घरफिचर्ससारांशकस्तुरीयोग

कस्तुरीयोग

Subscribe

मुंबई येथील सुप्रसिद्ध युवा साहित्यिक कस्तुरी देवरुखकर हिचा हा पहिला ललित लेखसंग्रह. यापूर्वी ‘स्वप्नसखा’ आणि ‘शब्दकस्तुरीचा चांदणचुरा’ या दोन वाचकप्रिय काव्यसंग्रहांच्या रूपाने तिची आपल्याशी भेट झाली आहेच. कवयित्री म्हणून जरी साहित्य क्षेत्रात तिचे पदार्पण झाले असले तरी केवळ काव्याच्या परिघात अडकून न पडता अन्य साहित्यप्रकार ती तितक्याच ताकदीने हाताळू लागली आहे. या संग्रहातून वाचकांना त्याची प्रचिती येईलच. या संग्रहातील सर्व लेख हे सोलापुरातील एका नामवंत दैनिकात साप्ताहिक स्तंभलेखनाच्या रूपात प्रसिद्ध झाले आहेत. बर्‍याचदा वृत्तपत्रीय स्तंभलेखनाचे विषय तात्कालिक आणि म्हणूनच अल्पजीवी असतात, पण या पुस्तकासाठी निवडलेल्या लेखांचे विषय हे सार्वकालिक आहेत. कधीच शिळे होणारे नाहीत. ‘बाल रंगभूमी’, ‘अश्रू’, ‘निसर्ग राजा’, ‘ऋतू प्रेमाचा’, ‘पितृपक्ष’ अशी काही शीर्षके पाहिली तरी हे लक्षात येईल.

बालरंगभूमी या पहिल्याच लेखात लेखिकेने नोंदवलेली पुढील निरीक्षणे दखल घ्यावी अशीच आहेत. ती म्हणते, काही वर्षांपूर्वी बाल रंगभूमी हे केवळ करमणुकीचे साधन होते. बालनाट्ये सादर करणार्‍या संस्था संख्येने कमी होत्या, पण त्यांची कलेवरील निष्ठा वादातीत होती. ओल्या मातीला योग्य आकार देऊन बालकांचा सर्वांगीण विकास साधण्याची तळमळ त्या काळच्या नाट्यनिर्मात्यांत होती. आता मुलांना सादरीकरण करण्यासाठी अनेक दारे मोकळी झाली आहेत. तरीही मुळापासून कष्ट घेण्याची कोणाची तयारी नाही. रिऍलिटी शोजच्या माध्यमातून मिळणारी अकाली अन् अवाजवी प्रसिद्धी मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मारक आहे. ही परिस्थिती बदलावी ही लेखिकेची उत्कट भावना आहे.

‘अश्रू’ हा आसवांची महती सांगणारा लेखही असाच काहीसा वेगळा आहे. इथे लेखिकेने अश्रूंची सुंदर व्याख्याच केलीय. ‘मनात उठलेल्या विचारांच्या, विवंचनांच्या असंख्य लाटा आणि त्यायोगे होणारी घुसमट यांचा विसर्ग होण्यासाठी निसर्गाने दिलेले जलरूपी वरदान म्हणजे अश्रू.’ या निसर्गाच्या देणगीला कमजोरी न समजता कोणत्याही अपयशामुळे वा दु:खामुळे ढळलेला मानसिक तोल सांभाळण्यासाठी आसवांचा शस्त्राप्रमाणे वापर करावा आणि मनातील मळभ दूर झाले की नव्या दमाने आव्हानांचा सामना करण्यासाठी सिद्ध व्हावे, असा छानसा संदेश देऊन काही काव्यपंक्तींद्वारे लेखाचा शेवट होतो.

- Advertisement -

अश्रू म्हणजे संवेदना,
काळजातली वेदना..
अश्रू म्हणजे भावनांची ओल,
जाणती जखमेतली व्यथा खोल..
लेखिकेचा जन्म आणि जडणघडण मुंबईत झाली असली तरी कोकणातल्या आपल्या गावाशी असलेली तिची नाळ कधीच तुटली नाही. ‘गाव माझं न्यारं’ या लेखाची सुरुवातच मस्त कवितेने झालीय.
‘रम्य वाटे मजला, गावामधली पहाट
हिरवळीच्या पाटावर, पक्ष्यांचा किलबिलाट
कौलारू या घरावरती, किरणांचा थाट
प्राजक्त, चाफ्याची अंगणामध्ये बरसात…’

हे रमणीय गाव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरी बदलणारा निसर्ग, सणावाराला ओसंडून वाहणारा गावकर्‍यांचा उत्साह हे सारे नोंदवताना तिच्या शब्दकळेला असा काही बहर येतो की बस. ‘इथली सकाळ, दुपार, संध्याकाळ पाहताना वाटते, लग्न मंडपात नटून बसलेली नववधू ज्याप्रमाणे दिवसभरात तीनदा पेहराव बदलते, त्याप्रमाणे या तिन्ही प्रहरांत सृष्टीचा वेगळाच थाट दृष्टीस पडतो अन् पाठवणीचा कार्यक्रम सुरू झाल्यावर नवरीला हुंदका आवरेनासा होतो, अगदी तशीच जिवाला कातरणारी नीरव, शांत कातरवेळ येते’ हे वाचल्यावर आपणच जणू त्या गावातील ही कातरवेळ अनुभवत आहोत अशीच भावना उत्पन्न होते.

- Advertisement -

शाळेला सुट्टी पडली की लेखिका थेट गावाकडेच धाव घ्यायची आणि त्या जीवनाशी पूर्णपणे समरस होऊन जायची. त्यामुळे तिथल्या संस्कृतीचे, जीवनशैलीचे बारकावे टिपणे शक्य झाले. कोकणात शिमगा हा खूप मोठा आणि महत्त्वाचा सण. उर्वरित महाराष्ट्रात दोन दिवस चालणारा हा सण कोकणात तब्बल पाच दिवस किती उत्साहाने साजरा होतो याचे बहारदार वर्णन या लेखात केलंय ते मुळातूनच वाचायला हवे.

शहरातील झगमगाट पाहून थकलेल्या डोळ्यांना शांत नीज येण्यासाठी, जीवघेण्या स्पर्धेत पायपीट करून झाल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी, खचलेल्या मनाला तणावमुक्त करून नव्या उमेदीची उभारी देण्यासाठी एक तरी गाव असावं..गावातल्या टुमदार घरट्यात मायेचं गोकुळ वसावं..! ही लेखिकेची इच्छा वाचून खरंच ‘तथास्तु’ असेच म्हणावेसे वाटते.

‘निसर्गराजा’ ही तर लेखिकेच्या मर्मबंधातील ठेवच जणू. त्यामुळे या लेखात तिच्या शब्दकळेचे सौंदर्य सर्वांगाने फुलून आलेले वाटते. लेखाची सुरुवातच पाहा ना,

‘गंध ओल्या ऋतुची किनार..
भरल्या आभाळी दाटली…
शांत निजलेली एक कळी..
हिरवळीच्या मिठीत भेटली’

वसंतापासून शिशिरापर्यंतचे सहा ऋतू म्हणजे विविधांगी सौंदर्याची उधळण करणारी निसर्गाची सहा अपत्ये आहेत अशी सुरेख कल्पना इथे मांडली आहे. संपन्न शब्दकळेचा आणखी एक नमुना पाहा,

पानांच्या ओलसर ओंजळीतून निसटलेले दवांचे कोवळे थेंब काळजावर झेलावेसे वाटतात, तर कधी अळवाच्या गुळगुळीत पानावर घसरगुंडी करीत मौजेने पहुडणारा पाण्याचा इवलासा थेंब व्हावसं वाटतं. निसर्गाचे दुसरे नावच आहे आयुष्य. निसर्गावर भरभरून प्रेम करणार्‍या या कवयित्रीला सागराचे आकर्षण तर विलक्षण आहे. सागराची गाज म्हणजे हृदयाची तार छेडणारे संगीतच आहे अशीच तिची भावना आहे. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी या संगीताचा आस्वाद घ्यायला ती तत्पर असते.

मनाचा ठाव घेणार्‍या या काही ओळी तर पाहा,

ऐन दुपारच्या वेळी, अथांग पसरलेल्या सागर किनारी गेल्यावर नीरव शांततेत पसरलेला उष्ण दमट वार्‍याचा गंध श्वासात रूतून बसतो. अशावेळी समुद्रकिनारी दिमाखात उभे राहून साक्षात सूर्याच्या आव्हानाला प्रतिसाद देणार्‍या डौलदार नारळाच्या झाडाखाली झावळ्यांच्या आडोशाला बसून एकटक समुद्राकडे पाहत राहावंस वाटतं. कारण त्या उसळणार्‍या प्रत्येक लाटेसोबत आपल्या विचारांचे मंथन होत असते. भावनांचा डोह घुसळून निघतो. हळूहळू सूर्याची प्रखर तेजस्वी किरणे मंद होतात. मग सोनेरी संधीप्रकाशाच्या साक्षीने लहरींची गतीदेखील मंदावते. एव्हाना आसवांच्या लाटेने मनडोहातील नैराश्याचा निचरा झालेला असतो. अतरंगात उरते ती फक्त निर्मळता. कवीमनाच्या कस्तुरीच्या या लेखाचा शेवट कवितेने होणे उचितच की!

‘लेवून पैठणी सोनरंगी
उजळून आली सकाळ..
सोनसळी त्या स्पर्शाने
फुले चैतन्याची माळ..
पानापानात अमृतकण
परिमल भिजल्या क्षणात
सुखाचे सांजण व्हावे
रोज आपल्या जीवनात’

‘पितृपक्ष’ हा असाच वेगळ्या विषयावरचा लेख. हे पंधरा दिवस आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे असतात. मग त्याला अशुभाची झालर का असावी? किंवा सुधारणेच्या नावाखाली या काळातील विधींना विरोध वा त्यांची टिंगलटवाळी तरी का करावी? आईवडील हयात असताना जे त्यांची उपेक्षा करतात वा त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात त्यांनी पितृपक्षात कावळ्यांना मिष्टान्न भोजन देणे हा निव्वळ ढोंगीपणा आहे हे खरे असले तरी याची दुसरी बाजूही लेखिका दाखवून देते ती अशी, नाण्याची एकच बाजू पाहून कसे चालेल! जुन्या व नव्या विचारांची सांगड घालणे गरजेचे आहे. आपण जे पूजाविधी करतो त्यासाठी लागणारे जे साहित्य विकत घेतो त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह होत असतो. मग त्या प्रथा बंद करण्यापेक्षा प्रथा साजर्‍या करताना त्यासोबत समाजकार्य केले तर काय हरकत आहे? पितरांच्या नावाने काकवळ ठेवल्यानंतर जर एखादा मुलगा अथवा मुलगी वृद्धाश्रमाला भेट देऊन तिथल्या वंचितांची सुख दुःख वाटून घेत असेल तर काय हरकत आहे? ज्या चालीरीतींनी कोणाचा पूर्णतः फायदा होत नसेल परंतु नुकसानही होणार नसेल तर ती प्रथा आणि सामाजिक भान जपल्यास संस्कृती आणि जाणिवांचा सुरेख मिलाप होईल.

निसर्गाने अन्य सजीवांपेक्षा मानवाला दिलेली बहुमोल देणगी म्हणजे वाणी अर्थात शब्द. या शब्दांच्या सामर्थ्याचा आढावा घेतलाय तो ‘शब्द सामर्थ्य’ या लेखात. शब्द कधी कठोर असतात तर कधी मुलायम. कठोर शब्दांनी झालेल्या जखमा धारदार शस्त्राने केलेल्या जखमेपेक्षाही तीव्र असू शकतात अन् त्या भरून काढण्यासाठी औषध लागू पडते ते मुलायम शब्दांचेच. त्यामुळे शब्द जपून वापरावेत हेच खरे. शब्दांची विविध रूपे विषद करताना लेखिका आधार घेते तो तिच्याच कवितेचा

तर असा हा शब्द..

बाल मुखातून टपटपताना बोबडी अंगाई होतो..
संत मुखातून ओथंबताना संतवाणी होतो..
भुकेल्याच्या ओठी थरथरताना आर्त गाणी होतो..
प्रियकर प्रेयसीच्या प्रेमात व्याकुळताना प्रेम कहाणी होतो..
अन्
साहित्यिकाच्या वाणीतून बरसताना श्रोत्यांच्या काळजाचे पाणी होतो..

या ग्रंथाचे शीर्षक ज्या लेखाच्या नावावरून योजलंय तो आहे ‘ती घरात बसली म्हणून’. अर्थार्जन करून संसाराला हातभार लावणार्‍या महिलांबद्दल आदर असायलाच हवा, पण केवळ ‘गृहिणी’ हे बिरुद मिरवणार्‍या स्त्रियांचाही तितकाच आदर व्हायला हवा, पण दुर्दैवाने तसे होत नाही. लेखिका गृहिणी असल्याने तिला हे अनुभव येतातच. तुम्ही गृहिणी ना. भरपूर वेळ असेल तुमच्याकडे घरात बसून म्हणून लिहायला वेळ मिळतो तुम्हाला.. यासारखे शेरे तिला नित्य ऐकायला मिळतात. खरंतर अर्थार्जन करणार्‍या स्त्रियांना जेवढे कष्ट करावे लागतात तेवढेच कष्ट घरात दिवसभर राबणार्‍या माऊलीला करावे लागतात. तिला दर महिन्याला पगार मिळत नसला तरी तिच्यावरील जबाबदार्‍या पार पाडताना ती कुठलीच कसर ठेवत नाही.

मुलांचे उत्तम संगोपन करणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे, घरातील मंडळींना काय हवं नको ते पाहणे, घरी येणार्‍या पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, मुलांच्या शाळेची जबाबदारी, बाजारहाट, एक ना अनेक जबाबदार्‍या पार पाडताना दिवस कधी मावळतो ते समजतदेखील नाही. या सगळ्यातून थोडासा वेळ मिळालाच तर तिने साधी विश्रांतीसुद्धा घेऊ नये का? या दमलेल्या माऊलीला फक्त दोन शब्द आदराचे हवे असतात. ते मिळाल्यावर ती पुन्हा नव्याने ऊर्जा घेऊन कामाला लागते. ही लेखिकेची अपेक्षा गैरवाजवी आहे असे कोण म्हणू शकेल?

या पुस्तकात एकूण ३३ लेख आहेत. सर्वांचा धांडोळा घेणे प्रस्तावनेच्या शब्द मर्यादेत शक्य नाही, मात्र यातील प्रत्येक लेख निःसंशय वाचनीय आहे. निसर्ग, आजूबाजूचा समाज याबद्दल वाटणारी आस्था, आपली संस्कृती, परंपरा याबद्दल वाटणारा रास्त अभिमान याचे दर्शन या पुस्तकात ठायी ठायी घडते. लिखाणात एक ओघ आहे. कृत्रिम शब्दबंबाळपणा तर अजिबात नाही. तरीही वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य कस्तुरीच्या लिखाणात आहे हे नक्की. या पुस्तकाचे रसिक वाचक नक्कीच स्वागत करतील याची खात्री आहे.

–अरुण कमळापूरकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -