घरताज्या घडामोडीभाषांमाजी साजिरी मराठीया

भाषांमाजी साजिरी मराठीया

Subscribe

बालपणीच्या अमूल्य आठवणींपैकी एक आठवण! एका उन्हाळ्यातल्या दुपारी एक आजोबा आरामखुर्चीत रेलून बसलेले… त्यांच्यासमोर एका हाताचं बोट नाचवत, तालात-

कावळा म्हणतो पंख दे
चिमणी म्हणते खोपा दे
माझ्यासारख्या आजोबाला
फक्त तुझा पापा दे!

- Advertisement -

असं म्हणत शेवटची ओळ संपवली. तू आता जे गाणं म्हणालीस ना ते याच आजोबांनी लिहिलं आहे. असं आईने सांगितलं तेव्हा हे आजोबा ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त खूप खूप मोठ्ठे लेखक आहेत हेसुद्धा कळत नसेल! आज मात्र स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटतो.

मराठी भाषेसोबत, साहित्यासोबत बाराखडी गिरवली तेव्हाच नाळ जोडली गेली. त्या भाषेचा गौरव करण्यासाठी खरं तर 365 दिवस अपुरेच. पण हा गौरव आनंदासारखा द्विगुणीत करण्याचं एक निमित्त असतं. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस त्यासाठी निवडला जावा ही गोष्टच मला काव्यमय वाटते. ‘सूर म्हणतो साथ दे’ खुद्द कुसुमाग्रजांनाच म्हणून दाखविली तेव्हाच त्यांच्या कवितेशी गट्टी जमली. शाळेत असताना एका सुरात गायलेली त्यांची ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ ही प्रार्थना असो किंवा तारुण्यात पृथ्वीच्या प्रेमगीताची केलेली पारायणे; त्यांच्या कवितेसोबतचं माझं नातं कालानुरूप गहिरं होत गेलं.

- Advertisement -

27 फेब्रुवारी 1912 हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन. गजानन रंगनाथ शिरवाडकर हे त्यांचे मुळचे नाव. 1917 साली दत्तकविधानानंतर त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर झाले. त्यांचे बालपण पिंपळगाव व वणी येथे गेले. 1924 साली ते नाशिकला पुढील शिक्षणासाठी आले. पुढे नाशिकच्या एच.पी.टी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. आजही या महाविद्यालयात अध्यापन आणि अध्ययन करणार्‍या सर्वांनाचं याचे अप्रूप आणि अभिमान आहे. अस्मादिक त्यात अंतर्भूत आहेत!

व्यक्तिमत्व सगळ्या अंगांनी बहरत असताना लेखणी त्यांची जीवश्च कंठश्च सखी बनली ती अखेरपर्यंत… कुसुमाग्रजांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात भाग घेतला होता. बी. ए. झाल्यावर त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला होता. ‘प्रभात’ ‘नवयुग’ अशा तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये कामही केले. चित्रपट व्यवसायात असताना त्यांनी पटकथाही लिहिल्या. 1942 साली प्रसिध्द झाला ‘विशाखा’ काव्यसंग्रह! त्यानंतर ‘वैष्णव’ ही कादंबरी मग ‘समिधा’, ‘किनारा’, ‘मराठी माती’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’, ‘छंदोमयी’, ‘मारवा’ असे एकेक काव्यसंग्रह. कल्पनेच्या राज्यातून प्रवास करत त्यांची कविता हळूहळू माणसाचा विचार करणारी होत जाते. ‘क्रांतीचा जयजयकार’ ‘पृथ्वीचे प्रेमगीत’, ‘कणा’ अशा कित्येक सुपरिचित कवितांपासून ते फारशा प्रसिद्ध नसलेल्या किंवा मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या कविता इतक्या वर्षांनंतरही ताज्या आहेत. अगदी त्या कितीही वेळा वाचल्या गेल्या किंवा सादर केल्या गेल्यात तरीही!

कवितांप्रमाणेच नाटकाच्या प्रांतातही त्यांनी मुशाफिरी केली. ‘राजमुकुट’, ‘कौंतेय’, ‘ययाति आणि देवयानी’, ‘वीज म्हणाली धरतीला’ आणि ‘शेक्सपिअरच्या जातीची शोकात्मिका’ असा गौरव प्राप्त झालेले ‘नटसम्राट!’ केव्हातरी शाळकरी वयात ‘वीज म्हणाली धरतीला’ वाचलेलं तेव्हापासून मनावर ठसलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई काही वर्षांनी महाविद्यालयीन वयात पुन्हा तेच नाटक वाचले तेव्हा अधिक गडद झाली.

भाषा मरता, देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे… असं म्हणणारे कुसुमाग्रज मराठीच्या संरक्षणाविषयी आणि संवर्धनाविषयी जागरूक होते. भाषा बंदिखान्यात वाढत नाही ती नदीसारखी प्रवाही असते, इतर प्रगत भाषांशी संपर्क ठेऊनच ती प्रगती करू शकते. जगातील सर्व प्रगल्भ भाषांना जे साधलं ते मराठीलाही साधता येईल. फक्त आपला विश्वास हवा, अमृताशीही पैजा जिंकणार्‍या आपल्या मायभाषेच्या क्षमतेवर. असे मत कुसुमाग्रजांनी 1989 साली मुंबईत भरलेल्या जागतिक मराठी परिषदेत त्यांच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले होते. मुंबईत भरलेल्या जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले तसेच 1964 साली मडगाव येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषविलं. ‘नटसम्राट’साठी त्यांना साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला आणि 1988 साली ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला.

त्यांच्या जन्मदिनी मराठीचा गौरव दिन साजरा केला जातो. मराठीचा सन्मान करताना आणि मराठीच्या आजच्या स्थितीकडे लक्ष वेधताना त्यांचे वाक्य आठवते ते म्हणजे ‘आपल्यासमोर प्रश्न इंग्रजीच्या बहिष्काराचा नसून मराठीच्या संवर्धनाचा आहे. भाषेच्या संवर्धनासाठी मराठीत उत्तमोत्तम ग्रंथनिर्मिती करणे, मराठीतील दुर्मिळ ग्रंथाचे डिजिटायझेशन करणे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करणे, जगातील उत्तमोत्तम कलाकृतींचे मराठीत अनुवाद करणे, विद्यापीठातील तसेच महाविद्यालयातील मराठी विभागांनी वेगवेगळे उपक्रम राबवून मराठीविषयी गोडी निर्माण करणे सध्या नितांत गरजेचे आहे. तोच खर्‍या अर्थाने कुसुमाग्रजांना अपेक्षित असलेला भाषेचा सन्मान आहे.

‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’ या त्यांच्या पुस्तकात कवी ग्रेस कुसुमाग्रजांविषयी म्हणतात, सरकार! तुम्ही तर निघून गेलात. कुठे गेलात? कलावंताना स्वर्ग, नरकात प्रवेश नाहीच. इथलीच माणसे सरळ उठून तिथे जातात ना! कलावंतांची वसाहत स्वर्ग-नरकाच्या वर असते तेथून ते स्वर्ग नरकातील पाप पुण्याची प्रेमळ नजरेने पाहणी करीत असतात. तीही शब्दशून्य मूकतेने.

— पूजा देविदास गिरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -