घरताज्या घडामोडीस्मृतिचित्रांचा भावरम्य आकृतिबंध

स्मृतिचित्रांचा भावरम्य आकृतिबंध

Subscribe

प्रा. डॉ. अशोक लिंबेकर यांच्या ‘कोलाज’ या कादंबरीचे नुकतेच प्रकाशन झाले. सध्याचा काळ फक्त माणसेच एकमेकांपासून तुटत जाण्याचा नाही, तर माणसांच्या आतून स्वतःशीच तुटत जाण्याचादेखील आहे. स्खलनशीलता हे या काळाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागते. या सर्वार्थाने पडझडीच्या काळात स्वतःला सावरत नेटाने जगणे पुढे नेत राहण्याचा दृष्टिकोन या कादंबरीचा नायक सदानंद राजहंस हा वाचकाला देतो.

– मनीषा उगले

सदानंद राजहंस या नायकाच्या मनोविश्वात उमलून आलेल्या असंख्य स्मृतींच्या तुकड्यांची सुरम्य पुनर्जोडणी म्हणजे हा कोलाज आहे. सिंह जसा चालताना क्षणभर थबकतो आणि मागे वळून पाहतो, तसा हा सदानंद आपल्या भूतकाळाची पाने चाळवतो आणि हाती आलेल्या अनुभवांची मंजूषा तो वाचकापुढे रिती करतो. प्रथमपुरुषी एकवचनी निवेदनातून ही कादंबरी पुढे सरकत जाते. इंदिरा गांधींच्या हत्येचं गोठवून टाकणारं वृत्त नायकाच्या कानी पडण्यापासून ते कोविड विषाणूने जगाला विळखा घालून भीषण संहार करेपर्यंतचा विस्तृत कालावकाश हे कथन कवेत घेते. हा नायक एक मनस्वी, संवेदनशील तरुण आहे. उमलत्या वयातील कोवळ्या भावनांबद्दल तो कमालीच्या हळवेपणाने व्यक्त होतो.

उच्चशिक्षण घेतल्यानंतर तो नोकरीसाठी काही ठिकाणी मुलाखती देतो. त्यानिमित्ताने मानवी स्वभावाचे अनेक नमुने त्याला पाहायला मिळतात. यादरम्यान शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टतेचे त्याला जवळून दर्शन होते. हा नायक ‘सत्या’ची बाजू घेणारा, अन्यायाची चीड असणारा, पापभिरू युवक आहे. तो जीवन-मृत्यू, देहाची नश्वरता अशा गंभीर विषयांवर सातत्याने चिंतन करतो. गावकी-भावकीतील राजकारण, माणसा-माणसांतील आटत चाललेला जिव्हाळा, नात्यांपेक्षा पैशाला आलेले महत्त्व, दांभिकांनी भक्तीचा मांडलेला बाजार याबद्दल त्याचे मन कळवळते. सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मानवी मनात उफाळून येणारे पशुत्व पाहून तो अत्यंत अस्वस्थ होतो.

- Advertisement -

सदानंद हा कवी मनाचा तरुण आहे, पण जीवनसंघर्षात अस्तित्वासाठी चिवटपणे जीव धरून राहणे हे अटळ भागधेय स्वीकारायलाही तो शिकतो. त्याचे मनोगत वाचताना भालचंद्र नेमाडेंच्या कादंबर्‍यांतील कार्‍या प्राध्यापकांचे जग सहजपणे आठवते. सदानंद हा बहुश्रुत, बहुआयामी व्यक्ती असल्याने ग्रामीण म्हणी, वाक्प्रचार, अभंग आणि कवितांची रेलचेल त्याच्या व्यक्त होण्याचा एक लोभस भाग आहे. नोकरी लागून नव्या शहरात स्थिरस्थावर झाला असला तरी त्याची मुळे गावाकडच्या मातीत खोलवर रुजलेली आहेत. आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची त्याची मानसिक पातळीवरची धडपड कादंबरीभर व्यापून राहिलेली दिसते. चिंतनशील प्रवृत्तीचा असला तरी या नायकाला विनोदाचे वावडे नाही. खुसखुशीत विनोदाची पेरणी करीत संवाद साधण्याची शैली त्याच्याजवळ आहे.

प्राध्यापकी पेशातील आव्हांनाकडे पाहण्याचा नायकाचा दृष्टिकोन, बदलत्या पिढीतील विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांचे भावविश्व, स्टाफरूममधल्या चर्चा, व्यवस्थापनातले राजकारण यांचेही ऐसपैस चित्रण या कादंबरीत येते. स्त्रीवाद, जागतिकीकरण, यंत्रयुगाचे आगमन आणि अलीकडचे नवीन शैक्षणिक धोरण अशा प्रवाहांबद्दल तो स्वतंत्र विचार मांडताना दिसतो.
नायक स्वत: लिहिता प्राध्यापक असल्याने वाङ्मयीन व्यवहार आणि एकूणच कलाविषयक जाणिवा याबद्दल त्याची स्वतंत्र अशी मते आहेत. तो ती वेगवेगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने मांडत जातो. सुमित्रा महाजन हे सदानंदच्या जीवनातील एक महत्त्वाचे, हळवे वळण आहे. तिच्यासोबत त्याच्या भावनिक गुंतवणुकीचा एक लांबच लांब धागा जोडला गेलेला आहे, जो कादंबरीच्या शेवटच्या पानापर्यंत वाचकाची सोबत करतो.

- Advertisement -

सध्याचा काळ फक्त माणसेच एकमेकांपासून तुटत जाण्याचा नाही, तर माणसांच्या आतून स्वतःशीच तुटत जाण्याचादेखील आहे. स्खलनशीलता हे या काळाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागते. या सर्वार्थाने पडझडीच्या काळात स्वतःला सावरत नेटाने जगणे पुढे नेत राहण्याचा दृष्टिकोन या कादंबरीचा नायक सदानंद राजहंस हा वाचकाला देतो.
शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कादंबरीची ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांनी मार्मिक शब्दांत पाठराखण केली आहे. डॉ. अशोक लिंबेकर यांच्या ‘वय कोवळे उन्हाचे’ या ललित लेखसंग्रहाप्रमाणेच ह्या पहिल्यावहिल्या कादंबरीलादेखील वाचकांचा हार्दिक स्नेह लाभेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -