. राज्य, राष्ट्रीय पातळीवर विचार केला, तर अनेक स्पर्धांचे आता वेळापत्रक तयार झाले असून, त्यादृष्टीने आयोजकांसह खेळाडूंचेही नियोजन झाले आहे. त्यानुसार भारतासह जगभरात विविध क्रीडाक्षेत्रातील खेळाडूंचे सराव सत्रही सुरू झालेले दिसून येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरही सर्वच खेळांतील स्पर्धांना सुरुवात झाली आहे. भारताचा विचार केला, तर भारताने कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरच्या अनलॉकमध्ये सर्वच क्रीडाप्रकारांत दमदार कामगिरी केल्याचे दिसून येते. ऑलिम्पिकसह अन्य खेळांतही भारताने ‘सुवर्ण’ कामगिरी केली. क्रिकेटसह हॉकीमध्येही भारताने विजयी लय कायम राखली. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये काहीशी निराशा पदरी पडली, मात्र त्यानंतर आणि त्यापूर्वीची मैदानी कामगिरी वाखाणण्यासारखीच म्हणावी लागेल. अशा स्थितीत आता मैदाने बंद होण्याचा विचारही क्रीडाविश्वासाठी अत्यंत मारक ठरू शकतो.

- Advertisement -

टेनिस आणि फुटबॉलच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप्सच्या तारखांबाबत आता नियोजन सुरू झाले आहे. या स्पर्धांनाही मोठे महत्व दिले जाते. बॅडमिंटन, टेनिसला विदेशात मोठे महत्व आहेच. या स्पर्धांची स्पर्धकच नव्हे, तर प्रेक्षकही मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. मात्र, अचानक कोरोनाने डोके वर काढल्याने आता अनेक बड्या आयोजकांना धक्का बसतोय. फेब्रुवारीत होणार्‍या एबीएन अ‍ॅम्रो वर्ल्ड टेनिस टुर्नामेंट आणि दलास ओपन टुर्नामेंटसाठी खेळाडूंची तयारी जोरात सुरू आहे. त्याचबरोबर अर्जेंटिना ओपन, रिओ ओपन स्पर्धाही फेब्रुवारीत नियोजित आहेत. २२ मेपासून फ्रेंच ओपन, २७ जूनपासून विम्बल्डन, ऑगस्टमध्ये यूएस ओपन नियोजित आहे. पण, आता या स्पर्धांवरही कोरोनाचे सावट दिसू लागल्याने चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धा नियोजित असलेल्या शहरांमध्ये आजही कोरोनाचा प्रादूर्भाव फारसा कमी झालेला नाही. याउलट आता ओमायक्रॉनही पाय पसरत असल्याने निर्बंधांची शक्यता परदेशातही नाकारता येणार नाही. परिणामी, क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात प्रामुख्याने नाव घेतले जाणारे देश अमेरिका, भारत, दक्षिण आफ्रिका, लंडन, ब्राझिल, फ्रान्स, जपान, साउथ कोरिया, स्पेन, मलेशिया, कझाकिस्तान, पाकिस्तान, स्वित्झर्लंड, इंग्लंड अशा अनेक देशांत आता पुन्हा निर्बंधांची शक्यता वर्तवली जात आहे.

फुटबॉलचा विचार केला, तर नोव्हेंबर २२ पासून आयोजित फिफा वर्ल्डकपसाठी कतारमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी जगभरातील ३२ संघ आपली दावेदारी सिद्ध करतील. हजारो खेळाडू आज या स्पर्धेकडे नजरा लावून बसले आहेत. महिला फुटबॉल चॅम्पियनशीपसाठीही जगभरातील महिला फुटबॉलपटू नजरा खिळवून बसल्या असताना आता त्यांच्या चिंतेतही भर पडली आहे. भारतात मुंबई आणि पुण्यात फेब्रुवारीत होऊ घातलेल्या फुटबॉल स्पर्धांबाबतही आता विचार होऊ शकतो, अशी काहीशी स्थिती दिसू लागली आहे. एकीकडे फेब्रुवारी २०२२ मध्ये बिजींग येथे होणार्‍या विंटर ऑलिम्पिक स्पर्धांवरही कोरोनाचे सावट घोंघावतेय. याशिवाय मोटर रेसिंग, गोल्फ, शूटिंग, सायकलिंग, ट्रायथलॉनसह अ‍ॅथलेटिक्समध्येही मोठ्या स्पर्धांच्या आयोजनात सर्वांना विचार करावा लागत आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्राची हानी होऊ नये, अशीच अपेक्षा जगभरातील क्रीडारसिक अन् खेळाडू करत असतील, यात शंका नाही.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला, तर भारतासह प्रमुख ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, वेस्ट इंडिज, श्रीलंका अशा अनेक देशांच्या संघांना येत्या वर्षात परदेश दौरे करायचे आहेत. यात आयपीएलसह बीग बॅश लीग, वुमेन्स अ‍ॅशेस, आयसीसी वुमेन्स वर्ल्डकप, द अ‍ॅशेस, ट्रँग्युलर सिरीज अशा अनेक मोठ्या स्पर्धांचाही समावेश आहे. वैयक्तिक भारताचा विचार केल्यास भारताला नववर्षात दक्षिण आफ्रिकेतील दौरा पूर्ण करायचा आहे. दौर्‍याच्या प्रारंभीच भारताला मोठ्या तणावात सराव करावा लागला होता. कोरोनामुळे या दौर्‍याविषयी साशंकतेचे वातावरण होते. अगदी भारतीय संघाला मायभूमी परतावे लागण्याचीही शक्यता होती. मात्र, सद्य:स्थितीत हा दौरा सुरू असून, भारतीयांची यात दमदार कामगिरी सुरू आहे. या दौर्‍यानंतर भारतीय संघाला फेब्रुवारीत वेस्ट इंडिजसोबत मायभूमीतच दोन हात करायचे आहेत. परंतु, सद्य:स्थितीत भारतातही कोरोना स्थिती चिंताजनकच असल्याचे चित्र आहे. पुन्हा मार्चमध्ये भारतातच श्रीलंकेसोबत यजमानांना मालिका खेळायची असून, मार्च-मे महिन्यात मात्र जगभरातील क्रिकेटर्सचा मेळावा भरणार आहे. इंडियन प्रिमीयर लीग या दोन महिन्यांत नियोजित असल्याने त्यादृष्टीने प्रचंड तणावात नियोजन सुरू झाले आहे. याला कारणही तसेच आहे.

गत आयपीएलमध्ये मोठ्या संख्येने खेळाडू कोरोनाबाधित आढळल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली होती. यानंतर काही काळानंतर उर्वरित सामने पार पडले होते. यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले. त्यादृष्टीने आता आगामी स्पर्धांबाबत सर्वांगाणे विचार करावा लागणार आहे. जून महिन्यात पुन्हा दक्षिण आफ्रिका संघ भारतीय दौर्‍यावर येणार आहे. दक्षिण आफ्रिका सद्य:स्थितीत हॉट लिस्टवर असल्याने पुढे काय स्थिती असेल, याबाबत तर्क-वितर्क आतापासून लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, भारतीय संघाला १ जुलैपासून इंग्रजांच्या भूमीत मैदानावरच नव्हे तर कोरोनाशीही दोन हात करायचे आहेत. जवळपास एक महिन्याच्या या दौर्‍यात भारतीयांची कसोटी असेल. सप्टेंबर महिन्यात टी-२० एशिया कप श्रीलंकेत होणार आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ बांग्लादेश दौर्‍यावर जाईल. त्यानंतर २०२२ च्या अखेरीस भारतीय संघ मायभूमीतच श्रीलंकेसोबत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. अशा या व्यस्त वेळापत्रकामुळे भारतीय क्रिकेट संघापुढे निश्चितच आव्हान असेल. मात्र, कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये एवढीच प्रार्थना प्रत्येक क्रिकेटप्रेमींना करावी लागणार आहे.

या प्रमुख स्पर्धांकडे लक्ष

फॉर्म्युला वन, ब्रिटीश ओपन, मास्टर्स, विम्बल्डन, यूएस ओपन, हवाईतील आयर्नमॅन चॅम्पियनशीप, टूर दी फ्रान्स सायकल चॅम्पियनशीप, वूमेन्स युरोज, वर्ल्ड अ‍ॅथलिट चॅम्पियनशीप, इटलीत नियोजित युरो बास्केट २०२२, रग्बी वर्ल्ड कप सेवेन्स यांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि फुटबॉल स्पर्धांच्या वेळापत्रकांकडेही आता जगभरातील क्रीडापटूंसह प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. फुटबॉलमधील फिफा वर्ल्डकप, बिजिंगमधील विंटर ऑलिम्पिक, टेनिसमधल्या बड्या ओपन चॅम्पियनशीप, क्रिकेटमध्ये आयपीएल, एशिया कप, बिग बॅश लीग अशा अनेक स्पर्धांबाबत आता आयोजकांनाच नव्हे तर खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमींनाही चिंता सतावू लागली आहे.

व्हॅक्सिनेशन वाढले, पण व्हेरिएंटचे काय?

जगभरात व्हॅक्सिनेशन वाढवण्यावर भर दिला जात आहे. मात्र, कोरोनाचे नवे व्हेरिएंट प्रत्येक देशापुढे आव्हानात्मक ठरत आहेत. खेळाडूंसाठी आता कुठल्याही परिस्थितीत मैदाने बंद ठेवू नयेत, अशी ओरड आंतरराष्ट्रीय पातळीवरही असली तरी तशी खबरदारी घेतली गेली, तरच ही गोष्ट शक्य असल्याचे सर्वश्रूत आहे. कुठल्याही खेळातील घटक असो, त्याने आपली आणि आपल्या कुटुंबियांची, सहकार्‍यांची काळजी घेणे, नियमांचे पालन करणे या गोष्टी योग्यप्रकारे झाल्या, तरच कोरोनाला पुन्हा एकदा आळा घालणे शक्य होईल. जेणेकरून भारतातच नव्हे, तर विदेशातही कोरोनामुक्त वातावरण बघावयास मिळेल आणि क्रीडाक्षेत्रात सगळे खेळ उत्तमरित्या पार पडतील.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -