मराठी भाषा सौंदर्यवान !

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उपाख्य थोर नाटककार वि.वा. शिरवाडकर यांनी मराठी साहित्याच्या सर्वच प्रकारात मुशाफिरी केलेली दिसून येते. कविता, नाटक, कादंबरी, कथा, ललित निबंध असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळले असून मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली आहे. त्यातही सर्व साहित्य प्रकारांपैकी त्यांचे काव्य आणि नाटक हे दोन वाङ्मय प्रकार विशेष गाजले असून त्यांचा ठसा त्या काळातील मराठी जनमानसावर तर उमटलेला होताच, परंतु आजही नव्या पिढीवर त्यांच्या काव्यासह सर्वच वाङ्मयाचा प्रभाव जाणवतो, हा ठसा किंवा प्रभाव केवळ रसिकांच्या मनावर उमटलेला नाही तर कुसुमाग्रजांच्या सौंदर्य दृष्टीचा आणि लेखन शैलीचे संस्कार मराठी कवितेवर झालेले आहेत, असेही आढळून येते. कुसुमाग्रज यांच्याप्रमाणेच मराठी भाषेत अनेक लेखक, कवी, समीक्षक, नाटककार झाले. मराठी भाषेचे सौंदर्य हे मुळातच अभिजात आहे, त्याला कुणाच्या विशेषणांची गरज नाही. मराठी राजभाषा दिन तथा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी हा विशेष लेख.

मनुष्य हा सृष्टीतील, पृथ्वीतलावरील आणि अवकाशातील एक अणू-रेणू इतकाच छोटा प्राणी आहे, असे म्हटले जाते. त्याचे अस्तित्व जन्मापासून मृत्यूपर्यंतच असते, तेही फक्त त्याच्या स्वतःसाठी आणि त्याच्या सभोवती असलेल्या मोजक्याच लोकांनाच हे अस्तित्व जाणवत राहते. परंतु काही माणसे आपल्या कार्य- कर्तृत्वाने खूप मोठी होतात, आणि आकाशातही अगणित काळापर्यंत चमकत राहतात, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विषयीदेखील असेच म्हटले जाते. मराठी वाङ्मयात तर त्यांचे नाव अजरामर तर झालेले आहेच, परंतु नभांगण एका तार्‍याला कुसुमाग्रज यांचे नाव दिल्याने ते अधिकच प्रकाशमान झालेले आहे. त्यांचा मानसन्मान अनेकांनी केला. अनेक पुस्कार त्यांना मिळाले.

साहित्य म्हणजे वाङ्मय हा मानवी संस्कृतीचा म्हणा किंवा सर्वांगीण जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. तुम्हाला जगण्यासाठी जशा अन्न, वस्त्र या मूलभूत गरजा लागतात, तशा तुमच्या मनाची देखील एक गरज अथवा ऊर्मी असते. त्याला केवळ मनोरंजन असे म्हणता येणार नाही, तर माहिती आणि ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा असे म्हणता येईल. मराठी साहित्यातील कोणत्याही प्रकारचा विचार केला तर वाचकांचे मनोरंजन यापेक्षा जनमानसाची जिज्ञासा पूर्ण करून त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे, त्याचा मनोविकास करणे अशा प्रकारचे कार्य राहिले आहे.

सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत, या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल, परंतु मुळातच मराठी भाषा ही अभिजात आहे, त्यावर फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे, हे निश्चितच नमुद करावेसे वाटते, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहेत त्या करिता अभिजात मराठीसाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या ज्येष्ठ लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या समितीमध्ये ख्यातनाम भाषा वैज्ञानिक प्रा.कल्याण काळे, प्रा.श्रीकांत बहुलकर, प्रा. मैत्रेयी देशपांडे, प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. आनंद उबाळे, प्रा.मधुकर वाकोडे, परशुराम पाटील असे तज्ज्ञ आहेत.

यात तज्ज्ञ समितीने सुमारे दहा वर्षे भांडारकर संस्थेत आणि अन्यत्र चौफेर अभ्यास करून सुमारे 440 पानांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. तो सरकारने छाननी व तपासणीसाठी साहित्य अकादमीकडे पाठवला. साहित्य अकादमीने नियुक्त केलेल्या जागतिक पातळीवरील सर्व भाषा वैज्ञानिकांनी हा अहवाल तपासला आणि त्याला लेखी मान्यताही दिली, पण अद्याप कार्यवाही झालेली नाही, हे खेदाने नमूद करावे लागते.

खरे म्हणजे मराठी भाषा ही खूप जुनी आहे हे सांगण्याची वारंवार गरज का पडावी हा प्रश्न निर्माण होतो? कारण अनेक शिलालेख दस्तऐवज जुने दस्तऐवज ताम्रपत्र पोथ्या बखर ऐतिहासिक पत्रे यामध्ये मराठी ही खूप जुनी भाषा असल्याचे दाखले मिळतात. इतकेच नव्हे तर सन 1932 मध्ये मराठीतील तत्कालीन लेखक आणि इतिहास संशोधक ल.रा.पांगारकर यांनी लिहिलेल्या मराठी साहित्याचा इतिहास या ग्रंथात महाराष्ट्री प्राकृत हे मराठीचंच आधीचे रूप आहे हे सप्रमाण मांडलेले दिसून येते याशिवाय संशोधक राजाराम शास्त्री भागवत आणि प्राचीन महाराष्ट्र संशोधक व कोषकार डॉ. श्री.व्यं.केतकर यांच्या अनेक ग्रंथात मराठी भाषा अन्य भाषांच्या तुलनेत खूप जुनी असल्याचे दाखले मिळतात. तसेच प्राचीन महारठ्ठी, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी असा मराठी भाषेचा प्रवास आहे.

1932 साली प्रसिद्ध विद्वान पांगारकर यांनी महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगवेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची वेगवेगळ्या काळातील तीन नावे आहेत असे सप्रमाण सिद्ध केले आहे. अक्षी येथील इ.स. 1012 चा देवनागरीतील मराठी शिलालेख हा श्रवणबेळगोळच्या आधीचा आहे. नाणेघाटातील 2200 वर्षांपूर्वीचा ब्राह्मीतील शिलालेख हा आजपर्यंत सापडलेला सर्वांत प्राचीन मराठी (महाराष्ट्री) शिलालेख आहे. त्यानुसार ‘गाथासप्तशती’ हा महाराष्ट्री प्राकृतातील अर्थात मराठीतीलच ग्रंथ आहे. गाथासप्तशती तिसर्‍या शतकातील ग्रंथ आहे, त्यानंतर श्रवणबेळेगोळचा शिलालेख, नंतर संतसाहित्य असा मराठीचा प्रवास सर्वांना परिचित आहे; तसेच मधल्या सात-आठशे वर्षात हाल, पादलिप्त, प्रवरसेन, हरीभद्र, उद्योतन सुरी असे अनेक मराठी लेखक मधल्या काळात झालेले आहेत. अभिजात अहवालामध्ये या संदर्भग्रंथ, हस्तलिखितांची प्रमाणे दिलेली आहेत.

महानुभव पंथाचे संस्थापक तथा प्रवर्तक मानले जाणारे श्री चक्रधर स्वामी यांनी बाराव्या शतकाच्या प्रारंभी या पंथाचा पाया रचला, इतकेच नव्हे तर ग्लानी आलेल्या तत्कालीन समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचे सामाजिक कार्य श्री चक्रधरस्वामी यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्रात परिभ्रमण करीत असताना त्यांनी तेथील समाज जीवनाची पाहणी केली, तद्वतच मराठी भाषेचा अंगीकार केला. त्या काळात राजकारण, धर्मकारण आणि उच्च समाजाचे समाजकारण म्हणजे सामाजिक व्यवहार हे संस्कृत भाषेत चालत असत, मात्र महाराष्ट्रात सर्वसामान्यांची बोलीभाषा ही मराठी होती. त्यावेळी समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्था बळकट झालेली होती. जातीपातीच्या नावावर समाजात विषमता, स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव या विषयाला महत्व दिले जात होते. अशा वेळी त्या काळात सर्वप्रथम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी मराठी भाषेचा आपल्या निरुपणासाठी उपयोग केला.

श्री चक्रधर स्वामी सर्वसामान्य भाविकांना ज्ञानोपदेशासाठी मराठी भाषेचा उपयोग करीत ही घटना तात्कालीनदृष्ठ्या क्रांतिकारक होती. कारण त्या काळात ज्ञानभाषा ही संस्कृत मानली जात होती. परंतु सर्व परंपरा मोडीत स्वामींनी मराठीचा उपयोग केला म्हणून ही गोष्ट धर्म-पंथ अभ्यासक आणि मराठी संशोधकांनादेखील क्रांतिकारी वाटते. मराठी त्या काळातील सर्वसामान्य जनतेची नित्याची बोलीभाषा होती. एरवी संस्कृतमध्ये पंडितांसमवेत वादविवाद करण्याचे सामर्थ्य स्वामींमध्ये होते, तथापि नित्याच्या व्यवहारात नव्हे तर उपदेश वगैरे करतानाही ते मराठीचा उपयोग करीत, यात एक विशिष्ट धोरण होते, ते म्हणजे सर्वसामान्य जनतेला धर्मज्ञानाचा बोध व्हावा, हा त्यामागचा सामाजिक दृष्टिकोन होता.

जनतेच्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी जनतेच्याच भाषेचा उपयोग करायला हवा, हे स्वामींचे धोरण होते. श्री चक्रधर स्वामींनंतरदेखील महानुभाव पंथात ते धोरण आणि कार्य पुढे निरंतर सुरू राहिले. त्यातून पुढील काळात आचार-विचार, धर्मचर्चा, मंथन, चिंतन-मनन यातून मोठी ग्रंथसंपदा निर्माण झाली, हेच मराठी भाषेचे वैभव आहे. मराठी वाङ्मयात मोलाची भर टाकणार्‍या महानुभाव पंथातील ग्रंथांनी सामाजिक कार्यात मोठे परिवर्तन केले आहे, किंबहुना मोठी क्रांती केली आहे. धर्म-पंथ हा सर्वांचा असून स्त्री-पुरुष समानता, जातीप्रथेला विरोध अशा अनेक सामाजिक कार्यात महानुभाव पंथ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. या विचारांमागे चक्रधर स्वामी यांची मोठी प्रेरणा दिसून येते.

खरे म्हणजे मराठी भाषा चळवळीचा इतिहास महाराजा सयाजीरावांच्या अभ्यासाशिवाय अपूर्ण राहतो. मराठी भाषेला संलग्न असा पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास आपण फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांच्या नावाने गेली 40 वर्षे आपण मोठ्या अभिमानाने सांगितला. परंतु या तिन्ही महापुरुषांना गुरुस्थानी असणार्‍या महाराजा सयाजीरावांच्या अभ्यासाची गरज आज तीव्र झाली आहे. कारण सयाजीरावांच्या चरित्रात पुरोगामी महाराष्ट्राचा पूर्वार्ध लपला आहे. म्हणूनच आज महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिवशी महाराजा सयाजीराव व महात्मा फुले यांच्या नात्याचा इतिहास समजून घेणे उद्बोधक ठरेल. आपल्या प्राचीन मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने प्राचीन ग्रंथाच्या हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह, संरक्षण आणि संपादन करण्याचे महत्व महाराज सयाजीराव यांनी जाणले होते.

सन 1887 च्या पहिल्या युरोप दौर्‍यात सयाजीरावांनी दुर्मिळ संस्कृत हस्तलिखिते जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 1893 मध्ये बडोद्यातील विठ्ठल मंदिरातील संस्कृत हस्तलिखितांचा संग्रह करण्यात आला. प्रारंभी पाटण आदी ठिकाणी जावून हस्तलिखितांचे अध्ययन, संकलन व अनुवादाची जबाबदारी महाराजांनी मणिभाई, नभुभाई द्विवेदी, अनंतकृष्ण शास्त्री यांच्यावर सोपविली. महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची शाळा सुरू केली हे देखील मराठी भाषेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविण्याची घटना आहे, त्यातच आणखी विशेष म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पहिला महिला शिक्षिका होत्या आणि त्या मराठीतून मुलींना शिकवत होत्या ही घटना देखील अत्यंत गौरवाची मराठी भाषेसाठी अत्यंत गौरवाची आणि ऐतिहासिक असेच म्हणता येईल. विविध भाषातज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी यांनी अनेक भाषांचा अभ्यास केला असून भारतातील अनेक बोली भाषा लोप पावत असल्याचे मत मांडले आहे. खरे म्हणजे प्रा. गणेश देवी हे जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ असून त्यांनी मराठी ही जगातील 6व्या क्रमांकाची समृद्ध आणि प्राचीन भाषा आहे, असे म्हटले आहे.

तसेच मराठी भाषा कशी विकसित होत गेली, याचा गौरवपूर्ण उल्लेख गणेश देवी यांनी केलेला आहे, त्यांच्या मते, मराठी भाषेची सांस्कृतिक व सामाजिक शक्ती वाढविणे जसे गरजेचे आहे, तसेच आर्थिक शक्ती वाढवणेदेखील आवश्यक आहे. त्याशिवाय मराठी भाषा वाढणार नाही. भाषा वाढवण्यासाठी आर्थिक शक्ती किंवा आर्थिक बाब अत्यंत महत्त्वाची आहे. भाषा ही लोकांच्या व्यवसायाची बनली पाहिजे. भाषा जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला तिला लोकांच्या व्यवसायाशी जोडण्याची गरज आहे, असेही डॉ. देवी स्पष्ट करतात. त्याचप्रमाणे भाषा टिकवायची असेल तर काय करावे याबाबत विश्लेषण करताना डॉ. गणेश देवी म्हणतात की, भाषा शब्द आणि वाक्यांनी बनते. संवादासाठी निर्माण करण्यात आलेली सामाजिक व्यवस्था म्हणजे भाषा होय, तिची तोडफोड करून कोणत्याच भाषेचं भलं होत नाही. मात्र भाषा जगवायची असेल, टिकवायची असेल तर भाषेवर काम करावे लागेल. उग्र प्रतिक्रिया आणि तोडफोड करून कोणाचा फायदा नाही, उलट नुकसान आहे, तसेच भाषेवर होणारे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यांच्याकडे खरोखर काहीच मुद्दे नसतात ते असे मुद्दे शोधून राजकारण करतात. भाषेचा राजकीय फायद्यासाठी उपयोग दुर्दैवी म्हणावा लागेल. असेही त्यांनी खेदाने नमूद केले.

खरे म्हणजे मराठी भाषा ही सौंदर्याचे लेणे आहे, तिला कुणाच्या विशेषणाची, पुरस्काराची किंवा गर्व गौरवाचीदेखील गरज नाही असे स्पष्टपणे सांगावेसे वाटते. कारण मराठी भाषा ही मुळातच अवीट गोड असलेली आहे, म्हणूनच ‘माझ्या मराठीची गोडी अवीट…’ असे कविराज म्हणतात. तिच्या प्राचीन तत्वाचे पुरावे देणारे राजाराम शास्त्री भागवत, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, दुर्गा भागवत आदी सारेच लोक तज्ज्ञ होते तरीही, मग केवळ अभिजात हा शब्द जोडण्यासाठी इतका विलंब का याचा संताप होणे साहजिक आहे. खरे म्हणजे हा महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेर भारतात आणि जगभरात राहणार्‍या 12 कोटी मराठी भाषिक नागरिकांचा अपमान आहे, असे सखेद नमूद करावे लागते.

–नलिनी पाटील-बाविस्कर