घरफिचर्ससारांशकादंबरी आणि कविता

कादंबरी आणि कविता

Subscribe

रवींद्रनाथ अखेरपर्यंत कादंबरीला विसरू शकत नव्हते, ना चंद्रनगरचे ते दिवस. चंद्रनगरचं त्यांचं ते घर अगदीच गंगेच्या तीरावर होतं. घराच्या पायर्‍या थेट नदीपात्रात उतरत होत्या. भलामोठा दिवाणखाना, खिडक्यांच्या रंगीत काचांमधून ऊन सावल्यांचा खेळ चालायचा. कधी आभाळ भरून यायचं. वातावरण ओलसर गूढ झालेलं असताना रवींद्रनाथ पेटी पुढे ओढायचे आणि मग त्यांच्या गळ्यातून पाझरायचे मधुर स्वर आणि त्यांच्या कविता.

–सुनील शिरवाडकर

कादंबरी गच्चीवर आली तेव्हा तिच्या हातात एक रूमाल होता. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीकडे जात होता. कादंबरीने हौसेने लावलेली अनेक फुलझाडे, त्यात फुलणारी रंगीबेरंगी फुले, अंथरलेल्या चटया, त्यातील एका चटईवर लहानगा रवींद्र बसला होता. कादंबरी आली, तिनं हातातला रूमाल एका तबकात ठेवला. त्यात मोगर्‍याचे गजरे होते. त्याचा दरवळ सगळीकडे पसरला.

- Advertisement -

पानदानात ठेवलेलं पानं उचलून ज्योतिरिंद्रनाथांनी ते तोंडात टाकलं. खांद्यावरचं उपरणं सारखं केलं आणि बाजूलाच ठेवलेलं व्हायोलिन उचललं. नुकतीच न्हाऊन आलेली सुस्नात कादंबरी समोर बसली. व्हायोलिनचा सूर लागला आणि रवींद्रनाथ मुक्तपणे सुरेल गाऊ लागले. तार्‍यांनी भरलेलं आकाश आणि गाण्याचा आवाज चहूकडे घेऊन जाणारा दक्षिण वारा.

हो, ही होती कादंबरी. रवींद्रनाथ टागोर यांची मोठी वहिनी, त्यांची प्रेरणा. लग्न होऊन ती जेव्हा घरात आली तेव्हा होती दहा वर्षांची आणि रवी होता पाच-सहा वर्षांचा. साहजिकच दोघांचं नातं एका मित्र मैत्रिणीचं होतं. तिचं वाचन भरपूर होतं आणि केवळ वेळ घालवण्यासाठी म्हणून ती वाचत नसे. त्यातून तिनं स्वत:ला समृद्ध केलं होतं.

- Advertisement -

संगीत आणि साहित्य हे दोघांच्या आवडीचे विषय. याच काळात रवींद्रनाथ कविता करू लागले होते आणि यामागे त्यांची स्फुर्तिदेवता होती कादंबरी. त्यांच्या अनेक कवितांमधून ती दिसते, तर कधी त्यांच्या चित्रांमधून ती अवतरते.

रवींद्रनाथांनी जिथं जिथं म्हणून स्पर्श केला, तिथे तिथे आपला अमीट ठसा उमटवला. वयाच्या चाळीशीनंतर त्यांना आपल्यामधील चित्रकार सापडला. त्यानंतर त्यांनी जवळपास दोन-अडीच हजार कॅनव्हास रंगवले. जगभरातील चित्रकार, समीक्षक त्यांची चित्रकला पाहून थक्क झाले. संगीतकार म्हणूनही त्यांची कामगिरी अलौकिक आहे.

तरीही असं म्हणता येईल की, ते सर्वप्रथम एक कवी होते, नंतर बाकी सगळं. एका पत्रात ते म्हणतात की,

कविता ही माझी पूर्वीपासूनची प्रेयसी. माझं खरं जीवन तिच्याशीच निगडित आहे. ज्या क्षणी मी कविता लिहायला लागतो, त्याक्षणी माझं चिरंतन अस्तित्व माझ्यामध्ये प्रवेश करीत असतं.

आपल्याकडे एक समज आहे कवी हा श्रेष्ठ असतो आणि गीतकार जरा दुय्यम, पण रवींद्रनाथ त्यांच्या कवितांना ‘गीत’ असंच म्हणत. नोबेल पारितोषिक मिळालेल्या त्यांच्या कवितासंग्रहाचं नावच मुळी ‘गीतांजली’ आहे. रवींद्रनाथांना गीत आणि संगीत हे सर्वव्यापी वाटत होतं. गीत गाण्यासाठीच मी या जगात आलो हे त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहेच.

रवींद्रनाथ केवळ गीत रचत होते. ती गीतं सुरात बांधत होते असं नाही. जगभर ते हिंडत होते. त्या त्या ठिकाणच्या निसर्गाच्या लीला पाहत होते. सौंदर्य पाहत होते आणि त्या त्या ठिकाणचं कष्टमय जीवनही पाहत होते. या कष्टकर्‍यांच्या जीवनातील आनंदाचा शोध घेत होते. बंगाली लोकसंगीत खूप समृद्ध आहे. ते त्यांनी बारकाईने ऐकलं, अनुभवलं. तेथील अनेक लोकसंगीतातल्या चाली रवींद्रनाथ यांच्या गीतांमधून दिसतात ते याचमुळे.

आणि तरीही ते अखेरपर्यंत कादंबरीला विसरू शकत नव्हते, ना चंद्रनगरचे ते दिवस. चंद्रनगरचं त्यांचं ते घर अगदीच गंगेच्या तीरावर होतं. घराच्या पायर्‍या थेट नदीपात्रात उतरत होत्या. भलामोठा दिवाणखाना, खिडक्यांच्या रंगीत काचांमधून ऊन सावल्यांचा खेळ चालायचा. कधी आभाळ भरून यायचं. वातावरण ओलसर गूढ झालेलं असताना रवींद्रनाथ पेटी पुढे ओढायचे आणि मग त्यांच्या गळ्यातून पाझरायचे मधुर स्वर आणि त्यांच्या कविता.

त्यांची एक नाव होती. अशाच एका पहाटे आभाळात सूर्योदय आणि लाली पसरलेली होती. ज्योतिदा, कादंबरी आणि रवींद्रनाथ तिघं मग नावेतून निघाले. ज्योतिदांचं व्हायोलिन, समोर कादंबरी, पहाटे सुरू झालेला प्रवास थेट संध्याकाळपर्यंत चालला होता. प्रहर बदलत होते आणि रागही बदलत होते. आता पश्चिम क्षितिजावर लाल केशरी रंगांचा उत्सव सुरू झाला होता. वार्‍यावर येणार्‍या बकुळीच्या गंधाने ते वेडावून गेले आणि मुक्तकंठाने गाऊ लागले…

पाताय पाताय घाशे घाशे
नवीन प्राणेर पत्र आशे
पलाश जबाय, कनक चाँपाय अशोके अश्वत्थे
बकुलगन्धे बन्या एलो
दखिन हावाय स्त्रोते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -