घरताज्या घडामोडीअल्पसंतुष्ट कोकणी माणूस आणि उदासीन नेते!

अल्पसंतुष्ट कोकणी माणूस आणि उदासीन नेते!

Subscribe

कोकणी माणूस हा मूलत: अल्पसंतुष्ट असून बहुतांश कोकणी माणसे मिळेल त्यात समाधानी राहतात. याला एक कारण निसर्गाचा लहरीपणा असण्याची शक्यता आहे. शेती अतिशय मर्यादित झालेली आहे. त्याचसोबत कोकणी माणसांचे शासनामध्ये प्रतिनिधित्व कमी आहे. कोकणासाठी काही मनापासून करावे अशी तळमळ इथल्या नेत्यांमध्ये नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळमध्ये नुकतेच ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे उद्घाटन करताना कोकणासाठी अनेक विकास योजना आणि भरघोस निधीची घोषणा केली. कोकण विकास नियोजन प्राधिकरण, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड मार्गाचा कोकणाला फायदा होईल, असे जाहीर केले. या सगळ्या घोषणा चांगल्या असल्या तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला हवी. त्या कोकणात चार महिने कोसळणार्‍या धो धो पावसाच्या पाण्यासारख्या वाहून जाता कामा नयेत.

– दिलीप नलावडे

स्वर्गाहून सुंदर आपले कोकण, असे म्हणतात ते खरेच आहे. निसर्गाने कोकणात मुक्तहस्ते सौंदर्य दिलेले आहे. हिरवीगार वनराई, स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आहेत, तशीच लाल कौलारू घरे, उंचच उंच दर्‍या, कोकणात वाहणार्‍या नद्या, पावसाळ्यात दिसणारे धबधबे, कोकणातील मंदिरे, गडकिल्ले कोकणाच्या सौंदर्यात भर घालत आहेत. तसेच कोकणात आढळणारी रसदार फळे आंबा तर ग्रेटच आहे. आंबा, फणस, काजू, नारळ, कोकम या फळांचे उत्पन्न कोकणात भरपूर प्रमाणात होते. खरेतर हा आंबा, काजूचा प्रदेश आहे. दर्जेदार आंबा व काजू या भागात मिळतो. निव्वळ आंबे खाण्यासाठी कोकणात अनेक पर्यटक जातात. कोकणातील खाद्य संस्कृतीसुद्धा उच्च दर्जाची आहे, पण या खाद्य संस्कृतीची वाढ हे आंबा, फणस, काजू, कोकम, नारळ ही फळे करीत असतात. कारण कोकणी माणसाच्या जेवणात नारळाचा वापर सर्रासपणे केला जातो.

या महत्त्वाच्या फळांव्यतिरिक्त कोकणात करवंदे, आळू, पपणीस, तोरण ही जंगली फळे वेगवेगळ्या मोसमात आढळतात. तीसुद्धा रसाळ व चवदार असतात, पण दुर्दैवाने म्हणा किंवा कोकणात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे (कमतरतेमुळे) आंबा, फणस, काजू, नारळ, सुपारी, कोकम या फळांचा विकास म्हणावा तितका झालेला नाही. कारण चांगल्या दर्जाचा नारळ कोकणात येतो, परंतु मार्केटमध्ये केरळचा नारळ मुबलक मिळतो तसेच सध्या बाजारात कोकणातील हापूस आंब्यापेक्षा कर्नाटकी हापूस जास्त मिळतो व देशात काजू हा दक्षिण आफ्रिकेतून येतो. कारवार काजू जास्त विकला जातो म्हणजे कोकणी माणूस आंबा, काजू, नारळ या उत्पादनात मागे पडत आहे. हे चित्र चांगले नाही. कोकणी माणसांनी कोकणात सुबत्ता आणायची असेल तर आंबा, फणस, काजू, नारळ, सुपारी या पैसे देणार्‍या फळांची लागवड मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

ज्या ठिकाणी पाणी आहे त्या वाशिष्ठी नदीच्या दुतर्फा तर या फळबागांची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये शासनानेसुद्धा जास्त लक्ष देणे गरजेचे आहे तसेच स्थानिक पुढार्‍यांनी उठसूठ मुंबईत येऊन बसण्यापेक्षा कोकणामध्ये फळबाग लागवडीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासन शंभर टक्के अनुदान रोपांसाठी देते. त्याचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच कोकणात रायवळ आंबासुद्धा चांगल्या दर्जाचा येतो. त्याचेसुद्धा उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. प्रत्येक शेतकर्‍याने हापूस आंबा व काजूच्या झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकणच्या सौंदर्यात तर वाढ होईलच व कोकणात पर्यटकांची संख्यासुद्धा वाढेल.

कोकणचे सौंदर्य स्थळ म्हणजे कोकणातील स्वच्छ, विस्तीर्ण सागरी किनारे. कोकणाला 720 किमीचा सागरी किनारा लाभला आहे. त्यातील एक-दोन बंदरे वगळता समुद्रकिनार्‍याचा वापर पर्यटनासाठीच होतो. काही छोट्या बंदरांचा वापर मच्छीमार लोक करतात. अत्यंत चांगले मासे कोकण किनारपट्टीवर मिळतात. या माशांच्या व्यापारावरसुद्धा कोकणी माणसांनी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. कोकण किनारपट्टीवर आढळणारे मासे सुरमई, बांगडा, पापलेट तसेच अत्यंत विविध प्रकारचे चवदार मासे या किनारपट्टीवर मिळतात. त्यांच्या व्यापारावर व मच्छीमारीवर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. कोकण किनार्‍यावरील तारकर्ली, गणपतीपुळे, हरिहरेश्वर, गुहागर, वेलदुर, अलिबाग या किनार्‍यावर (बीच) नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. पांढरीशुभ्र वाळू, निळाशार अथांग पसरलेला समुद्र, त्यावर तरंगणार्‍या बोटी, होड्या, किनार्‍यावरील नारळ, सुपारीची झाडे, हिरवीगार वनराई, डोंगर उतारावरील लाल कौलारू सुबक घरे व प्रेमळ भाबडी कोकणी माणसे यामुळे कोकणात कामानिमित्त गेलेली बरीच मंडळी येथे स्थायिक होतात.

- Advertisement -

कोकणी माणसाच्या प्रेमात पडतात. त्यांचे नाते घट्ट होते. कारण कोकणी माणूस हा अतिशय प्रेमळ, आतिथ्यशील व नम्र आहे. दुसरे म्हणजे कोकणात चोर्‍यामार्‍या, खून, दरोडे यांचे प्रमाण एकदम कमी. हा शांतताप्रिय अशा बुद्धिवान लोकांचा प्रदेश आहे. या कोकणाच्या लाल मातीत अनेक बुद्धिवंतांनी जन्म घेतला. लोकमान्य टिळक, साने गुरुजी, केशव धोंडो कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (यांचे मूळगाव आंबवडे), अनंत कान्हेरे, वीर सावरकर यांचे मूळगावसुद्धा कोकणात आहे. यांसारख्या नर रत्नांची खाण हे रत्नागिरी म्हणजे कोकण आहे. कोकणात सौंदर्य व बुद्धिमत्ता दोन्ही आढळते. एसएससीचा निकाल पाहिल्यास दरवर्षी कोकण विभागाचा निकाल एक नंबरचा आहे.

तसेच कोकणात कला व क्रीडा यांचासुद्धा सुरेख संगम आहे. अनेक खेळाडू या देशाला कोकणाने दिले. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, एकनाथ सोलकर, चंद्रकांत पंडित ही सर्व मूळची कोकणची माणसे आहेत तसेच कला क्षेत्रातसुद्धा अनेक दिग्गज निर्माण झाले. नाना पाटेकर, लक्ष्मीकांत बेर्डे, माधुरी दीक्षित, वर्षा उसगावकर, उर्मिला मातोंडकर अशी अनेक नावे घेता येतील. असे कलाकार कोकणात निर्माण झाले. श्वास फेम प्रकाश नलावडे यांनी कोकणचे नाव जागतिक पातळीवर नेले तसेच अनेक लेखक कोकणातील आहेत, कवी आहेत. असा हा कोकण आहे. अशा या सौंदर्याची खाण व महाराष्ट्राची शान असणार्‍या कोकणाचा विकास त्या मानाने झालेला नाही. त्याला अनेक कारणे आहेत.

एक म्हणजे कोकणी माणसाचा स्वभाव अल्पसंतुष्ट आहे. बहुतांश कोकणी माणसे मिळेल त्यात समाधानी राहतात. याला एक कारण निसर्गाचा लहरीपणा असण्याची शक्यता आहे. कोकणात कोसळणारा मुसळधार पाऊस. चार महिने पावसाचे फार कष्टाचे असतात तसेच मर्यादित शेती, या सर्व गोष्टी असल्या तरी कोकणी माणसांचे शासनामध्ये प्रतिनिधित्व कमी व त्यामध्ये आक्रमक पुढार्‍यांची कमतरता. सध्या काही पुढारी आक्रमक आहेत. त्यांनी कोकणच्या विकासात महत्त्वाची भूमिका घेणे आवश्यक आहे आणि या कोकणचा विकास करायचा असेल तर कोकणाला विशेष प्रदेशाचा दर्जा देणे आवश्यक आहे. जसा डोंगरी प्रदेश विकासासाठी काही सवलती देणे आवश्यक आहेत. जसे आदिवासी भागासाठी भरतीमध्ये काही अटी सौम्य केलेल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी म्हणून आदिवासी भागासाठी नेमणूक करताना एमबीबीएसऐवजी बीएएमएस, बीएचएमएस डॉक्टरांची भरती करणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळमध्ये नुकतेच ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे उद्घाटन करताना कोकणासाठी अनेक विकास योजना आणि भरघोस निधीची घोषणा केली. कोकण विकास नियोजन प्राधिकरण, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड मार्गाचा कोकणाला फायदा होईल, असे जाहीर केले. या सगळ्या घोषणा चांगल्या असल्या तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला हवी. त्या कोकणात विशिष्ट कालावधीत कोसळणार्‍या धो धो पावसाच्या पाण्यासारख्या वाहून जाता कामा नयेत.

पर्यटनासाठी हॉटेल व्यवसाय, लॉजिंग उभी करणे, एमआयडीसीच्या माध्यमातून त्यांचे दर नियंत्रित ठेवणे, या व्यवसायाला प्रोत्साहन देणे, सवलती देणे, आंबा, काजू उत्पादन वाढविणे, त्यावर प्रक्रिया करणार्‍या उद्योगांची निर्मिती करणे, त्यांना सवलती देणे, डोंगर भागात व्यवसाय करणार्‍यांना सवलती देणे, असे केल्याने कोकणाचा विकास होऊन पर्यटनात वाढ होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -