घरफिचर्ससारांशसुटकेच्या शोधात परिंदा!

सुटकेच्या शोधात परिंदा!

Subscribe

लेखक दिग्दर्शक असलेल्या विधु विनोद चोप्रानं ‘परिंदा’ चित्रपटाचं नाव आधी कबुतरखाना असं ठेवलं होतं. जावेद अख्तरांनी ते बदलायला लावलं आणि परिंदा असं सुचवलं. हे नाव युनिटच्या सगळ्यांना आवडल्यावर फायनल झालं. विधु विनोद चोप्रासाठी परिंदा महत्वाचा होताच, सोबतच तो जॅकी, अनिल आणि नाना पाटेकर या सगळ्यांच्या अभिनय करिअरला वळण देणारा मैलाचा दगड ठरला. विधु विनोद चोप्राचा मागील रविवारी वाढदिवस होता. अंडरवर्ल्डच्या पिंजर्‍यातून सुटका होण्यासाठी परिंदे फडफडत, तडफडत असतात, ही तडफड आज तीन दशकांनंतरही सारखीच आहे, माणूस नावाचा परिंदा अजूनही सुटकेच्या शोधात आहे.

‘परिंदा’साठी संगीत दिग्दर्शक म्हणून आर. डी. बर्मन यांचे नाव पक्के झाल्यावर विधू विनोद चोप्राला या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला होता. नव्वदच्या दशकात ज्यावेळी बप्पी लाहिरीच्या संगिताचा बिगुल पडद्यावर जोरदार वाजत असताना काहीशा विस्मृतीत गेलेल्या आरडींना संगिताची जबाबदारी देणं ही मोठी रिस्क असल्याचं विधु विनोदला त्याच्या संगीत क्षेत्रातल्या जाणकारांनी सांगितलं. मात्र विधुने आरडी बर्मन यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला. सुरेल गाणी म्हणजे रोमँटिक सिनेमा असं घट्ट झालेलं समीकरण परिंदाने मोडून काढलं, कितनी है प्यारी, प्यार के मोड पे, सेहरे में दुल्हा होगा, तुमसे मिलके अशी चार सुरेल गाणी परिंदामध्ये होती. आरडी बर्मन काळाच्या ओघात संपल्याची टीका करणार्‍यांना ही गाणी आरडीनं दिलेलं चोख उत्तर होतं. परिंदासाठी पटकथा शिवकुमार सुब्रमण्यम यांनी लिहिली, त्या ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस प्रणयपटांनी हिंदी पडदा व्यापला होता. हा काळ हिंदी पडद्यासाठी आशादायी नव्हताच, अशा परिस्थित प्रवाहाबाहेरच्या वेगळ्या आशय विषयाच्या परिंदाने 1989 मधल्या फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारांवरही नाव कोरलं. वास्तवदर्शी गुन्हेगारीपटांच्या खोलात जाऊन तिथले व्यवहार, माणसांचे स्वभावदर्शन टिपणारा परिंदा हा हिंदी पडद्यावरील पहिलाच प्रयत्न विधु विनोद चोप्राने केलेला होता.

अंडरवर्ल्डमध्ये काम करणारी माणसं नसतात, ते कमालीचे रक्तपिपासू असे लांडगे असतात, इथं नाती, मैत्री असल्या कुठल्याही गोष्टींना थारा नसतो, या स्पर्धेत जिवंत असणं म्हणजेच जिंकणं हे परिंदाने पहिल्यांदा थेट अधोरेखित केलं. धंदे में कोई किसीका भाई नही, कोई बेटा नही…नानाच्या तोंडी असलेला हा संवाद परिंदाच्या कथासूत्राच्या मध्यवर्ती होता. या कबूतरखान्यात गुन्हेगारी जगतातील सर्वोच्च उडान भरण्याच्या प्रयत्नात असलेला परिंदे आणि त्यांना टिपण्यासाठी खाली जमिनीवरून पिस्टलचं टार्गेट सेट करणारे कबुतरबाज, यांच्यातील संघर्षाचं हे कथानक होतं. दक्षिण मुंबईतल्या कामगार, चाळवजा वस्त्यांमध्ये कबुतरबाजी चालते. उंचच उंच उडणार्‍या पंरिद्यांवर पैसे लावले जातात, हा थेट जुगार असतो. इथं उंचावर जाऊन हवेतच पल्टी मारणारे परिंदे, निश्चित वेळेत पुन्हा आपल्या कबुतरखान्यांकडे वळणारे परिंदे, दुसर्‍या परिंद्याच्या समुहात शिरून त्यातल्या बादशहा परिंद्याला फितवून आपल्या कबुतरखान्यात आणणारे परिंदे असतात, आपल्या गटातले परिंदे ओळखता यावेत म्हणून परिंद्यांच्या पायात सोन्याची कडी अडकवणारेही कबुतरबाज असतात. या कबुतरांवरून प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये नेहमीच हिंसक संघर्ष सुरू असतो. कबुतरबाजीतल्या धंद्यातले गुलाम परिंद्यांचे नियम अंडरवर्ल्डसाठीही तंतोतंत लागू होतात. विधु विनोद चोप्राने परिंदा बनवताना हेच मध्यवर्ती सूत्र ध्यानात घेतलं.

- Advertisement -

परिंदाचं कथानक आणि सादरीकरण व्यावसायीक अंगाने करावं की कमालीच्या वास्तववादी हा प्रश्न विधु विनोद चोप्राने पटकथा संतुलीत ठेवून सोडवला खरा, पण चित्रपट रिलिज झाल्यावर पहिल्या दोन आठवड्यात सिंगल थिएटरमध्ये प्रेक्षक फिरकेनासे झाले, त्यावेळी कथानकात बदल करण्याचा विषय आल्याने पुन्हा रिशूट करण्याचा विचार झाला. चित्रपटाच्या अखेरीस अनिल कपूर आणि माधुरीवर नानाकडून झालेला गोळ्यांचा वर्षाव प्रेक्षकांना रुचला नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र थिएटरातल्या थोड्याशा गर्दीने केलेल्या माऊथ पब्लिसिटीमुळे पुढे परिंदाच्या खेळाबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला, यात रिपिट ऑडियन्स मोठ्या प्रमाणात होती, हाच प्रकार राम गोपाल वर्माच्या गुन्हेगारीपट ‘सत्या’बाबतही घडला होता.

परिंदाच्या पडद्यावर मुंबईच्या गुन्हेगारी जगात लहानपणीच नाईलाजाने ओढलेले किशन (जॅकी श्रॉफ) आणि करन (अनिल कपूर) हे दोन भाऊ आहेत. या गुन्हेगारी जगाचे दोन बादशहा आहेत, अन्ना सेठ ( नाना पाटेकर) आणि मुसा (टॉम ऑल्टर) त्यांच्यात कायम संघर्ष सुरू आहे. यातील अन्ना सेठच्या गोटात सामील सुरेश ऑबेरॉय (अब्दुल), शिवकुमार सुब्रमण्यम ( फ्रान्सिस), कमल चोप्रा (रामा रेड्डी) अशी या दोन पायांच्या लांडग्यांची टोळी आहे. हजार रुपयांसाठी माणसांना चाकू मारणे, गोळीने भेजा उडवणं त्यांच्यासाठी रोजच्या धंद्यातलं काम आहे. या टोळीतही सत्तेचं राजकारण आहे. अब्दुल आणि किशनमध्ये टोळीतल्या दुसर्‍या नंबरच्या पदासाठी कायम कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. विश्वासघात, थंड डोक्याने गळा चिरणं, फसवणुकीला इथं माफी नाही, मात्र ही या जगात सहज घडणारी गोष्ट आहे.

- Advertisement -

परिंदामध्ये थंड डोक्याने माणसं सहज मारली जातात. हिंदी पडद्यावर गुन्हेगारीचा हा प्रकार नवा होता. खलनायक कमालीचा हिंसक असायला तो तसा दिसायलांच हवा, हा नियम परिंदाने मोडीत काढला. अन्ना सेठ साकारणार्‍या नानाने आपल्या बायको मुलाला जिवंत जाळलेलं आहे. या दुःखामुळे त्याचे डोळे गोठलेले आणि कोरडे झालेत, मात्र हे गोठलेपण कमालीचं फसवं आहे, ती त्याच्या मरणाच्या धंद्यातल्या राजकारणाची गरज आहे. परिंदातला फ्रान्सिस साकारणार्‍या शिवकुमार सुब्रमण्यमनेच या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. चित्रपटात त्याचेही डोळे कमालीचे थंड आहेत. माणसातल्या नैतिकतेचे प्रतिनिधत्व करणारी पारो (माधुरी), व्यवहारी जगाशी तडजोड करून नाईलाजाने जगणारा किशन आणि सहजसाध्य आनंदी जगण्याचं स्वप्न असलेला करन ही परिंदाच्या कथानकाची तीन टोकं आहेत. या तीनही टोकांमधील जगण्याच्या सामाईक संघर्षाची कथा म्हणजेच परिंदा चित्रपट.

परिंदाच्या अखेरच्या प्रसंगात किशन अन्नासेठला त्याच्याच घरात जिवंत जाळतो, या प्रसंगाच्या चित्रिकरणादरम्यान सेटवरची आग अनियंत्रित झाल्याने नाना जबर जखमी झाला. नानाला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर रेणु सलुजांनाही बेस्ट एडिटींगसाठी राष्ट्रीय पुरस्कारने गौरवण्यात आलं. व्यवस्था, गुन्हेगारीचं कमालीचं व्यवहारी निर्दयी जग, सत्तेची स्पर्धा, गरिबी, हतबलता, नातेसंबंध, मैत्री हे सर्व पिंजरे असतात, या पिंजर्‍यातून सुटका होण्यासाठी परिंदे फडफडत, तडफडत असतात, ही तडफड आज तीन दशकांनंतरही सारखीच असते, माणूस नावाचा परिंदा अजूनही सुटकेच्या शोधात असतो.

– संजय सोनवणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -