घरफिचर्ससारांशस्त्री जन्म म्हणोनि न व्हावे उदास!

स्त्री जन्म म्हणोनि न व्हावे उदास!

Subscribe

जनाबाईच्या अभंगाची ही पृथगात्मता अनन्यसाधारण आहे. जनाबाईच्या अभंगातील स्वतंत्र आविष्कार शैली, स्त्री संवेदनेचा व स्त्री भाषेचा झालेला आविष्कार यातून जनाबाईच्या स्वयंसिद्ध व्यक्तिमत्त्वाची जाणीव होते. ‘स्त्री जन्म म्हणोनि न व्हावे उदास’ असा स्त्री जन्माचा सार्थ गौरव करणारी जनाबाई तेराव्या शतकात स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तिवाचा विचार करत होती. नवा आशावाद व्यक्त करत होती. तिचा हा स्त्रीविषयक दृष्टिकोन आधुनिक काळातील स्त्रीवादी विचारवंतांनी विचारात घेण्यासारखा आहे. नामदेवादी संतांच्या बरोबरीने भक्तिपथावर निर्भीडपणे वाटचाल करणार्‍या या स्त्रीने समतेचा विचार आपल्या प्रत्यक्ष कृतीतून समाजसन्मुख केला.

– डॉ. अशोक लिंबेकर

‘नामयाची दासी’ म्हणून मराठी काव्यविश्वात प्रसिद्ध असलेल्या ज्या संत कवयित्रीने आपले लक्ष वेधून घेतले ती कवयित्री म्हणजे संत जनाबाई होय. संत वाटिकेतील जाईची वेल म्हणून तिचा यथार्थ गौरव केला गेला. मराठवाड्यातील गंगाखेड येथे एका उपेक्षित दलित कुटुंबात जनाबाईचा जन्म झाला. आपल्या उपेक्षिततेला शरण न जाता जनाबाईने आपले स्त्रीत्व व स्वत्व जोपासत तत्कालीन कर्मठतेचा पगडा असणार्‍या काळात आपले कर्तृत्व सिद्ध करून मराठी संताच्या व संत साहित्याच्या मांदियाळीत स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले. पुरुषप्रधान व्यवस्थेचे वर्चस्व असलेल्या या काळात एका दासीने पारमार्थिक पथावर वाटचाल करत सोबतच काव्यप्रवासही करावा ही घटना विस्मयजनक आहे. ‘माय मेली बाप मेला। आता साभाली विठ्ठला।’ असे निर्धास्त होत आपल्या जीविताचा सर्वस्वी भार विठ्ठलावर टाकून जनाबाईने आपल्या पोरकेपणावर मात करत आपल्या तेजस्वी आणि ओजस्वी वाणीने इतिहासाच्या पटलावर आपली अमिट अशी काव्यमुद्रा उमटवली.

- Advertisement -

बालपणीच मातृ-पितृ छत्र हरपल्याने दामाशेटीच्या घरी जनाबाईला दासीपण करत उदरनिर्वाह करावा लागला. नामदेवांच्या घरातील भक्तिमय वातावरणामुळे दासीपण करता करताच जनाबाईला विठ्ठलभक्तीचा लळा लागला. नामदेव कुटुंबातील पंधरावी सदस्य म्हणून जनाबाईला या घरात स्थान मिळाले. नामदेवांना अंगाखांद्यावर खेळवणारी फक्त तीच संत स्त्री. या कुटुंबातील सर्वच भगवत भक्त होते आणि सर्वांनीच अभंग रचना केलेली. या भक्ती आणि काव्यमय परीवेशाचा प्रभाव जनाबाईवर पडला आणि दासीपण करतानाच तिने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व सिद्ध केले. केवळ दासीपण करूनही तिचा उदरनिर्वाह झाला असता. तसे पाहता तत्कालीन समाजव्यवस्थेतील सर्व स्त्रियांना कुटुंबातील पडेल ती कामे करावी लागतच होती. रांधा वाढा उष्टी काढा हेच भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीतील तमाम स्त्रियांचे भागधेय होते. फरक एवढाच की इतर स्त्रिया स्वत:च्या घरात दासीपण मिरवत होत्या. या दुय्यमत्वाची यत्किंचितही जाणीव होणे त्यांना दुरापास्त होते. अशा विषमताजनक परिस्थितीत जनाबाईने नामदेवाच्या घरी दासीपण स्वीकारत जीवन व्यतित केले असले तरी तिने या प्राप्त परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिले. ती कुठेही अगतिक झाली नाही अथवा तिच्या व्यक्तिमत्त्वातून कुठेही असहाय्यतेचे, दुर्बलतेचे दर्शन घडले नाही.

आपल्या पदरात पडलेल्या दु:खाला निमूटपणे सामोरे जात आणि नियतीजन्य वेदना सहन करत हे पोरकेपणाचे दु:ख तिने चंद्रभागेला वाहिले. म्हणूनच पंढरी, पांडुरंग, चंद्रभागा आणि नामदेव हेच जनाबाईच्या भावविश्वातील प्रमुख जीवनाधार आहेत. यांच्याशी मानसिक पातळीवर जनाबाईने आपल्या भावनांचे नाते जोडले. त्यामुळेच जनाबाईचा विठ्ठल सगुण साकार, देहधारी आहे. तो जनाबाईला सर्व कामात मदत करतो. तिच्याशी एकांतात हितगुज करतो. हा मानसिक आधार तिने मिळवला. ‘नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे’ या भक्तिभावाच्या बळावर तिने आपल्या मनातील स्पंदनांना शब्दरूप देत काव्याभिव्यक्तीच्या प्रांगणात प्रवेश केला आणि आपल्या सहज सुलभ दैनदिन जीवनानुभवाला काव्यरूप दिले. झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी किंवा दळीता कांडीता तुज गाईन अनंता, हा स्त्रियांचा नित्याचा व्यवहार काव्यविषय होऊ शकतो असे कोणाच्या ध्यानीमनीही नसेल, पण जनाबाईने मराठी कवितेला हे नवे परिमाण दिले. वयाने लहान असलेल्या नामयाला आपला गुरू मानून जनाबाईने आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच लौकिक ज्ञानही संपादन केले. ‘बाई मी लिहिणे शिकले ।सद्गुरू रायापाशी॥’ हा कबुलीजबाब तिनेच दिला आहे. नामयाची दासी जनी ते संत कवयित्री जनाबाई असा तिचा जीवनप्रवास तमाम स्त्रियांना निश्चितच प्रेरणादायी आहे. झाडलोट करणार्‍या, केर भरणार्‍या, दळण-कांडण करणार्‍या जनाबाईला हातात लेखणी धरावी वाटली ही घटना तत्कालीन स्त्री जीवनासंदर्भाने क्रांतिकारक आहे.

- Advertisement -

जनाबाईला आलेले हे व्यापक आत्मभान व आत्मजागृतीच्या पथावर तिने केलेला प्रवास धार्मिक क्षेत्रापुरता का होईना स्त्री जीवनाच्या विकसनाचा निर्देश करतो. नामयाचे ठेवणे जनीस लाभले। धन सापडले विटेवरी। असा नामदेवाबद्दलचा आदरभाव व्यक्त करून ती आपल्या आत्मजागृतीचे श्रेय आपल्या गुरूंना देते. या कालखंडातील स्त्रीयांच्या मानसिकतेचा विचार करता जनाबाईच्या मनातील जिज्ञासा, आत्मनिर्भरता, ज्ञानोपासनेची व काव्याविष्काराची लालसा महत्त्वपूर्ण आहे. नामदेव हे तिचे प्रेरणास्थान असले तरी आपल्या काव्यरचनेवर तिने स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला. जनाबाईच्या अभंगाची ही पृथगात्मता अनन्यसाधारण आहे. जनाबाईच्या अभंगातील स्वतंत्र आविष्कार शैली, स्त्री संवेदनेचा व स्त्री भाषेचा झालेला आविष्कार यातून जनाबाईच्या स्वयंसिद्ध व्यक्तिमत्त्वाची जाणीव होते. ‘स्त्री जन्म म्हणोनि न व्हावे उदास’ असा स्त्री जन्माचा सार्थ गौरव करणारी जनाबाई तेराव्या शतकात स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तिवाचा विचार करत होती. नवा आशावाद व्यक्त करत होती. तिचा हा स्त्रीविषयक दृष्टिकोन आधुनिक काळातील स्त्रीवादी विचारवंतांनी विचारात घेण्यासारखा आहे. नामदेवादी संतांच्या बरोबरीने भक्तिपथावर निर्भीडपणे वाटचाल करणार्‍या या स्त्रीने समतेचा विचार आपल्या प्रत्यक्ष कृतीतून समाजसन्मुख केला.

नामदेवाबरोबर अखंड नामभक्तीत व कथाकीर्तनात रमणार्‍या जनाबाईला तत्कालीन समाजाने सहज स्वीकारले असे नाही. कारण पुरुषप्रधान समाजव्यवस्थेच्या वर्चस्वाला तिने सुरुंग लावला होता. या वर्चस्वाला झुगारूनच तिला आध्यात्मिक क्षेत्रात पुढे जावे लागले. प्रसंगी या असमान तटबंदीविरोधात तिला आक्रमक पवित्रा घेत बंडखोरीची, विद्रोहाची भाषाही वापरावी लागली. तत्कालीन कर्मठ लोकांच्या अन्यायाला न घाबरता ती अविचल राहिली. आपल्या निर्भीडतेच्या बळावर तिने या अपप्रवृत्तीवर विजय मिळवला. स्त्रीजीवनाच्या या प्रखर जीवनानुभूतीलाच तिने शब्दबद्ध केले. स्त्रियांच्या सत्त्वाची भाषा अभिव्यक्त करणारे तिचे अभंग म्हणजे प्राचीन मराठी काव्यातील स्त्रीस्वातंत्र्याचा आद्य स्वर आहे. स्त्रीवादी साहित्याची काही अंशी बिजे जनाबाईच्या काव्यात सापडतात. स्त्रीवादी संकल्पना जरी परकीय चळवळीतून उदयास आली असली तरी स्त्रियांच्या आत्मिक विकासाची, तिच्या आत्मसन्मानाची, स्त्री-पुरुष समतेची स्त्रीमनातील स्पंदने संत साहित्यातून आविष्कृत झाली. म्हणूनच स्त्रियांच्या आत्मभानाच्या प्रवासाची नांदी जनाबाईच्या काव्यातून झालेली दिसते.

या काळात राजकीय भान येणे किंवा राजकीय आकलनाचा विचार येथे अप्रस्तुत ठरतो. डोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी। हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा। आता मज मना कोण करी। पंढरीच्या पेठे मांडियेले पाल। मनगटावर तेल घाला तुम्ही। जनी म्हणे देवा मी झाले येसवा। निघाले केशवा घर तुझे॥ असे समाजव्यवस्थेला ठणकावून सांगणार्‍या जनाबाईची निर्भीडता येथे अधोरेखित होते. माझे आयुष्य माझे आहे. ते कसे जगायचे हे मी ठरवेन या आत्मसूचनांबरोबरच माझ्या विचार स्वातंत्र्यावर, हक्कावर, जीवननिष्ठ कृतीवर बंधने का, हा प्रश्नही येथे अद्याहृत आहे. जनाबाईच्या व्यक्तिमत्त्वातील प्रखर विद्रोहाची, बंडखोरीची जाणीव येथे होते. तत्कालीन स्त्रीविषयक सामाजिक संकेताला जनाबाई झुगारून देते. डोईच्या पदराचा संबंध आणि थेट भरल्या बाजारात जाण्याचा निर्देश स्त्रियांच्या शिलाशी, नैतिकतेशी, चारित्र्याशी जोडलेला आहे आणि हा संकेत पुरुषप्रधान व्यवस्थेने रूढ केलेला आहे.

अजूनही हा संकेत शिष्ट मानला जातो. या परंपरेला जनाबाई छेद देते. याचा अर्थ ती स्वैर जगण्याचा पुरस्कार करते असा होत नाही. असे बोलण्याचा अधिकार तिने संपादन केला म्हणून ती बोलू शकली. ही बाब भक्ती क्षेत्रापुरती मर्यादित असली तरी जनाबाईच्या भाषेतील रोखठोकपणा आणि हा विद्रोहाचा स्वर संत एकनाथ, तुकाराम ते आजच्या विद्रोही कवीपर्यंत मराठी कवितेतून निनादत राहिला हे लक्षात घेतले पाहिजे. देव खाते देव पिते। देवावरी मी निजते। देव देते देव घेते देवासवे व्यवहारीते। या प्रकारचा जनाबाईच्या अभंगातील हा अद्वैतानुभव, विशुद्ध भाव खूप मनोज्ञ आहे. ज्ञानदेवांच्या तत्त्वज्ञानाचा साक्षात्कारही या अभंगातून होतो. देव पाहायासी गेलो। देव होवोनिया ठेलो। ह्या अनुभूतीचा प्रत्यक्ष अनुभव या अभंगातून प्रतीत होतो. एकुणातच तत्कालीन कालखंडाच्या पार्श्वभूमीवर जनाबाईच्या अभंग रचनेतून आविष्कृत झालेला स्वतंत्र दृष्टिकोन, पारंपरिक बंधनांना तिने दिलेले आव्हान, धार्मिक हक्कासाठी तिने केलेला संघर्ष आणि तिच्या अभंगातील आत्मनिर्भरता, कणखरता, स्पष्टवक्तेपणा आदी पैलूतून एका स्वातंत्र्यवादी स्त्रीचे दर्शन घडते. स्त्रीसुलभ भावनांचा आविष्कार आणि माणूस म्हणून जगण्याची अभिलाषा यासंदर्भात जनाबाईचे अभंग सर्व स्त्री संत कवयित्रींच्या परंपरेमध्ये अधिक लक्ष वेधून घेतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -