घरफिचर्ससारांशलोकप्रतिनिधींची ब्रॅण्ड व्हॅल्यू?

लोकप्रतिनिधींची ब्रॅण्ड व्हॅल्यू?

Subscribe

महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता प्रचाराचा बिगुल वाजेल. वाजतगाजत उमेदवार आपल्या दारापर्यंत येतील. मतांचं दान घेण्यासाठी प्रसंगी हातापाया पडतील. आपणही पक्ष-जात-धर्म-प्रांत-ओळखीचे निकष लावत मतदान करू आणि पाच वर्षाचे आपले निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला तरी देऊ. म्हणजे नुसतेच देऊ असं नाही. सोसायटीला रंगकाम, आरओ प्लांटपासून तर कधी कधी विकासासाठी रोख रक्कम, कधी आश्वासन, असं काही ना काही नक्कीच घेऊ.

आपली खास काळजी कशी घ्यावी याची जाण भावी नगरसेविकांना असतेच आणि तयारी त्याच्या ही पुढे. ते भव्यदिव्य बॅनर, त्या रात्रीच्या मेजवान्या. प्रत्येक नगरसेवकांचं खर्चाचं बजेट कोट्यवधीमध्ये असावं पण कागदावर मात्र काही हजारात दाखवले जाते. आपल्याला कधी प्रश्न पडतो का, की यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून? कालपर्यंत आपल्यासारखं सामान्य जीवन जगणारा, आपला मित्र, आपला शेजारी, आपल्या ओळखीचा व्यक्ती लोकप्रतिनिधी होतो आणि असा काय परिसस्पर्श होतो त्यांना, की बघता बघता त्यांचे राहणीमान, मालमत्ता काही पटीने वाढते. गाड्या, बंगले, जमिनी त्यांच्या पायाशी लोटांगण घालतात. दुसरीकडे रात्रंदिवस कष्ट करून मात्र अनेकांना जगण्याची भ्रांत पडते, काही शरीर कष्टांऐवजी बौद्धिक कष्ट घेतात त्यांना चांगली मिळकत होते. ते काही प्रमाणात स्वतःच्या प्राथमिक गरज भागवून प्रगती करतात तर ती प्रगती आपल्या डोळ्यात खुपते. तो लुटत असल्याची भावना आपल्या मनात निर्माण होते. परंतु अशी कोणतीही भावना लोकप्रतिनिधींविषयी आपल्या मनात येत नाही. कारण ते प्रत्यक्ष आपल्या खिशातून पैसे काढून घेत नाहीत.

आपल्या घरात चोरी करणारा, आपल्याला लुटणारा, आपली फसवणूक करणारा फार फार तर आपली आहे ती संपत्ती लुटून नेऊ शकतो. परंतु लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या चुकीच्या किंवा स्वतःचे हितसंबंध जपणार्‍या धोरणांमुळे आपल्या अनेक पिढ्या बरबाद होतात. इतका दूरगामी परिणाम साधला जाऊ शकतो, याचा आपण साधा विचारही करत नाही. आपण भुलतो त्या झगमगाटीला, आपण भाळतो त्यांनी दाखवलेल्या स्वप्नांना, आपण घाबरतो त्यांच्या दहशतीला, आपण झुकतो त्यांच्या बळापुढे, आपण लाचार होतो त्यांनी दिलेल्या नोटांमुळे अशी एक ना अनेक कारणं देता येतील, आपण चुकीच्या लोकांना का मतदान करतो म्हणून ? आपण आपल्या शोषणाची कारणं निरक्षरतेत बघितली ती काही अंशी खरी असली तरी आज उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी स्वतःच्या बुद्धिमत्तेचा फायदा पिळवणुकीचे अजून आधुनिक मार्ग शोधून स्वतःच्या विकासासाठीच वापरताना दिसत आहेत. हीच मंडळी सत्तेसाठी नको त्या पातळीवर सेटलमेंट करून स्वतःचा फायला, युती आघाड्या करून आलटून पालटून आपल्या हक्काचं एकमेकात वाटून घेत असतात.

- Advertisement -

हिटलरच्या छळछावणीतून बचावलेल्या एकाने तिथल्या शिक्षकांना उद्देशून लिहिलेले एक पत्र अतिशय गांभीर्याने विचार करायला लावणारं आहे. ‘माझ्या डोळ्यांनी ते बघितलं आहे त्याचा दुसरा कोणीही पुरावा नाही, विषारी वायूचे चेंबर्स इंजिनियर्सने बांधले होते, लहान मुलांना डॉक्टर्स विषारी इंजेकशन्स देत होते, अर्भकांना शिकलेल्या नर्स मारत होत्या, कॉलेज ग्रॅज्युएट्स महिलांना जाळत अथवा गोळ्या घालत होते, तेव्हा मी शिक्षणाबाबत साशंक झालो. माझी शिक्षकांना हात जोडून विनंती आहे, तुमच्या विद्यार्थ्यांना माणूस होण्यात मदत करा. तुमच्या प्रयत्नातून शिकलेले राक्षस, सराईत मनोरुग्ण, शिकलेले अशिक्षित तयार व्हायला नको. वाचण्या-लिहिण्या-शिकण्याला तेव्हाच अर्थ आहे जर ते माणसाला माणूस बनवत असेल. त्यामुळे उच्चशिक्षित उमेदवारांचे गाजरही किती खरे, हेही जोखून घेतलं पाहिजे.

संविधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्याबरोबरच मतदानाचा अधिकार दिला तो विकण्या किंवा झुकण्यासाठी नाही. चला तर मग थोडा विचार करू या. आपल्याकडे मत मागायला येणार्‍याला थोडं तपासून बघू या. तो कोणत्यातरी पक्षाचा झेंडा घेऊन आला आहे. कोणत्यातरी जाती, धर्माचा, प्रांताचा आहे. त्याची दहशत आहे त्यामुळे तो आपलं संरक्षण करेल. आपली ओळख आहे या चुकीच्या ब्रँड वॅल्यूऐवजी त्याची विकासाची वाट कोणती? तो जनउपयोगी धोरणांचा अवलंब करेल का? तो त्याच्या शिक्षणाचा उपयोग नागरिकांच्या प्रगतीसाठी करेल का? तो कोणत्या विचारांवर कोणत्या मूल्यावर काम करतो? त्याचं चरित्र ओळखू या. म्हणून यावेळी नेत्याऐवजी नीतीला मतदान करू, मग त्याच्या पाठीशी कोणताही पक्ष असो वा नसो. क्यो की ब्रँड का ठप्पा आदमी के कपडो में नहीं होता, कॅरेक्टर में होता हैं !

- Advertisement -

–डॉ. समीर अहिरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -