कडाकण्या…

Subscribe

प्रत्येकाच्या घरची कडाकण्या करण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असली तरी त्यासाठी पाऊण वाटी साखर/गूळ पाण्यात भिजवतात. त्यात एक वाटी रवा पिठी (मैदा) आणि चमचाभर रवा घालतात. त्यात अगदी थोडंसं तेल आणि मीठ घालून पीठ घट्ट भिजवतात. भिजवलेले पीठ लाकडी हातोड्याने खलात कुटून मऊ करून घेतात आणि पातळ पुर्‍या लाटून झाल्या की त्यावर लहान गोलसर ताटली ठेवून सर्व बाजूंनी मोठ्या कातणाने कातरतात आणि मग ती पुरी मंद आचेवर तळतात. तळताना त्यावर फोड उठले तर त्या कडाकण्या कुरकुरीत जमल्या असे खुशाल समजायचे.

पश्चिम महाराष्ट्रात ‘कडाकण्या’ हा पदार्थ शारदीय नवरात्राच्या दुसर्‍या टप्प्यात बनवला जातो. कडाकण्या म्हणजे काय तर गोडसर न फुगलेली, किंचित कडक आणि अजिबात तेलकट नसलेली पुरी. आमच्या कोल्हापुरात म्हणजे ललिता पंचमीची टेंबलाबाईची जत्रा पार पडली की दुसर्‍या दिवसापासून गावात कुठेही फिरलं तरी कडाकण्या तळण्याचा खमंग, गुळमट वास दरवळत असतो.

पूर्वी या दिवसांत गल्लीतल्या, उपास धरलेल्या बायका एकमेकींकडे आपलं पोळपाट लाटणं घेऊन कडाकण्या बनवायला जात असत. तेव्हा कडाकणीचा साचा आणि कातण बहुधा एखाद्या वाड्यात एकाकडेच असे. ज्यांच्या घरी कडाकण्या बनवत त्या घरच्या मालकीणी मदतीला आलेल्या पोरांच्या हातात दोन-दोन कडाकण्या ठेवत. अशा कडाकण्या घरी घेऊन येताना मला केवढा अभिमान वाटत असे. कारण एकतर त्या वयात मला ती स्वकष्टार्जित कमाई वाटे. दुसरे म्हणजे आमच्या घरी कडाकण्या बनवत नसत. त्यामुळे दिवसाकाठी ६ कडाकण्या म्हटले तरी दसर्‍यापर्यंत माझ्याकडे १५-२० कडाकण्या सहज जमत. अर्थातच माझ्या आईला या सगळ्या प्रकाराचा भयंकर राग येई, पण मी लक्ष देत नसे. खरे सांगायचे तर कडाकणीच्या प्रत्यक्ष चवीपेक्षा त्या कडाकणीबरोबर जोडलेल्या प्रथा आणि कथा दोन्हीही छान असतात.

- Advertisement -

त्यातली एक प्रथा म्हणजे प्रत्येक घरातल्या घटावर चंद्रासारख्या पांढर्‍या शुभ्र गोल, पण चांदणीसारख्या कातरलेल्या कडाकण्यांची माळ सोडतात. कुणाकडे कडाकण्यांचे तोरण बांधायची पद्धत असते, तर कुणा थोड्या सधन घरात चार- पाच प्रकारच्या कडाकण्यांचा फुलोरा घटावर डुलत असतो. इथल्या अनेक घरांमध्ये अष्टमीला पाच उसांनी देवीचा चौक बांधतात. त्यावरही कडाकण्या बांधाव्या लागतात. पन्हाळा गडाच्या पायथ्याशी राहणार्‍या एका ताईंनी देवीला कडाकण्या वाहण्याबाबतची एक खूप गोड कथा सांगितली होती. नवरतनात (नवरात्रात) देवीला भक्तांच्या कल्याणाचे भरपूर काम असते. अर्थातच तिच्या घरातल्या कडाकण्या करायला तिला वेळ नसतो म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातल्या कडाकण्या दिल्या तर देवीच्या पोराबाळांनाही कडाकण्या खायला मिळतात. म्हणून या दिवसांत देवीला कडाकण्या वाहायची पद्धत पडली आहे.

काही लोकांच्या घरी विशेषतः शिंपी समाजात कडाकण्यांच्या पिठाची फणी, कंगवा, नारळ, पानसुपारी, कुंकवाचा करंडा, तिपेडी वेणी, अंगठ्या, बांगड्या, मंगळसूत्र, गळ्यातला साज, पैंजणे असे खूप सुंदर दागिने करतात. त्यासाठी पांढरा मैदा आणि पिवळे बेसनाचे पीठ वापरतात. त्या दागिन्यांनी देवीची वाडी भरतात. पूर्वीच्या काळी मुलीला सासरी पाठवताना अलंकार, सौभाग्यवाण आणि तिच्या सौंदर्यसाधनेसाठीच्या वस्तू द्यायची पद्धत होती. त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या किंवा किमान चांदीच्या असाव्यात अशी सासरच्यांची अपेक्षा असे. ज्यांना हे शक्य नसे, ते त्यांच्या गावच्या देवीला साकडे घालत. देवीकडे म्हणे भरपूर दागिन्यांचा साठा असे, पण कोणकोणते डाग द्यावेत हे तिला कसे कळावे? यासाठी गावातल्या बायका बेसनाच्या कडाकण्यांच्या पिठाचे सर्व डाग बनवत आणि देवीपुढे ठेवत. देवी ते रातोरात सोन्याचे बनवून ठेवी. माहेरवाशिणी सासरी जाताना गावदेवीचे दर्शन घेत आणि देवीने बनवलेले सोन्याचे डाग घेऊन जात. त्या सर्व मुली सासरच्यांचे समाधान झाल्यावर परत कधी माहेरी येताना नेलेल्या सर्व वस्तू देवीच्या देवळात परत नेऊन देत.

- Advertisement -

एका मुलीने देवीकडून घेतलेले ते डाग परत केले नाहीत. तेव्हापासून देवी काही तिच्यापुढे ठेवलेले कडाकण्यांचे दाग-दागिने सोन्याचे करून देत नाही, पण कधीतरी परमदयाळू देवी कृपावंत होऊन आपण ठेवलेले कडाकण्यांचे दागिने सोन्याचे करून देईल या अपेक्षेने आजही देवीपुढे ते दागिने आणि सौभाग्यलेणी ठेवली जातात.
या कडाकण्यांशी संबंधित खूप गाणीही असतात.

देवीच्या ग नवरातीला..झुंबरी डुले कडाकणी
घट बसला मातीचा सहाव्या माळेला कडाकणी
देवीच्या ग दाराच्या तोरणी बांधली कडाकणी
घट बसला मातीचा…फुलोर्‍याला कडाकणी…

प्रत्येकाच्या घरची कडाकण्या करण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असली तरी त्यासाठी पाऊण वाटी साखर/गूळ पाण्यात भिजवतात. त्यात एक वाटी रवा पिठी (मैदा) आणि चमचाभर रवा घालतात. त्यात अगदी थोडंसं तेल आणि मीठ घालून पीठ घट्ट भिजवतात. भिजवलेले पीठ लाकडी हातोड्याने खलात कुटून मऊ करून घेतात आणि पातळ पुर्‍या लाटून झाल्या की त्यावर लहान गोलसर ताटली ठेवून सर्व बाजूंनी मोठ्या कातणाने कातरतात आणि मग ती पुरी मंद आचेवर तळतात. तळताना त्यावर फोड उठले तर त्या कडाकण्या कुरकुरीत जमल्या असे खुशाल समजायचे.

काही जणांकडे सारण भरून कडाकण्या करतात. सारण भरणे म्हणण्यापेक्षा एका पातळ पुरीवर एकतर भाजलेले खोबरे, त्यात थोडासा भाजलेला रवा आणि पिठीसाखर किंवा भाजलेले बेसन, तीळ आणि पिठीसाखर/गुळाचे सारण पसरतात. कधी त्यात खवाही घालतात. त्यावर दुसरी पुरी ठेवून पातळ लाटतात. मग ती भरलेली कडाकणी तळतात. अशा भरलेल्या कडाकण्यांना बडाम असेही म्हणतात. कडाकण्यात गुळाऐवजी साखर असेल तर त्या पांढर्‍याशुभ्र होतात. काही जण नुसत्या रव्याच्याही कडाकण्या करतात. काही जण फक्त तांदळाचे पीठ किंवा त्यात बेसन किंवा मुगाचे पीठ घालून कडाकण्या बनवतात.

वेणीफणी आणि दागिन्यांसाठी मात्र अनेक ठिकाणी फक्त गूळ आणि बेसन किंवा मुगाचे पीठच वापरतात, पण कोणत्याही प्रकारच्या कडाकण्या बनवताना त्यात मोहन एकतर घालतच नाहीत किंवा कमीच घालतात. (हल्ली त्यात मोहन थोडे अधिक घालून कुरकुरीत बनवतात.) त्यात गूळ/साखरही कमीच असल्याने मधुमेहींसाठी खरंतर त्या उत्तमच असतात. मूळ कडाकण्या नावाप्रमाणे कडक असल्याने एखाद्या फटाकड्या, सहजी न बधणार्‍या पोरीला आमच्याकडे कडाकणी म्हणतात. माझ्या लहानपणी आजूबाजूच्या घरातली पोरे आणि कधीकधी दात कमजोर असलेली मोठी माणसेही चार-पाच कडाकण्या मोडून कपात टाकत. त्यावर गरमा गरम चहा ओतत.

मग मऊ झालेल्या कडाकण्या आणि गुळमट चहा यांचा असा काही संगम होई की खाणार्‍याची आणि पाहणार्‍यांची ब्रह्मानंदी टाळीच लागायला पाहिजे. पूर्वी या दिवसांत म्हणजे दसर्‍यापासून ते जवळजवळ दिवाळीपर्यंत शेतकरी, शिंपी, सोनार, कुंभार या समाजातल्या लोकांच्या घरात सुगीचे भरपूर काम असायचे. अधल्या मधल्या भुकेच्या वेळेला किंवा सकाळच्या चहाबरोबर कडाकण्या चघळून खाल्ल्या की बाकी स्वयंपाक करण्यातला वेळ वाचायचा. त्यामुळे त्यावेळी त्या कडाकण्या चांगल्या दिवाळीपर्यंत पुरतील एवढ्या बनवत असत. कडाकण्या शिळ्या होतील तशी त्याची चव अधिक चांगली लागते.

त्यावेळी कडाकण्यांसाठी घरातल्या माणसांच्या संख्येनुसार तीन मापटे ते सहा मापट्यांपर्यंत रवापिठी घेत असत, मात्र हल्ली बाकीच्या खाण्याच्या गोष्टी सहज उपलब्ध असल्याने कशाबशा एका मापट्याची रवापिठी घेऊन नैवेद्यापुरत्या कडाकण्या केल्या जातात. या कडाकण्यांच्या कमी साखरेच्या किंवा शुगरलेस रूपाला विदर्भात पात्या म्हणतात. पात्याचा फुलोरा नागपंचमी आणि महालक्ष्म्यांसाठी केला जातो. कडाकणीचे तिखट जाळ, उग्र रूप म्हणजे उत्तर कर्नाटकात केली जाणारी ‘खारद होळगी’. खारद होळगी मात्र चवीला अतिशय भारी असते. त्यासाठी प्रथम जिरे, मिरच्या, कोथिंबीर, कधी कधी लसूण, मीठ घालून वाटून घेतात. त्यात पाणी घालून थोडा वेळ ठेवतात. त्यानंतर त्यात भाजणीचे पीठ किंवा भाजलेली कणिक, ज्वारीचे पीठ आणि बेसन हे २:१:०.५ या प्रमाणात मिसळून त्यात २ चमचे तेल घालून ते पीठ घट्ट भिजवतात. पातळ पुर्‍या लाटून कडाकण्या तळतात. ही खारद होळगी कडाकणी चवीला चांगली तिखट असते. डोळ्या नाकातून पाणी काढत ही तिखटजाळ कडाकणी चहाबरोबर खाताना जी मजा येते ती अनुभवावीच लागते.

कडाकणी हा पदार्थ करायला सोपा आणि चवीला चांगला असला तरी कदाचित कडक आणि फारसा गोड नसल्याने शिवाय उपलब्ध असलेल्या खुसखुशीत बेकरी पदार्थांमुळे अगदी अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. नवरात्र वगळता इतर वेळी कधीच कडाकण्या बनवल्या जात नाहीत हे त्याचेच द्योतक आहे. अन्न प्रक्रिया उद्योगातील सुगरणींनो, आता त्याचे भविष्य तुमच्याच हातात आहे.

–मंजुषा देशपांडे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -