घरफिचर्ससारांशभूतदयेची जाणीव...

भूतदयेची जाणीव…

Subscribe

गेल्या चाळीस वर्षात अनेक पशुप्रेमी माणसं बघितली आणि ह्या प्रेमाच्या मागे किती संवेदना असेल याचा विचार करतोय, ज्या काळात माणूस माणसाला पारखा झाला आहे, त्याकाळात ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि मग पुन्हा आपण माणूस हा संवेदनशील प्राणी आहे हे कोडं सोडवू पाहतो. गावखेड्यात ह्या गोष्टी अगदी नित्याच्या आहेत म्हणजे गायी वासरं, बैल, म्हशी रेडे किंवा कुत्रे हे सगळे त्या जीवनाचा घटक बनतात. तिथे ह्या गोष्टी बाळगणं हा चैनीचा विषय नसतो तर ती गरजेचा विषय बनतो.

गडग्यावरून उडी मारून भाऊकाका आमच्या घराच्या पाटल्यादारी आला आणि तिथे उभ्या असलेल्या तात्याला काही सांगू लागला. मी, श्रद्धा अजून कोणी घरातली माणसे सगळे बाजूला उभे राहून भाऊकाका आणि तात्याच्यात होणारा संवाद ऐकत होतो. त्यांच्यात झालेल्या संवादातून एवढं कळलं की, आमची म्हैस कोणाच्या कुडनात गेली. आणि तिथे उगवलेला मुग खाऊन पोबारा करणार इतक्यात शेताच्या मालकाने तिला बांधून आपल्या गोठ्यात बांधून ठेवलं आहे.

घरातली दुभती म्हैस संध्याकाळी घरी यायला हवी, तिला त्या शेताच्या मालकाकडून आणायचे म्हणजे तात्यांना त्या मालकाला भेटून त्याच्या हातापाया पडावे लागणार. तात्या तसेच निघाले, इकडे माझ्या चुलतभावाने तणतणायला सुरुवात केली. कितक्यांदा सांगलय सगळी ढोरा कोणाक तरी देवन टाका ….तरी नाय ….त्यो गाई नी म्हशी व्हयो कित्या ? …..लोकांची बोलणी खावक ? ….. , तिन्हीसांजा झाल्या इकडे म्हशीचे रेडकू रेकू लागलं. थोड्यावेळाने तात्या म्हशीला घेऊन आले. तरी भावाची तोंडाची टकळी सुरूच होती. तशी बाजूच्या बिर्‍हाडातून काकी आली आणि म्हणाली माका वाटता ह्याच्या (माझ्या भावाचे) बोलना भाऊंनी (माझ्या आजोबांनी ) आयकल्यांनी आसता तर अंथरूण धरल्यानी असता.

- Advertisement -

काकीच्या बोलण्यात काहीच अतिशयोक्ती नव्हती. माझ्या आजोबांना गुराढोरांबद्दल विलक्षण माया. काही प्रमाणात तो गुण माझ्यातदेखील आला आहे. आजोबा हयात होते तेव्हा दोन जोताचे बैल सोडून तीन चार दुभती गुरं गोठ्यात होतीच. त्यांच्या जतनाची एकूण जबाबदारी आजोबाच घेत होते. हळूहळू घरातले व्याप, इतर उद्योगधंदे यात उर्जा विभागली जाऊ लागली आणि शेती व पर्यायाने शेतीकडे म्हणा किंवा पारंपारिक पद्धतीकडे दुर्लक्ष होतं गेलं आणि आधुनिकीकरणाच्या कल्पनेत गुरांना स्थान नाकारलं. आता गाई वासरं सांभाळणे हे जिकीरीचे होऊन बसले आहे.

एखादे वेळी सारवण करायला शेण मिळाले नाही तरी चालेल पण गोठ्यात गुरं नको, दुधाचा प्रश्न दुधाच्या पिशवीने सोडवला आहे. बाईकवर टांग मारली की, कोळोशीच्या बाजारातून दुधाची पिशवी सहज आणता येते, एवढेच कशाला आता तर गावातल्या गावात दुधाची पिशवी मिळू लागली आहे. आपण संस्कृतीच्या कुठल्या टप्प्यावर नक्की आलोय हे सांगणे तसे कठीण आहे. देशी वस्तूंचा त्याग करून एका विशिष्ट पातळीवर जगताना माणूस म्हणून आपण नक्की काय करू पाहत आहोत.

- Advertisement -

माझे चुलते आल्यागेल्या पाहुण्याला अभिमानाने सांगायचे, गेल्या सात पिढ्यात आम्ही म्हस कसली ती इकत घीतलाव नाय, त्यांच्या म्हणतात हा तथ्यांश होता की, गेली कित्येक पिढ्या म्हशी किंवा गाई आमच्या घरी वंशपरंपरेने वाढत होत्या. घरात नेहमीच दूध दुभतं पुष्कळ होतं, एकतर घरात बहुतेक सर्वजण शाकाहारी त्यामुळे घरात दुधाचा रतीब अव्याहत चालू असायचा. घरातली गाय किंवा म्हैस व्यायची असेल तेव्हा तात्या आणि नंदा काकी वाड्यात बसून राहायचे, गायीची घोटी थोडी मोठी झाली कि मग तात्या काकीला उद्देशून नंदा, दोन दिवसात तयारी कर हा, गाय इतली, मग काकीची लगबग सुरु व्हायची. दोन दिवस दोघांच्या पायाला भिंगरी असायची, कुठे जुने कपडे गोळा कर, कुठे गायीसाठी नवीन दावे शोध, वासराला बांधायला नवीन जुपनी शोध, मध्येच वाड्यात जाऊन गायीकडे लक्ष दे, या गोष्टी क्रमाक्रमाने चालू असायच्या. गायीच्या, म्हशीच्या ह्या विन्याबाबत दोघेही तेवढेच हळवे. काकी म्हणायची, ‘बाईचा बाळंतपण काय नी गायीचा वीत काय सारख्याच.’ त्यांचा जीव हा असा गुंतलेला !

गेल्या चाळीस वर्षात अनेक पशुप्रेमी माणसं बघितली आणि ह्या प्रेमाच्या मागे किती संवेदना असेल याचा विचार करतोय, ज्या काळात माणूस माणसाला पारखा झाला आहे, त्याकाळात ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि मग पुन्हा आपण माणूस हा संवेदनशील प्राणी आहे हे कोडं सोडवू पाहतो. गावखेड्यात ह्या गोष्टी अगदी नित्याच्या आहेत म्हणजे गायी वासरं, बैल, म्हशी रेडे किंवा कुत्रे हे सगळे त्या जीवनाचा घटक बनतात. तिथे ह्या गोष्टी बाळगणं हा चैनीचा विषय नसतो तर ती गरजेचा विषय बनतो.

मागे गोव्याला नातेवाईकाच्या घरी गेलो तेव्हा प्रत्येकाच्या घरासमोर एकतर कुत्रा, मांजर असायचीच, ह्या नातेवाईकांच्या घरासमोर घोडे बांधले होते, त्यांना विचारलं की, गोव्यातल्या त्या भागात असे घरासमोर प्राण्यांना का बांधून ठेवतात तेव्हा त्यांच्याकडून कळलं, गोव्याच्या या भागात हे प्राणी त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे, मालकावर संकट येणार आहे याची जाणीव माणसाच्या आधी ह्या प्राण्यांना लागते, तेथील लोकांच्या समजुतीनुसार काहीवेळा मालकावर येणारे संकट हे प्राणी आपल्यावर ओढून घेतात. इथल्या ह्या जीवनशैलीत ह्या प्राणीमात्रांना किती महत्व असेल याचा मी विचार करताना माणसाच्या आणि प्राण्यांच्यात असा कोणता वेगळा घटक आहे, आहार, भय, निद्रा आणि मैथुन ह्या गोष्टी तर सारख्याच आहेत मग कोणता घटक आहे !

समाजात होणारे महिलांवर होणारे अत्याचार, लहानमुलींवर होणारे बलात्कार, लहानसहान गोष्टीवरून होणार्‍या मारामार्‍या, त्यातून होणारे खून, संपत्तीवरून होणारे कलह ह्या सगळ्या पशुवृत्ती मानल्या तर पशुजीवनात ह्या गोष्टी किती विसंगतीने आढळतात? ह्या पशुवृत्ती माणूस मात्र सरस वापरतो, त्यामुळे निमित्त मात्र होणारे हे फरक किती बेमालूमपणे माणसात आढळतात. प्राण्यावर प्रेम करणारा माणूस माणसात तेवढ्याच सहजपणे माणसात मिसळून मानवता सांभाळताना दिसतो.

भूतदया हा फार वेगळा विषय झाला, पण पशुवृत्तीत रमणारा माणूस जेव्हा समाजविघातक बनतो तेव्हा त्याचे मनुष्य म्हणून अस्तित्व किती राहत असेल. घरातल्या म्हशीच्या तोंडात कीड पडली तेव्हा त्या म्हशीला गवत पाणी जाईना, त्यावेळी माझे आजोबा हयात होते. त्यांनी म्हशीच्या तोंडात हात घालून किडे काढून टाकायला सुरुवात केली. त्यांचे मन किती गुंतले होते. म्हशीचे औषधोपचार करताना शुश्रुषा हा किती महत्वाचा भाग असतो. माझ्या सहकारी आहेत पूनम भोगले त्यांच्याकडे लाब्रोडॉर जातीचा कुत्रा आहे. अगदी लहान एक महिन्याचं पिल्लू असताना त्यांच्याकडे आणलेला, आता जवळपास बारा वर्षाचा झाला. अर्थात म्हातारा झालेला पण त्यादिवशी त्या ब्रुनोच्या (कुत्राचे नाव ) कानात गाठ दिसली म्हणून यजमान आणि मुलगा पशुवैद्याकडे घेऊन गेले. इकडे ह्या बाईंचे लक्ष ते डॉक्टर काय सांगतात ह्याकडेच लागलेलं.

प्राणीसृष्टीत, जीवसृष्टीत रमून जाणारी माणसं त्याच्याशी किती वेगळ्या पद्धतीने बोलतात, उगाच का डॉ. जगदीशचंद्र बोस म्हणायचे की, झाडं माझ्याशी बोलतात. त्याचे बोलणे ऐकायला एक वेगळ्या प्रकारचे संवेदनशील मन लागते, माणसाचे माणसाशी जे नाते आहे तेच किंबहुना एक वेगळे नाते ह्या प्राणी जगताशी आहे हे मात्र नक्की !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -