घरफिचर्ससारांशखरंच नवदुर्गा?

खरंच नवदुर्गा?

Subscribe

नवरात्रात सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीला खरंच तिच्या घरात कायमस्वरूपी देवीचा दर्जा, देवीसारखाच आदर मिळतोय का? हा आजचा विचारमंथनाचा मुद्दा ठरावा. घरातील लक्ष्मीरूपी सुनेने, मुलीने, आईने, घरातील महिलेने प्रत्येक नवरात्र कसं व्यवस्थित करावं, त्यासाठी काय काय तयारी करावी, काय खरेदी करावी, कोणत्या रीतीभाती, कुलाचार, कुलधर्म, पूर्वापार चालत आलेल्या पद्धती पाळाव्यात, सगळ्या कुटुंबात कसं मिळून मिसळून हा सण साजरा करावा याबाबत तिला अनेक उपदेश केले जातात आणि अपेक्षादेखील ठेवल्या जातात, पण मग तिला देवीसारखा सन्मान का मिळत नाही?

–मीनाक्षी जगदाळे

अगदी एक वर्षाच्या लहान कुमारिकेपासून ते वयस्कर महिलेपर्यंत प्रत्येक स्त्रीला वंदन करणारं हे नवरात्र. हे सर्व करण्यासाठी, अमलात आणण्यासाठी घरोघरी लेकी सुना काटेकोर नियम पाळणे, अहोरात्र मेहनत घेणे, देवीच्या कृपेने, आशीर्वादाने तरी आपल्या आयुष्यातील दुःख कमी होतील या भाबड्या अपेक्षेने स्वतःची प्रचंड धावपळ, दगदग करीत असतात. आपल्या प्रापंचिक प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी, मुलाबाळांसाठी, अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी अत्यंत मनोभावे स्वतःला दहा दिवस देवीच्या सेवेत झोकून देतात.

- Advertisement -

घरोघरी अतीव आनंदाने, उत्साहाने, श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जाणारा सण. खासकरून स्त्रीशक्तीला अभिवादन करणारा, स्त्रीशक्तीचा महिमा वर्णन करणारा आणि स्त्रीला देवीचं रूप समजून तिचा आदर, पूजाअर्चना करण्याचे दिवस. नवरात्र म्हणजे घरगुती स्वरूपातच नाही तर सामाजिक स्तरावरदेखील मंडळांमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, स्पर्धा, दांडिया, होमहवन, पूजापाठ यामुळे वातावरण चैतन्यमय झालेले असते. या नऊ दिवसांत प्रत्येकाला जाणीव होते की स्त्री शक्ती आहे, स्त्री भक्ती आहे, स्त्रीला नाना उपमा, उपाध्या देऊन तिला विविध पुरस्कार, विविध सन्मान बहाल केले जातात. स्त्रीचं महात्म्य सांगणारं भाषण प्रत्येक पुरुष या कालावधीमध्ये करीत असतो, पण प्रत्येक पुरुष व्यासपीठावर त्याच्या भाषणात स्त्रीबद्दल जे बोलतो तसेच त्याच्या घरात तो वागतो का? हा खूप मोठा मजेशीर विषय आहे.

अतिउत्साहाने, हसतमुखाने महिलादेखील सर्व कार्यक्रमांत हजेरी लावतात. स्वतःमधील आत्मविश्वास पुन्हा रिचार्ज होतो. पुन्हा नव्याने स्त्री कामाला लागते. याबरोबरच घरोघरी घटस्थापना, त्यामधील शास्त्रीय विधी, विविध रंगांच्या साड्या, दागदागिने परिधान करणे, गरबा खेळणे, त्यात फोटो सेशन, सेल्फीचा आनंद घेणे, उपवास करणे, यथाशक्ती देवींची साधना करणे यातदेखील ती स्वतःला गुंतवून घेते. कुठेतरी स्वतःचा मानसिक त्रास, नैराश्य, अपमान, अवहेलना लपवण्यासाठी, स्वतःची कर्मकहाणी जगाला दाखवून आणि सांगून तरी काय उपयोग या भावनेतून तीसुद्धा मुखवटा धारण करून रंगमंचावरील कलाकार बनून जाते.

- Advertisement -

खोलवर विचार केला तर नवरात्रात बहुतांश जणी हाच विचार करीत असतात की निदान आता तरी आपल्या प्रापंचिक परिस्थितीमध्ये काही चांगला, सकारात्मक बदल होईल. आपल्या अडचणी दूर होतील. आपल्या घरात आपल्याला मान-सन्मान मिळेल. गृहकलह थांबतील, वाद मिटतील. आपल्या नवर्‍याला, सासरच्यांना आपली जाणीव होईल. आपल्याला आपल्या नवर्‍याचे प्रेम मिळेल. सासरी होणारा मानसिक त्रास थांबेल. अनेक महिला अशी भाबडी आशा मनात ठेवून सर्व कार्यक्रम यथासांग पार पाडताना दिसतात. अनेक जणी मनोमनी देवीला तसा नवस बोलतात, साकडं घालतात. अनेक जणी नवरात्रात मनातलं दुःख आणि डोळ्यातलं पाणी न दाखवता रोजच्या रंगांशी स्पर्धा करीत, स्वतःचे फोटो सामाजिक माध्यमांतून शेअर करीत सणाचा आनंद घेताना दिसतात.

आजही अनेक घरांमध्ये महिलांप्रति अन्याय, अत्याचार, त्यांना वागवताना राक्षसी वृत्ती, रानटी विचार, घरातील सुनांना घरातून मिळणारी राक्षसी वागणूक ही व्यथा कायम आहे. तोच मानसिक, भावनिक, शारीरिक रूपाने छळणारा मनुष्यरूपी राक्षस जिवंत आहे. स्त्रीवर लादले जाणारे चुकीचे प्रसंग, तिच्या भावनांशी खेळणं, तिचा पदोपदी होणारा अपमान, तिला मिळणारा मनस्ताप आताही अस्तित्वात असल्याचे दिसते. स्त्री उच्चशिक्षित असो वा अडाणी, कमवणारी असो वा गृहिणी, गरीब असो वा श्रीमंत तिच्या वाटेला येणारी उपेक्षा काही कमी होत नाही.

स्त्रीचं बाह्यरूप तिने कितीही रंगीबेरंगी साड्यांनी, मेकअपने, भारी भारी फॅशन करून सजवलं आणि मिरवलं तरी तिचं अंतर्मन तितकंच प्रफुल्लित आहे का? ती आतूनदेखील तितकीच सुखी समाधानी आणि आनंदी आहे का हे तिला कोण विचारतं? तिचा संसार तिच्या स्वप्नांना वाव देणारा आहे का? तिच्या घरात तिच्या संसारात तिची जागा काय आहे? यावर कोण विचार करतं. तिच्या मनातील सल समजून घेऊन त्यावर उपाय कोण करतं? तिचा त्रास दूर करण्यासाठी पुढे कोण येतं? आलंच कोणी पुढे तर त्याला कितपत यश येतं?

एक स्त्री म्हणून तिच्या आत्मसन्मानाची किंमत कोण ठेवतं? तिच्या मतांना, निर्णयांना, भावनांना न्याय कोण देतं? तिचा घरात अपमान होणार नाही, ती दुखावली जाणार नाही याची जबाबदारी कोण घेतं? या प्रश्नांची जर अनेक महिलांनी मनापासून खरीखरी उत्तरे द्यायची ठरवली तर उत्तर कोणीच नाही हेच येणार यात शंका नाही.

नवरात्र उत्सवात फक्त नावाला स्त्रीचे गुणगान गाऊन, तिचं कौतुक करून तूच कर्ती-धर्ती, तू गृहलक्ष्मी, तू सौभाग्यवती, तू धर्मपत्नी, तू शक्ती, तू महती अशी विविध लेबल लावून महिलांना तिच्या दुःखाचा तात्पुरता विसर पडायला नक्कीच मदत होते, परंतु या तात्पुरत्या, वरवरच्या स्तुतीने तिच्या आयुष्यात आलेले नकोसे विषय, तिचा कौटुंबिक त्रास, तिच्या आयुष्यातील संघर्ष संपतो का? तिचं प्रापंचिक, वैयक्तिक ध्येय साध्य होतं का? वरवर तिच्या मनावर केलेली ही मलमपट्टी, खरंच असं वागत असाल तर नवरात्र करूच नका.

नवरात्रात सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीला खरंच तिच्या घरात कायमस्वरूपी देवीचा दर्जा, देवीसारखाच आदर मिळतोय का? हा आजच्या लेखामधील विचारमंथनाचा मुद्दा आहे. घरातील लक्ष्मीरूपी सुनेने, मुलीने, आईने, घरातील महिलेने प्रत्येक नवरात्र कसं व्यवस्थित करावं, त्यासाठी काय काय तयारी करावी, काय खरेदी करावी, कोणत्या रीतीभाती, कुलाचार, कुलधर्म, पूर्वापार चालत आलेल्या पद्धती पाळाव्यात, सगळ्या कुटुंबात कसं मिळून मिसळून हा सण साजरा करावा याबाबत तिला अनेक उपदेश केले जातात आणि अपेक्षादेखील ठेवल्या जातात. अगदी एका वर्षाच्या लहान कुमारिकेपासून ते वयस्कर महिलेपर्यंत प्रत्येक स्त्रीजन्माला वंदन करणारं हे नवरात्र. हे सर्व करण्यासाठी, अमलात आणण्यासाठी घरोघरी लेकी सुना काटेकोर नियम पाळणे, अहोरात्र मेहनत घेणे, देवीच्या कृपेने, आशीर्वादाने तरी आपल्या आयुष्यातील दुःख कमी होतील या भाबड्या अपेक्षेने स्वतःची प्रचंड धावपळ आणि दगदग करीत असतात.

नवरात्र घरोघरी अतीव आनंदाने, उत्साहाने, श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जाणारा सण. खासकरुन स्त्रीशक्तीला अभिवादन करणारा, स्त्रीशक्तीचा महिमा वर्णन करणारा आणि स्त्रीला देवीचं रूप समजून तिचा आदर, पूजाअर्चना करण्याचे दिवस. नवरात्र म्हणजे घरगुती स्वरूपातच नाही तर सामाजिक स्तरावरदेखील, मंडळांमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, स्पर्धा, दांडिया, होमहवन, पूजापाठ यामुळे वातावरण चैतन्यमय झालेले असते. या नऊ दिवसांत प्रत्येकाला जाणीव होते की स्त्री शक्ती आहे, स्त्री भक्ती आहे, स्त्रीला नाना उपमा, उपाध्या देऊन तिला विविध पुरस्कार, विविध सन्मान बहाल केले जातात. स्त्रीचं महात्म्य सांगणारं भाषण प्रत्येक जण या कालावधीत करीत असतो, पण प्रत्येक पुरुष व्यासपीठावर त्याच्या भाषणात स्त्रीबद्दल जे बोलतो तसेच त्याच्या घरात तो वागतो का? हा खूप मोठा मजेशीर विषय आहे.

मुळात घरातील महिलांच्या या परिस्थिती ला फक्त पुरुष जबाबदार कधीच नसतो तर इतर महिला देखील एकमेकांना कमी लेखणे, एकमेकींना घालून पाडून बोलणे, चहाड्या चुगल्या करणे, एकमेकींची निंदा करणे यात आघाडीवर असतात.

महिलाच महिलांना किंमत देत नाहीत. त्याच एकमेकींना समजावून सांभाळून घेत नाहीत त्यांनाच एकमेकींबद्दल आपुलकी, प्रेम आस्था नाही तर कश्याला करता नवरात्री मध्ये उपवास? घरातल्या लेकी सुनांच्या डोळ्यात जर तुमच्या मुळे पाणी येत असेल तर कश्याला करता सकाळ संध्याकाळ आरत्या??? एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीच्या वेदनेचे कारण बनत असेल तिचा जीव रोज जळत असेल तर तुम्हाला देवी समोर केलेल्या होमाचे आणि त्यात जळणार्‍या समिधांचे काय फळ मिळणार आहे? एकाबाजूला जप तप साधना ध्यान धारणा करायची आणि दुसर्‍या बाजूला घरातील स्त्री चा अवमान करायचा यात महिलाच अग्रेसर असल्याचे दिसतात.

एका स्त्री ने दुसर्‍या स्त्री बद्दल मनात तिरस्कार, राग, चीड, द्वेष, सूड भावना, चुकीचे विचार ठेऊन देवीला कितीही पूजल तरी ती कधीच प्रसन्न होणार नाही. देवी तुमच्या घरात फक्त नऊ दिवस नाही तर वर्षभर आहे चोवीस तास आहे जी तुमची सून आहे, लेक आहे, बहीण आहे पण आपल्या संकुचित वृत्तीला हे वास्तव स्वीकारायचं नाही. एकमेकींना दोष देणार्‍या महिला, एकमेकींवार आरोप करणार्‍या महिला महिला पहिल्या कि असं वाटतं खरच यांना दुर्गा सप्तशती किंवा देवी महात्म्य समजलं आहे का???? निदान त्यांनी ते खरच मनःपूर्वक वाचून अभ्यासल आहे का?

या नवरात्रात आपण हा विचार जरूर करावा की आपल्या घरातील कोणतीही स्त्री जर अंतःकरणातून सुखी, समाधानी नसेल, फक्त तडजोड म्हणून आयुष्य जगत असेल, तिला तिचं अस्तित्व नसेल, तिचं मन मारून ती दुःख पचवत असेल, ती तिच्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित असेल, तिला तिचं स्थान मिळत नसेल तर आपण नवरात्रात कितीही वेळा कितीही देवींची पूजा, उपवास, साधना आणि प्रार्थना केली तरीही देवी आपल्याला इच्छित फळ देईल का? ती आपल्याला शुभ आशीर्वाद देईल का? आपल्या घरातील दैवी शक्तीला म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीला अंधारात ठेऊन, त्रासात ठेऊन आपण देवीच्या मूर्तीसमोर कितीही दिवस दिवा जाळला तर आपल्या आयुष्यात प्रकाश पडेल का? या विषयावर विचार होणे अपेक्षित आहे.

आजच्या कलियुगात स्त्रीला देवी म्हणून नाही, पण निदान माणूस म्हणून वागणूक मिळणं आवश्यक आहे असे वाटते. निदान प्रत्येक स्त्रीला तिचे मूलभूत हक्क अधिकार मिळतील, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून तिला तिच्या नात्याप्रती असलेलं अस्तित्व मिळेल, ओळख मिळेल, मान सन्मान मिळेल इतका प्रयत्न आपण करू शकतो. कोणत्याही स्त्रीचा अवमान होणार नाही, ती आपल्यासोबत सुरक्षित राहील, तिला कधीच आत्महत्या करावीशी वाटणार नाही, ती एकटी पडणार नाही, तिला कधीच आयुष्याचा कंटाळा येणार नाही, तिची घुसमट होणार नाही यासाठी आपण नवरात्रीपासून प्रयत्न करूयात.

कोणत्याही स्त्रीला लाचारी पत्कारावी लागणार नाही, हतबल व्हावं लागणार नाही, मजबुरीमुळे कोणत्याही स्त्रीला तिच्या चारित्र्याशी तडजोड करावी लागणार नाही, समाज तिच्या दुःखाच भांडवल करुन तिचा गैरफायदा घेणार नाही, तिच्या वर होणारे शारीरिक, मानसिक बलात्कार थांबतील, तिची पिळवणूक, फसवणूक थांबेल, तिच्यावर होणारे प्राणघातक हल्ले बंद होतील, तिला खोटं आमिष दाखवलं जाणार नाही या सर्व बाबींची दखल घेऊन जर येत्या नवरात्रीपासून आपण काम केलं तर निश्चितच ती आदिमाया, आदिशक्तीची खरी पूजा असेल आणि त्यातून आपल्याला प्रसादरूपी जो आशीर्वाद मिळेल तो नक्कीच आपलं कल्याण करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -