घरफिचर्ससारांशनवनव्या घाटरस्त्यांचा हव्यास... विकास की विनाश ?

नवनव्या घाटरस्त्यांचा हव्यास… विकास की विनाश ?

Subscribe

काल-परवा जिल्ह्यात कुठेतरी नव्यानं घाटमार्ग मागणीची बातमी वाचण्यात आली. सखेद आश्चर्य वाटले. प्रश्न पडतो, मागणी करणार्‍यांची मनं डोकी शाबूत असतील का? इतके सामाजिक अधःपतन होत असल्याचे पाहून कीव करावीशी वाटते. सामाजिक या अर्थाने की, कोणत्या मागणीचे कोणते दूरगामी भलेबुरे परिणाम आपल्यावरच होतील याचे विचारभान न ठेवता जेव्हा समाज आंधळेपणाने यात सक्रिय होतो. खरंच नवीन घाटमार्गांची गरज आहे का?दळणवळणाची सोय, म्हणून पर्याय नाहीत का? याचबरोबर दुसर्‍या बाजूने या मार्गातील डोंगर जंगल सुरक्षित राहिल्याने जैववैविध्यतेतील प्रत्येक घटकाने जैविक साखळीत आपापले मोलाचे योगदान दिल्याने मानवासह सारी सजीवसृष्टी आजवर पोषित राहिली या बाजूकडे गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक ठरते.

जेव्हा एखादा घाटमार्ग व्हावा म्हणून अट्टाहास धरतो, त्यावेळी त्याच्यामुळे कित्येक पटीने होणार्‍या दुष्परिणामांचा विचार किती करतो? घाटरस्ता तयार होत असताना बेसुमार जंगल तोडीमुळे जैविक साखळीचा र्‍हास तर होतोच,शिवाय त्या मार्गावर पुन्हा अवैधपणे व्यावसायिक घरं दुकानं हॉटेल थाटली जाऊन विघटन न होणारा प्लास्टिक कचर्‍याचा डोंगर मात्र वाढतोय.अख्खे जंगल अस्वस्थ होते. पुढे याच मार्गावरून दुर्गम जंगलाआत चोर मार्ग निर्माण होऊन लाकूड विक्री सुरू होते. या सर्व क्रियाकलापांमुळे वनसमूहात केवळ घटच होत नाही तर वनस्पती आणि जीवजंतूंचा एक मोठा भाग नष्ट झाल्याने प्रजातींमधील संबंध क्षीण होऊन संपूर्ण परिसंस्था मरतेय. दाट जंगलांमध्येच प्राणी आणि वनस्पती प्रजाती विकसित होऊ शकतात आणि पुनरुत्पादित होऊ शकतात.

- Advertisement -

आज पर्यावरणीयदृष्ठ्या महत्वाच्या असलेल्या क्षेत्रातील दरवर्षी 13 दशलक्ष हेक्टर मूळ वनराई नष्ट होतेय. याच दराने असंख्य अनुप्रयोगांसाठी जंगलांची तोड कायम राहिल्यास नदी-वने-पाऊस पुढील सुमारे 100 वर्षात अदृश्य होऊन निसर्गाची स्वतःची इकोसिस्टम यंत्रणाच उध्वस्त होईल. जंगल तोडीमुळेच पृथ्वीची स्वतःची हवामान आणि रासायनिक रचना नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते. जंगलांमुळे श्वास घेण्यास ऑक्सिजनच मिळतो असे नाहीय,तर डोंगरातील साठलेल्या गोड्या पाण्याचे संग्रहण आणि फिल्टरिंगदेखील होतेय. जंगलतोडीमुळेच वारंवार पूर आणि दुष्काळाची तीव्रता वाढतेय.

पृथ्वीवर उत्सर्जित होणारे कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेणारी झाडे नष्ट झाल्याने वातावरणातील वायूंचे प्रमाण कमी होत नाही. त्याचमुळे सरासरी तापमान इतके वाढत जातेय की एक दिवस मोठ्या आपत्तीला सामोरे जावे लागेल. जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ? हेच तर होय. ग्लोबल वार्मिंग उत्सर्जनात आज ‘जंगलतोड’ हे कारण 10 टक्के जबाबदार आहे. जैवविविधता ग्लोबल वार्मिंगशीदेखील संबंधित आहे. जंगलतोडीमुळे वनस्पती आणि प्राण्यांचे साम्राज्य विस्कळीत होतेय. पक्षी, कीटक, प्राणी हे वनस्पतींचे परागण आणि बियाणे पसरवतात. जंगलतोडीमुळे पक्षी आणि प्राणी प्रजातींच्या कमी होण्यामुळे, परागकण कमी अर्थात जंगलाचे पुनर्जन्म थांबते.

- Advertisement -

जंगलांचे असणे, हे एक मूल्यवान पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संसाधन म्हणून महत्त्वपूर्ण ठरलेय. वर्षानुवर्षे देशातील सामाजिक-आर्थिक विकासात जंगलांनी मोठे योगदान दिलेय. जंगलं ही सर्वाधिक उत्पन्न आणि रोजगार निर्मिती क्षेत्रांपैकी एक आणि उद्योगांसाठी संसाधन तळ म्हणून काम करतायत. इमारती लाकूड, लगदा आणि कागद, औषधे आदी वस्तू-उत्पादनासाठी कच्चा माल जंगलातूनच मिळविला जातो. वर्ल्ड वाइल्डलाइफच्या मते, गेल्या 150 वर्षात जगाच्या अर्ध्या भागाचा नाश झालाय. हवामान बदलामध्येही जंगलतोड हेच प्राथमिक कारण होय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घोटगे-सोनवडे घाटमार्गाच्या अलाईनमेंटमध्ये रस्त्याचा 2.75 किलोमीटरचा भाग राधानगरी अभयारण्याच्या क्षेत्रात येत असल्याची बाब निष्पन्न झाली.

याचा अर्थ अभयारण्यातील जंगलाची किती वृक्ष तोड होईल. या जंगलातील दुर्मिळ वनस्पती पशुपक्षी वनसंपदा नष्ट होईल. जी मानव निर्माण करू शकत नाही. नवीन घाटमार्ग मागण्यांना खरंतर तीव्र लोकविरोध व्हावयास हवा.

‘घाटमार्ग’ हा खरंतर स्वतंत्र लिहिण्याजोगा विषय, पण या लेखाच्या मूळ विषयावर येताना खरंच नव्यानं घाटमार्ग होण्याची आवश्यकता आहे का,यावर लिहावंसं वाटतं.

‘घाटमार्ग’ इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर सातवाहन राजे सुमारे चारशे वर्षे सलग राज्य करत होते. या राजवटीत महाराष्ट्रासह इतर प्रदेशांचीही भरभराट झाली. प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण,जुन्न्नर, तेर, नेवासा आणि नाशिक अशी घाटमाथ्यावरील व्यापारी शहरे आणि शुर्पारक म्हणजेच आताचे नालासोपारा, कल्याण,च ौल या पश्चिम किनार्‍यावरच्या अत्यंत महत्त्वाच्या बंदरांच्या मदतीने परदेशात व्यापार चालत असे. त्यासाठी सह्याद्री ओलांडण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नाणेघाटासारख्या घाटवाटा तयार केल्या गेल्या. पुढे याच घाटवाटांचा सामरिक उपयोग शिवाजी महाराजांनीही अतिशय चांगल्या प्रकारे करून घेतला. तापी नदीपासून दक्षिणेस महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि केरळ राज्यात पसरलेला सुमारे 1600 कि.मी.पेक्षा जास्त दक्षिणोत्तर लांबीचा हा सह्याद्री पश्चिम घाट.

कोकणातून पूर्वेकडे पाहिलं तर सह्याद्रीचा घाट साधारणपणे सातशे ते हजार मीटर्सपर्यंत उठावलेला दिसून येतो. या घाटांतून कोकणात दांड किंवा नाळी,सरी स्वरूपात उतरणार्‍या अनेक घाटवाटा आहेत. कोकण, घाटमाथ्यावरील लोकांच्यात जसे नातेसंबंध निर्माण झाले. तसे धार्मिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी सह्याद्री घाट मार्गातून वर्दळ सुरू झाली. त्यातूनच सहजपणे पायी जाता-येता येईल अशा सोयीसाठी एक दोन नव्हें तर जवळपास 220 घाटवाटा तयार केल्या गेल्या. काही घाटवाटा ‘भौगोलिक परिस्थितीवरून’ तर काही ‘उपयोगावरून’ निर्माण होत. घाटवाटांचा जसा व्यापारासाठी तसा अनेक विधायक कामांसाठी उपयोग होत होता. व्यापारी मार्गांवर बैल, गाढवं, घोडे, सैन्य जाऊ शकेल अशा घाटवाटांची गरज भासू लागली.

तसेच मुख्य व्यापारी घाट मार्गातील खोळंबा लक्षात येऊन पुढे अनेक पर्यायी वाटा निर्माण झाल्यात.यात काही लष्करी घाटवाटा होत्या. या वाटांवर संरक्षणासाठी असलेल्या चौक्याना ‘मेट’ म्हटलं जातं असे. काही घाटवाटा शिकार्‍यांच्या असत तर काही औषधी वनस्पती गोळा करणार्‍या वैदू-धनगर-कोळी यांच्याही असत. बोलीभाषेप्रमाणे घाटवाटांना कुठे ‘बारी’ म्हणत तर, दक्षिणेकडे घाटवाटांच्या नावात ‘दार’, ‘नाळ’, ‘खिंड’, ‘सरी’, ‘व्हळ’, ‘पाज’ असा बदल होत जातो. काही घाटवाटा वाटेत असलेल्या गावाच्या तर काही देवाच्या नावानेही ओळखल्या जात. सह्याद्रीत या घाटवाटांचे विलोभनीय सौंदर्य आजही पाहावयास मिळते. विकासाच्या दळणवळण प्रक्रियेत अनेक जिल्हे पक्क्या-रस्त्याने जोडले गेलेत.

घाटमाथ्यावरून एकट्या सिंधुदुर्गात उतरणार्‍या जवळपास 46 घाटवाटा आहेत आणि दोडामार्ग ते राजापूर दरम्यान रामघाट, आंबोली, फोंडा दाजीपूर, गगनबावडा, भुईबावडा त्या लगत अनुस्कुरा आणि प्रस्तावित घोटगे सोनवडे असे 7 मार्ग आहेत. सह्याद्री पायथ्याशी वसलेल्या कोणत्याही गावाच्या उजव्या डाव्या सरी-पाजीवरुन कोल्हापूर जिल्ह्यात आपण पोहोचतो. याचा अर्थ प्रत्येक गावाने उद्या रस्त्याची मागणी करावी म्हणजे, हास्यास्पद होईल.

बरं या नव्याने मागणी करण्यात येणार्‍या घाट रस्त्यांमुळे असा कोणता ‘वेगळा’ विकास हे लोकं साधू इच्छितात,देव जाणो. आजही जिल्ह्यात परजिल्ह्यातूनच अंडी,भाजी, दुधापासून घरगुती वापराच्या बहुतेक सर्वच वस्तूंची आयात होतेय.

कोकणातून सातत्याने प्रतिदिनी परजिल्ह्यात निर्यात करताय, अशा मासेमच्छी सोडून कोणत्या वस्तू इथे उत्पादित करीत आहात? या सर्व गोष्टींची जाणीव असूनही आपण अनाठायी मागणी रेटून जंगल जैविक वैविध्यतेची हानी करणार असाल तर त्याला यापुढे तीव्र विरोधच होईल. मागील दोन दशकात कोकणात विकासाची स्वप्नं जोर धरू लागलीयत. कोणता विकास आणि कुणाचा विकास? विकास म्हणजे रोजगार निर्मितीसाठी आणले जाणारे मोठमोठे प्रकल्प, असे भासवले जाऊन एमआयडीसी, सी-वर्ल्ड, एअर पोर्ट प्रकल्पाकरीता लोकांच्या जागा कवडीमोल भावात खरेदी केल्या गेल्यायत. कोकणाच्या सौंदर्यास आणि इथल्या नैसर्गिक फळ-भात शेतीस घातक ठरणारे रासायनिक क्रशर-खाणकाम उद्योगच इथे उभारले जाऊ लागलेत.

चिपळूण-लोटेतील रासायनिक उद्योग, जयगडमधला औष्णिक विद्युत प्रकल्प,जैतापूर अणूविद्युत प्रकल्प, नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी, रसायनी प्लांट मधले रासायनिक कारखाने,आंबोळगड येथील आयलॉग पोर्ट, फिनोलेक्स कंपनीचा औष्णिक विद्युत प्रकल्प असेच विनाशकारी प्रकल्प आणण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांत सातत्याने सुरू आहेत. वाड्यावस्ती- पोरालेकरांना खोटी आश्वासने-आमिषे दाखवून जागा विकावयास भाग पाडले जातेय. त्यात, मायनिंग-क्रशरच्या बेसुमार जाळ्याने निसर्गाचे-लोकांचे इतक्या वर्षात जे नुकसान झालेय, त्याहून जास्त नुकसान येत्या काही काळात होण्याची परिस्थिती इथे निर्माण होतेय. वर्तमानकाळ केवळ त्या घडामोडीची प्रक्रिया होय. सबब,जंगलं उध्वस्त करून नव्याने घाटमार्गाची अनाठायी मागणी कोकणाच्या सौंदर्याच्या, शाश्वत विकासाच्या आडच येईल.

वसुंधरेचं वस्त्रहरण करणारे आपण कौरव व्हायचे की मूकपणे हे दुष्टचक्र सहन करणारे कर्ण-भीष्म व्हायचे? की,माय-वसुंधरेचे संरक्षक श्रीकृष्ण व्हायचे? हे ज्याचे त्याने सद्सद्विवेक बुद्धीने ठरवावे. वाढत्या डांबरी सडका आणि सिमेंटची जंगले मानवास मातीचा स्पर्श आणि गंध यापासून दूर नेतायत. नद्यांचे पात्रं घटतेय-आटतेय. डोळ्यांदेखत वाढणारी झाडे, त्यावरील पाखरांचा थवा, सावलीत खेळणारी मुले, विसावणारी गुरे, शेतबांधावर कांदा भाकर खाणारे शेतकरी हा सगळा मामला आता इतिहास जमा होतोय. पूर्वी निसर्ग आणि माणूस यांचे संयुक्त स्वराज्य होते. यातील माणसाच्या स्वास्थ्यातील ‘स्व’ संपून जिथे यंत्र अस्तित्वात आले तिथूनच हवा-पाणी-भूमीची प्रतारणा होऊ लागली. या प्रतारणेचा दुष्परिणाम म्हणजे वसुंधरा विद्रोहच होय. हाती काठी घेऊन रस्ता ओलांडणारा एखादा हसतमुख जन्मांध दिसला म्हणजे वाटते, की हे अनमोल जीवन किती सहज आहे.

घाटमार्ग खोदून सर्वनाश होण्यास जबाबदार ठरण्यापेक्षा ‘निरामय-निरागस मनोवृत्ती’ याच अखेरच्या उपायाकडे घेऊन जाणार्‍या मार्गाचा अट्टाहास धरूया!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -