घरताज्या घडामोडीसुनहरी यादें...

सुनहरी यादें…

Subscribe

साधारण 1980 नंतरची 10-15 वर्षे विविध वाद्यवृंदांनी गाजवली. मराठी नाटकांच्या तोडीस तोड बुकिंग ऑर्केस्ट्रा घेत. वर्तमानपत्रात नाटकांच्या जाहिरातींसोबतच ऑर्केस्ट्रांच्या जाहिराती झळकत. प्रमिला दातार यांचा ‘सुनहरी यादें’ हा ऑर्केस्ट्रादेखील या सर्व गर्दीत ठामपणे उभा होता. सुरेल आवाजाच्या प्रमिला दातार खासकरून लता मंगेशकरांची गाणी गायच्या. ‘ये जिंदगी उसीकी है...अपलम चपलम...शिशा हो या दिल हो...’ ही गाणी म्हणजे त्यांचा हातखंडा. शेवट मात्र करीत त्या आपल्या गुरूंच्या गाण्याने. वसंत देसाई हे त्यांचे गुरू. त्यांनी संगीत दिलेले ‘ए मालीक तेरे बंदे हम’ हे गाणं त्या जीव ओतून म्हणायच्या. कार्यक्रम संपल्यानंतर ती प्रार्थना गुणगुणतच प्रेक्षक घरी जायचे.

– सुनील शिरवाडकर

मागच्याच रविवारी एका कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रमाचं नाव होतं ‘किशोर कुमार की याद में.’ माझ्या एका मित्राचा त्यात सहभाग होता. तो आणि त्याच्यासारखे सात-आठ गायक, त्यांनी एकत्र येऊन हा प्रोग्राम ठरवला होता. स्टेजवर मागे किशोर कुमारचं होर्डिंग होतं. दोन मोठे स्पीकर दोन बाजूला ठेवले होते. बाकी वादक वगैरे कोणी नाही. कारण हा होता कॅराओके क्लबचा कार्यक्रम. यात गायकाच्या हातात असलेल्या कॅराओकेमध्ये त्या त्या गाण्यांचे म्युझिक ट्रॅक तयारच असतात. गायकाने त्यात फक्त स्वतःचा आवाज पेरायचा म्हणजे गाणं तयार. सुरात गाणारे अपवादानेच. म्युझिक ओरिजनल असल्याने गाणं ऐकवत तरी होतं.

- Advertisement -

जे कोणी श्रोते होते ते या गायकांच्या ओळखीतले, नात्यातलेच. प्रत्येकाच्या ओळखीचे आठ-दहा या हिशोबाने साधारण शंभर जण उपस्थित होते. (कार्यक्रम मोफत होता तरीही.) गाणी ऐकता ऐकता मी 40 वर्षे मागे गेलो. मोठ्या थिएटरमध्ये असलेला तो कार्यक्रम. मेलोडी…मेलोडी… मेलोडी…मेकर्स…मेकर्स…मेकर्स…असा आवाज थिएटरमध्ये घुमायचा. अगदी इको स्टाईलने आणि त्यानंतर ड्रमवर स्टीक थरथरायची. पडदा उघडला जायचा. विविध वाद्यांवर बसलेले कलाकार दृष्टीस पडायचे. समोरच त्यांचा लोगो, ड्रमसेट, गिटार वगैरे वाद्यांचे एक प्रतिकात्मक चित्र असलेला. भव्य, सुसज्ज साऊंड सिस्टीममधून बाहेर पडणार्‍या आवाजाने पुरा हॉल दुमदुमून जायचा आणि मग पुढचे दोन-तीन तास संगीताच्या दुनियेत प्रेक्षक हरवून जायचा. ते दिवसच सोनेरी होते. मंतरलेले होते. शंकर जयकिशन, ओपी, लक्ष्मी प्यारे, कल्याणजी आनंदजी आणि अर्थातच आरडी यांच्या गीतांच्या लडी हळूवार उलगडत जायच्या.

प्रेक्षक खरंतर श्रोते त्यात हरवून जायचे. मेलडी मेकर्स हा पुण्याचा ग्रुप. त्यांचे एकेक कलाकार म्हणजे खणखणीत रुपया, पण त्यांचे हुकुमाचे पान होते सुदेश भोसले. विविध गायकांचे आवाज ते लिलया काढतच, पण मिमिक्रीदेखील लाजवाब करीत. मॅन्युअल फ्रान्सिस नावाचा एक कलाकार होता त्यांच्याकडे. वर्णाने काळासावळा. ‘चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा’ ही कव्वाली तो इतक्या जोशात पेश करायचा, केवळ ती ऐकण्यासाठी बरेच जण वारंवार जायचे. पण तरी मेलडी मेकर्सचा प्रत्येक शो वेगळा. त्यातील गाणी, मिमिक्री सतत बदलत असे.

- Advertisement -

‘बाबला अँड हीज ऑर्केस्ट्रा वीथ कंचन’ हा असाच एक गाजलेला ग्रुप. यातील बाबला हा अफलातून ड्रम वाजवायचा. त्याच्यासोबत होती कंचन. तीच ती ‘लैला मै लैला’फेम. कल्याणजी आनंदजी यांच्या अनेक स्टेज शोसाठी यातील कलाकार काम करायचे. प्रमिला दातार यांचा ‘सुनहरी यादें’ हा ऑर्केस्ट्रादेखील या सर्व गर्दीत ठामपणे उभा होता. सुरेल आवाजाच्या प्रमिला दातार खासकरून लता मंगेशकरांची गाणी गायच्या. ‘ये जिंदगी उसीकी है…अपलम चपलम…शिशा हो या दिल हो…’ ही गाणी म्हणजे त्यांचा हातखंडा. शेवट मात्र करीत त्या आपल्या गुरूंच्या गाण्याने. वसंत देसाई हे त्यांचे गुरू. त्यांनी संगीत दिलेले ‘ए मालीक तेरे बंदे हम’ हे गाणं त्या जीव ओतून म्हणायच्या. कार्यक्रम संपल्यानंतर ती प्रार्थना गुणगुणतच प्रेक्षक घरी जायचे.

कितीतरी वाद्यवृंदे होती तेव्हा. दिदारसिंगचा ऑर्केस्ट्रा होता, मिलनसिंगचा होता, माणिक वर्मांच्या मुलीचा राणी वर्माचा ‘सप्तक’ होता. अगदी मराठी कलाकारांच्या ‘मेंदीच्या पानावर’नेदेखील महाराष्ट्र गाजवला होता. राणी वर्मा तिच्या शोमध्ये जरा हटके गाणी गायची. इतर कोणत्याही ऑर्केस्ट्रात न गायली जाणारी.1980 नंतरची साधारण 10-15 वर्षे या वाद्यवृंदांनी गाजवली. मराठी नाटकांच्या तोडीस तोड बुकिंग ऑर्केस्ट्रा घेत. वर्तमानपत्रात नाटकांच्या जाहिरातींसोबतच ऑर्केस्ट्रांच्या जाहिराती झळकत. या सर्व ऑर्केस्ट्रांमध्ये टॉपवर होता ‘महेशकुमार अँड पार्टी.’ महेशकुमार आणि नरेशकुमार हे दोघे बंधू. महेशकुमार गाण्यांची बाजू सांभाळत. त्यांचे वैशिष्ठ्य म्हणजे ते युगल गीत एकटेच सादर करीत. लताचा असो की आशाचा हुबेहूब आवाज काढत. त्यांचा भाऊ नरेशकुमार डान्स, निवेदन आणि मिमिक्री या बाजू सांभाळायचा. महेशकुमारने गुजराथी चित्रपटांना संगीतदेखील दिले होते.

हे दोघे भाऊ नंतर राजकारणातदेखील यशस्वी झाले. नरेशकुमार आमदार तर महेशकुमार चक्क तीन वेळा खासदार झाले. या कलाकारांनी अनेक वर्षे श्रोत्यांना सुमधुर संगीत ऐकवले. गाणी ऐकण्यासाठी तेव्हा फारसे पर्याय नव्हते. रेडिओ आणि रेकॉर्ड प्लेअर. रेकॉर्ड प्लेअर सामान्यांच्या आवाक्यात नव्हता. काही काळाने कॅसेट प्लेअर घरोघरी आले, पण लाईव्ह गाणी ऐकण्याची मजा काही वेगळीच. खच्चून भरलेला हॉल, गायक-गायिका एकामागोमाग एक गाणी गात आहेत, तीदेखील रफी, किशोर, आशा, लता यांच्या डिट्टो आवाजात आणि त्यांना साथ करणारे प्रतिभावान वादक आणि एकामागून एक वन्स मोअर. खरंच तो काळ वेगळा होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -