घरफिचर्ससारांशकित्तूरची वीरांगना राणी चन्नम्मा

कित्तूरची वीरांगना राणी चन्नम्मा

Subscribe

कित्तूर संस्थान छोटेसे आहे. आपण ते सहज जिंकू, असं ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी मिस्टर थ्याकरे याला वाटलं, परंतु कित्तूरचा अखेरचा माणूस जिवंत असेपर्यंत कित्तूर लढत राहील, असे चन्नमाने आपल्या सैनिकांना सांगितले. मोठ्या सैन्यासह थ्याकरे कित्तूरवर चालून आला. त्याचवेळी राणी चन्नमाचे घोडदळ विजेच्या चपळाईने बाहेर आले आणि इंग्रजांच्या फौजेवर तुटून पडले. राणी चन्नम्मा तिच्या ‘तेज’ घोड्यावर स्वार होती. एका हातात नंगी समशेर तर दुसर्‍या हातात घोड्याचा लगाम. तिच्या अंगात जणू काही वीरश्री संचारली होती. अनेक इंग्रज अधिकारी मारले गेले. तसेच उन्मत्त थ्याकरेच्या छातीत गोळी घुसून तोही मरण पावला आणि राणी चन्नम्मा आणि तिचा गड अजिंक्य ठरला.

– पुष्पा गोटखिंडीकर

कित्तूर संस्थानचा राजा मल्लसर्जा हा ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी सर्व संस्थानिक, सरदार यांना भेटण्याच्या मोहिमेवर होता. यासाठी तो बेळगावजवळील काकती गावात पोहचला. कित्तूरचा राजा आपल्या गावात आला आहे हे समजताच त्याला भेटायला गावकर्‍यांनी गर्दी केली. बोलता बोलता एक गावकरी म्हणाला, आमच्या गावात एक नरभक्षक वाघ शिरला आहे. आपण आपल्या पराक्रमाने त्याची शिकार करावी आणि आम्हाला संकटमुक्त करावे. हे ऐकताच राजा शिकारीसाठी गेला आणि गर्द झाडामागे लपलेल्या वाघावर अचूक नेम धरून बाण सोडला आणि एका बाणातच तो नरभक्षक वाघ गतप्राण झाला. मारलेला वाघ पाहण्यासाठी राजा जवळ गेला आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या वाघाजवळ एक शस्त्रसज्ज, सुंदर युवती उभी होती. राजाला ती म्हणाली, वाघ मी मारला आहे. राजा म्हणाला, मी माझ्या बाणाने मारला आहे. मल्लसर्जाने वाघाकडे पाहिले, त्याच्या शरीरात दोन बाण घुसले होते.

- Advertisement -

मल्लसर्जाने त्या युवतीची ओळख करून घेतली. ती साहसी तरुणी धुळप्पा देसाईंची कन्या चन्नम्मा आहे हे कळताच त्याला आनंद झाला. कारण तो धुळप्पा देसाईंना भेटण्यासाठीच गेला होता. दोघांची काही काळ राजकारणावर बोलणी झाली. चन्नम्माच्या सौंदर्याने आकर्षित झालेल्या मल्लसर्जाने चन्नम्माशी विवाह करण्याची इच्छा तिच्या वडिलांजवळ व्यक्त केली. मल्लसर्जासारखा गुणी, संपन्न राजा आपला जावई होणार या कल्पनेने धुळप्पा देसाई आनंदित झाले.

मल्लसर्जाचा एक विवाह रुद्रमाबरोबर झाला आहे हे कळूनही चन्नम्माने त्याची दुसरी पत्नी होण्यास संमती दिली आणि मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला आणि चन्नम्मा कित्तूर संस्थानची राणी झाली. अशा या चन्नमाचा जन्म बेळगावजवळील काकती येथील धुळप्पा देसाई आणि त्यांची पत्नी पद्मावती यांच्या पोटी 1778 मध्ये झाला. तिचं शिक्षण घराण्यातील रिवाजाप्रमाणे धार्मिक मठात झाले. चन्नम्मा मुळातच बुद्धिमान असल्यामुळे ती मातृभाषा कन्नडबरोबर मराठी व उर्दू भाषाही शिकली. धार्मिक शिक्षणाबरोबर वडिलांनी तिला शस्त्रविद्या शिकवली. घोडदौड, दांडपट्टा, भालाफेक या खेळात ती निपुण झाली. घोड्यावर टाच मारून ती रानोमाळ फिरत असे. तलवारबाजी, नेमबाजीतही ती तरबेज होती. मल्लसर्जा राजाच्या रुद्रम्मा आणि चन्नम्मा या दोन्ही बायकांचा पतीच्या सहवासात संसार सुखाचा चालला होता. थोड्याच दिवसांत चन्नम्माला मुलगा झाला. त्याचे नाव ठेवले शिवबसवराज, परंतु तो अल्पायुषी ठरला. पुत्र वियोगाने चन्नम्मा खूपच दुःखी झाली, परंतु त्यातून सावल्यावर तिने रुद्रमाच्या मुलावर शिवलिंग रुद्रसर्जावर पोटच्या मुलाइतकेच प्रेम केले. चन्नम्माला राज्यकारभारात रस होता. ती अत्यंत प्रजाहितदक्ष होती. सरकारी कामकाजात पतीबरोबर दरबारात बसत असे. पतीच्या मोहिमांत आणि लढायांमध्ये तिने पतीला साथ दिली. ती मल्लसर्जाची पत्नी तर होतीच पण सखी आणि मार्गदर्शकही होती.

- Advertisement -

सर्वकाही सुखा समाधानात चालले असताना चन्नम्मावर पती निधनाचं संकट कोसळलं. मल्लसर्जाच्या मृत्यूनंतर रुद्रमाचा मुलगा शिवलिंग रुद्रसर्जा गादीवर बसला. वैधव्याचे दुःख विसरून चन्नम्मा त्याच्या पाठीशी राजकीय सल्लागार म्हणून खंबीरपणे उभी राहिली. रुद्रसर्जाला मूलबाळ नव्हते. आपल्या माघारी कित्तूरची गादी चालू राहावी म्हणून त्याने चन्नम्माच्या संमतीने एक मुलगा दत्तक घेतला, परंतु दुर्दैव असे की दुसर्‍याच दिवशी रुद्रसर्जाची जीवन ज्योत मालवली. बाराव्या शतकापासून प्रसिद्ध असलेले कित्तूर गाव हे निसर्गसंपन्न आणि समृद्ध असे होते. अनेकांनी कित्तूर जिंकण्याचा प्रयत्न केला, पण कुणालाही ते शक्य झालं नाही. एका इंग्रजांशिवाय कित्तूरचा किल्ला कोणालाही जिंकता आला नाही. इंग्रजांनी किल्ला जिंकला खरा पण त्यासाठी त्यांना जबरदस्त किंमत द्यावी लागली. एका शूर भारतीय वीरांगनाने अपूर्व धैर्य, संघटन चातुर्य आणि चिकाटी दाखवून किल्ला शेवटपर्यंत लढवला. ती वीरांगना म्हणजे राणी चन्नम्मा होय.

रुद्रसर्जाने दत्तक घेतलेला मुलगा वयाने लहान असल्यामुळे राणी चन्नम्मा त्याच्या वतीने राज्यकारभार पाहू लागली. त्याचवेळी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी मिस्टर थ्याकरे हा धारवाडचा कलेक्टर होता. कित्तूर संस्थान खालसा करण्याची त्याला आता सुवर्णसंधी चालून आली होती. दत्तक विधान हे बेकायदेशीर असून ते संस्थान खालसा करण्याचा त्याने प्रयत्न सुरू केला. कित्तूर संस्थान छोटेसे आहे. आपण ते सहज जिंकू असं थ्याकरेला वाटलं, परंतु कित्तूरचा अखेरचा माणूस जिवंत असेपर्यंत कित्तूर लढत राहील, असे चन्नम्माने आपल्या सैनिकांना सांगितले. मोठ्या सैन्यासह थ्याकरे कित्तूरवर चालून आला. त्याचवेळी राणी चन्नम्माचे घोडदळ विजेच्या चपळाईने बाहेर आले आणि इंग्रजांच्या फौजेवर तुटून पडले. राणी चन्नम्मा तिच्या ‘तेज’ घोड्यावर स्वार होती. एका हातात नंगी समशेर तर दुसर्‍या हातात घोड्याचा लगाम. तिच्या अंगात जणू काही वीरश्री संचारली होती. अनेक इंग्रज अधिकारी मारले गेले. तसेच उन्मत्त थ्याकरेच्या छातीत गोळी घुसून तोही मरण पावला आणि राणी चन्नम्मा आणि तिचा गड अजिंक्य ठरला.

एका स्त्रीच्या हातून झालेला हा पराभव इंग्रजांना चांगलाच झोंबला आणि ते पुन्हा प्रचंड सैन्यानिशी कित्तूरवर चाल करून गेले. कित्तूरवर ब्रिटिशांनी युनियन जॅक फडकवला. राणी चन्नम्मा आणि तिच्या कुटुंबीयांना कैदी म्हणून बेलहोंगलच्या किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले. कित्तूरच्या मुक्ततेचे स्वप्न पाहणारी राणी चन्नम्मा 2 फेब्रुवारी 1829 रोजी कैदेतच मरण पावली. स्त्री ही अबला नाही हे राणी चन्नम्माने तिच्या कर्तत्वाने, स्वपराक्रमाने दाखवून दिले. क्रांतीची ज्योत सर्व भारतीयांच्या मनात चेतवण्याची तिने केलेली कामगिरी अतुलनीय आहे. स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा देणार्‍या राणी चन्नम्माला लाख लाख प्रणाम.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -