घरफिचर्ससारांशजिया व्हायचं की मूव्ह ऑन करायचं, ठरवाचं!

जिया व्हायचं की मूव्ह ऑन करायचं, ठरवाचं!

Subscribe

स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने जिया खानने आत्महत्या केली. त्यामुळे अभिनेता सूरज पांचोली याला जियाच्या आत्महत्येसाठी जबाबदार ठरवता येणार नाही, असा निकाल देत सीबीआय न्यायालयाने पुराव्याअभावी सूरजला निर्दोष करार दिला. यामुळे गेली १० वर्षे लेकीला न्याय मिळवण्यासाठी लढणार्‍या राबिया खान यांना आई म्हणून धक्का बसणे स्वाभाविकच आहे, पण न्यायालयाने या प्रकरणात जियाबद्दल नोंदवलेले स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचं मतही समस्त तरुण पिढीला विचार करायला लावणारं आहे.

–कविता जोशी-लाखे

जेवढं ते तरुणींचं प्रतिनिधित्व करणार्‍या जियासाठी आहे तेवढंच ते सूरज म्हणून जगणार्‍या तरुणांसाठीही आहे. कारण हा सगळा खेळ भावनांचा आहे. जियाने आत्महत्येपूर्वी सूरजसाठी सुसाईड नोट लिहिली होती. तू मला फक्त वेदना दिल्यास, पण मी तुला फक्त प्रेम दिलं. तुझ्यासाठी मी सगळंच सोडून दिलं, पण तू मात्र मला फक्त एकटेपणा दिलास. जियाच्या या नोटमधूनच ती सूरजमध्ये किती भावनिकरित्या गुंतली होती हे स्पष्ट होतंय. जगाचा निरोप घेण्याआधीही तिने सूरजला अनेक कॉल केले, पण त्याने ते रिसिव्ह केले नाहीत, मात्र त्याआधी त्याने तिला खालच्या दर्जाच्या भाषेत १० मेसेज केले होते. त्यामुळे ती अधिकच व्यथित झाल्याचे तिच्या आईने सांगितलंय.

- Advertisement -

आत्महत्येच्या काही दिवासांआधीपर्यंत जिया आणि सूरज लिव्ह ईनमध्ये राहत होते. त्यावेळी ती प्रेग्नंट होती, पण सूरजने तिला गर्भपाताचा सल्ला दिला. तो तिला डॉक्टरकडेही घेऊन गेला. ती त्याच्यामागे लग्नासाठी लागली होती, तर त्याला तिच्यापासून सुटका हवी होती. यातच खरंतर सगळं आलं, पण न्यायालय पुराव्यांवर निर्णय देते. तिथे या भावभावनांच्या खेळांना काडीमात्र किंमत नाही. यामुळेच असेल कदाचित लेकीला जाऊन १० वर्षे झाली तरी न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या राबियाच्या नशिबी अजूनही संघर्षच संघर्ष दिसतोय. थोडं नीट बघितलं की लक्षात येतं की आपल्या आजूबाजूला असे अनेक जिया आणि सूरज वावरत आहेत.

आधुनिक विचारांच्या नावाखाली शारीरिक आकर्षण संपलं की एकमेकांना वापरून फेकत आहेत, पण जे या नातेसंबंधात शारीरिक सुखाबरोबरच भावनिकही गुंततात ते कधीच या नात्यातून बाहेर पडत नाहीत. जोडीदाराने फेकलं तरी ते त्याच्याच वियोगात आयुष्य घालवण्याचा अट्टाहास करतात. त्यातूनच मग जिया-सूरज, तुनिषा-शिजान खान, बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जी आणि अगदी काल परवाचे आफताब-श्रद्धा यातील तरुणीही प्रियकरामध्ये भावनिकरित्या गुंतल्या आणि संपल्या, पण त्यांच्या विरहात यातील एकाही तरुणाने अजून स्वतःचे काही बरं वाईट केल्याचं ऐकिवात नाही. उलट नव्या जोडीदाराबरोबर ते move on झालेत.

- Advertisement -

त्यातच गेल्या काही वर्षांत अशा प्रकरणात न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे, निकालही विचार करायला लावणारे आहेत. संमतीने झालेले शारीरिक संबंध याला बलात्कार म्हणता येणार नाही. लग्नाचे आमिष दाखवून ठेवलेले संबंधही गैर नाहीत. असे अनेक प्रॅक्टीकल विचार करायला लावणारे निकाल न्यायालय देत आहे. आजच्या पिढीच्या मानसिकतेला धरूनच हे निर्णय येत असले तरी त्यातून तरुणाईचे डोळे उघडणे गरजेचे आहे. स्त्री स्वभावच हा भावनाप्रधान असल्याने ती प्रेमाच्या पाशात सहज सापडते. त्यात तिचं पुरुषावरील प्रेम हे भावनिकतेतून आलेलं, तर त्याच पुरुषसुलभ स्वभावानुसार शारीरिक आकर्षणातून. जेव्हा यातील बॅलन्स बिघडतो तेव्हा बिघडतं. त्यामुळे तरुणींनाही आता डोळे उघडूनच असे नातेसंबंध जोडण्याची गरज आहे. आधीच सध्याच्या स्ट्रेसफूल आयुष्यात सापडलेली ही पिढी मानसिकरित्या तशी कमकुवतच आहे.

नकार पचवणं, अपयश स्वीकारणं यांना पालकांनी शिकवायलाच हवं. कारण याचेच परिणाम त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवणारे आहेत. बंधनात न अडकता स्वच्छंद जगू पाहणारी सूरज, आफताब, शिजानची ही पिढी म्हणूनच लग्नाच्या नावाने दूर पळते, तर त्यांच्या विरहाने जिया, तुनिषा, प्रत्युषा सुसाईड करत सुटल्याहेत. यात नाहक वेळ घालवण्यापेक्षा अशा प्रसंगातून बाहेर कसे पडायचे याचे धडे घेण्याची गरज या पिढीला आहे. लग्नानंतर नातेसंबंधात दुरावा आला तर त्यातून बाहेर पडण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे तरी ठोठावता येतात, पण अशा नातेसंबंधात आपले निर्णय आपणच घ्यायचे असतात. कारण याला काही समाजाचे बंधन नसते. त्यामुळे जाब विचारायला तसं कोणीही नसतं.

अशा तरुणांसाठी आज मोटिवेशनल स्पीकर यू ट्यूबवर खच्चून भरले आहेत. इकडून तिकडून सगळेच जण सारखेच फुकटचे सल्ले देत आहेत. विशेष म्हणजे या मोटिवेशनल स्पीकरला विचारण्यात येणार्‍या प्रश्नांमध्येही ब्रेकअपसंबंधीचेच प्रश्न अधिक आहेत. यातूनच आजची पिढी ते संबंध हाताळताना किती स्ट्रेस घेऊन जगत आहे हे दिसतंय. त्यामुळे या पिढीने त्रासदायक संबंधांत न गुरफटता वेळीच त्यातून कशी सुटका करून घ्यावी याचे धडे घेणे जास्त गरजेचे आहे. उगाच कोणासाठीही जीव द्यावा एवढं हे जीवन स्वस्त मुळीच नाही. हे जेवढे लवकर या तरुणाईला कळेल तेवढे बरे, अन्यथा न्यायालयात प्रेमाचा हिशोब मागायला येणार्‍या जिया आणि सूरजच्या रांगा कधीच संपणार नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -