घरफिचर्ससारांशशिव्या झाल्या उदंड!

शिव्या झाल्या उदंड!

Subscribe

पूर्वीच्या तुलनेत आता काळ बदलला आहे. प्रवासात, बाजारात किंवा गर्दीच्या ठिकाणी एकमेकांशी सहज बोलतानाही तरुण मंडळींकडून घाणेरड्या शिव्यांचा आणि अश्लील शब्दांचा सर्रासपणे वापर केला जातो. शिव्या किंवा अपशब्दांचा वापर केल्याशिवाय बर्‍याचदा यांचे वाक्यच पूर्ण होत नाही. तरुण मित्र मंडळींमध्ये एकमेकांना हाक मारतानासुद्धा समोरच्याच्या नावापेक्षा बरेचदा एखाद्या शिवीचा वापर केला जातो. आजूबाजूला महिला किंवा लहान मुले आहेत याचा तिळमात्र विचार केला जात नाही. हे शिव्यांचे उदंड होणे समाजस्वास्थ्यासाठी घातक ठरणार आहे. त्यामुळे पालक आणि सरकारने पुढाकार घेऊन याला पायबंद घालायला हवा.

-जगन घाणेकर

साधारण २०-२५ वर्षांपूर्वी रेल्वेतील पुरुषांच्या डब्यातून, बसमधून प्रवास करताना कोणाची भांडणे झाली आणि त्यापैकी कोणी घाणेरड्या शिव्या देऊ लागले की प्रवाशांपैकी कोणीतरी पुढाकार घेऊन पटकन त्यांना सूचित करायचा की आजूबाजूला महिला, लहान मुले आहेत याचे भान ठेवा. त्याबरोबर भांडण जरी थांबले नाही तरी एकमेकांना शिव्या द्यायचा कार्यक्रम मात्र पटकन थांबवला जायचा. आपल्या कुसंस्कारांचे महिला आणि लहान मुलांसमोर जाहीर प्रदर्शन नको म्हणून शिव्यांना लगाम घातला जायचा.

- Advertisement -

चाळी-वसाहतींमध्येसुद्धा भांडण झाले तरी मुखातून घाणेरड्या शिव्या येणार नाहीत याचे भान बर्‍याच प्रमाणात राखले जात असे. आपली मुले हे सर्व ऐकतील आणि उद्या तेही अशाच शिव्या बरळतील याची जाणीव पालकांना असायची. शाळा-महाविद्यालयांमध्येसुद्धा थट्टा-मस्करीमध्ये मुखातून शिव्या येणार नाहीत याचे भान विद्यार्थ्यांकडून राखले जात असे. शिव्या दिल्या की आपल्यातील असभ्यपणा चव्हाट्यावर येतो याची कुठेतरी जाणीव त्या काळातील पिढीला असायची.

आता मात्र काळ पूर्णतः बदलला आहे. प्रवासात, बाजारात किंवा गर्दीच्या ठिकाणी एकमेकांशी सहज बोलतानाही तरुण मंडळींकडून घाणेरड्या शिव्यांचा आणि अश्लील शब्दांचा सर्रासपणे वापर केला जातो. शिव्या किंवा अपशब्दांचा वापर केल्याशिवाय बर्‍याचदा यांचे वाक्यच पूर्ण होत नाही. तरुण मित्र मंडळींमध्ये एकमेकांना हाक मारतानासुद्धा समोरच्याच्या नावापेक्षा बर्‍याचदा एखाद्या शिवीनेच त्याला हाक मारली जाते. आजूबाजूला महिला किंवा लहान मुले आहेत याचा तिळमात्र विचार केला जात नाही.

- Advertisement -

हल्ली शिव्यासुद्धा बहुदा परवलीच्या शब्दांमध्येच गणल्या जात असाव्यात. त्यामुळे एकमेकांना शिव्या देण्यासाठी भांडणेच व्हायला हवीत असे काही गरजेचे नाही. नेहमीच्या संभाषणातसुद्धा शिव्यांच्या माळा गुंफल्या जातात. कालपरत्वे मुलामुलींमधील दरी कमी झाल्याने तरुणवर्गाच्या गटामध्ये मुलीसुद्धा सामावलेल्या असतात. त्या सोबत असल्या तरी मुलांच्या संभाषणात शिव्या काही टाळल्या जात नाहीत. किंबहुना हल्लीच्या मुलींनासुद्धा मुलांसोबत मैत्री करायची तर हे सर्व ऐकावेच लागेल याची पूर्णतः जाणीव असावी.

आजमितीला प्रत्येक महाविद्यालयीन तरुणाकडे स्मार्टफोन आहेत. या स्मार्टफोनचा वापर स्वतःतील स्मार्टनेस वाढवण्यासाठी कितीजण करतात हाही एक प्रश्नच आहे. हल्लीच्या पिढीतील बहुतेकांसाठी स्मार्टफोन हे केवळ मनोरंजनाचे साधन बनले आहे. तरुणांची गरज ओळखून आज अनेक प्रकारच्या गेम्सचे अ‍ॅप्स आणि विविध विषयांवरील रील्स वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये केवळ प्रौढांसाठीच्या रील्स बनवणारी मंडळीही आहेत. ज्या रील्समध्ये शिव्यांचा बेसुमार वापर केलेला असतो, यातील काही रील्समध्ये महिलांच्या तोंडीही शिव्या किंवा अश्लील शब्द घातले जातात, अशा रील्स काही तरुण मंडळींकडून चवीने बघितले जातात.

याशिवाय आज मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्म्स तयार झाले असून बहुतेक सर्वच प्लॅटफॉर्म्सवर प्रौढांसाठी ‘विशेष’ वेबसीरिज तयार केल्या जातात. या वेबसीरिजमध्ये पदोपदी शिव्यांचा मारा केलेला असतो. यातील स्त्री पात्रांसमोरही शिव्या आणि अश्लील शब्दांचा वापर केलेला असतो. काही वेळा यातील स्त्री पात्रांच्या तोंडीही शिव्या दिल्या जातात. दुर्दैवाने यातून मराठी वेबसीरिजही सुटलेल्या नाहीत. आजमितीला सिनेमागृहातील चित्रपटांपेक्षा वेबसीरिज निर्मितीचे प्रमाण वाढल्याने नामवंत कलाकारही वेबसीरिजमध्ये काम करू लागले आहेत.

आयुष्यभर ज्यांनी सुसंस्कृत आणि सभ्य कलाकार म्हणून नावलौकिक कमावला असे कलाकारसुद्धा या  वेबसीरिजमधून बेधडक शिव्या हासडताना दिसू लागले आहेत. या प्रौढांसाठीच्या वेबसीरिज पाहण्यासाठी वयाचे कुठलेही प्रमाणपत्र द्यावे लागत नाही. केवळ एका बटनावर क्लिक केल्यावर लहान मुलेसुद्धा या सीरिज सहज पाहू शकतात. त्यामुळे मुलांना विरंगुळा म्हणून आईबाबांनी दिलेल्या स्मार्टफोनवर आपली मुले असले रील्स आणि वेबसीरिज पाहत नाहीत ना, याकडेही पालकांनी लक्ष द्यायला हवे. काही घरांमध्ये या वेबसीरिज घरातील स्मार्ट टीव्हीवर पाहिल्या जात असल्याने त्यातील कलाकारांनी दिलेल्या शिव्या हळूहळू घरातील लहान मुलांच्याही तोंडी येऊ लागल्या आहेत. दहा-बारा वर्षांची कोवळी मुलेही आता एकमेकांशी बोलताना शिव्यांचा वापर करत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येते.

ज्या शिव्यांचा अर्थही माहीत नाही अशा शिव्या या मुलांच्या तोंडून ऐकल्यावर भविष्यात आणखी काय ऐकावे लागणार आहे याची कल्पनाही करवत नाही. असले रील्स काय किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील वेबसीरिज काय यांना सेन्सॉरचे बंधन नसल्याने इथे शिव्या आणि अश्लील शब्दांचा बाजार बिनदिक्कतपणे भरलेला असतो. या रिल्स आणि वेबसीरिजमधील शिव्या आणि अश्लील शब्दांच्या सर्रास वापरामुळे आजच्या तरुण पिढीला चारचौघांत शिव्या देण्यात काहीही गैर वाटत नाही. भारतात संतती नियमनाच्या साधनांच्या जाहिराती दूरदर्शन वाहिन्यांवर प्रसारित करण्याला वेळेचे बंधन घातले आहे, मात्र अश्लील दृश्ये आणि अश्लील शब्दांचा भरणा असलेल्या वेबसीरिजना कोणतेही बंधन नाही. हे सर्व थांबण्यासाठी वेबसीरिज आणि अश्लील रिल्सवर नियंत्रण आणण्याची आज नितांत गरज आहे.

माणसातील संस्कार त्याच्या वागण्या बोलण्यातून कळतात. मुलांच्या किंवा तरुणांच्या बोलण्यात अश्लील शब्दांचा आणि शिव्यांचा वापर असेल तर दोष त्याला नाही, तर त्याच्या आईवडिलांना दिला जातो. त्यामुळे शिव्यांचा सतत वापर करणार्‍यांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी. पूर्वी एकत्र कुटुंबामुळे घरातील आजी-आजोबांकडून नातवांवर आपल्या संस्कृतीचे, अध्यात्माचे संस्कार केले जात असत. ग्रामीण भागातून शहरात नोकरी व्यवसायासाठी आलेल्या पिढीतही घरातील स्त्री घर सांभाळण्यासोबत आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असे. आज काळ बदलला आहे. घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही नोकरी करू लागले आहेत. त्यामुळे आजची बहुतांश मुले बेबी सिटिंगमध्ये मोठी होऊ लागली आहेत.

वेळेच्या अभावामुळे आईवडिलांसोबत मुलांचा संवादच उणावू लागला आहे. त्यामुळे संस्कार काय ते केवळ संडे टू संडे मिळू लागले आहेत. त्यातही वाढत्या स्पर्धेत आपल्या पाल्याचा निभाव लागावा यासाठी पालक आपल्या मुलांना कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये घालू लागल्याने मुलांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार होणे दुरापास्तच झाले आहे. समाजातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन शिक्षण विभागाने शाळांतून नीती आणि नैतिक मूल्याचे शिक्षण अनिवार्य केले आहे, मात्र अनेक शाळांमध्ये या विषयासाठी शिक्षकच देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या विषयाच्या तासिकेमध्ये वेगळेच काहीतरी शिकवले जाते. समाजाची ढासळती नीतिमत्ता लक्षात घेता भावी पिढीमध्ये संस्कारांचे बीज रोवणे आणि ते वाढवणे आज अनिवार्य झाले आहे. यासाठी अन्य गोष्टींना दोष देण्याऐवजी पालकांनीच आपल्या पाल्याचे संपूर्ण दायित्व घ्यायला हवे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -