घरफिचर्ससारांशनिवडणूक रोखे आणि दादाभाई

निवडणूक रोखे आणि दादाभाई

Subscribe

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीचे सक्रिय कार्यकर्ते असलेले दादाभाई नौरोजी १८९२ साली लिबरल पार्टीचे उमेदवार म्हणून इंग्लंडच्या फिनस्वरी भागातून हाऊस ऑफ कॉमन्सच्या पार्लमेंट निवडणुकीसाठी उभे राहण्याच्या तयारीत आहेत, हे कळताच, सयाजीराव गायकवाड खंबीरपणे पुढे आले आणि रुपये १५००० चा निधी आणि वीस गाड्यांचा ताफा मदतीसाठी दिला! निवडणुकीसाठी योग्य व्यक्तीला, चांगल्या हेतूने, पिढीजात आणि नेक धनिकाने दिलेला हा पहिला, (आणि एकमेव) निवडणूक निधी असावा. सध्या निवडणूक रोख्यांच्या निमित्ताने निवडणुकीसाठी देण्यात येेणार्‍या निधीबाबत चर्चा होत असताना या घटनेचा विचार होणे आवश्यक आहे.

-योगेश पटवर्धन

दोन्ही शब्द समानार्थी. जे दादा करतात तेच भाईसुध्दा. मागील पन्नास साठ वर्षांत या शब्दाची ओळख सर्व भारतीयांना नक्कीच झाली आहे. सगळ्या भाषेत भाई आहेत, तसेच देशभर दादाही आहेत. त्यांचा नागरिकांना भीतीयुक्त आदर आणि धाकयुक्त भीती वाटते. कधीमधी त्यांची नजरभेट झालीच तर हात छातीशी जोडून मान झुकवल्यास आपण त्यांचे विरोधक नाही, हे दाखवता येते. असे कधीपासून वाटू लागले हे नक्की सांगता येणार नाही. मात्र त्यांचा निवडणूक प्रक्रियेत उमेदवार म्हणून सहभाग दिसू लागल्यापासून ते आपसूक घडू लागले.

- Advertisement -

अशा भाईंचे आकर्षण मला नाही. माझ्या भागातील, ज्याला निवडणूक काळात प्रभाग असे म्हणतात, त्यातील कोणताही भाऊ, भाई अथवा दादा मला ओळखत नाही. मात्र मी त्यांना ओळखतो, कारण चौकाचौकात खिडकी एव्हढ्या आकाराचे उग्र दाढीत लपलेले हसरे मुखदर्शन मला बॅनरमधून झालेलं आहे.

शहरातील गुंडगिरी कमी व्हावी म्हणून पोलीस आयुक्तांना हसत हसत निवेदन देतानाची त्यांचीच फोटोंसह बातमी मी पेपरात पाहिली आहे. आधार कार्डवर आणि बँकेच्या खाते पुस्तकावर फिकट झालेला फोटो याशिवाय आम्ही कुठेही झळकलेलो नाही. हा त्यांच्या आमच्यातील मुख्य फरक आहे. मतदान ओळखपत्र दाखवल्यास माझे आडनाव वाचणे त्यांना अवघड जाते. तोंडी सांगितलं तर लिहिणं त्याहून कठीण.

- Advertisement -

याच भारतात, मुंबई प्रांतात सुमारे २०० वर्षांपूर्वी म्हणजे ४ सप्टेंबर १८२५ ला पालनजी आणि मानेक बाई दोरडी दाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली, त्यांचे नाव दादाभाई नौरोजी. ३० जून १९१७ ला वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे आत्मचरित्र मराठीत लिहिलं आहे, निंबाजीराव पवार यांनी. हे चरित्रात्मक पुस्तक मला वाचायची इच्छा झाली त्याला कारणं दोन. एक म्हणजे त्यावर स्पष्ट लिहिलं आहे, भारतीय राजकारणातील भीष्माचार्य. आणि दुसरे कारण म्हणजे त्याचे लेखक निंबाजीराव पवार हे मराठी लेखक असावेत याचे, आणि ते ही नाशिकचे म्हणून. जेव्हा गुराखी राजा होतो, हे सयाजीराव गायकवाड यांचे गाजलेले चरित्र लिहिणारे ज्येष्ठ लेखक ते हेच.

स्वातंत्र्यपूर्व भारतातील राजकारण, समाजकारण आणि प्रशासनातील भीष्माचार्य म्हणून दादाभाई नौरोजी यांचा उल्लेख करावा लागतो. सयाजीराव बडोद्याचे राजे होण्याअगोदर मल्हारराव गायकवाड यांच्या काळात बिघडलेली घडी सुधारावी म्हणून दादाभाई यांना दिवाण नेमले होते, त्यांनी ती घडी बसवण्याचा प्रयत्नही केला, पण लहरी मल्हारराव यांच्याशी मतभेद होऊ लागल्याने ते राजीनामा देऊन मोकळे झाले.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीचे सक्रिय कार्यकर्ते असलेले दादाभाई १८९२ साली लिबरल पार्टीचे उमेदवार म्हणून इंग्लंडच्या फिनस्वरी भागातून हाऊस ऑफ कॉमन्सच्या पार्लमेंट निवडणुकीसाठी उभे राहण्याच्या तयारीत आहेत, हे कळताच, सयाजीराव खंबीरपणे पुढे आले आणि रुपये १५००० चा निधी आणि वीस गाड्यांचा ताफा मदतीसाठी दिला! निवडणुकीसाठी योग्य व्यक्तीला, चांगल्या हेतूने, पिढीजात आणि नेक धनिकाने दिलेला हा पहिला, (आणि एकमेव) निवडणूक निधी असावा.

दादाभाई नौरोजी यांचा एकच दावा होता. प्रश्न दहशतीने सुटत नाहीत, समजुतीने सुटतात. सनदशीर मार्गाने चळवळ करून, प्रजेचे प्रबोधन करून आणि पार्लमेंटमध्ये ठराव संमत करून प्रश्न सुटू शकतात, यासाठी त्या सर्वोच्च सदनाचे रीतसर निवडणूक लढवून सभासद होणे गरजेचे आहे, तिथे मांडलेली मते अथवा मागण्या किमान ऐकून घेतल्या जातात, त्याची सरकारी दफ्तरी लिखित नोंद होते, कारण त्याला निवडून देणार्‍या हजारो नागरिकांचे पाठबळ असते, हे जाणणारा पाहिला भारतीय.

केवळ भावनेच्या लाटेवर स्वार होऊन भारताची प्रगती साधता येणार नाही हे ते जाणून होते. अलोट देशभक्ती, पाश्चिमात्य शिक्षणाचे विवेकपूर्ण व साक्षेपी आकलन, इथल्या अंधश्रद्धाळू, अशिक्षित आणि दरिद्री बांधवांची स्थिती सुधारावी याची कळकळ या सर्व गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या समकालीन व त्यांच्या नंतरच्या भारतीय नेत्यांमध्ये दीपस्तंभासारखे अढळ दिसते.

आज भारतात निवडणुकीच्या आखाड्यात बाजी मारून निवडून आलेल्या सत्ताधीशांची, म्हणजे ग्राम पंचायत सदस्य ते खासदार यांची एकूण संख्या अंदाजे पन्नास हजाराच्या आसपास नक्कीच असेल. त्यासाठी कोणत्याही किमान शिक्षणाची अट नाही. परंतु आपण ज्या क्षेत्रात वावरतो, त्याचे आद्यपुरुष कोण, हे जाणून घेणे किती जणांना आवश्यक वाटते? त्यांचा फोटो सभागृहात नसल्यास तो असावा यासाठी किती जणांनी प्रयत्न केले?

भारतातील गरिबी, त्याची कारणे, उपाय, यावर त्यांनी सातशे पानी अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे, हे उठसूट गरिबांच्या नावाने गळे काढणार्‍या किती नेत्यांना ठाऊक आहे? दादाभाई नौरोजी या नावाचा पाचकळ विनोदासाठी वापर करणार्‍या किती मराठी तरुणांनी त्यांचे चरित्र आणि चारित्र्य जाणून घेतले आहे? या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे त्याच्या जन्मगावी यथोचित स्मारक व्हावे असे एखाद्या सेक्युलर सरकारला का वाटू नये?

लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणे जसे आवश्यक आहे, तसेच निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराने दादाभाईंचे चरित्र वाचलेले असावे ही माझी किमान अपेक्षा आहे. ती पूर्ण होणे कठीण. म्हणून मीच ते वाचले. तुम्ही पण वाचणार का? आजचे दादा भाई वाचणार नाहीत. आपण तरी वाचूया. हे वर्ष निवडणुकीसाठी समर्पित आहे. त्या आखाड्याचा चिखल होण्यापूर्वी, दोन शतके आधीच एक कमळ फुलले होते, त्या विषयी थोडेसे… माझ्या सुजाण वाचकांसाठी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -